Ticker

6/recent/ticker-posts

अहमदनगरचा भुईकोट किल्ला (कोटबाग निजाम/ निजाम फोर्ट) Ahmednagar Fort


अहमदनगरचा भुईकोट किल्लाअहमदनगर चा भुईकोट किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर शहराजवळील किल्ला आहे.किल्ल्याचे नाव- भुईकोट किल्ला, अहमदनगर किल्ला, कोटबाग निजाम, निजाम फोर्ट, भिंगारचा किल्ला
समुद्रसपाटीपासुन ऊंची-  ६५७ मी.
किल्ल्याचा प्रकार- भुईकोट
चढाईची श्रेणी- सोपी
ठिकाण- अ‍हमदनगर शहराजवळील भिंगार मध्ये
जिल्हा- अहमदनगर
सध्याची अवस्था-चांगली

किल्ल्याला भेट द्यायला कसे जाल?

    पुण्याहुन शिरुर मार्गे नगर १२१ कि.मी. आहे.
    औरंगाबादहुन अहमदनगर ११४ कि.मी. आहे.
    शिर्डी पासुन अहमदनगर १६० कि.मी. आहे


अहमदनगर शहरात आल्यास २ कि.मी. अंतरावर हा किल्ला असुन बसने किंवा टॅक्सीने किल्ला पाहन्यास जाता येते.
मनमाड-दौंड रेल्वेमार्गावर अहमदनगर येथे मध्य रेल्वेचे स्टेशन आहे. स्टेशन जवळच शहर आहे व शहराच्या पुर्वेला भुईकोट किल्ला आहे.

भेटिची वेळ- सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत (७ही दिवस)
अहमदनगरचा भुईकोट किल्ला

किल्ल्यावर प्रवेश करताना-

सुरक्षेच्या कारणास्तव मर्यादित भेटीची वेळ पाळवी.
प्रवेश करण्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, वोटर आय डी, इ. सरकारमान्य ओळखपत्र असावे.
किल्ला केवळ तटबंदी वरुनच फिरुन पाहता येतो. किल्ल्यात उतरुन फक्त काही भागच पाहाता येतो.

भुईकोट म्हणजे सभोवताली तट बांधुन जमिनीवरच बांधलेला किल्ला. अहमदनगरचा भुईकोट म्हणजे अजिंक्य किल्ला, संपुर्ण इतिहासात एकदा ही हा किल्ला कोणालाही स्व-बळावर जिंकता आला नाही. जिंकला तो फक्त वाटाघाटिने अथवा फंद-फितुरिनेच!

किल्ल्याचा आकार हा बशीसारखा, बाहेरुन आता किल्ला बाहेरुन दिसतो परंतु इतिहासात असा उल्लेख आहे कि एकदा मोगल सैन्य किल्ल्याशेजारुन गेले परंतु त्यांना किल्ला दिसला नाही. याला कारणहोत किल्ल्याच्या बाजुने खंदकातील काढलेली माती टाकलेली होती ज्यामुळे बाहेरुन मातीच्या टेकड्या तयार झाल्या होत्या व किल्ल्याला एक आणखी संरक्षन मिळत होते तटावर होनारया तोफांच्या मार्‍यापासुन.

दुसरी संरक्षक फळी होती ती खंदकाची. आजही खंदक आपल्याला बघायला मिळतो. आता खंदकात पाणी नसते पण एखादा चांगला पाऊस झाला तर आजही खंदकात पाणी असते. खंदकाची रुंदी हि ३५ ते ४५ मी. इतकी असुन ते खोल देखिल आहे. जवळच भिंगार नाला आहे त्यामुळे कदाचित अस वाटू शकते की याचच पाणी खंदकात येत असेल तर इतिहास अभ्यासक सांगतात की कापुरवाडी व शहापुर चे तलाव त्या काळात बांधले होते व तेथुन खापरी नळाने ते पाणी खंदकात सोडले जायचे व हवे तेव्हा ते बाहेर देखील काढन्याची व्यवस्था होती व पाणी सोडन्याचा नळ इथे आजही आहे. खंदकात विषारी सर्प व मगरी सुसरी असत, त्यामुळे पोहुन पार करने अशक्य!

