Ticker

6/recent/ticker-posts

शंभुराजांना वाचवण्याचा अखेरचा प्रयत्न- रायप्पा महार यांचे बलिदान

शंभुराजांना वाचवण्याचा अखेरचा प्रयत्न- रायप्पा महार यांचे बलिदान

Rahayla mahar balidan

शंभुराजांना संगमेश्वरी कैद केल्यानंतर मुकर्रबखान शंभुराजांना अहमदनगर जिल्ह्यातील बहादूरगडाकडे घेऊन आला. शंभूराजे कैद झाले ही बातमी पसरायला थोडा वेळ गेला. रायगडावर बातमी पोहोचल्यानंतर शोककळा पसरली होती. संताजी, धनाजी, खंडोजी, जोत्याजी, रायप्पा आणि स्वतः महाराणी येसूबाई देखील महाराजाना कसे सोडवायचे याचा विचार करत होते. 

अखेरीस महाराणी येसूबाई यांच्या आज्ञेवरून 7 ते 8 हजारांची फौज सज्ज झाली. पण औरंगजेबाच्या 5 लाखांच्या फौजेचा सामना करायचा कसा हा प्रश्न होताच! कारण बहादूरगड हा तर भुईकोट किल्ला! 5 लाखांच्या फौजेसमोर समोरासमोर लढणे निव्वळ अशक्य होते. तसा प्रयत्न जर झाला जरी असता तरी सगळे मराठे कापले गेले असते. संताजी आणि धनाजी भयंकर संतापले होते. काहीही करून आम्ही राजांना सोडवून माघारी घेऊन येतो, असे त्यांचे म्हणणे होते. त्यावेळी महाराणी येसूबाई म्हणाल्या "संताजी आणि धनाजी आपण धीराने घ्या. आमचं कुंकू वाचवायच्या नादात हिंदवी स्वराज्याचा कपाळमोक्ष व्हायला नको!" 

इटक्यात रायप्पा महार उठून उभे राहिले. रायप्पा म्हणचे स्वराज्याचे निष्ठावंत मावळे! शंभुराजांचा रायप्पा हा बालपणापासूनच जिवलग मित्र होता. रायप्पाला हुंदका दाटून आला, येसूबाई राणी साहेबांकडे पहात ते बोलू लागले. "निदान आता तरी आम्हाला अडवू नका, राजांपर्यंत कसे पोहोचायचं ते पाहतो आम्ही!"

येसूबाईंचा निरोप घेऊन बहादूरगड च्या दिशेने रायप्पा निघाले. रायप्पांच्या सोबत होते त्यांचे भाऊ देवप्पा! बहादूरगड पासून जवळपास औरंगजेबाच्या धास्तीने गावची गावं गपगार पडली होती. माणसाचं तर सोडा पण जनावरे देखील समोर यायला घाबरत होती. परंतु रायप्पा मागे हटणारे नव्हते, काहीही झाले तरी त्यांना बहादूरगडाकडे पोहोचायचे होते. 

बहादूरगडाच्या मार्गावर असताना त्यांची भेट एका बिस्त्याच्या पथकाशी गाठ पडली. चामड्याच्या पिशवीतून पाणी घेऊन जायचं, फौजेत स्वार सैन्याला पाजायचं, हाच त्यांचा व्यवसाय होता. रायप्पाच्या लक्षात आले की हीच संधी आहे राजांपर्यंत पोहोचायची. त्यांनी कोणाकडून तरी चामड्याची जनकी मिळवली, त्या दख्खनी बिस्ती पथकात रायप्पा आणि देवप्पा सामील झाले. 

