Ticker

6/recent/ticker-posts

कर्नाटकातील अत्याचारावर महाराजांचा वार । महाराजांनी कानडी जनतेला आदिलशाही जाचातून कसे वाचविले?

कर्नाटकातील अत्याचारावर महाराजांचा वार । महाराजांनी कानडी जनतेला आदिलशाही जाचातून कसे वाचविले?

छत्रपति शिवाजी महाराज म्हणजे फक्त महाराष्ट्राचे नव्हे तर अवघ्या विश्वाचे प्रेरणास्थान आहे. मुघलशाह्यांच्या जोखडातून महाराष्ट्राला मुक्त करून त्यांना स्वतंत्र करण्याचे काम महाराजांनी समर्थपणे पार पाडले. महाराजांचे गडकिल्ले, महाराजांचे अश्वारूढ पुतळे आजही आपल्याला त्या काळातील महाराजांची थोरवी आठवून देतात.

कानडी जनता आणि शिवाजी महाराज

दुर्दैवाने काही दिवसांपूर्वी कर्नाटक मध्ये महाराजांच्या आठवणींची अवहेलना केली जाते आहे. कर्नाटक येथील राजधानी शहर बंगळुरू येथील सदाशिव नगर मध्ये काही समाज कंटकांनी महाराजांच्या पुतळ्यावर काळा रंग फेकण्याचा निंदनीय प्रकार केला. तद्नंतर अनेक शिवप्रेमींनी धर्मवीर संभाजी महाराज चौकामध्ये  एकत्र येऊन या प्रकरणाचा निषेध केला. बेळगाव मधील रस्ते बंद करण्यात आले. या प्रकरणाचे पडसाद कोल्हापुरात देखील बघायला मिळाले. या प्रकरणावरून राजकारण देखील भरपूर तापले. 

वाद पेटत जरी असला तरी देखील महाराष्ट्र आणि कर्नाटकचे नाते फार जुने आहे. इतकंच काय तर कर्नाटक राज्याची राजधानी असणारे बंगळूर शहर उभे करण्यासाठी सर्वात मोठा हातभार हा शहाजी राजे यांचा आहे. 

अभिमान वाटावा असा आणखी एक इतिहास म्हणजे कधी काळी कानडी जनतेला वाचवण्यासाठी शिवरायांच्या मावळ्यांनी रक्त सांडले होते. 

6 जून 1674 ला स्वराज्याची राजधानी रायगडावर छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. रयतेचा राजा छत्रपती झाला! फक्त महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी ही क्रांतिकारी घटना होती. गुलामगिरीमध्ये खितपत पडलेल्या गोरगरीब जनतेसाठी हा आशेचा किरण उगवला होता. नवं युगच सुरू झालं होतं!

दक्षिणेत असलेले विजय नगरचे साम्राज्य नष्ट झाल्यानंतर मोगली राजवटीला आव्हान देऊ शकेल अशी एकही सत्ता तेव्हा उरलेली नव्हती. दिल्लीतील मुघलांपासून ते पोर्तुगीज, इंग्रज, डच यांच्या हृदयात धडकी भरविणारे स्वराज्य महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झाले होते. हे स्वराज्याचे बीज वटवृक्षात रूपांतरित होत होते. महाराष्ट्रातील जनतेला या जुलूमातून मुक्त केल्यानंतर आता संपूर्ण भारतात स्वराज्याची स्थापना करण्याची वेळ होती. स्वराज्य विस्ताराचा हा काळ होता. महाराजांनी सत्ता विस्तार करण्यासाठी दक्षिणेकडे लक्ष वळविले. विजापूरच्या आदिलशाही मध्ये राजकारण सुरू होते आणि याचा फायदा महाराजांनी घ्यायचा ठरविला होता. आदिलशाही मध्ये दक्षिणी लोक विरुद्ध पठाण हा संघर्ष शिगेला पोहोचला होता. 

शिवरायांच्या वाढत्या बळाला आळा घालण्यासाठी खवास खानाने मुघल सुभेदार बहादूर खानाशी सख्य केले होते मात्र ते त्याच्यावरच उलटले. राजकारणात खवास खानाचा बळी गेला. विजापूर अखेर बहलोलखानास मिळाले. ही लढाई विजापूरच्या अस्तित्वास सुरुवात करून देणारी ठरली. 

छत्रपती शिवरायांनी ही अस्तिर परिस्थिती हेरून स्वराज्याचा ध्वज दक्षिणेत फडकविण्याचा निर्धार केला.  भविष्यात जर मुघली सत्तानी आक्रमण केले तर एक जागा दक्षिणेत असावी आणि आपल्याला महसूल मिळणारे एक आणखी क्षेत्र असावे हा महाराजांचा विचार होता. गोवळकोंड्याचा कुतुबशहा देखील महाराजांच्या समवेत होता. दक्षिण पंथीयांच्या सोबत मिळून आदिलशाही निपटून  काढावी या हेतून महाराजांनी दक्षिण मोहीम हाती घेतली. 