किल्ल्यात शिरल्यावर उजवीकडे नोंदनीकक्ष व डावीकडे वाहनतळ आहे. किल्ल्याचा आकार हा अंडाकृती असुन एकुण २२ बुरुज या किल्ल्याला आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक बुरुजाला निजामशहाने आपल्या सरदारांची किंवा तिथे पहारयाला असलेल्या तुकडिचे नाव दिलेले होते. याने सैनिकांचे मनोबल ऊंचावन्याचा प्रयत्न केला जात होता हे लक्षात येते.जवळपास २ कि.मी. लांबीची तटबंदी या किल्ल्याला आहे. तटबंदीच्या आत  एकुण ६ राजमहाल होते. गगन महाल, सोन महाल, मीना महाल, बगदाद महाल, मुल्क आबाद ही अशी काही त्यांची नावं. मध्यभागी एक मदरसा देखील होता. किल्ल्यात एक संपुर्ण गाव असल्याने मदरस्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था होती व ४ पाण्याच्या विहिरी देखील होत्या. गंगा,यमुना, मछलीबाई, शक्करबाई ही अशी काही विहिरिंची नावे. सध्या या वास्तु दिसत नाहीत, काळाच्या ओघात  त्या नष्ट झाल्या.

अहमदनगरचा भुईकोट किल्ला

किल्ल्यामध्ये सध्या आपण ज्या दरवाजाने आत जातो त्या दरवाज्याची गरज ही दुसरया महायुद्धाच्या वेळी भासली कारण मुख्य हत्तीदरवाजा मधुन रणगाडे आणने कठिण होते. २रया महायुद्धाच्या काळापासुन नगर हे मुख्य लष्करी तळ बनले व स्वातंत्र्यानंतर देखील आजही इथे भारतीय सैन्यदलाचे तळ आहेत. आजही  किल्ला मिलिटरीच्या ताब्यात असल्याने काही ठिकाण, किल्ल्याचे भाग आपल्याला पाहता येत नाहीत.
किल्ल्याला हत्तीदरवाजा हा त्या काळातिल मुख्य दरवाजा आहे. या दरवाज्याचे वैशिष्ट्य म्हणजे अगोदर दरवाजात येताना व नंतर किल्ल्यात येताना ९० अंशाच्या कोनातुन वळुन आत यावे लागते. औरंगजेब जेव्हा नगर च्या किल्ल्याला भेट देउन गेला तेव्हा त्याने या दरवाजाची रचना बघुन आपल्या वडिलांनी (शहाजहानने) बांधलेल्या लाल महालाला अशी रचना केली. यामुळे शत्रु सैन्याला येताना खुप सारया अडचणी सोबत जास्त वेळ बुरुजावरील सैनिकांचा सामना करावा लागत असे. खंदकावरुन या दरवाजात येताना एक साखळदंडाने बांधलेला पुल आहे. हा पुल काढुन घेता येत होता आणि स्वराज्याच्या नियमांप्रमाने इथे देखिल सुर्योदयाला पुल लावने व सुर्यास्ताला काढने हा नियम होत. हत्तीदरवाजा वर लांब लांब खिळे आहेत जेणेकरुन कोणीही शत्रु हत्ती इथे दरवाजा तोडन्यासाठी आघात करेल तेव्हा त्याच्या गंडस्थळात ते सुळे घुसतिल. याच दरवाजाला दिंडी दरवाजा आहे.
हत्ती दरवाजा ज्या बुरुजात आहे तो २२ बुरुजांपैकी एकमेव असा बुरुज आहे जो पोकळ आहे. यालाच किल्ल्याचा एक नंबर चा बुरुज म्हनुन ओळखले जाते. दरावाजाच्या बाहेरिल बाजुस वरच्या भागात एक शिल्प दिसते ते असे, एक वाघ आहे व त्याच्या चार पायाखाली ४ हत्ती आहेत. या शिल्पाचा अर्थ हाच की वाघ म्हणजे निजामशाही आणि त्याच्या पायाखाली असलेले ४ हत्ती म्हनजे इतर चार शाह्या, हे शक्तिचे प्रतिक आहे. आतील बाजुस आपल्याला शरभ शिल्प (हत्तीचे तोंड आणि वाघ किंवा सिन्हाचे शरिर) दिसते. या बुरुजाला ब्रिटिश काळात फार महत्व होते, युनियन जॅक म्हणजेच ब्रिटिशांचा भारतातील झेंडा व सर्वात मोठा झेंडा याच बुरुजावर लावला गेला होता. भारतीयांनी देखील ही परंपरा पुढे चालवत स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतातील तेव्हाच्या सर्वात मोठ्या ३ तिरंग्यांपैकी मानाचा एक तिरंगा याच किल्ल्यावरील हुसेनी(इतर नावे-निशान, फत्तेही) बुरुजावर फडकवला गेला.
