Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रा || Chatrapati Shivaji Maharaj Rajmudra

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रा || Chatrapati Shivaji Maharaj Rajmudra

एखाद्या ऐतिहासिक कागदावर शिक्का असेल तर तो कागद मान्य आहे असे त्याचे तात्पर्य होते. हा शिक्का म्हणजेच राजमुद्रा होय. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा हा अभ्यासाचा विषय आहे. आज आपण महाराजांच्या सर्व राजमुद्रा जाणून घेणार आहोत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रा || Chatrapati Shivaji Maharaj Rajmudra

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळात देखील महाराष्ट्रात हे शिक्के म्हणजेच राजमुद्रा होत्या परंतु त्या फक्त फारसी भाषेत होत्या. महाराजांचे वडील म्हणजेच शहाजी राजे यांची मुद्रा देखील फारसी भाषेत होती. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही त्यांच्या स्वतंत्र भूमिकेचा पुरस्कार करणारी संस्कृत भाषेतील वेगळी आणि विलक्षण अशी होती. आपण संभाजी महाराजांच्या राजमुद्रा या विषयावर आधीच माहिती बघितली होती. महाराजांच्या राजमुद्रेचा आदर्श ठेवत त्यांचे पुत्र आणि मंत्रिमंडळाने देखील संस्कृत भाषेत राजमुद्रा बनविल्या होत्या. 

शिवाजी महाराजांची राजमुद्रा किंवा शिक्का हा इतिहास अभ्यासकांसाठी कुतूहलाचा विषय आहे. शिवाजी महाराजांची मुद्रा जेव्हा तयार केली गेली तेव्हा ते लहान होते.   शहाजी राजे हे संस्कृतचे उत्तम जाणकार देखील होते. त्यासोबत त्यांच्या दरबारी अनेक संस्कृत अभ्यासक देखील होते. या दोन्ही गोष्टींचा संदर्भ घेता असे देखील वाटते की महाराजांची मुद्रा बनवत असताना शहाजी राजांचे महत्वाचे योगदान होते. 

आपण सर्व शिवप्रेमी ही राजमुद्रा शिरसावंद्य मानत असतो. इतिहास अभ्यासक देखील ही राजमुद्रा एखाद्या कागदपत्रांची सत्यता तपासताना महत्वाची मानतात. शिवाजी महाराजांची प्रचलित असलेली मुद्रा तर आपल्या सर्वांना माहीत आहे. याशिवाय देखील महाराजांच्या काही मुद्रा अस्तित्वात होत्या, ही गोष्ट आपल्याला कदाचित माहीत नसावी!  

हे देखील वाचा: छत्रपती संभाजी महाराजांची राजमुद्रा - Sambhaji Maharaj Rajmudra

महाराजांची जी सर्व पत्रे आज समोर आलेली आहेत त्यामध्ये सर्वात जुने पत्र हे 28 जानेवारी 1646 या तारखेचे आहे. या पत्रावर शिवाजी महाराजांची अष्टकोनी मुद्रा आहे. ती मुद्रा म्हणजे आपल्या शिरसावंद्य असणारी राजमुद्रा होय!

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता 

शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।

अर्थ- शुद्ध पक्षातील प्रतिपदेच्या चंद्रकोरीच्या प्रमाणे दिवसेंदिवस वाढत जाणारी विश्वातील वंदनीय अशी ही मुद्रा, शहाजीचा पुत्र शिवाजी यांची असून सर्वांच्या कल्याणासाठी शोभते आहे!

मिरज येथील जेष्ठ इतिहास संशोधक वासुदेव शास्त्री खरे यांचे चरित्र हे त्यांचे शिष्य असणाऱ्या दामोदर मोरेश्वर भट यांनी 1929 साली दोन भागात लिहिलेले आहे. त्यातील दुसऱ्या भागात शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा आणखी एक वेगळा भाग आपल्याला वाचायला मिळतो. आपल्याला माहीत असलेल्या मुद्रेसारखीच ही मुद्रा असून त्यात थोड्याफार प्रमाणात वेगळेपणा हा दिसून येतो. 

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता 

शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भाति यशस्विनी।।

अर्थ- शुद्ध पक्षातील प्रतिपदेच्या चंद्रकोरीच्या प्रमाणे दिवसेंदिवस वाढत जाणारी ही विश्ववंदनीय अशी मुद्रा शहाजीचा पुत्र शिवाजी यांची असून यशस्वी होवो!

या मुद्रेविषयी आणखी काही माहिती मात्र आपल्याला मिळत नाही त्यामुळे हिचा वापर झाला होता का? याविषयी मात्र संभ्रम आहेच.

