Ticker

6/recent/ticker-posts

किल्ले (भाग २): किल्ल्यांचे प्रकार सविस्तर

किल्ले (भाग २): किल्ल्यांचे प्रकार सविस्तर

मागच्या भागात किल्ल्यांची सविस्तर माहिती दिलीये. वाचली नसेल तर इथे क्लिक करून ती नक्की वाचा.
किल्ले (भाग २): किल्ल्यांचे प्रकार सविस्तर, प्रतापगड

आज किल्ल्यांच्या प्रकाराविषयी सविस्तर जाणून घेऊयात.राज्यव्यवहारकोष मध्ये दिल्या प्रमाणे किल्ल्याचे ३ प्रकार आहेत त्यांच्याविषयी जाणून घेऊया.

१) गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ला-

किल्ले (भाग २): किल्ल्यांचे प्रकार सविस्तर, वासोटा

'अभिलाषितार्थचिंतामणी' या ग्रंथात उल्लेख केल्याप्रमाणे दुर्घट चढाच्या व पाण्याच्या सोयीने समृद्ध अशा शिखरावरील दुर्गाला गिरिदुर्ग असे म्हणतात.
'आकाशभैरवकल्प' या ग्रंथात डोंगरी किल्ल्याची व्याख्या ही चढ असलेल्या, शिखरावर रुंद पठार असलेल्या, जिवंत विपुल पाण्याची टाकी असून वरखाली तटाने परिवेष्ठीत असलेल्या डोंगरी किल्ल्याला गिरिदुर्ग म्हणले आहे.
मनुस्मृती, शुक्रनीती व कौटिलीची अर्थशास्त्र या प्राचीन ग्रंथातून गिरिदुर्ग हा इतर सर्व दुर्ग प्रकारांपेक्षा श्रेष्ठ मानला जातो.मनू म्हणतो, " सर्व प्रकारच्या दुर्गांमध्ये गिरिदुर्ग हाच श्रेष्ठ होय.म्हणून अनेक प्रयत्नांनी राजाने त्याचा आश्रय करावा." प्राचीन राजनीतीतज्ञ शुक्राचार्य म्हणतात, "किल्ल्यांच्या आश्रयाने एक सशस्त्र माणूस शंभर योद्द्यांशी लढू शकतो व शंभर योद्धे दहा हजार माणसांशी लढू शकतात.यास्तव राजाने किल्ल्याचा आश्रय घ्यावा."

कौटिल्य म्हणतो "सर्व प्रकारच्या गडदुर्गात भुईकोट किल्ल्यापेक्षा पाणकोट किल्ला चांगला व पाणकोट किल्ल्यापेक्षा डोंगरी किल्ला चांगला."

शिवकाळात डोंगरी किल्ल्याचा प्रकार विशेष प्रसिद्धीस आला होता. मध्ययुगातील किल्ल्यांची बांधणी,रचना व सिद्धता ही प्राचीन काळाच्या किल्ल्यांहून वेगळ्या स्वरूपाची होती.याचे मुख्य कारण म्हणजे युद्धशास्त्रात झालेला बदल हा होय. किल्ल्यांचे संरक्षण म्हणजे राज्याचे संरक्षण अशी परिस्थिती असल्यामुळे किल्ल्यांचा बंदोबस्त चांगल्या प्रकारे ठेवणे हे गरजेचे होते. म्हणून भक्कम तट, चिलखती बुरुज, तोफा व बंदुका यांचा मारा करण्यासाठी सोयीची जागा इ. नवीन प्रकार किल्ल्यांच्या बांधणीत आणावे लागले. सह्याद्री पर्वताची रांग महाराष्ट्रातून उत्तर-दक्षिण अशी जाते.तिच्या उंचच उंच शिखरांवर किल्ले बांधणे अगदी सोयीचे होते.

 सह्याद्री म्हणजे किल्ल्याची जागा, सह्याद्री म्हणजे किल्ल्याचा बालेकिल्ला, सह्याद्रीतील गुहा म्हणजे राहण्याची निसर्गनिर्मित जागा, सह्याद्री म्हणजे रक्षणकर्ता, सह्याद्री म्हणजे पाठीराखा, सह्याद्री म्हणजे किल्ल्याची तटबंदी, सह्याद्री म्हणजेच किल्ल्याचे खंदक, सहयाद्री म्हणजेच अभेद्य दुर्ग आणि सह्याद्री म्हणजेच शत्रूचा कर्दनकाळ!

२) भुईकोट किल्ला-

किल्ले (भाग २): किल्ल्यांचे प्रकार सविस्तर, किल्ले शिवपट्टण, भुईकोट

'राज्यव्यवहारकोष' मध्ये महाराज भुईकोटास प्राकार असे म्हणतात. 'आकाशभैरवकल्प' या ग्रंथात भुईकोट किल्ल्याचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे. जे पूर किंवा शहर मोठ्या तटांनी परिवेष्टित आहे व खंदकांनी सभोवार रक्षिले आहे. नाना तऱ्हेच्या उपयुक्त वस्तूंचा आणि गवत, धान्य, जल, वित्त वैगैरेंचा भरपूर साठा आहे आणि अनेक शस्त्रांनी सज्ज असलेले संरक्षित असे नगर त्याला कोष्टदुर्ग म्हणजेच कोट किंवा भुईकोट म्हणतात.