आज जो ३ नंबर चा बुरुज आहे तिथे १९५३ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरु  यांनी ध्वज फडकवला आणि आजही तो दररोज रितिरिवाजाप्रमाने फडकवुन सायंकाळी उतरवला जातो.
पहिल्या बुरुजावरुन थोडं पुढे गेल्यावर आपल्याला खाली खंदकात भुयार दिसतात.  त्यातील एक रस्ता सध्या जे कलेक्टर ऑफिस आहे तिथे निघतो, आजही ती इमारत जुनी जशी होती तशीच आहे परंतु तळघर आज बंद केलेले असल्याने व मार्गात नविन बांधकाम झाल्याने ते नष्ट झालेत. दुसरा मार्ग हा फराहबक्ष महालात निघतो.
एका भव्य बुरुजावरुन (४था बुरुज) खाली तटबंदित उतरायला जिना लागतो. तिथे कधी कधी जाता येते परंतु काही वेळेस तिथे जान्यास मनाई केली जाते.
हत्ती दरवाजातुन पुढे आल्यावर जुनं कारागृह दिसते. जुने या शब्दाचा आवर्जुन उल्लेख केला कारण नविन देखिल कारगृह किल्ल्यात आहे. इथेच मराठा इतिहासातील काही वाईट क्षण आहेत ते खाली इतिहास या भागात दिलेले आहेत. तटबंदिच्या आतील बाजुस ३ पायरयांची  रचना केलेली आहे. यातील तटबंदिजवळिल पायरी ही  घोड्यावरुन गस्त घालनारया सैनिकासाठी होती, दुसरी ही गस्ती साठी होती आणि तिसरी पायरी ही युद्धच्या काळात रसद पुरवन्यासाठी होती. सर्व बुरुज जर आपन पाहिले तर प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे. काही बुरुजांवर उतार पाहायला मिळतो जो तोफा चढवन्यासाठी केला जायचा. प्रत्येक बुरुजावर तोफांसाठी अशी रचना केली आहे की तिथुन १८० अंशापर्यंत तोफांचा मारा केला जाऊ शकत असे. भिंती मध्ये काही छिद्र दिसतात त्याला ऐतिहासिक भाषेत जंग्या म्हनतात, येथुन येनारया शत्रुवर उकळत तेल, गरम पाणी टाकले जायचे. इथुनच लांब पल्ल्याच्या एनफिल्ड या बंदुकांमधुन मारा केला जात असे.
हत्त्ती दरवाज्याच्या अगदी विरुद्ध बाजुला (७व्या बुरुजावर)एक आपत्कालीन मार्ग आहे तिथे भारतातिल पहिला झुलता पुल आहे त्यालाच इंग्रजी मध्ये IRON SUSPENSION BRIDGE म्हणतात. एका इंग्रज अधिकारयाने हा पुल बांधला होता आज त्याचे काही अवशेष शिल्लक आहेत..
किल्ल्यावरील दोन महत्वाच्या इमारती म्हनजे दिवाण-ए-आम आणि दिवाण-ए-खास.  दिवाण-ए-खास आता बघता येत नाही परंतु नेता कक्ष कडे जाताना तिथे दगडी बांधकाम जे दिसते ते आहे दिवाण-ए-खास. सुंदर नक्षीकाम हे खास आहे इथे. त्यानंतर दिवाण-ए-आम म्हणजे नविनकारगृह होय. इंग्रजांच्या ताब्यात किल्ला गेल्यानंतर वेलस्ली ने दिवाण-ए-आम पाडुन तिथे बराकी बांधल्या त्यामुळे त्यांना “वेलस्लिज बराकी” म्हणुन ओळखले जाते. इथेच स्वातंत्र्यलढ्यातील कैदी ठेवले जात त्यांना राजकैदी म्हणत.
(लिडर्स ब्लॉकचे फोटो लवकरच येथे असतिल)

