Ticker

6/recent/ticker-posts

मुसेखानाचा कर्दनकाळ : श्रीमंत सरदार गोदाजीराव जगताप ।। Godajirao Jagtap Marathi Mahiti

 मुसेखानाचा कर्दनकाळ : श्रीमंत सरदार गोदाजीराव जगताप ।। Godajirao Jagtap Marathi Mahiti

स्वराज्याची पहिली लढाई पुरंदर किल्ल्याच्या परिसरात सासवड भागात झाली. लढाई पुरंदर परिसरात झाल्याने तिला पुरंदरचे युद्ध किंवा लढाई म्हणूनच ओळखली जाते. गोदाजी रावांच्या पराक्रमाने या लढाईत पारड कसं पालटलं आणि यानंतर स्वराज्याच्या लढाईत शत्रू वर तुटून पडणारे हे गोदाजीराव जगताप पुढे जाऊन स्वराज्यासाठी किती महत्वाचे ठरले, त्यांचे कार्य याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

भारतात सध्याचा राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेश या भागात रजपूत राजे हे 8व्या शतकापासून राज्य करत होते. दिल्लीच्या भागात तोमर किंवा आपण त्यांना तुंवर म्हणून ओळखतो ते राजे राज्य करत होते. पृथ्वीराज चौहान देखील दिल्लीच्या राजकारणातील एक महत्वाचे नाव होते. पुढे जाऊन सुलतान शाहीला दिल्लीच्या तख्तावर सुरुवात झाली मात्र तरी देखील हे रजपूत राजे निष्ठेने लढत होते. सुलतानी शक्ती समोर त्यांची ताकद कमी पडत होती. त्यापैकी एक रजपूत राजाने म्हणजे भरतपुरच्या वसुसैन राजाच्या वंशातील दोन पराक्रमी बंधूनी भरतपुरच्या सुलतानी अधिकाऱ्याचा जुलूम बघूज त्याला ठार मारले. हा पराक्रम करून ते महाराष्ट्रात दाखल झाले. 

मुसेखानाचा कर्दनकाळ : श्रीमंत सरदार गोदाजीराव जगताप ।। Godajirao Jagtap Marathi Mahiti

महाराष्ट्रात आलेले हे दोन्ही बंधू सासवड भागात आणि पंदारे या बारामती जवळील भागात स्थिरावले. पंदारे भागातील भावाला पुढे मुरुंब खोऱ्याची देशमुखी मिळाली. सासवड भागातील जे घराणे स्थिरावले त्या घराण्याचा गोदाजी यांच्याशी संबंध आहे.

शिवकाळात या घराण्यातील गोदाजी जगताप हे नाव प्रचंड पराक्रमाचा इतिहास घेऊन उभे आहे मात्र आपल्याला निवडक मावळे सोडता इतरांविषयी जास्त माहिती नसते. बहिर्जी हे गोदाजी जगताप यांच्या वडिलांचे नाव होते. शिवकाळात जगताप घराण्याकडे या सासवड भागातील 10 गावांची देशमुखी होती. जगताप घराण्याकडे सासवड, दिवे, कोढीत बुद्रुक, खळद, बेलसर, राख, मोढवे, बाबुर्डी, कारखेळ, कोळोली ही गावे देशमुखी करता होती. 

1645 हा काळ मध्ये रायरेश्वर महाराजांनी शपथ घेतली तेव्हा महाराजांच्या समवेत कदाचित गोदाजी जगताप देखील असावेत असा अंदाज आहे. तोरणा जिंकून महाराजांनी स्वराजाच्या स्थापनेला सुरुवात केली. पाठोपाठ राजगड देखील ताब्यात आला. कोरीगड देखील स्वराज्यात आला होता. 

सर्व काही सुरळीत चालू होते मात्र मार्च 1648 रोजी महाराजांनी सिंहगडावर हल्ला करून काबीज केला आणि त्यासोबत शिरवळ या आदिलशाही ठाण्यातील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला केला. आता आदिलशहाला याचा धक्का बसला. तो संतप्त झाला आणि त्याने शिवरायांवर दबाव आणण्यासाठी शहाजी राजांना जिंजीला कैद केले. महाराजांवर म्हणजेच स्वराज्यावर चाल करुज फत्तेखानाला मोठ्या फौजेनिशी पाठविले. 

