महाराणी येसूबाई समाधी संगम माहुली || Maharani Yesubai Samadhi Sangam Mahuli Place
छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज हे छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर स्वराज्याची घडी पूर्ववत करण्यासाठी अनेक आघाड्यांवर लढत होते. पोर्तुगीज, इंग्रज आणि मुघलांचे वादळ मराठा साम्राज्यावर घोंघावत होते. शंभुराजे त्यावेळी या सर्व गोष्टींचा बीमोड करण्यासाठी प्रत्येक आघाडीवर स्वतः तलवार घेऊन उभे होते.
शंभुराजे जेव्हा या आघाड्या सांभाळत होते तेव्हा स्वराज्याची आघाडी सांभाळण्याची जबाबदारी होती ती श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाई यांच्याकडे... मराठा साम्राज्याचा इतिहासात अनेक पत्र हे महाराणी येसूबाई यांच्या 'श्री सखी राज्ञी जयति' या शिक्क्यांचे आपल्याला बघायला मिळतात.
शंभूराजांच्या मृत्यूनंतर महाराणी जवळपास 30 वर्षे औरंगजेबाच्या कैदेत होत्या. हे 30 वर्षे आणि त्यानंतर कैदेतून सुटका झाल्यानंतर अनेक वर्षे महाराणी येसूबाई यांनी स्वराज्याची सूत्रे राजाराम महाराजांच्या माध्यमातून विजयी ठेवली.
30 वर्षे कैदेत असणाऱ्या महाराणी येसूबाई यांच्या समाधीचं शोध घेण्यासाठी तब्बल 300 वर्षे गेली. मात्र आज ही समाधी स्थान निश्चितीच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर आली आहे.
300 वर्षानंतर महाराणी येसूबाई यांच्या समाधीची स्थान निश्चिती
साताऱ्यात संगम माहुली येथे महाराणी येसूबाई यांच्या समाधीची मूळ वास्तू सापडली आहे. संगम माहुली गावात ही समाधी गावात प्रवेश केल्यानंतर लगेच दिसते. प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला दगडी चौथऱ्यावर छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी सगुनाबाई यांची समाधी आहे. याच्या बाजूला कृष्णा आणि वेण्णा माई ची रथशाळा आहे. रथशाळेला लागूनच जी वास्तू आहे ती म्हणजे महाराणी येसूबाई यांची समाधी होय.
समाधी ही दगडी असून तिची उंची 20 फूट तर रुंदी 10 फूट इतकी आहे. श्रीमंत महाराणी येसूबाई फाऊंडेशनचे सुहास राजे शिर्के, जिज्ञासा मंचाचे निलेश पंडित यांनी मिळून महाराणी येसूबाई यांच्या समाधीची स्थांन निश्चिती केली आहे.
महाराणी येसूबाई यांच्या समाधी विषयी पूर्वी झालेले संशोधन - Efforts to find Maharani Yesubai Samadhi
औरंगजेबाच्या कैदेतून सुटका झाली आणि त्यानंतर 1719 मध्ये येसूबाई या शाहू महाराजांच्या सोबत साताऱ्यात आल्या. महाराणी येसूबाई यांचा मृत्यू नक्की कधी झाला याची तारीख मात्र निश्चित माहिती नाही. 1729 मध्ये महाराणी येसूबाई यांचे निधन साताऱ्यात झाले असा अनेक इतिहासकारांचे मत होते.
ज्येष्ठ इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांनी सर्वात आधी महाराणी येसूबाई यांच्या समाधीचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली. 1970 मध्ये कृष्णा आणि वेण्णा नदीच्या पात्रात शाहू महाराजांच्या समाधीच्या बाजूलाच बेंद्रे यांनी महाराणी येसूबाई यांची समाधी असावी असा अंदाज वा सी बेंद्रे यांनी मांडला होता. त्या काळात हा अंदाज पुढे नेत याच भागात उत्खनन करण्यात आले होते.
1991 मध्ये अहमदनगर येथील वस्तूसंग्रहालयात काम करणाऱ्या सुरेश जोशी यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या श्र्वानाच्या समोर असलेल्या समाधीला महाराणी येसूबाई यांची समाधी असल्याचा दावा केला.
हे मुख्य दोन दावे होते आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारे इतर दावा समोर आला नाही. अनेकांना बेंद्रे यांच्या अंदाजाने समाधी संगम माहुली इथे आहे हेच सांगितले मात्र त्यात निश्चित स्थान माहिती नव्हते. सुरेश जोशी यांनी सांगितलेल्या ठिकाणावर समाधी असे मानून अनेक दिवस सर्व कार्यक्रम पार पडले.