त्या दिवशी पाणी देणाऱ्या पथकाच्या प्रमुखाला फौजदाराचा निरोप आला. जे पथक आत किल्ल्यात जाणार होते त्यात रायप्पा सामील झाले. दुपारी ऊन वाढले, सूर्य माथ्यावर आला, तशी फौजेकडून पाण्याची मागणी वाढू लागली. बिस्ती चामड्याच्या पिशवीतून पळत पळत पाणी आणत होते. तहानलेल्या फौजेला पाजत होते. औरंगजेबाच्या आज्ञेवरून मुकर्रबखानाच्या स्वागताला त्याचे सगळे नामचंद सरदार गोळा झाले होते. शंभूराजे आणि कवी कलश यांना कैद करून साखळदंडाने जखडवून धिंड निघाली होती. तोपर्यंत ही धिंड कोणाची आहे याची रायप्पाला तिळमात्र कल्पना नव्हती. तो पाणी पुरवत आत किल्ल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता.

रायप्पा पाणी पुरवत पुढे आला तेव्हा जमवातून मराठे, दो कैदी असे अस्पष्ट शब्द त्याच्या कानावर पडले. थोड्या काळाने संभा हा शब्द रायप्पाच्या कानावर पडताच तो थरारून गेला. तो तसाच पाणी पुरवण्याच्या बहाण्याने गर्दीतून वाट काढत राजांना ज्या उंटा वरून धिंड निघाली होती, त्या उंटा पाठोपाठ चालू लागला. त्याने समोर येत एका वळणावर शंभूराजांकडे पाहिले. राजांचे ते चमकदार डोळे त्याच्या दृष्टीस पडले. दोघांची नजरानजर झाली आणि राजे उदासवाने हसले! शंभू राजांनी त्यांना ओळखले असावे. आपल्या राजाचे चालवलेले ते हाल पाहून इमानी रायप्पाचे काळीज तुटत होते. 

खोड्याच्या घट्ट लोखंडी कडया आणि बिजागऱ्या राजांच्या शरीराला बोचत होत्या. सुरुवातीला राजांच्या शरीरातून वेदनेच्या कळा उठत होत्या. पण हळूहळू सारे शरीरच बधिर होत गेले. जेव्हा शंभूराजे बहादूरगड च्या मुखय वेशिजवळ पोहोचले तेव्हा समोरचा महादरवाजा उघडला गेला. राजांसाठी काहीतरी करण्याची हीच नामी संधी आहे, हे रायप्पाच्या लक्षात आले. रायप्पाचे रक्त उसळले, कानशिले गरम झाले, धमन्या पेटल्या. काय होतय ते कळायच्या आधीच त्याने एकांडी झडप घातली! बंदोबस्तात असलेल्या एका राजपुताची तीक्ष्ण तलवार हिसकावून घेतली आणि काय होतय हे कळायच्या आधीच त्याने बाजूच्या दोन अंमलदारांना तलवारीने सपासप कापून काढले. राजे, शंभूराजे अशी आरोळी ठोकत तो पुढे धावला. 

आपल्या तलवारीच्या घावानी राजांच्या अंगातील साखळदंड तोडण्याचा वेडा प्रयत्न तो करत होता. इतक्यात संभा का आदमी, गनीम गनीम असा मोघलांनी गलका केला. राजांना सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रायप्पाच्या दिशेने एकाच वेळी अगणित तलवारी पुढे सरसावल्या. सपासप वार झाले, रायप्पाची पाठ - बलदंड खांदे सर्वांगावर तलवारीचे वार झाले. रायप्पाच्या शरीराचे अगणित तुकडे झाले. रस्त्यात पडलेले रायप्पांच्या शरीराचे तुकडे तुडवत तुडवत धिंड पुढे चालली होती. काय घडले हे राजांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले होते. शंभुराजांना सोडवण्याचा हा शेवटचा प्रयत्न ठरला! त्यानंतर शंभुराजांना बहादूरगड वरून इंद्रायणी भीमेच्या संगमावर वढू तुळापूर येथे आणण्यात आले. महाराजांचे पुढे इथेच निधन झाले.

Post a Comment

0 Comments