Ticker

6/recent/ticker-posts

पांडवगड किल्ला : विराटनगरीचा पहारेकरी || Pandavgad Fort Information in Marathi

पांडवगड किल्ला : विराटनगरीचा पहारेकरी || Pandavgad Fort Information in Marathi


वाई म्हणजेच जुन्या काळातील विराटनगरी! सातारा प्रांतात असलेल्या कृष्णा नदीच्या काठी वसलेले हे सुंदर शहर! याच विराटनगरीच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आलेला किल्ला म्हणजे किल्ले पांडवगड. 

आज याच पांडवगड किल्ल्याच्या विषयी माहिती आपण मराठी मध्ये जाणून घेणार आहोत. गडावरील वास्तू आणि इतिहास यांची पुरेपूर माहिती तुम्हाला या लेखातून नक्की मिळेल. 
Pandavgad Fort pandavgad killa


गडाचे नाव - पांडवगड (Pandavgad)

गडाचे स्वरूप - गिरिदुर्ग

समुद्रसपाटीपासून उंची - 1273 मिटर (4170 फूट)

ठिकाण - वाई, सातारा

जिल्हा - सातारा

सध्याची अवस्था - बिकट


पांडवगड ला कसे पोहोचाल ? How to Reach Pandavgad Fort?


सातारा जिल्ह्यातील वाई प्रांतातून तुम्हाला गडावर सहज पोहोचता येते. त्यासाठी तुम्हाला गडाच्या पायथ्याशी असलेल्या गुंडेवाडी या गावात यावे लागेल. गुंडेवाडी गावाकडे जाणारा रस्ता हा मांढरदेवी रस्ता नावाने ओळखला जातो. 

पुण्यातील भोर इथून जर तुम्ही येत आला तर खानापूर, नेरे करत मांढरदेवी रस्त्याने तुम्हाला मांढरदेवी मंदिराकडे न जाता घाटाने पुढे यायचे आहे. त्यानंतर तुम्ही पांडवगड च्या पायथ्याशी असलेल्या गुंडेवाडी गावात पोहोचाल. 


पांडवगड किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे - Places to visit on Pandavgad Fort in Marathi


गुंडेवाडी गावातून घरापाशी लावलेल्या पांडवगड च्या फलकापासून आपली गडफेरी सुरू होते. घरांपासून जाणाऱ्या वाटेने आपला प्रवास सुरू होतो. घरांच्या समोर विरुद्ध बाजूला आपण आपली वाहने पार्क करू शकतात.


गडावर जाणारी वाट ही दाट झाडीतून जाणारी आहे. वळणावळणाचा रस्त घेत आपण गडावर असलेल्या मॅप्रो गार्डनच्या खाजगी प्रॉपर्टी असलेल्या बोर्ड जवळ येऊन पोहोचतो. तिथून पुढे तुम्हाला कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. 

गडावर काही अंतर चालून गेला की मोठ्या तलाव जवळ येऊन पोहोचतो. या तलावात तुम्हाला झाडांच्या सावलीमध्ये हिरवेगार असे पाणी दिसते. पुढे लगेच डाव्या बाजूला एक घर आहे. त्यामध्ये जाऊन तुम्हाला तुमचे नाव आणि माहिती द्यावी लागेल. माहिती यासाठी द्यावी लागते कारण ही जागा mapro गार्डन यांच्या खाजगी मालकीची असून त्यानंतर पुढे गड आहे. 

माहिती देऊन आपण पुढे आल्यास आपल्याला डाव्या बाजुला एक खराब पाण्याचं टाकं आणि पुढे आणखी एक पाण्याचं टाक दिसेल. पांडवगड हा किल्ला पाण्याच्या टाक्यांसाठी प्रसिद्ध आहे. वाटेत आणखी काही पाण्याच्या टाक्यांचा समूह दिसतो. इथे देखील एकूण 6 टाकी असून यातील पहिल्या क्रमांकाचे टाके हे खांब टाके आहे. 

इथून तुम्ही गडाला फेरी देखील करू शकतात. डाव्या बाजूने पुढे गेल्यास तुम्हाला कपारीत असलेल्या ग्रामदैवत चे ठिकाण दिसेल. त्याच्या पुढे खाली दक्षिण बाजूला गेले असता मेणवली गावाकडून येणारी वाट दिसते. याच वाटेवर पहारेकऱ्यांच्या देवड्या आणि उध्वस्त दरवाजा देखील आहे. आपण गडाला फेरी मारून पुढे आल्यास वाटेत आपल्याला आणखी काही पाण्याची टाकी दिसतात. 

