Ticker

6/recent/ticker-posts

शंभूराजांना वाचवण्याचा पहिला प्रयत्न- जोत्याजी केसरकर

शंभूराजांना वाचवण्याचा पहिला प्रयत्न- जोत्याजी केसरकर

जोत्याजी केसरकर

छत्रपती
संभाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर दऱ्याखोऱ्यांत गोंगावणारे पराक्रमाचे वादळ होय. पण आच पराक्रमी वादळाला आणि स्वराज्याच्या छत्रपतीना मुकर्रब खानाने दगा फटका करून आणि फितुरांच्या मदतीने संगमेश्वरी कैद केले. संभाजी महाराज पकडले गेले ती तारीख होती फेब्रुवारी १६८९. पण साडे-तीनशे वर्ष झाली, लाखो लोकांच्या मनात प्रश्न येत आहेत, संभाजी महाराज स्वराज्याचे छत्रपती मग संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न का झाला नाही? संभाजी महाराज पकडले गेले तेव्हा मराठे काय करत होते? संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी एकाही मावळ्याने प्रयत्न केले नाहीत का?

या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचे प्रयत्न आम्ही या लेखांमध्ये केलेले आहेत, त्यातीलच हा एक भाग!

संभाजी महाराजान सोडवण्याचा प्रयत्न हा झाला होता. हा प्रयत्न कोणी केला? कोण होता हा जिगरबाज मावळा? छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यावर मुकर्रब खानाने आपल्या सैन्याला आदेश दिला कि जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर संभाजी महाराजांना संगमेश्वरातून बहादुरगडाकडे घेऊन चला. मुकर्रब खानाची हजारोंची फौज निघाली. संभाजी महाराजांना कैद करून घेऊन जाणारी सैन्याची हि तुकडी बत्तीस शिराळ्याच्या जवळ आली. त्याचवेळी एका स्वामिनिष्ठ मावळ्याला समजले कि आपला राजा कैद झाला आहे. तो मावळा होता जोत्याजी केसरकर! जोत्याजीना काही कळेना, काहीही करून राजांना वाचवले पाहिजे हे त्यांनी ठरवले. जोत्याजीनी आसपास असलेले मावळे गोळा केले. जास्त संख्या नव्हती ती फक्त १०० च्या आतच असावी!

आपल्या राजाला सोडवण्यासाठी जीवावर उदार होऊन हे मावळे लढायला लागले. मोघली फौजेवर त्यांनी हल्ला केला. जोत्याजी वाऱ्याच्या वेगाने गनिमांना कापत सुटला होता, इतर मावळे गनिमांना सपासप तलवारीने कापत होते. मोगलांच्या हजारोंच्या फौजेसमोर १०० मावळ्यांचे बळ तोकडे पडले. आपल्या राजाला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने लढणारे मावळे कापले गेले. जोत्याजीनी स्वतःच्या अंगावर तलवारीचे वार सोसले. शिराळ्याच्या जंगलात झाडा-झुडूपात मावळे कोसळले. संभाजी महाराजांना सोडवण्याचा पहिला प्रयत्न अखेर अपयशी ठरला.

आजही कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पुनाळ या छोट्याश्या गावात संभाजी महाराजांना वाचवणण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या जोत्याजी केसरकर यांची समाधी आपल्याला बघायला मिळते.अशा प्रत्येक मावळ्याच्या शौर्याला, पराक्रमाला आणि स्वराज्यनिष्ठेला गर्वाने मराठी परिवाराकडून मानाचा मुजरा!

Post a Comment

0 Comments