Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवरायांची शिवकाळातील आणि पुरातन मंदिरे ।। Oldest and First Temples of Chatrapati Shivaji Maharaj

छत्रपती शिवरायांची शिवकाळातील आणि पुरातन मंदिरे ।। Oldest and First Temples of Chatrapati Shivaji Maharaj

माहिती साभार -  मराठेशाही: प्रवीण भोसले

छत्रपती शिवाजी महाराजांनी गडांवर अनेक मंदिरे बांधली. यामध्ये प्रतापगडावरील भवानी मंदिर, रायगडावरील जगदीश्वर मंदिर, पुरंदरावरील केदारेश्वर मंदिर, रांगणा किल्ल्यावरील रांगणाई मंदिर, वज्रगडावरील मारुती मंदिर, राजगडावरील पद्मावती माचीवरील पद्मावती मंदिर ही काही प्रसिद्ध मंदिरे आहेत. महाराजांनी अनेक मंदिरे बांधली आणि दुरुस्त देखील केली. हनुमान, भवानी माता, गणेश हे काही मुख्य देवता त्या काळी गडकिल्ल्यांवर होत्या.

छत्रपती शिवरायांची शिवकाळातील आणि पुरातन मंदिरे ।। Oldest and First Temples of Chatrapti Shivaji Maharaj

आपल्याकडे देवाला सोडता अलौकिक कर्तृत्वाने एखाद्या व्यक्तीला देवत्व हे त्याच्या मृत्यूनंतर दिले जाते. आपल्याला अनेक देवाचे अवतार माहीत आहेत मात्र हे अवतार जेव्हा त्यांचे कार्य पूर्णत्वाला नेतात तेव्हाच त्यांना देवत्व प्राप्त होते. मात्र छत्रपती शिवरायांचे दैवत्व हे काहीसे वेगळे आणि अलौकीकच ठरले. छत्रपती शिवरायांचे स्वराज्य स्थापनेचे कार्य सुरू असतानाचा त्यांना देवत्व प्राप्त झाले होते. फक्त महाराजांचे हयात असताना मंदिरच बांधले गेले नाही तर त्यांची मूर्ती त्या मंदिरात स्थापन करून त्याची पूजा देखील सुरू करण्यात आलेला असल्याचा उल्लेख आपल्याला इतिहासात आढळतो. 

छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक मंदिरे आपण आज बघतो आहे. आज आपण शिवराय जिवंत असताना  बांधले गेलेले मंदिर कोणते? शिवरायांच्या मृत्यूनंतर मात्र शिवकाळातच बांधली गेलेली महाराजांची मंदिरे कोणती? आणि आधुनिक काळात छत्रपती शिवरायांची बांधली गेलेली मंदिरे कोणती? याविषयी सविस्तर आणि इतिहासाला साक्षी ठेवूनच माहिती जाणून घेणार आहोत.

छत्रपती शिवरायांचे हयातीत असताना बांधले गेलेले पहिले मंदिर

आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की छत्रपती शिवाजी महाराक हयात असताना बांधले गेलेले त्यांचे पहिले मंदिरे हे महाराष्ट्रात नसून कर्नाटक राज्यात आहे. कर्नाटकातील धारवाड जवळ असलेल्या यादवाड गावात हे मंदिर आहे. 

मंदिराच्या स्थापनेचा इतिहास

दक्षिण भारताच्या दिग्विजय मोहिमेत म्हणजेच 1678 साली शिवरायांच्या सैन्याला कडवा विरोध करणाऱ्या बेलवाडी येथील मल्लमाँदेवी यांचा पराभव करण्यात आला. छत्रपती शिवरायांनी मल्लमाँ या स्त्री असून देखील शौर्याने लढल्या म्हणून त्यांना माफी दिली. त्यांना त्यांचा मुलुख परत करण्यात आला. मल्लमाँ यांनी दिलेला लढा आणि त्यांच्या पराभवानंतर शिवरायांनी त्यांचा केलेला सन्मान ही कथा आपण नक्की एखाद्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 

छत्रपती शिवरायांच्या उपकारांची परतफेड म्हणून मल्लमाँ यांनी बेलवाडी जवळच असणाऱ्या यादवाड येथे एक सुबक आणि देखणी मूर्ती एका घुमटीत स्थापन केली. त्या मूर्तीची नित्यपूजा देखील सुरू करण्यात आली. मंदिराची स्थापना 1678 साली करण्यात आली. 

यादवाड गावातील मारुती मंदिराच्या बाजूलाच ही छोटीशी घुमटी आहे. मूर्तीमध्ये आपल्याला जे शिवराय दिसतात ते घोड्यावर स्वार झालेले आहेत. डोक्यावर एक छत्र धरलेला अब्दागिरी घेतलेला सेवक देखील आहे.  छत्र आणि शेजारी अब्दागिरी ही राजचिन्हे महाराज छत्रपती झालेले असल्यामुळे आहेत. मूर्तीच्या खालील भागात शिवरायांनी एका लहान मुलाला मांडीवर घेतलेले आहे. त्या मुलाला ते दूध पाजत आहेत असे काहीसे शिल्प आहे. शेजारी एक स्त्री आहे आणि तोच मल्लमाँ आहे. मांडीवर असलेले मुल हे मल्लमाँ यांचे आहे. ज्यावेळी मूर्ती स्थापन केली गेली तेव्हा मंदिराप्रमाणे एका छोट्याश्या घुमटीत स्थापून त्याला लाकडी फळ्यांचा दरवाजा बसविला होता. वरच्या बाजूस कळस देखील होता. लाकडी फळ्यांचा दरवाजा काळाच्या ओघात नष्ट झाल्याने आता तिथे जाळीचा दरवाजा बसविण्यात आला. 