समाधी स्थळ निश्चिती साठी प्रयत्न - Efforts to Decide place of Maharani Yesubai Samadhi
2005 या वर्षी साताऱ्याचे माजी नगराध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुढाकारातून महाराणी ताराराणी यांच्या समाधीचे अवशेष शोधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. साताऱ्यातील जिज्ञासा मंचाच्या कार्यकर्त्यांनी यामध्ये मोलाचे योगदान दिले. अजिंक्यतारा किल्ल्याचे देखील यामध्ये संवर्धन करण्यास सुरुवात झाली. महाराणी येसूबाई फाऊंडेशन आणि जिज्ञासा मंडळ यांनी एकत्रितपणे हा शोध सुरू ठेवला.
जिज्ञासा मंचाच्या सदस्यांना महाराणी ताराराणी यांचे एक पत्र मिळाले. 5 नोव्हेंबर 1765 रोजी लिहिले गेलेले हे पत्र आहे. पत्राची सुरुवात श्रीमंत महाराज मात्रोशी आईसाहेब अशी होते. पत्रामध्ये ताराराणी यांनी हरिनारायान मठासाठी मंदिराच्या नजिकच एक बिघा जमीन देऊ केली असून या जमिनीच्या चतु:सिमेत येसूबाई यांची घुमटी असल्याचा उल्लेख आहे. हे पत्र येसूबाई यांची समाधी संगम माहुली येथेच आहे हे निश्चित झाले.
संगम माहुली परिसर म्हणजे राजघराण्यातील अनेक व्यक्तींच्या समाधी असलेले ठिकाण... यात महाराणी येसूबाई यांची समाधी नक्की कोणती आहे? हे निश्चित नव्हते.
महाराणी येसूबाई यांच्या समाधीची स्थान निश्चिती - Maharani Yesubai Samadhi Place
जिज्ञासा मंचाचे कार्याध्यक्ष निलेश पंडित सांगतात की,
"ताराराणी यांनी जमीन दान दिली तेव्हाचे नकाशे आणि आत्ताची परिस्थिती यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आजूबाजूला वस्ती वाढली आहे, त्या जागेतून रस्ते गेले आहेत. त्यामुळे स्थान निश्चिती करण्यासाठी जुना नकाशा आणि आत्ताचा नकाशा जुळविणे गरजेचे होते.
यासाठी आम्ही पेशवे दफ्तरात सुद्धा नकाशाचा शोध घेतला. मागच्या महिन्यात आम्हाला एक नकाशा सापडला, या नकाशा नुसार harinarayan मठाचा जुना आणि आत्ताचा नंबर, जागेच्या चतुः सीमा गुगल मॅप सोबतही जुळल्या आहे.
त्यानुसारच येसूबाई यांच्या समाधीची स्थान निश्चिती करण्यात आली आहे."
समाधीवर असलेली राज चिन्हे ही समाधी महाराणी येसूबाई यांचीच आहे हे निश्चित करतात. राजचिन्हे समाधी निश्चित करण्यासाठी खूप मदत करतात.
महाराणी येसूबाई यांच्या समाधी वर शरभ या काल्पनिक प्राण्याचे चित्र आहे. शरभ हे शिल्प राज घराण्यातील शक्तिशाली व्यक्तीचे प्रतीक आहे. सिंहा सारखा दिसणारा हा प्राणी आपल्या शक्तीचे प्रतीक दाखविण्यासाठी तोंडात, प्रत्येक पायाखाली आणि शेपटीला असे एकूण 6 हत्ती दाखवतो.
महाराणी येसूबाई समाधी वर्णन - Maharani Yesubai Samadhi Details
संगम माहुली येथे समाधी स्थळी कृष्णा वेण्णा माईच्या रथशाळेच्या मागे एका दगडी चौथऱ्यावर अष्टकोनी बांधकाम आहे. याच्या चारही बाजूंनी गोलाकार दगडी खांब आहे. वरील बाजूस घुमट असून वास्तूवर अनेक ठिकाणी कलाकुसर केलेली आहे. घुमटाच्या वरील बाजूस झालेले नुकसान सोडता आजही 300 वर्षानंतर ही समाधी सुस्थिती मध्ये आहे.
आजूबाजूला वाढलेली वस्ती आणि झाडे झुडपे यामुळे ही समाधी आज दुर्लक्षित झालेली होती.
महाराणी येसूबाई यांची समोर आलेली समाधी ही निश्चितच संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. संभाजी महाराजांच्या कैदेनंतर सुद्धा स्वराज्य झुंजवत ठेवणाऱ्या आणि स्वतः कैदेतून बाहेर आल्यानंतर पुन्हा स्वराज्यासाठी लढणाऱ्या या महाराणी येसूबाई यांना गर्वाने मराठी परिवाराचा मानाचा मुजरा.
0 Comments