Ticker

6/recent/ticker-posts

किल्ले (भाग- ५) : व्यवस्था आणि पेशवेकालीन किल्ले

किल्ले (भाग- ५) : व्यवस्था आणि पेशवेकालीन किल्ले


आपण भाग एक ते पाच मध्ये किल्ल्यांविषयी खूप काही माहिती मिळवली. ते जर तुम्ही अजून वाचले नसतील तर अनुक्रमे वाचा म्हणजे तुम्हाला किल्ले फिरताना याची नक्कीच मदत होईल.


किल्ल्यातील अंतर्गत व्यवस्था-

शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या अंतर्गत व्यवस्थेकडे विशेष लक्ष पुरवले होते. प्रत्येक किल्ल्यावर एक इमानी, शूर व शहाणा असा मराठा हवालदार असे. त्याच्यावर किल्ल्याच्या बंदोबस्ताची व संरक्षणाची जबाबदारी असे. किल्ल्याच्या दरवाज्याच्या किल्ल्या त्याच्याकडे असत. किल्ल्याचे दरवाजे उघडणे व बंद करणे याकडे त्याला जातीने लक्ष द्यावे लागत. त्याने रात्रीच्या वेळी कोणत्याही परिस्थितीत किल्ल्याचे दरवाजे उघडू नयेत अशी महाराजांची आज्ञा होती.

हवालदार हा किल्ल्यातील सैन्याचा प्रमुख असे. किल्ल्यावरील दुसरा महत्वाचा अधिकारी म्हणजे सबनीस. हा ब्राम्हण जातीचा असे. किल्ल्यावरील जमाखर्च ठेवणे व किल्ल्यावरील लोकांची हजेरी ठेवणे हे त्याचे काम असे. तिसरा महत्वाचा अधिकारी म्हणजे कारखानीस, हा गृहस्थ प्रभू जातीचा असे. किल्ल्यावरील कोठी, दारुगोळा याची व्यवस्था पाहण्याचे काम त्याच्याकडे असे. किल्ल्यावरील इमारतीवर देखरेख ठेवणे, त्याची दुरुस्ती करणे वैगेरे कामे त्यालाच करावी लागत. हवालदार, सबनीस व कारखानीस  हे किल्ल्यावरील तिन्ही अधिकारी समान दर्जाचे होते. या तिघांना संयुक्तरित्या किल्ल्याचा कारभार पहावा लागत असे. तरीही त्यांच्या कामाची विभागणी केलेली असे. हे तीनही लॉक एकमेकांच्या कामावर लक्ष देतील व कार्यभार सुरळीत कसा चालेल हे महाराजांनी हेरले होते.

किल्ल्यावरील सैन्यात चांगल्या आणि निवडक सैन्याचा अंतर्भाव केला जात असे. किल्ल्यावरील सैनिकांची रचना निश्चित अशी नसे. किल्ल्यावरील सैन्याची रचना पुढीलप्रमाणे होती.

हुद्दा- सैनिकांची संख्या

नाईक- ९ सैनिक अधिक एक नाईक
जमादार- तीन नाईकांवरील अधिकारी
हवालदार- सर्व जमादारांवरील अधिकारी

या शिवा तटाच्या बंदोबस्तासाठी अधिकारी नेमलेले असत. त्यांना तटसरनौबत असे म्हणत. त्यांना किल्ल्याच्या तटावर रात्री जागता पहारा देण्याचे महत्वाचे काम असे. किल्ल्याच्या पायथ्याला अनेक महत्वाच्या चौक्या होत्या. या चौक्यांवर रामोशी, मांग, बेरड व अन्य आदिवासी काम पाहत असत.किल्ल्यावर वेळोवेळी बातम्या पोहोचवणे, शत्रू फिराक्ल्यास त्यास कापून काढणे, हे त्यांचे प्रमुख काम असे.