त्यावेळी आदिलशाही मध्ये असलेल्या किल्ले कोप्पल येथे हुसेनखान मियाँना नावाचा पठाण राज्य करत होता. त्याने व त्याच्या पठाणी सैन्याने पिके लुटण्यास सुरुवात केली होती. आया बहिणींच्या अब्रूवर घालावा घातला जात होता. त्याच्या या जाचामुळे कानडी जनता त्रासली होती. ही सर्व लोकं मदत मागण्यासाठी शिवरायांकडे आली. महाराज, पठानांनी आमच्या भागात उच्छाद मांडला आहे असे गाऱ्हाणे त्यांनी महाराजांकडे घातले. त्या कानडी लोकांना माहीत असावे की पठाणांचा सामना करण्याची ताकद फक्त मराठ्यांमध्येच आहे. 

महाराजांनी त्यांना मदतीचे वचन दिले. दक्षिण दिग्विजय मोहीम सुरू झाली तेव्हा महाराजांना कुतुबशहाच्या भेटीसाठी भागानगर ला जाणे गरजेचे होते. त्यामुळे महाराजांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली दुसरी तुकडी कर्नाटकात पाठविली. थंडीचे दिवस होते. मराठी सेना हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली घटप्रभा आणि मलप्रभा नद्या ओलांडून कर्नाटकात उतरली. या सेनेत संताजी, मालोजी, धनाजी हे धुरंधर होते. सरसेनापती हंबीरराव यांनी त्यांना गजेंद्रगड ताब्यात घेण्यास सांगितले. या मावळ्यांनी मोहीम फत्ते केली! गडाची व्यवस्था लावून संताजी परत माघारी आले. 

येलबुर्गा येथे हंबीरराव मोहिते यांनी छावणी पडली होती. आपल्या जहागिरी मधील मोक्याचे ठिकाण गेल्याने हुसेनखान पठाण मात्र भडकला होता. तो रात्री अपरात्री येलबुर्गा येथील मराठा छावणीवर चालून आला. पठाण आले पठाण आले अशी हाकाटी उठली. सगळ्या छावणीत खळबळ उडाली. शत्रूला अंगावर घेण्यासाठी संताजी आणि धनाजी ही तरुण जोडी पुढे सरसावली. पठाण जवळपास 5000 सैन्य घेऊन आले होते. हुसेनखान स्वतः हत्तीवर बसून चालून आला होता. त्या प्रमाणात मराठ्यांची ताकद तर खूपच कमी होती. 

खानाला भरपूर आत्मविश्वास होता मात्र मराठ्यांचा गनिमी कावा आणि चिकाटी यासमोर तो कमी पडला. मराठ्यांना मात द्यायला निघालेला पठाण स्वतः चक्रव्यूहात अडकला होता. एकीकडे संताजी धनाजी जोडी पराक्रम दाखवत होते. मावळे दुसरीकडे गोफणीने शत्रूला टिपत होते. बाजी सर्जेराव जेधे यांचा तरुण मुलगा नागोजी जेधे अभिमन्यू प्रमाणे शत्रूच्या सैन्यात खोलवर घुसला. थेट खानाच्या हत्तीपुढे उभे राहून नागोजी यांनी स्वतःच्या समशेरीने हत्तीची सोंड कापून टाकली. भेदरलेला हत्ती पठाणी सैन्याला तुडवत धावू लागला. 

नागोजी यांनी खानाला मारण्यासाठी भाला उगारला, इतक्यात खानाच्या बाणाने नागोजींचे मस्तक टिपले. बाण थेट कपाळात घुसला आणि थेट हनुवटी मधून बाहेर आला. नागोजी रणभूमी वर कामी आले. त्यांचे वडील बाजी सर्जेराव जेधे शेजारीच उभे होते. आपला तरणा ताठा मुलगा सर्जेरावांनी डोळ्यांसमोर गमविला. त्यांनी सैन्याला धीर दिला. मराठा सैन्यात दुःख न पसरू देता त्यांनी जे केले त्याने मराठा सैन्यात वीरश्री संचारली. 

मराठ्यांनी खानाला जिवंत धरला. मियाँ बंधूंना पकडून हंबीरराव मोहिते यांच्या समोर आणण्यात आले. त्यांचं मोठं सैन्य, दारुगोळा आणि जवळपास 2000 हुन अधिक घोडी ताब्यात आली. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य विस्तारातील दक्षिण दिग्विजयाची सुरुवात मोठ्या धडाक्यात झाली. याच येलबुर्ग्याच्या युद्धामुळे संताजी, धनाजी यांना पहिली ओळख मिळाली. मराठ्यांनी पठाणांचा बंदोबस्त केला. या पराक्रमाने कानडी जनतेची त्रासातून मुक्तता झाली. कानडी जनतेने शिवरायांना दुवा दिली. नागोजी जेधे आणि यांच्यासह अनेक मराठा वीरांनी आपले रक्त सांडले आणि फक्त त्यामुळेच कानडी जनता सुखाचा श्वास घेऊ शकली.

सध्या कर्नाटक प्रांतात ज्या घटना घडत आहे त्यांच्याकडे बघता एकदा महाराजांच्या या कामगिरीची आणि त्या रयतेला स्वराज्य मिळवून दिलेल्या पराक्रमाची जाणीव एकदा सगळ्यांनी ठेवणे गरजेचे आहे! 

Post a Comment

0 Comments