किल्ले कुर्डुगड (रायगड)
सह्याद्री डोंगररांगांमुळे महाराष्ट्राचे कोकण किनारपट्टी सह्याद्रीची रांग व त्यावरील पठार किंवा घाटमाथा असे तीन भाग पडले आहेत. येथील राज्यकर्त्यांचा प्राचीन काळापासून परदेशासी व्यापार चाले. कोकण किनारपट्टीवर उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील बाजारपेठांमध्ये जात असे. त्यामुळे या परिसरात संपन्न बंदरे, शहरे, बाजारपेठा तयार झाल्या. त्याकाळी वापरण्यात येणारी शिडांची गलबते समुद्रातून खाडी मार्गे नदीत आतपर्यंत येत. भिर्याला ऊगम पावणारी कुंडलिका नदी अरबी समुद्राला कोर्लई जवळ मिळते. प्राचीन काळा पासून कुंडलिका नदीतून व्यापार चालत असे. घाटावर जाणारा माल विविध (ताम्हणी, थळ घाट इत्यादी) घाटमार्गंनी घाटमाथ्यावरील बाजारपेठेत जात असे. या व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदर, घाटमार्ग व घाटमाथा अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. ताम्हणी घाटाचे रक्षण करण्यासाठी कुर्डुगड (विश्रामगड) हा किल्ला बांधण्यात आला होता.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
किल्ल्याची ऊंची : २०२० फुट
डोंगररांग : ताम्हणि घाट
जिल्हा : रायगड
श्रेणी : मध्यम
गडावर जाण्याच्या वाटा: मुंबई -पनवेल - पेण मार्गे मुंबई- गोवा महामार्गावरील कोलाड गाव (१२० किमी) गाठावे. कोलाड गावाच्या पुढे डाव्याबाजुला ताम्हणी घाटमार्गे पुण्याला जाणारा रस्ता आहे तो पकडावा. ताम्हणी घाटाच्या अगोदर वरचीवाडी गाव आहे. तेथे मुख्य रस्ता सोडुन उजव्या बाजुला बागड गावाला जाणारा रस्ता पकडावा. हा रस्ता बागड एम आय डी सी - तासगाव - कांदळगाव- बामणवाडी मार्गे किल्ल्याच्या पायथ्याच्या जिते गावात जातो. जिते गावाच्या पुढे ३ किलोमीटर अंतरावर उंबर्डी गाव आहे. या गावाच्या पूर्वेला कुर्डूगड किल्ला आहे.या गावात एक हेमाडपंथी मंदिर आहे. उंबर्डी गावातून खड्या चढाच्या वाटेने आपण १ ते १.५ तासात, कुर्डूगडाच्या माचीवर असलेल्या कुर्डूपेठेत पोहोचतो. उंबर्डी गावातून विजेच्या खांबांच्या बाजूने पायवाट थेट कुर्डूपेठे पर्यंत जात असल्यामुळे चुकण्याची शक्यता नाही. कुर्डूपेठे वाडीतून ३० मिनिटात आपण गडाच्या प्रवेशव्दारात दाखल होतो.
राहण्याची सोय : राहण्याची सोय नाही
जेवणाची सोय : जेवणाची सोय स्वतः करावी
पाण्याची सोय : किल्ल्यावर बारमाही पिण्याच्या पाण्याची टाकी आहे
पायथ्याचे गाव: कुर्डूपेठे वाडी
वैशिष्ट्य : गडमाथा,लिंग्या घाट धबधबा
0 Comments