महाराष्ट्रात भुईकोट किल्ल्यांचे प्रमाण कमी आहे परंतु जसे जसे उत्तरेला जाऊ म्हणजेच मुसलमान रियासतिच्या जागांवर वारोमाप प्रमाणात हे कोट आढळतात. महाराष्ट्रात परांडा, अहमदनगर, बेळगाव, मंगळवेढा, मिरज, सोलापूर इ भुईकोट किल्ले आहेत आणि हे सर्व मुसलमान रियासतीने बांधलेले आहेत.

३) द्वीपदुर्ग/ जलदुर्ग किंवा जंजिरा-

किल्ले (भाग २): किल्ल्यांचे प्रकार सविस्तर, जंजिरा

नदीच्या पात्रात किंवा न आटणाऱ्या जलसमुद्रात किंवा पाणी कधीच आटत नाही अशा जलस्रोतात एक बेट बनवून तेथे जो किल्ला बांधला जातो त्याला जलदुर्ग म्हणून संबोधिले जाते.इंग्रज, फ्रेंच, डच व सिद्दी या समुद्रावरील सत्तानी मराठ्यांच्या राजकारणात हस्तक्षेप करण्याचा प्रारंभ केल्यामुळे जंजिऱ्याची वाढ कोकणपट्टीत झाली.

यात सिद्दीने राज्य केलेला मुरुड येथील जंजिरा म्हणजेच जंजिरा किल्ला प्रसिद्ध आहे. जसे सिद्दी ला तोंड द्यायचे तर आपणही जलसम्राट व्हायला हवं हे महाराज जाणून होते. महाराजांचं म्हणणं थोडं चुकीचं ठरेल महाराजांच्या दृष्टिकोनातून कारण महाराज राज्य स्वतःच आहे असे कधीच म्हणाले नव्हते, असो! भारतीय नौदलाचे प्रमुख, संस्थापक अस गुगल जरी कराल तरी महाराजांचे नाव गौरवाने घेतले जाईल. स्वराज्याचे नौदल निर्माण होत होते तेव्हा राज्यांच्या मनात एका कुरट्या बेटावर जलदुर्ग बांधायला घेतला. 

सिंधुदुर्ग, अर्नाळा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, अलिबाग, खांदेरी, उंदेरी,पद्मदुर्ग येथील जलदुर्ग हे मराठ्यांनी बांधले तर जंजिरा हा पाणकिल्ला हबशाने बांधला.

गढी-

किल्ले (भाग २): किल्ल्यांचे प्रकार सविस्तर,पळशी

हा देखील किल्ल्याचाच एक प्रकार.मध्ययुगात खेड्याचे दोन प्रकार असत १)मौजे आणि २) कसबा. या पैकी मौजे या ठिकाणी ग्राम व्यवस्थेतील सर्व व्यवहार चालत व्यापार वगळता.तर कसब्यामध्ये फक्त व्यापार चालत असे. कसबा हा शब्द 'कसब' म्हणजेच कौशल्य या शब्दावरून रुळला गेला आहे.आता ही दोनही ठिकाण धन दौलतीने संपन्न असत. त्यातल्या त्यात कसबा हे व्यापाराचे ठिकाण असल्याने ते जरा जास्तच समृद्ध असे. तटबंदी बांधताना मौजे आणि कसबा या दोनही प्रकारच्या खेड्यांना असत परंतु कसब्याला तट असणे जास्त गरजेचे असेल.म्हणून आज अनेक ठिकाणी ज्या तटबंदी बघायला मिळतात त्या कसब्याच्या गावांनाच दिसतात.परंतु मौजेला दिसतीलच असे नाही.अशा तटबंदीला कुसु असे म्हणत. 

साधारणतः त्या संबंधित भागाचा देशमुख कसब्याच्या ठिकाणीच राहात असे. त्याची वस्ती ही गढी मध्ये असे.गढी ही संपूर्णपणे संरक्षणासाठी असे.डोंगराळ प्रदेशात भौगोलिक परिस्थितीमुळे  संरक्षण होत असल्याने स्वतंत्र गढी बांधत नसत.

महाराज जेव्हा सुरत लुटायला गेले होते तेव्हा तेथील घनिष्ठ व्यापारी आणि खुद्द औरंगजेबाचा सरदार देखील अशा  त्याच्या गढीत राहिला आणि स्वतःचे जीव वाचवून घेतले. महाराजांना त्यांना बंदी करायचे जरी असले तरी सर्वात मोठा हेतू हा स्वराज्यासाठी संपत्ती गोळा करणे हा होता आणि तो यशस्वी झाला. बाकी व्यापारी लुटले गेले पण गढीच्या आतील वाचले यावरून गढीला देखील फार महत्व आहे हे लक्षात घ्यायला हवे.

किल्ले (भाग १): इतिहास, महत्व आणि प्रकार
किल्ले (भाग ३) : बांधकाम आणि दुरुस्ती
किल्ले (भाग ४): किल्ला बांधण्याची सूत्रेPost a Comment

0 Comments