Ticker

6/recent/ticker-posts

किल्ले (भाग ३) : बांधकाम आणि दुरुस्ती

किल्ले (भाग ३) : बांधकाम आणि दुरुस्ती

किल्ले म्हणजे जणू स्वराज्याचा जीवकी प्राणच! महाराजांनी दिलेले किल्ल्यांना महत्व आपण जाणून आहोतच. तर याच किल्ल्यांच्या बांधकामाचे आणि दुरुस्तीचे महायज्ञ महाराजांनी पार पाडले.
किल्ले (भाग ३) : बांधकाम आणि दुरुस्ती

किल्ल्यांची नावे

मराठ्यांचे विशेषतःशिवकाळाचे वैशिष्ट्य म्हणजे किल्ले.महाराष्ट्रातील किंवा शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या प्रदेशातील अनेक किल्ल्यांची नावे गरजेप्रमाणे बदलण्यात आली. महाराजांनी किल्ल्यांना नावे संस्कृत भाषेत दिली. तसेच मुसलमानांनी किल्ला जिंकल्यानंतर त्यांच्या समजुतीनुसार नावे बदलली, थोडक्यात सांगायचं झालं तर एकाच किल्ल्याचा उल्लेख अनेक नावानी आढळून येतो. प्रत्येक किल्ल्याची माहिती घेताना या सर्व नावांचा उल्लेख आम्ही करतोच.

शिवाजी महाराजांनी दिलेली नावे-

महाराज नजीकच्या गावावरून किंवा डोंगरावरून किल्ल्यांना नावे देत असे. उदा. अर्नाळा, बेळगाव, सोलापूर, नगर, मुरूमदेव(राजगड), रायरी(रायगड) इ.तसेच शिवाजी महाराज आपल्या किल्ल्यांना प्रसंगानुसार किंवा रचणे नुसार देखील नावे देत. उदा. रोहिडा(विचित्रगड), तोरणा(प्रचंडगड), खेळणा(विशाळगड), प्रतापगड (मोऱ्यां विरुद्ध आणि नंतर अफजलखाना विरुद्ध प्रताप केला) इ.
किल्ले (भाग ३) : बांधकाम आणि दुरुस्ती,प्रतापगड


मुसलमानांनी दिलेली नावे-

रायगड( इस्लामगड), सिंहगड (बसिदाबक्ष)

किल्ल्यांची संख्या-

किल्ले (भाग ३) : बांधकाम आणि दुरुस्ती,लोहगड

महाराष्ट्रातील किल्ल्यांची एकत्रित केलेली अशी संपूर्ण यादी अजून उपलब्ध नाही. १७ व्या शतकाच्या शेवटी कृष्णाजी अनंत सभासदाने लिहिलेल्या बखरीत शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची संख्या २४० सांगितली आहे. त्यापैकी ५० मूळचे, १११ महाराजांनी बांधलेले व ७९ कर्नाटकातील. महाराजांच्या किल्ल्यांची संख्या ३१७ होती असे मल्हार रामराव चिटणीस सांगतात.चित्रगुप्तच्या मते ही संख्या ३६१ अशी आहे.त्यापैकी पर्वतावरील किल्ले(गड) २४०, सपाट जमिनीवरील किल्ले(भुईकोट) १०८, समुद्रातील किल्ले (जंजिरे) १३ अशी वर्गवारी केलेली आहे. इतिहासकार गो.स.सरदेसाई यांच्या मते शिवाजी महाराजांचे सुमारे ३०० किल्ले होते. डॉ.बाळकृष्ण ३५० पर्यंत किल्ल्यांचा अंदाज धरतात.दि.वि.काळे यांनी शिवाजी स्मृतिग्रंथात ४९६ किल्ल्यांची नावे दिलेली आहेत. परंतु या संख्येत कर्नाटकातील किल्ल्यांचाही समावेश केलेला आहे.डॉ. अ. रा.कुलकर्णी म्हणतात, 'बखरीत आढळणाऱ्या पण ज्यांचे स्थान निश्चित करता येत नाही अशा किल्ल्यांची काळे यांनी नोंद घेतली आहे आणि छावण्यांचा म्हणजेच गढ्यांचा देखील यात अंतर्भाव केलेला आहे. त्यामुळे हे आकडे फुगलेले असावेत. महाराष्ट्रात साधारणतः ३००-३५० किल्ले असावेत आणि आपण ते सगळे जाणून घेतच आहोत आपल्या वेबसाईटवर...

किल्ल्याचे बांधकाम व दुरुस्ती-

किल्ले (भाग ३) : बांधकाम आणि दुरुस्ती,पन्हाळगड

ज्या ठिकाणी अवघड जागा, विपुल पाणी ,विस्तृत पठार इ. अनुकूल जागा दिसल्या त्या त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी किल्ला बांधण्याची संधी सोडली नाही. म्हणून डॉ.बाळकृष्ण म्हणतात, ' शिवाजी महाराज खरे दुर्गस्वामी होते.त्यांचा जन्म दुर्गात झाला.त्यांना जे वैभव प्राप्त झाले तेही सर्व त्याच्याच सहाय्याने झाले.त्यांचे दुर्ग म्हणजे भारतातील त्यांच्या शत्रूंना धाक होता. त्यांच्या राष्ट्राची ती संवर्धन भूमी होती.विजयाचा तो पाया होता.त्यांच्या महत्वकांक्षेचा तो जिना होता. दुर्ग हेच त्यांचे निवासस्थान आणि तेच त्यांच्या आनंदाचे निधान होते.' महाराजांची किल्ल्या बद्दलची काळजी व तळमळ पाहिल्यावर डॉ. बाळकृष्ण यांचे उद्गार सार्थ वाटतात.(खंत एकच आहे मी हे उद्गार आदरतीर्थ रुपात मांडलेत परंतु डॉ.बाळकृष्ण यांनी महाराजांना एकेरी नावाने उल्लेखले आहे, हे कितपत योग्य आहे याचा विचार वाचकांनी करावा)