अहमदनगरचा भुईकोट किल्ल्याचा इतिहास:

बहामनी राज्याचे पाच तुकडे झाल्यानंतर इ.स. १४८५ मध्ये अहमदनगरात निजामशाही उदयास आली. बहामनी राज्यातील मलिक अहमद(तमाभट असा देखिल याचा उल्लेख आढळतो) याला जुन्नर व बीड ही जहागिरी मिळाली परंतु त्याने जुन्नर ला राजधानी स्वतंत्र राज्य उभारलं.
इ.स.१४८९मध्ये बिदर च्या बिदरशहा व मलिक अहमद यांच्यात भिंगार येथे लढाई (जंग ए बाग) झाली यात निजामाचा म्हणजेच मलिक अहमद चा विजय झाला. या विजयाची आठवण म्हणून २८ मे १४९० रोजी निजामाने सीना नदीकाठी राजवाडा बांधला आणि हीच खरी नगर शहराची स्थापना व भुईकोट किल्ल्याचा पाया! आणि आजही ही वास्तु बघायला मिळते.

मलिक अहमद निजामशहा हा हुशार होताच परंतु दुष्काळामध्ये नगर शहर वसवले याचे कौतुक आहे. पहिली कर्जमाफी शिवाजी महाराजांच्या अगोदर याने केलेली आहे असा उल्लेख देखील आहे. मलिक चा मुलगा बुर्हान निजामशहा  हा रत्नपारखी होता त्याने आपल्या शहरात भुमिखान दख्खनी  हा तसा ग्रीकचा परंतु नंतर इराणचा तोफाबनवनारा निश्नात कारागिर निजामशाहीमध्ये आणला. नगर मधिल महेश थिएटर जवळ त्याने “मुलुख-ए-मैदान” ही तोफ गाळली आहे. इतिहास अभ्यासक असाल तर ही तोफ तुम्हाला नक्की माहित असेल. ही तोफ म्हणजे ५५ टण वजण, १४ फुट ११ इंच लांब, तिच्यावर जर आघात केला तर घंटानाद ऐकु येतो आणि भर उन्हात जरी हात लावाल तर बर्फसारखी थंडगार! आज ही तोफ आपल्याला विजापुरच्या किल्ल्यावर बघायला मिळते. भुईकोट किल्ल्याचा महत्वाचा संरक्षक भाग म्हणजे तोफा. आणि नगर किल्लाच नव्हे तर इतर सर्व किल्ल्यांवर आज ज्या तोफा बघायला मिळतात त्या याच नगर मध्ये बनलेल्या.

पुढे अहमद निजामाच्या म्रुत्युनंतर इ.स. १५५३ साली हुसेन निजामाने (अहमद निजामशहा चा नातु व बुर्हांशहा चा मुलगा) भव्य असा भुईकोट बांधला त्याच नाव ठेवलं ‘ कोट बाग निजाम’. पोर्तुगिज इंजीनियर ने हा किल्ला बांधला.