किल्ल्यावरील अधिकाऱ्यांच्या नेमणुका स्वतः महाराज करत असत.त्यासाठी त्यांची परीक्षा घेतली जात असे. विश्वासू, स्वामीनिष्ठ अशाचीच नेमणूक केली जात असे. त्याचप्रमाणे एकच अधिकाऱ्याला महाराज एकच किल्ल्यावर फार काळ ठेवत नसत. त्यांच्या वारंवार बदल्या करण्यात येत. अमात्य म्हणतात, "तीन वर्षांनी हवालदार, चार वर्षांनी सरनौबत  आणि पाच वर्षांनी सबनिस, कारखानीस यांच्या बदल्या कराव्यात आणि शक्यतो किल्ल्याजवळील लॉक किल्ल्यावर न ठेवावेत." तसेच कोणतीच जागा वंशपरंपरेनुसार कोणाला मिळत नसे.

फंदफितुरीला अत्यंत कडक शिक्षा दिली जात असे. आरोप शाबित झाल्यास "तत्काळ बेमुलाहीजा त्याचा शिरच्छेद करावा आणि ते मस्तक गडोगडी फिरवावे, असे जो करील त्यास हा नतीजा म्हणून दांडोरा पिटवावा" असे अमात्यांनी राजनीतीत सांगितलं आहे. "किल्ल्यावरील अधिकारी शत्रूस मिळाला तर त्याला हर प्रयत्ने हस्तगत करण्याची किंवा मारण्याची कारवाई करावी." किल्ल्याची सेवा परम कठीण आणि शासण परम उग्र....भिडेने भीड वाढते. केली मर्यादा ते भांगातेच तेच राज्य नाशाचे कारण याकरिता मर्यादाभंग सहसा होऊ न द्यावा. असा इशारा रामचंद्रपंतानी दिला आहे.

किल्ल्यावरील अधिकाऱ्यांच्या पगारासंबंधीचे काही उल्लेख कागदपत्रातून आढळतात. अधिकाऱ्यांचे हे सर्व वेतन वार्षिक आहे. हवालदारास १२५ होन, सरनौबतास १०० होन आणि कारकुनास ३ होन वेतन मिळत असे.
स्वतः शिवाजी किंवा त्यांचे मंत्री किल्ल्यातील शिबंदीची, साधनसामग्रीची आणि संरक्षण व्यवस्थेची तपासणी करत. किल्ल्यामध्ये पाळायचे नियम हे महाराजांनी कायम कडक ठेवले होते.त्यांची अंमलबजावणी नीट होते की नाही यावर त्याचे पूर्ण लक्ष असे. शिवाजी महाराज यासाठी अनेक किल्लेदारांची अनेक वेळा परीक्षा घेत असत.

एके दिवशी शिवाजी महाराज रात्री पन्हाळ्यावर गेले. गडाचे दरवाजे नियमानुसार संध्याकाळी सूर्य मावळतीलाच बंद झाले होते .महाराजांनी रात्री आल्यावर दरवाजा ठोठावला. महाराजांसोबत आलेल्या मावळ्यांनी महाराज आल्याचे किल्लेदाराला आवाज देऊन सांगितलं.तरी देखील किल्लेदाराने दरवाजा उघडला नाही. किल्लेदाराने शत्रूपासून संरक्षण करण्याचे अभय महाराजांना देऊन सकाळपर्यंत दरवाजा न उघडण्याचे सांगितले. महाराजांनी धमकी देऊन देखील किल्लेदार आपल्या निर्णयावर ठामपणे उभा राहिला. सकाळी दरवाजा उघडल्यावर तो पुढील प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी करूनच महाराजांसमोर आला. महाराजांच्या परीक्षेत हा किल्लेदार पास झाला होता त्यामुळे महाराजांनी त्याला शिक्षा न देता त्याला बढती दिली, असे कथन मल्हार रामराव चीटनिसाने आपल्या बखरीत लिहिले आहे.

