Ticker

6/recent/ticker-posts

संभाजी महाराज पकडले गेले तेव्हा मावळ्यांनी काय केले?

संभाजी महाराज पकडले गेले तेव्हा मावळ्यांनी काय केले?

संभाजी महाराज पकडले गेले मग मावळ्यांनी काय केले

कधीतरी
आपल्या whatsapp आणि फेसबुक च्या विश्वातील मावळे बनता, आपल्या इतिहासाकडे वळून बघा! स्वराज्याच्या इतिहासाची पाने कधीही उलगडून बघा, "लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे" हि भावना इतिहासाच्या पानापानात दिसत असते. आपल्या इतिहासात एकमेव अशी घटना आहे जिथे लाखांना वाचवण्यासाठी, स्वराज्य वाचवण्यासाठी लाखोंच्या पोशिंद्याला आपला प्राण गमवावा लागला. ते नाव म्हणजे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज होय.

जे घडले ते व्हायला नको होते, एकवेळ त्या योद्ध्याला युद्धात वीरमरण आले असते तरी ते चालले असते परंतु महाराजांनी ज्या यातना सहन केल्या त्या ऐकून आजही प्रत्येकाचे मन व्याकुळ होते. प्रश्न उभा राहतो , कणभर सैन्य असताना देखील मनभर शत्रूंवर तुटून पडणारे मावळे देखील शंभूराजांना का वाचवू शकले नाहीत? एकापेक्षा एक तलवारीवर मरण पेलून धरणारे मातब्बर सरदार देखील शंभूराज्यांना का सोडू शकले नाहीत? छत्रपतींच्या एका शब्दाखातर हजारोंची फौज सपासप कापून काढणारे स्वामिनिष्ठ मावळे त्यावेळी कुठे होते? मावळे तर खूप शूर पराक्रमी होते, तर सर्वांनी मिळून एकाच वेळी औरंगजेबावर हल्ला का केला नाही? संभाजी महाराज पकडले गेले तेव्हा मराठे काय करत होते? असे इतकेच नाही तर हजारो प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात वाळवी जसे पोखरते तसे पोखरत आहेत.

संभाजी महाराजांना मावळे सुखरूप सोडवू शकले नाही याला देखील काही कारणे आहेत. त्यातील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे ज्यावेळी संभाजी महाराजांना संगमेश्वरात मुघलांनी कैद केले, त्याचवेळी औरंगजेबाची लाखोंची फौज स्वराज्यावर चालून आलेली होती. औरंगजेबाचा सरदार जुल्फिखार खानाने स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडला वेढा दिला होता. एकीकडे स्वराज्याचे छत्रपती असणारे शंभूराजे मोघलांच्या जाळ्यात अडकले होते, तर  दुसरीकडे शिवरायांनी संपूर्ण आयुष्य खर्च करून जे स्वराज्य निर्माण केले ते संपूर्ण स्वराज्यच मोघलांच्या विळख्यात होते. कोणतीही पूर्व कल्पना नसताना स्वराज्याची राजधानीच मोघलांनी घेरल्याने सर्व मावळे आणि सरदार स्वराज्यावर आलेले हे आक्रमण परतवून लावण्यासाठी सज्ज झाले. त्यामुळे तिकडे संभाजी महाराज कैद झाल्याची वार्ता रायगडावर खूप उशिरा पोहोचली.

संभाजी महाराजांना मावळे सोडू शकले नाहीत याचे दुसरे महत्वाचे कारण होते, शंभूराजे कैद झाल्याची वार्ता ज्यावेळी औरंगजेबाला मिळाली त्यावेळी त्याने हजारोंची फौज पाठवून जागोजागी मराठ्यांची नाकेबंदी केली. ज्या मार्गाने मोघल शंभूराजांना घेऊन जात होते,त्या मार्गांपर्यंत मावळे सहजासहजी पोहोचू शकत नाहीत याची औरंगजेबाने पूर्ण खबरदारी घेतली होती. त्यामुळेच संभाजी महाराजांना सोडवणे मावळ्यांना शक्य झाले नाही.

एकीकडे शंभूराजे तर दुसरीकडे स्वराज्य, कोणतीही पूर्व कल्पना नसताना स्वराज्याच्या इतिहासातील हि सर्वात भयंकर संकटे एकाच वेळी उभी राहिलेली होती. त्यातून मार्ग कसा काढायचा याचा मावळ्यांनी विचार करे पर्यंत शंभूराजांना मुघलांनी औरंगजेबाच्या छावणीपर्यंत पोहोचवले होते. या छावणीत औरंगजेबाचा तब्बल लाखाचा सेनासागर उभा होता. असे असताना देखील तुमच्याही मनात प्रश्न उपस्थित होत असेल कि मावळे तर प्रचंड शूर आणि पराक्रमी होते, तर सगळ्यांनी एकाच वेळी हल्ला का केला नाही?

तुमच्या प्रश्नांचे उत्तर आहे, संगमेश्वरात संभाजी महाराजांना कैद केल्यावर मोघलांनी त्यांना बहादूरगडाकडे आणले आहे. बहादूरगड हा भुईकोट किल्ला आहे. आजूबाजूला दऱ्या-खोऱ्यांच्या आणि डोंगर कपारयांचा प्रदेश खूप कमी! समतोल भागावर औरंगजेबाचे लाखोंचे सैन्य उभे आहे,त्यावेळी मराठ्यांची सर्वात महत्वाची आणि मोठी ताकद म्हणजे गनिमीकावा! डोंगर कपारी मध्ये दबा धरून शत्रूवर अचानक हल्ला करणे म्हणजे मराठ्यांचा गनिमीकावा होय. पण समतोल भागात लाखांच्या फौजेसोबत समोरासमोर लढणे हे शक्य नव्हते. तसा प्रयत्नही केला असता तर कदाचित स्वराज्य संपले असते.

महाराजांना सोडवण्याचे प्रयत्न झाले नाही असे नाही! संताजी- धनाजी या जोडीने पराक्रम केले, माहिती पहिले ज्यांना कळाली त्या जोत्याजी केसरकर आणि अप्पाशास्त्री दीक्षित यांनी देखील प्रयत्न केले. पहिला प्रयत्न हा अप्पाशास्त्री दीक्षित म्हणजेच कृष्णभट जोशी यांनी! दुसरा पराक्रम हा जोत्याजी केसरकर यांनी केला. महाराजांना सोडवण्याचा तिसरा प्रयत्न हा पाथरपुंज या अंबाघाट परिसरातील धनगर वाड्यातील काही ते १० धनगर पोरांनी केला. अजाणतेपणी मुक्करब्ब खानाला अंबाघाट परिसरातून वाट दाखवण्याचे काम त्यांच्या हातून घडले होते. त्यामुळे त्यांनी चूक लक्षात येताच एक वेडा प्रयत्न देखील केला. महाराजांना वाचवण्याचे खूप प्रयत्न झालेत त्यात रायप्पा महार, खंडो बल्लाळ चिटणीस यांनी देखील प्रयत्न केले.

रायप्पा महार यांचा प्रयत्न इथे वाचा

जोत्याजी केसरकर यांचा प्रयत्न इथे वाचा

धनगर समाजाच्या मुलांचा प्रयत्न इथे वाचा

आपल्या इतिहासावर, स्वराज्यावर आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सर्वदूर पसरवण्याच्या आमच्या कार्याला तुमच्या एका कमेंटची गरज आहे. तुमचे विचार खाली कमेंट करून नक्की सांगा.

Post a Comment

2 Comments