इ.स. १५९९ मध्ये दानियालने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला तेव्हा हुसेननिजामशहाची पहिली बेटी चांदबिबी ने निकराने लढा दिला. दानियल म्हणजे मुघल सरदार.. निजामशाही व कुतुबशाही वाचवन्यासाठी तिने सम्राट अकबर ला विरोध केला. ती निकराने लढली परंतु बंडाळी व फितुरी पुढे पराभव झाला. चांदबिबीला तिच्या सरदाराने मारल्याचा उल्लेख काही ठिकाणी आहे. इ.स. १६०० मध्ये हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.

चांदबिबीच्या पश्चात हा किल्ला मोगलांकडुन पुन्हा निजामशाही मध्ये आला यात कदाचित शहाजीराजांचा संबंध असेल. शहाजी राजांनी निजामशाही वाचवन्यासाठी अथक प्रयत्न केले परंतु निजामशहाच्या नियोजनशुन्य धोरनामुळे अखेर निजामशाहीची सत्ता १६३६ मध्ये संपूष्टात आली व किल्ला शहाजहानकडे गेला.

या  किल्ल्याचा शिवाजी महाराजांसोबत सम्बंध येत नाही असे तुम्हाला देखिल वाटत असेल परंतु महाराजाना देखील वाटत होते की हा किल्ला आपल्या स्वराज्यात असायला हवा होता. याचे कारण होते शिवरायांचे वडिल श्री शहाजी राजे निजामशहा कडे होते. शहाजीराज्यांचे वडिल मालोजीराजे यांचावाडा आज नगर मध्ये जी अर्बन बॅंक आहे तिथे वाडा होता व आजही तुम्ही येथिल तळघर बघु शकता. अमृतेश्वराचे मंदिर जे आजही आहे  ते मालोजीराजे यांनी स्थापन केलेल आहे.यासोबत श्री लखुजीराजे जाधव यांचा देखिल संबंध नगर शहरासोबत निजामशहा मुळे येतो. लखुजीराजे म्हणजे राजमाता जिजाऊ यांचे वडिल होय.

महाराजांनी अहमदनगर किल्ला घेन्याचा दोन वेळेस व एकदा लुटन्याचा यशस्वी प्रयत्न केला असा उल्लेख आढळतो. यातील यशस्वी प्रयत्नाविषयी बोलायच झालं तर २५ घोडेस्वारांनी हल्ला करत मजबुत आणि अभेद्य अशा अहमदनगर किल्ल्याची सुरक्षाव्यवस्था तोडून किल्ल्याची संपत्ती लुटली. आता तुम्ही म्हनाल हे कुठे लिहिलेल नाहीये तर याच उत्तर आपल्याला पत्रव्यवहारात मिळतं. या लुटी मध्ये २ घोडेस्वारांना जलसमाधी मिळाली. एक होता नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील. या वीर मावळ्याच्या घरच्याव्यक्तींच्या सांत्वनासाठी केलेला पत्रव्यवहार आहे त्यातुन स्पष्ट होते की त्या कुटुंबाची संपुर्ण जबाबदारी महाराजांनी स्वतः घेतली.