किल्ल्याचे महत्व-


शिवाजी महाराजान किल्ल्यांमुळेच स्वराज्य स्थापन करता आले. स्वराज्यावर आलेली संकटे केवळ किल्ल्यांमुळेच टाळता आली.रियासतकार देसाई किल्ल्याचे महत्व वर्णन करताना म्हणतात, " प्रत्येक किल्ला व तन्मर्यादापरीविष्ठ प्रदेश हा शिवाजी राज्यमालिकेतील एक घटकावयव होय.या बहुमोल दुर्गमौलिकेने शिवाजीने आपले राज्य बंदिस्थ केले.शिवाजीची बहुतेक अचाट कृत्ये या किल्ल्यांच्या योगाने तडीस गेली. नाना ठिकाणाची लुट किल्ल्यांवर सुरक्षितपणे आणून ठेवण्यात आली, सुरात व खानदेश या भागांतील लुट रायगडी आणताना बागलाण व नासिक प्रांतातील किल्ल्यांचा त्यास अतिशय उपयोग झाला. शिवाजीने मिळवलेला बहुतेक पैसा या किल्ल्यांची बांधणी करून त्यांना सुरक्षित ठेवण्यात गेला. सिंधुदुर्गासारख्या किल्ल्यावर त्याने पाण्याप्रमाणे पैसा खर्च केला. अनेक आणीबाणीचे प्रसंग शिवाजीवर आले असता त्यातून निभावून जाण्यास हेच किल्ले त्यास उपयोगी पडले. कित्येक किल्ले स्व संरक्षणाच्या सोयीचे तर कित्येक अचानक शत्रूवर छापा टाकून त्यांचा पाडाव करण्याच्या सोयीचे, असे अनेक किल्ले नावाजलेले असून त्यांच्याच योगाने मराठ्यांच्या तात्कालीन पराक्रमास एक प्रकारची विलक्षण रसाळता उत्पन्न झाली आहे." (महाराजांचा इथे त्यांनी एकेरी उल्लेख केलाय आमचा तसा कोणताही हेतू नव्हता, हे वाचकांनी लक्षात घ्यावे.) 

किल्ल्यांचे महत्व सांगता स्वतः महाराजांनी एका ठिकाणी सांगितले आहे की, " जसा कुळबी शेतात माळा घालून शेत राखितो तसेच किल्ले राज्याच्या रक्षणासाठी आहेत. तारवास खिळे मारून बळकट करितात तशी राज्यास बळकटी किल्ल्यांची आहे.किल्ल्यांच्या योगाने औरंगशहासारख्याची उमर गुजरून जाईल. आपणास धर्मस्थापना व राज्यसंपादन करणे आहे. सर्वांस अन्न लाऊन त्यांचा बचाव करावयाचा आहे. दिल्लीचा बादशहा आमच्या स्वराज्याचा नाश करण्यास टपला आहे. त्याची स्वारी आमच्यावर झाली तर त्याला जुनेनवे तीनशेसाठ किल्ले आहेत. एक एक मिळून तो वर्ष वर्ष लढला तरी त्यास तीनशेसाठ वर्ष लागतील!"

पेशवेकालीन किल्ले-

शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्यांना अनन्यसाधारण महत्व होते.महाराजाना किल्ल्याचा आश्रयाने मुसलमानी फौजेशी झुंजून आत्मरक्षण कराव लागत असल्याने त्यांनी स्वतःचे नवीन किल्ले बांधून जुन्या किल्ल्यांत बरीच भर घातली. परंतु पेशवाईत मराठी राज्याचा खूप विस्तार झाल्यामुळे सह्याद्रीतील डोंगरी किल्ल्यांची आवश्यकता मराठ्यांना तितकी राहिली नाही, म्हणून त्यांनी नवीन किल्ले थोडेच बांधले.

उदा. बाळाजी विश्वनाथाने लोहगड जवळ विसापूर किल्ला बांधला. पहिल्या बाजीरावाने १७३७ मध्ये अर्नाळा किल्ला जिंकून त्याची नवीन बांधणी केली. १७६५ मध्ये नारोशंकर राजेबहाद्दर या सरदाराने माळगावचा प्रसिद्ध भुईकोट किल्ला बांधला. नाना फडणीसाने लोहगड किल्ल्याची थोडीफार दुरुस्ती केली होती. पेशवाईत या किल्ल्याचा प्रामुख्याने उपयोग हा कैदी ठेवण्यासाठीच केला जात असे.