घुमटीत असलेली शिवरायांची मूर्ती नित्य पूजेत ठेवल्याने हा ठिकाणाला शिवरायांचे पहिले छोटेखानी का असेना पण मंदिर म्हणायला हवे. 1678 साली हे मंदिर बांधले गेले आणि त्यामुळे महाराजांचे भारतातील सर्वात पहिले मंदिर आहे. मधल्या काळात हे मंदिर जीर्णोद्धार साठी काढले गेले. मूर्तीला त्यावेळी काळजीपूर्वक बाहेर काढली गेली आणि आता पुन्हा तिची प्रतिष्ठापना देखील करण्यात आली. 

इतिहासातील संदर्भ आणि साहित्य

जेष्ठ इतिहास संशोधक कै. ग. ह. खरे यांनी स्वतः यादवाड ला जाऊन स्वतः ही मूर्ती पाहून त्याची माहिती 1956 साली शिवचरित्र वृत्त संग्रहात प्रकाशित केली होती. त्यावेळी या शिल्पाचे छायाचित्र मात्र प्रकाशित केले नव्हते. त्यांचा हाच लेख 1979 च्या बेलवाडी मल्लमाँ यांच्या त्रिशतक स्मरणीकेत कन्नड भाषेत प्रकाशित झाला होता. 

2002 साली कोल्हापूरच्या डॉ वसंतराव मोरे यांच्या छ शिवाजी की साहित्यिक प्रतिमा या हिंदी पुस्तकात शिल्पाचा फोटो आणि माहिती दिली गेली. 


शिवराजेश्वर मंदिर, सिंधुदुर्ग किल्ला

यादवाड मधील शिवरायांच्या या पहिल्या मंदिरानंतर जवळपास 17 वर्षांनी म्हणजेच 1695 साली छत्रपती राजाराम महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्यात श्री शिवराजेश्वर मंदिर बांधले. म्हणजे शिवरायांच्या निधनानंतर 15 वर्षांनी हे मंदिर बांधले गेले. हे शिवराजेश्वर मंदिर बांधल्यानंतर त्यात शिवरायांची मूर्ती स्थापन करून तिची विधिवत पूजा सुरू केली.  या मंदिराला आपण महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचे सर्वात पहिले मंदिर म्हणून ओळखतो. 

खुद्द महाराजांचे पुत्र असलेल्या राजाराम महाराजांनी हे मंदिर बांधलेले असल्याने याला महत्व आहे. मंदिराचा पुढील सभामंडप कोल्हापूर छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी 1906 मध्ये बांधला होता. 

मंदिरातील शिवरायांची मूर्ती एक वेगळ्या रुपात आहे. मंदिर स्थापनेवेळी सुरू केलेली पूजाअर्चा आजतागायत अखंड पणे सुरू आहे. या मूर्तीविषयी अधिक माहिती लवकरच देत आहोत.


आधुनिक काळातील छत्रपती शिवरायांची मंदिरे

कोल्हापूर छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी छत्रपती शिवरायांची 2 मंदिरे बांधली. एक मंदिर पन्हाळगडावर बांधले तर दूसरे मंदिर नर्सरी बागेत बांधलेले आहे. 1908 साली बांधलेली मंदिरे ही महाराष्ट्रातील शिवरायांची आधुनिक काळातील पहिली मंदिरे आहेत.

पन्हाळगडावर असलेले मंदिर छोटेखानी असून त्यात शिवरायांची संगमरवरी अश्वारूढ मूर्ती आहे. 

एखाद्या गावाने मिळून बांधलेले शिवरायांचे पहिले मंदिर म्हणजे रांजनी (तालुका कौठे महांकाळ, जिल्हा सांगली) गावातील आहे. 1976 आणि 77 या काळात हे मंदिर बांधले आहे. 


छत्रपती शिवाजी स्फूर्ती केंद्र, श्रीशैलम मल्लिकार्जुन

श्रीशैलम येथे मल्लिकार्जुन मंदिराच्या उत्तरेला काही अंतरावर छत्रपती शिवाजी स्फूर्ती केंद्र बांधलेले आहे. आधुनिक काळात हे बांधकाम करण्यात आलेले आहे. 1974 च्या सुमारास ही वास्तू बांधण्यास सुरुवात करण्यात आली. आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र शासन दोघांनी मिळून ही इमारत बांधलेली आहे. मंदिरात छत्रपती शिवरायांचा सिंहासनारूढ पुतळा आहे. मंदिरात ऐतिहासिक माहितीचे फलक देखील आहेत. शिवछत्रपतींचे हे आंध्रप्रदेश राज्यातील एक प्रसिद्ध स्मारक आहे. 

कधी तुम्ही श्रीशैलम येथे गेला तर हे स्मारक नक्की बघा. 


या सर्व महत्वाच्या मंदिरांव्यतिरिक्त अनेक शिवरायांची मंदिरे स्वतंत्र पणे उभारली जात आहेत. अनेक मंदिरांच्या शिखरांवर देवांसोबत छत्रपती शिवरायांची देखील मूर्ती आपल्याला बघायला मिळते. शिवरायांना देव म्हणावे की नाही हा प्रश्न अनेकांना पडतो मात्र याचे उत्तर अगदी सोपे आहे, ज्या मनुष्याला जिवंतपणीच दैवत्व प्राप्त झाले होते त्याचे दैवत्व नाकारणारे आपण कोण? एकवेळ एखादा नास्तिक देवाचे अस्तित्व नाकारेल परंतु ज्याने संपूर्ण देशाला एक स्वतंत्र स्वराज्य निर्माण करून परकीय लुटीतून जाचातून मुक्त केले त्याला तर नास्तिक देखील देवच म्हणेल.

Post a Comment

0 Comments