मोगलांच्या ताब्यात असताना या किल्ल्याचा प्रथमतः उपयोग कारागृह म्हणुन झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर महारानी येसुबाई, बाळ शाहुराजे, मुलगी भवानीबाई व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी मातोश्री सकवारबाई यांना इथेच कैदेत ठेवल होत. महादजी शिंदे यांची पत्नी देखील काही काळ येथेच कैदेत होत्या. आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे माहित असतील सर्वांन, त्यांचे पुत्र तुळाजी आंग्रे हे देखील इथे कैदेत होते.
इ.स १७६९ मध्ये पेशव्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला (मोगलांकडुन विकत घेतला). इथे पेशवे काळात कैदेचा जास्त उल्लेख आहे. मराठ्यांच्या इतिहासात साडेतीन शहाणे होते असे म्हनतात त्यातील सर्वात हुशार नाना फडणिस/ फडणवीस यांचे बंधु मोरोजीनाना यांनी पद घेन्याचा प्रयत्न केल्याने त्यांना इथे कैदेत ठेवलं होतं.पानिपतच्या रनसंग्रामानंतर आलेला तोतया सदाशिवराव चे कारस्थान समोर आल्यावर त्याला देखील कैदेत ठेवल होत. स्वतः नाना फडणिस/ फडणवीस  यांच्या मृत्युच्या अगोदरचा काही काळ ते इथेच कैदेत होते. इ.स. १७९७ मध्ये हा किल्ला पेशव्यांनी शिंदे घरान्याच्या ताब्यात दिला.
१२ ऑगस्ट १८०३ रोजी लॉर्ड वेलस्लीने अहमदनगर किल्ला पेशव्यांच्या ताब्यातुन घेतला. पुढे या किल्ल्याचा  उपयोग भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील राजकैद्यांना तुरुंगात टाकन्यासाठी झाला. सर्वात पहिले राजाराम महाराजांचे चिरंजिव व शाहु महाराजांचे वडिल  छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांना भुईकोट किल्ल्यात ठेवले होते व त्यांचा छळ केला जात होत. वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी २५ डिसेंबर १८८३ मध्ये छत्रपती गेले त्यानंतर जनतेत रोश उफाळुन आला व स्वातंत्र्यचळवळीला एक वेगळी दिशा मिळाली. सर्वांनी एकत्र येऊन १८८५ मध्ये कॉंग्रेस ची स्थापना केली.

१९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात इंग्रज सरकारने पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रिय नेत्यांना अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात डांबुन ठेवले होते. पंडित जवाहरलाल नेहरु यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’, प्रफुल्लचंद्र घोष यांनी ‘हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन’ हे ग्रंथ लिहिले. आणि इथुनच भारताच्या स्वातंत्र्यउत्तर काळाची रुपरेशा ठरली.

काही राजकैदी व त्यांचा कारावास कालवधी

नावे:                                                              कालावधी
१) सरदार वल्लभ भाई पटेल:       १० ऑगस्ट १९४२ - १८ एप्रिल १९४५
२) पंडित गोविंद वल्लभ पंत:        १० ऑगस्ट १९४२ - २८ मार्च १९४५
३) आचार्य नरेंद्र देव:                  १० ऑगस्ट १९४२ - २८ मार्च १९४५
४) आचार्य जे .बी. कृपलानी:        १० ऑगस्ट १९४२ - २७ मार्च १९४५
५) मौलाना अबुल कलाम आझाद: १० ऑगस्ट १९४२ - १७ एप्रिल १९४५
६) पंडित जवाहरलाल नेहरू:       १० ऑगस्ट १९४२ - २८ मार्च १९४५
७) असफ अली:                        १० ऑगस्ट १९४२ - ३ एप्रिल १९४५
८) डॉ.पी सी घोष:                    १० ऑगस्ट १९४२ - २० मे १९४४
९ ) पंडित हरेकृष्णा मेहताब:       १० ऑगस्ट १९४२ - २९ मार्च १९४५
१०) शंकरराव देव:                   १० ऑगस्ट १९४२ - १८ एप्रिल १९४५
११)डॉ.बी.पट्‍टभी सितारामन:    १० ऑगस्ट १९४२ - ५ एप्रिल १९४५
१२)डॉ. सय्यद महमुद:               १० ऑगस्ट १९४२ - ६ ऑक्टोबर १९४४

राहन्याची व खाण्यापिण्याची सोय-

अहमदनगर भुईकोट किल्ला शहरात असल्यामुळे शहरात जेवनाची व राहन्याची उत्तम सोय होऊ शकते.
सध्या किल्ला लष्कराच्या ताब्यात असल्यामुळे काही कारनास्तव किल्ल्याचा काही भाग पाहता येत नाही.

Click Here: Marriage Anniversary Wishes In Marathi

Post a Comment

3 Comments