सभासद बखर प्रसिद्ध करणारे रावबहादूर साने यांनी जेव्हा दुसरी आवृत्ती प्रसिद्ध केली त्यात परिशिष्ट 2 म्हणून मुद्रेचा एक श्लोक लिहिलेला (छापलेला) आहे.हा देखील मुख्य मुद्रेचा पाठभेदच असावा. 

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता 

शाहसुतस्य मुद्रेय शिवराजस्य राजते।।


राज्याभिषेकाच्या नंतर एक नवीन मुद्रा देखील बनवली गेली होती. ती पुढीलप्रमाणे

श्री महादेव

श्री तुळजाभवानी

शिवनृप रूपेणोर्वीमय

तीर्णोयःस्वयं प्रभु र्विष्णूः

एषा तदिय मुद्रा

भुबळ्यस्याभयप्रदा जयति।।

अर्थ- श्री शिवरायांच्या रूपामध्ये पृथ्वीवर अवतीर्ण झालेले हे स्वतः श्री विष्णुच आहेत. ही त्यांची मुद्रा संपूर्ण भूतलाला अभय देणारी आहे. तिचा जयजयकार असो!

भारत इतिहास संशोधक मंडळाच्या ऐतिहासिक संकीर्ण निबंध खंडात जून 1947 साली इतिहास संशोधक असणारे य रा गुप्ते यांनी ही राज्याभिषेक नंतरची मुद्रा समोर आणली. 1928 साली त्यांना कराड मॅजिस्ट्रेट आणि त्यांचे मित्र असणारे दादासाहेब दुबळ यांनी सभासद बखरीची एक प्रत दिली. शाहू महाराजांच्या राणी सकवारबाई यांच्या घराण्याशी त्यांचा संबंध होता. तिथून ती बखर दादासाहेबांकडे आली असे सांगितले जाते. या प्रतीवर 1857 मध्ये तयार केल्याचा उल्लेख आढळतो. यावर विठू पाटील लांडे  यांनी लिहिलेली असल्याचे नमूद केलेले होते. त्या सभासद बखरीच्या प्रतीत ही मुद्रा पहिल्यांदा सापडली होती.

गुप्ते यांनी ती प्रत विख्यात संशोधक द वि आपटे आणि इतिहासकार सरदेसाई यांच्याकडून तपासून देखील पाहिली.   शिवभारतकार परमानंद गोविंद नेवासकर यांनी राज्याभिषेकावेळी हा श्लोक लिहिला होता असा उल्लेख देखील आढळतो. आता कवींद्र परमानंद राज्याभिषेक काळात हयात होते का? याचा पुरावा आजही कोणाला सापडलेला नाही. 

महाराजांनी राज्याभिषेक झाल्यानंतर देखील जुनी मुद्राच वापरली होती असे पुढे पत्रांमधून आपल्याला कळते. सहयाद्री इतिहास संशोधन केंद्राचे इंद्रजित सावंत यांनी पुराभिलेखागार येथे शोध घेत असताना या राज्याभिषेकानंतर वापरल्या गेलेल्या मुद्रेचे ठसे सापडले. इंद्रजित सावंत यांनी ही माहिती पुन्हा एकदा समोर आणली. 

कोल्हापूर येथे असलेल्या पुराभिलेखागारातील आणि शाहू संशोधन केंद्रातील काही अस्सल कागदपत्रांचा अभ्यास करत असताना करवीर घराण्यातील मुद्रा उमटवलेल्या कागदपत्रांचा त्यांना शोध लागला. इ स 1866 पर्यंत करवीर छत्रपतींच्या गादीवर आलेल्या सर्व छत्रपतींच्या मर्यादा आणि मुद्रा एका ठिकाणी त्यांना सापडल्या. त्यामध्ये ही मुद्रा त्यांना सापडली. या मुद्रेला तिथे महादेव मुद्रा म्हणून नाव दिलेले होते. 

शिवाजी महाराजांची लेखन समाप्ती मुद्रा

शिवाजी महाराज लेखन संपवत असताना शेवटी एक मुद्रा उमटवत असत आणि ती म्हणजे 

मर्यादेयं विराजते

ही मुद्रा जवळपास बऱ्याच लोकांना माहिती देखील आहे. 

काही काळापूर्वी महाराजांचे हस्ताक्षर आहे म्हणून एक पत्र समोर आले होते परंतु त्याची सत्यता तपासताना ही समाप्ती मुद्रा कामी आली होती. समाप्ती मुद्रेत शेवटी एक शिरोरेषा नव्हती आणि त्यामुळे हे पत्र बनावट असल्याचे समोर आले होते. 

Post a Comment

0 Comments