किल्ल्यावर हवालदार किंवा गडकरी, सबनीस, सरनौबत फडणीस, कारखानीस हे प्रमुख अधिकारी असून त्यांना खर्चाकरिता नेमणुका असत. हवालदार हा मुख्य अधिकारी व त्याचा दर्जाही मोठा होता. त्यास पालखी, अब्दागिरी ई. सरंजाम असत. हवालदार सबनीस व सरनौबत यांनी किल्ल्यावरील कारभार पाहावा. धान्याची कोठी व युद्धसाहित्य यांवर नेमणूक कारखानिसांची.कारखानीसाच्याच देखरेखीखाली किल्ल्याचे हिशेब लिहिले जात असत. हवालदार व सरनोबत हे मराठे, सबनीस ब्राम्हण व कारखानीस प्रभू जातीचे असे. हवालदाराजवळ किल्ल्याच्या दरवाज्याच्या किल्ल्या असत.सबनीसाजवळ हजेरी पत्रक असे.

काही ठिकाणी किल्ल्यावरील अधिकाऱ्यांच्या पगाराचा आकडा देण्यात आला आहे. त्यावरून पगार फार कमी असत असे दिसून येते. उदा. हवालदारास मासिक १४ रु., सरनोबत १५ रु., कारखानीस ७ रु., परंतु सबनीसाचा वार्षिक पगार हा ६०० रु. अर्थात पगाराचे प्रमाण किल्ल्याच्या महत्वावर अवलंबून असले पाहिजे. किल्ला मोठा असल्यास ५ ते ७ सरनोबत असत. त्यांच्या हाताखाली शिबंदी (सैन्य) असे. शिबंदीच्या दहा आसामवर एक नाईक असे. शिबंदीतील बिनहत्यारी शिपायास आढावा व हत्यारी शिपायास हशम, बंदुकवाल्यास बरकंदाज असे म्हणत असत. काही तिरंदाज व काही इतर हत्यारे बाळगणारी असत. आढावास दरमहा साडेचार रुपये वेतन असे. बरकंदाजास जवळ जवळ तितकेच वेतन असे. किल्ल्यावरील शिपायांत गोलंदाजांमध्ये गोरे लोक देखील असत.

किल्ल्यावरील बंदोबस्थ किती कडक असेल हे धारवाडच्या किल्ल्याचा अधिकारी बापुजी शिंदे यास केलेल्या आज्ञेवरून समजते. बापुजी शिंदे यास, “ तुम्ही किल्ल्याचा कारभार किल्ल्यात राहून पाहावा. महालाचा कारभार पेठेत राहून पाहावा. किल्ल्यात लॉक येतील जातील त्यांची परवानगी हवालदार यास सांगावी. किल्ल्यातील भरतीचे लोकांची रजा, कामगिरी, हजेरी वाटणी करणे ती हवालदार, दरकदार यास सदरेस बसून करीत जाणे. त्यांचे सल्ल्याखेरीज न करणे. दरवाजे व कोठ्यांच्या किल्ल्या हवालदाराजवळ ठेवाव्या. दरवाजे व कोठ्या उघडणे व लावणे ते वेळच्या वेळेस तुम्ही हवालदारास परवानगी सांगून करीत जाणे, हशमणीस व हशमाचे फडणीस पेशजीपासून किल्ल्यात राहून दरकाचे कामकाज करतात, त्याप्रमाणे हल्ली किल्ल्यात रहातील. दरकाचे काम ज्याचे त्याचे हातून घेत जाणे.”

किल्ल्यावरील शिबंदीकडे दोन कामे असत. त्यांनी किल्ल्याचा बंदोबस्त ठेवून किल्ल्यावर जे कैदी येतील त्यांना सांभाळावे आणि भोवतालच्या सपाटीवरील प्रदेशास कुमक लागल्यास ती करावी. बऱ्याच भागातून तालुक्याची ठाणीही किल्ल्यावरच असत.म्हणून अद्यापही कित्येक तालुक्यांना त्यातील किल्ल्याचेच नाव चालत आहे. आसपास भरणाऱ्या यात्रेच्या बंदोबस्तालाही किल्ल्यावरून प्यादे रवाना होत.किल्ल्यावर लहान तोफा आणि दारुगोळा हि ठेवण्यात येई. किल्ल्यावरील शिबंदी वगैरे खर्च चालावा म्हणून निराळे गावही तोडून दिलेले असे.   

Post a Comment

0 Comments