Ticker

6/recent/ticker-posts

स्वराज्याचे चलन - शिवराई होण | Shivrai : The Currency of Swarajya Marathi

स्वराज्याचे चलन - शिवराई होण | Shivrai : The Currency of Swarajya Marathi

6 जून 1674 रोजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. हा दिवस आपण आजही शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा करत असतो. त्यावेळी राज्याभिषेकाच्या नंतर महाराजांनी स्वराज्यासाठी शिवराई हे चलन सुरू केले. 

स्वराज्याचे चलन - शिवराई होण | Shivrai : The Currency of Swarajya Marathi

राज्याभिषेकाच्या काळात शिवराई हे तांब्याचे नाणे सुरू केले गेले. टांकसाळी मध्ये या शिवराई ची निर्मिती होऊ लागली. 

इ स 1683 मध्ये झालेल्या एका पत्रव्यवहारात शिवराई बद्दल उल्लेख आलेला आहे. इ स 1674 पासून इ स 1920 पर्यंत शिवराई चलनात होती असेही काही पुरावे आपल्याला सापडतात. ब्रिटिश राजवट 1818 मध्ये सुरू झाल्यानंतर त्यांनी नवीन नाणी काढायला सुरुवात केली आणि मग अखेर 100 वर्षांहून अधिक कालखंड गेल्यानंतर शिवराई चलनातून नष्ट झाली. ब्रिटिशांनी सर्व उपलब्ध शिवराई गोळा करण्याचा प्रयत्न केला होता मात्र आजही आपल्याला काही ठिकाणी शिवराई सापडली असे उल्लेख ऐकायला मिळतात. 

शिवराई

शिवराई या नाण्याचे वजन साधारणतः 11 ते 13 ग्रॅम होते. शिवराईचा व्यास हा साधारणपणे 2 सेमी असतो. नाण्याच्या पुढच्या बाजूला "श्री राजा शिव" असे तीन ओळींमध्ये तर मागील बाजूस "छत्रपति" असे 2 ओळींमध्ये लिहिलेले आहे. शिव आणि छत्रपति या शब्दात बदल आपल्याला बघायला मिळतात. काही ठिकाणी शिव, शीव, सिव, सीव आणि छत्रपती किंवा छत्रपति असे आपल्याला बघायला मिळते. 

आपल्याकडे जसा अर्धा आणा, पाव आणा हे प्रकार होते त्याच प्रमाणे अर्धी शिवराई आणि पाव शिवराई असे प्रकार त्याकाळात होते. आजच्या घडीला आपल्याला पूर्ण शिवराई बघायला मिळाल्या परंतु पाव आणि अर्धी शिवराई बघायला मिळत नाही. ही तांब्याची शिवराई जनसामान्यत वापरास उपलब्ध होती. 

महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला तेव्हाच महाराजांची सुवर्णतुला करण्यात आली असे तिथे उपस्थित असलेल्या हेन्री ऑक्सझेंडर याने लिहुन ठेवलेले आहे. त्यामध्ये ही सुवर्णतुला होण वापरून केली गेली असावी असा अंदाज आहे. महाराजांचे त्यावेळी एकूण वजन हे 150 पाउंड होते असे त्याने लिहून ठेवले आहे.

हेन्री असेही म्हणतो की त्याने महाराजांसमोर इंग्रजी नाणी स्वराज्यात चालावी असे कलम मांडले होते. महाराजांनी ही मागणी नाकारली होती. 

शिवराई होण

सुवर्णतुला करताना महाराजांचे वजन हे 16 हजार होण इतके भरले आणि त्यात 1 हजार होण आणखी टाकून ते होण ब्राह्मणांना दान केले गेले. 

शिवरायांनी शिवराई होण देखील राज्याभिषेकावेळी सुरू केले. हे सोन्याचे नाणे होते. शिवराई वर असलेला मजकूर आपल्याला शिवराई होण वर देखील बघायला मिळतो. शिवराई आणि शिवराई होण मध्ये फरक इतकाच होता की शिवराई ही तांब्याची तर शिवराई होण हे सोन्याचे होते.

शिवराई होण चे वजन 2 मासे 7 गुंजा म्हणजेच 2.728 ग्रामच्या आसपास होते. होण हे 1.32 सेमी व्यासाचे असावेत. सोन्याची शुद्धता जर तपासली तर ती 97.45% इतकी होती. त्या काळात मग सोन्याचा भाव काय असावा? याविषयी सांगण्यासाठी तुम्ही त्याकाळातील कोणत्या गोष्टीशी तुलना करणार हे मोठे संभ्रमाचे आहे. 

शिवराईचे वैशिष्ट्य म्हणजे यांचा एकसारखा आकार, लिपीमधील एकसारखेपणा, वजनाला एकसारख्याच, कडेने असलेली बिंदूंची रचना! 

रायगडावर एक टांकसाळ होती असे आपल्याला माहीत आहे. आजही ही वास्तू सुस्थितीत आहे. इथे फक्त शिवराई होण पाडले जात असत. आपल्याला शिवराई सापडतात मात्र होण सापडणे कठीण आहे. यावरून हेच लक्षात येते की शिवराई होण हे कमी पाडले होते. 

सभासद बखरीत महाराजांच्या मृत्यूसमयी तिजोरीत असलेल्या नाण्यांच्या संख्येविषयी आणि नावांविषयी माहिती आहे. त्यानुसार एकूण 31 प्रकारची सोन्याची नाणी होती. जर या सर्व नाण्यांची एकूण संख्या आपण बघितली तर ती 69 लाखांच्या आसपास होती. या आकडेवारीत शिवराई होण हे फक्त 4 लाख होते. महाराजांच्या तिजोरीत या समयी विजयनगर, पातशाही, सनगरी, अच्युतराई, देवराई, रामचंद्रराई, गुत्तीहोण, धारवाडी, सतलाम्या, इभ्रराम्या, शिवराई, कावेरीपाक, प्रलयघटी, नाईकी, अदवाणी, जडमाल, ताडपत्री ही सोन्याची नाणी होती. 

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मात्र मुघलांनी हे होण नष्ट केले असे सांगितले जाते. पुढे जाऊन इंग्रजांनी देखील शिवराई होण जप्त केले. आज घडीला खूप कमी शिवराई होण उपलब्ध आहेत. आज तुम्हाला होण बघायचे असतील तर दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात, मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये आणि साताऱ्याच्या जलमंदिर येथे बघायला मिळेल. 

बरेच लोक शिवराई सापडली असे सांगतात तर ती तांब्याची शिवराई शक्यतो सापडत असते. शिवराई होण हे दुर्मिळच आहेत. 

Post a Comment

0 Comments