फत्तेखान स्वराज्यावर चालून आला. त्याने बेलसर येथे ठाणे मांडले. महाराजांनी घेतलेलं शिरवळ ठाणे बाळाजी हैबतराव या आदिलशाही सरदाराने काबीज केले. महाराजांनी फत्तेखानाला शह देण्यासाठी युक्ती सुरू केली. महाराजांनी पुरंदर या स्वराज्याच्या तेव्हाच्या सीमेवरील किल्ल्याची निवड केली. आदिलशाही सरदार निलकंठराव यांच्याशी मतभेद घालून किंवा बोलणी करून महाराजांनी हा किल्ला मिळविल्याचा उल्लेख आढळतो. 

पुरंदर किल्ल्यावरून आता सर्व सूत्र हालत होती. शिरवळ घेण्यासाठी कावजी मल्हार खासनिस या मराठा वीराची तुकडी पाठविण्यात आली. तुकडीत गोदाजीराव देखील होतेच. वीरांच्या या तुकडीने पुरंदर ते शिरवळ असा प्रवास करत शिरवळ कोटाला पाडले. बाळाजी हैबतराव या आदिलशाही सरदाराची हत्या कावजी मल्हार यांनी केली. शिरवळ कोटाला रक्षणासाठी एक तुकडी तिथे ठेऊन कावजी व गोदाजी पुन्हा पुरंदरावर आले.

बाजी पासलकर यांची माहिती आपण आधीच बघितली आहे. महाराजांनी बाजींच्या नेतृत्वात एक तुकडी फत्तेखानाच्या बेलसर छावणीवर पाठविली. बाजींना यात वीरमरण आले मात्र यांची युक्ती वेगळीच होती. सैन्यावर हल्ला झाल्यानंतर पुन्हा ही तुकडी माघार घेत असे. फत्तेखानाच्या सैन्याला पाठीवर घेत घेत हे सैन्य पुरंदर किल्ल्याच्या परिसरात आणण्याचे काम मावळ्यांच्या या तुकडीने केले. पुरंदर वर ही सर्व सैन्याची तुकडी परत आली. 

फत्तेखानचे सैन्य देखील पुरंदरला वेढा घालून बसले होते. पुरंदर घेण्यासाठी हे प्रयत्न सुरू होते. फत्तेखानचे सैन्य पुरंदरच्या तटावर चढत होते. मराठा सैन्याने त्यांना काही टप्प्यावर येऊ दिले. एकदा कठीण चढण सुरू झाल्यानंतर मात्र मराठ्यांनी दगड लोटून, गोफणीने दगड भिरकावून फत्तेखानाच्या सैन्याचा पाडाव करायला सुरुवात केली. एका टप्प्यात सैनिक आले की महाराज नव्या दमाची तुकडी या सैन्यावर आक्रमणासाठी बालेकिल्ल्यावरून आणि पुरंदर माची वरून पाठवत असत. मुसेखान हे एक फत्तेखानाच्या सोबत असलेल्या सरदाराचे नाव होते. याच्या सोबत अनेक आघाडीचे सरदार होते मात्र यावर गोदाजी आणि त्यांच्या सोबतीला इतर काही मावळे चालून गेले. फौजेचे सरदार ओळखून या मावळ्यांनी त्यांना घेरले. गोदाजींनी मुसेखान सरदार घेतला. गोदाजी रावांनी आपल्या हातातील भाला मुसेखानाच्या छातीत घातला. गोदाजीरावांनी हा पराक्रम केला मात्र मुसेखान पठाण असल्याने त्याला याचा जास्त प्रभाव पडला नाही. मुसेखानासोबत असलेल्या इतर पठाणांनी गोदाजीरावांवर चाल केली. अनेक पठाणांनी गोडजीराव घेरले गेले. तरी देखील त्यांची समशेर थांबली नाही. असंख्य पठाणांना कापत गोदाजीराव पुढे चालत होते. मुसेखानाने संधी साधत गोदाजींच्या मस्तकावर वार करण्यासाठी तलवार उगारली मात्र गोदाजींनी अगदी चपळता दाखवत त्याचा वार होण्याची आधी मुसेखानाचे दोन तुकडे केले. वार मोठा झाला होता. खांद्यावर लागलेली गोदाजींची तलवार मुसेखानाच्या पोटापर्यंत जात त्याला दोन तुकड्यांमध्ये विभागत होती. आदिलशाही सैन्याने हे बघितले. आपला आघाडीचा सरदार पडल्याने त्यांचे मनोबल खचले. त्याच प्रमाणे मराठ्यांमध्ये अधिक उत्साह आला आणि त्यांनी अधिक प्रखरपने आदिलशाही सैन्यावर हल्ला चढविला. 