6 टाक्यांच्या समुहापासून पुढे उजव्या बाजूला गेले असता आपल्याला गडाच्या पहिल्या दरवाज्याचे दर्शन होते. इथे बुरुज आणि कमान उध्वस्त झालेला दरवाजा आपल्याला बघायला मिळतो. वाटेत पुढे गडाचा दुसरा दरवाजा लागतो. 

दोन्ही दरवाजाचे अवशेष बघून आपण पुढे मारुती मंदिरात येऊन पोहोचतो. इथे पत्र्याचे छप्पर घातलेल्या विटांच्या बांधकामातील मंदिरात रौद्र मारुतीची मूर्ती आहे. मारुतीराया चे दर्शन घेऊन आपण चुन्याच्या घाण्याजवळ पोहोचतो. चुन्याच्या गाण्याचा चर आणि दोन्ही जाते तुम्हाला इथे बघायला मिळतील.

वाटेत पुढे पांडवाजाई मातेचे मंदिर आहे. मंदिरात पांडवजाई मातेची सुबक मूर्ती तांदळा स्वरूप असून त्याच्या समोर इत्रा काही मूर्ती आहेत. मंदिराचे छत सध्या मोडकळीस आलेले आहे. मंदिराच्या बाहेर लगेच दोन शिवलिंग आणि एक नंदी आहे. तर इथे परिसरात शिवमंदिर नक्की असावे असे वाटते. 

मंदिराच्या समोर एक शीळा असून त्याच्या बाजूला पादुका समाधी शिल्प आणि पाण्याचं एक छोटंसं कुंड आहे. हे सर्व बघून आपण मंदिराच्या मागे गेले असता तिथे एक घुमटी स्वरूप मंदिर आहे. कदाचित हेच शिवमंदिर असावे. मंदिराच्या शिखराची रचना मागील बाजूने नीट बघता येते .

मंदिराच्या पुढे शेजारीच एक उध्वस्त वास्तू आहे. दक्षिण बुरुजाकडे जाणारी वाट रुळलेली नसली तरी देखील त्या बाजूनं धोम धरण परिसर अगदी सुंदर दिसतो. 

मंदिराच्या पाठीमागे असलेल्या तलावाकडे जाणारी वाट ही नाहीये. तुम्हाला जायचे असेल तर दक्षिण बुरूज पासून तुम्हाला बाजूने तिथपर्यंत पोहोचता येते.  


पांडवगड किल्ल्याचा इतिहास - History of Pandavgad Fort in Marathi


शिलाहार राजा भोज दुसरा याने पांडवगड ची निर्मिती केली. बहमनी सत्तेच्या अस्तानंतर हा किल्ला विजापूरच्या आदिलशाही कडे होता. त्यानंतर तो स्वराज्यात आला. 

मोरोपंत पिंगळे आणि निरो सोनदेव यांनी त्रिंबक व्यंकटेश यांना 26 ऑक्टोबर 1671 रोजी एका पत्राद्वारे विचारणा केली होती की "शिवछत्रपती रोहिड्याहून पांडवगड पाहोन येणार होते…" यावरून असे समजते की 1671 या काळात पांडवगड हा स्वराज्याचा एक भाग होता. 

1689 मध्ये जेव्हा राजाराम महाराजा रायगड वरून सुटून जिंजीच्या दिशेने जात होते तेव्हा त्यांनी पांडवगड येथे काही काळ आश्रय घेतला होता.

1701 मध्ये किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला मात्र जास्त काळ तो मुघलांच्या ताब्यात राहू शकला नाही. औरंगजेबाच्या मुत्यूनंतर किल्ला लगेचच मराठ्यांच्या ताब्यात आला. 

अखेरीस 24 मार्च 1818 रोजी मेजर थैचर याने गडावर हल्ल करून गड ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. 


पांडवगड जवळ राहण्याची व जेवणाची सोय - Stay and Hotels near Pandavgad Fort 


पांडवगड किल्ल्यावर तशी राहण्याची आणि खाण्याची सोय नाही. गडपायथ्याच्या गावात तुम्ही खाण्यासाठी काही चिप्स वैगेरे घेऊ शकतात. गडफेरी ही 4 ते 5 तासात पूर्ण होते त्यामुळे तशी राहण्याची सोय करण्याची गरज नाही. तुम्हाला राहण्यासाठी जवळच रायरेश्वर पठार आहे तिथे कॅम्पिंग करू शकता किंवा भोर किंवा वाई भागात हॉटेल्स आहेत.

Post a Comment

0 Comments