'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' खंड लेखांक २२ मध्ये आपणास शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांसंबंधी माहिती आढळून येते. त्यामध्ये इ.स. १६७१ मध्ये त्यांनी गडकोटाचा दुरुस्तीकरिता १,७५,००० होन व गडावरील सामग्रीसाठी १,२५,००० होन बाजूला काढून ठेवल्याचे दिसून येते.हे पैसे फक्त आणीबाणीच्या काळात वापरावयाचे होते.

साधारणपणे असा समज आहे की महाराजांनी सर्व किल्ले बांधले.परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, मुसलमानपूर्व काळातसुद्धा अनेक किल्ले अस्तित्वात होते.देवगिरी, अंकाई-टंकाई, त्रिंबक व कोल्हापूरच्या आसपासच्या पन्हाळा(पर्णालपर्वत), रांगणा, पावनगड, विशाळगड, इ. किल्ले मुसलमानपूर्व काळातील आहेत. मुसलमानी काळात या किल्ल्यांचा वापर झाला.परंतु त्यांच्या बांधणीकडे किंवा दुरुस्तीकडे जागरूकपणे लक्ष दिले नाही. महाराजांनी किल्ल्यांचे महत्व ओळखून जुने किल्ले दुरुस्त केले व लष्करीदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी नवे किल्ले बांधले. उदा. विजयदुर्ग, पदमगड, सिंधुदुर्ग, कुलाबा, खांदेरी हे जलदुर्ग, प्रतापगड,पालगड,मंडणगड, प्रचितगड हे किल्ले शिवाय अनेक किल्ल्यांची दुरुस्ती करून त्यांचे महत्व वाढवले. उदा. राजगड, पुरंदर, सिंहगड, तोरणा,रायगड, विशाळगड, इ.
किल्ले (भाग ३) : बांधकाम आणि दुरुस्ती


शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले बांधले तर जवळपास सर्वच किल्ल्यांची दुरुस्ती केली. महाराजानी किल्ले अभेद्य बनवले परंतु एक इंग्रज प्रवासी जार्विस याचा रायगडा बाबतचा आक्षेप असा की, रायगडाची दुरुस्ती केल्यानेच त्याचा अभेद्यपणा कमी झाला. या इंग्रजांना गडाचे मार्ग नष्ट केले म्हणजे किल्ला अभेद्य वाटतो असे मला वाटते. तख्तास जागा हाची गड करावा हे गौरवउद्गार याच गडाचे महाराजांच्या तोंडून निघाले, स्थापत्य अभियंता हिरोजी इंदुलकर यांनी सर्वस्व लावून हा रायगड बनवला आणि हा अभेद्य नाहीये असा इंग्रज प्रवासी बोलतो आणि त्याचे इतिहासकार इतकं मनावर घेतात आणि महाराजांच्या स्थापत्यविषयी नजरेवर शंका उपस्थित करतात? किती चुकीचं आहे हे असं वागणं?

किल्ले बांधणाऱ्या कारागिरांना व कामगारांना महाराज चांगले वेतन देत. किल्ल्यांचे बांधकाम हे राज्याचे सर्वात महत्वाचे काम असल्याने त्यांच्या वेतनात महाराज हयगय करत नसे.किल्ले बांधण्याच्या कामात महाराज विदेश तंत्रज्ञानाची व कारागिरांची देखील मदत घेत असत. सिंधुदुर्ग बांधण्यासाठी महाराजांनी युरोपियन तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला होता असे आढळते. कर्नाटकच्या मोहिमेवर असताना महाराजांनी जिंजीच्या तटबंदीचे काम हाती घेतले होते, त्यावेळी महाराजानी मद्रासकर इंग्रजांना पत्र व्यवहाराद्वारे युरोपियन इंजिनिअर पाठवून देण्याची मागणी केली होती.
किल्ले (भाग ३) : बांधकाम आणि दुरुस्ती,जंजिरा


एका पाश्चात्य संशोधकाने महाराजांविषयी लिहिलेले हे उद्गार,
"He (Shivaji) had studied with extreme care everything about the duties of a general, soldier above all the art of fortifications which he understood was better than the ablest engineers."
म्हणजेच सेनापतीच्या कामा संबंधी त्याच प्रमाणे सैन्यातील शिपायांच्या कामासंबंधी शिवाजीने (छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी) प्रत्येक गोष्टीचा काळजीपूर्वक अभ्यास केला होता.किल्ल्याच्या बांधकामाची कला त्यांच्या हाताखाली असलेल्या प्रवीण स्थापत्य विशारद अधिकाऱ्यांपेक्षाही महाराजांस अवगत होती.

Post a Comment

0 Comments