फत्तेखान गडबडला आणि त्याने सैन्यासोबत आदिलशाही ठाण्याकडे म्हणजेच विजापूरकडे धाव घेतला. गोदाजी जगताप, भैरोजी चोर , भिमाजी वाघ यांचा हा पराक्रम स्वराज्यावर चाल करून येणाऱ्या सरदाराचा पहिला पराभव करण्यासाठी कारणीभूत ठरला.

मराठ्यांचा हा विजय स्वराज्यासाठी अधिक प्रेरणादायी आणि आदिलशाही साठी एक सर्वात जास्त मोठा धक्का ठरला. महाराजांनी यानंतर जावळीवर विजय मिळविला, शाहिस्तेखानाला पळवून लावलं, अफजलखानाचा वध केला आणि इतरही स्वराज्य कार्यात गोदाजी यांचे योगदान हे सतत होते. महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या सेवेत देखील गोदाजीराव जगताप यांचे नाव होते. विठुरायाच्या पंढरीला जाणारी वारी ही दिवे घाटातून जाते. या वारीच्या संरक्षणाची जबाबदारी महाराजांनी गोदाजी राव आणि देशमुखी असलेल्या जगताप घराण्याकडे सोपवलेली होती. 

गोदाजी यांचे नाव संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज यांच्या जिंजीकडे प्रस्थानात आढळते. रायगडावरून निसटून जात असताना कावल्या बावल्या च्या खिंडीमध्ये छत्रपती राजाराम महाराजांवर मुघली सैन्याने चाल केली. गोदाजी जगताप यांनी या खिंडीमध्ये पराक्रम गाजवत जवळपास 300 हुन अधिक मोगल कापून काढले. राजाराम महाराजांना जिंजीला पोहचविण्यासाठी त्यांनी फार मदत केली. 

गोदाजी रावांच्या पराक्रमाला साजेसा असा त्यांचा शेवटचा इतिहास उपलब्ध नाही याची खंत वाटते. यापुढे कधी गोदाजीराव यांचे नाव इतिहासात आले नाही मात्र वयाचा अंदाज घेता कदाचित त्यांचा मृत्यू वृद्धापकाळाने झाला असावा असा अंदाज बांधता येतो. 

गोदाजी जगताप समाधी स्थळ

सासवड येथे गोदाजीराव जगताप यांची समाधी आहे. सासवड मधील पुणे बारामती मार्गावरील मुख्य चौकाच्या जवळ कऱ्हा नदी आहे. या नदीकाठी संगमेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या पुलावरून पलीकडे गेले की आपल्याला डाव्या हाताला गोदाजीरावांची समाधी दिसते. 

समाधी मंदिरात आपल्याला गोदाजीराव यांचा फोटो बघायला मिळेल. इथे नित्य पूजा देखील होत असते. 

जगताप घराण्यातील नंदाजीराव जगताप या वीराची समाधी पांढरीच्या ओढ्यात आहे. नंदाजीराव यांना पुरंदरच्या युद्धात वीरमरण आले होते. मात्र ही समाधी त्यांची आहे का? याविषयी मात्र अजून काही माहिती नाही त्यामुळे आपण सध्या तरी या समाधीला नंदाजीराव यांची संभाव्य समाधी म्हणूनच समजूया. 

सासवड येथे युद्धप्रसंगाचा आवेश असलेला गोदाजीरावांची पुतळा देखील या मंडळींनी उभारला आहे. 


Post a Comment

0 Comments