Ticker

6/recent/ticker-posts

पुरंदरचे कालभैरव मुरारबाजी देशपांडे || Murarbaji Deshpande Marathi Mahiti

पुरंदरचे कालभैरव मुरारबाजी देशपांडे || Murarbaji Deshpande Marathi Mahiti

स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे कालभैरव म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांच्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. मुरारबाजी यांचे चरित्र, शौर्यगाथा आणि समाधी स्थळ म्हणजे त्यांचा संपूर्ण जीवनपट आज आपण मावळे या आमच्या सदरात जाणून आहोत.

पुरंदरचे कालभैरव मुरारबाजी देशपांडे || Murarbaji Deshpande Marathi Mahiti

महाड ते रायगड मार्गावर असलेल्या किंजळोली गावामध्ये नाडकर घराने इसवी सन 15 व्या शतकापासून वास्तव्यास होते. आता तुम्ही म्हणाल हे नाडकर मध्ये कसकाय आले? तर मुरारबाजी यांच्या घराण्याचे मूळ आडनाव हे नाडकर होते. मुरारबाजी यांच्या घराच्या शाखेचे मुळपुरुष काणप्रभू यांना महाड गावचे कुलकर्णी पद मिळाले. ही जी प्रभू मंडळी आहेत त्यांना आपल्या इतिहासात कुलकर्णी, देश कुलकर्णी अशी मोठी पदे आपल्याला बघायला मिळतात याचे कारण म्हणजे त्या लोकांची हुशारी आणि वाकबगिरी होय. 

अनेकांना प्रभू म्हणले की ब्राम्हण वाटतात परंतु नाडकर हे मूळ क्षत्रिय आहेत. त्यांनी वेदांचा आणि पुराणांचा अभ्यास करून त्यांनी हे अधिकार मिळविले होते. असो पुढे जाऊयात!

काणप्रभू यांना चार पुत्र होते. त्यातील एक म्हणजे मुरारप्रभू. मुरारप्रभूंचे पुत्र बाजी मुरार! हे बाजी मुरार म्हणजे मुरार बाजी यांचे वडील होय. बाजी मुरार यांचा संदर्भ स्वराज्य स्थापनेच्या काही काळ आधी सापडतो. 1616 साली मुरारबाजी यांचा जन्म झाला असावा असे अंदाज इतिहास संशोधक मांडतात. बाजी मुरार हे जावळीच्या मोऱ्यांच्या पदरी होते. महाबळेश्वर ते रायगड हा विस्तीर्ण भाग जावळीच्या चंद्रराव मोरेंच्या अधिपत्याखाली होता. बाजी मुरार हे मोरेंकडे सैनिकी हुद्द्यावर होते. 

बाजी मुरार हे शूर आणि वीर होते. त्यांनी एकदा आदिलशाही साठी मोरेंकडून लढत असताना वीर पराक्रम गाजविला. त्यामुळे विजापूरच्या आदिलशहाने त्यांना उमराव पद दिले. बाजी मुरार चंद्रराव मोरे यांचे सैन्य सोडून आदिलशाही पदरी गेले. आता चंद्रराव मोरे यांच्या सैन्यातील बाजी मुरार यांची जागा मुरारबाजी यांनी घेतली. 

चंद्रराव मोरे यांच्या सैन्यातील मुरारबाजी हे अतिशय तिखट योद्धे होते असे ओळखले जाते. त्यांना त्र्यंबकजी, शंकराजी, संभाजी आणि महादजी नावाचे चार भाऊ होते. हे 4 जण देखील तितकेच वीर योद्ध्ये होते त्यामुळे त्यांना चंद्रराव मोरे यांच्या सैन्यातील पंच बाजी म्हणून ओळखले जात असे. पुढे जाऊन त्यांच्या वंशजांना पंच बाजींचे वंशज म्हणूनच ओळख मिळाली.

जानेवरी 1656 मध्ये शिवरायांना कळले की जावळी घेतल्याविना आपले राज्य काही साधत नाही. महाराजांनी ठाम निश्चय केला. चंद्रराव मोरे हांच्या सैन्याचा त्या जावळीच्या घनदाट अरण्यात पराभव करून महाराजांनी संपूर्ण जावळी खोरे जिंकून घेतले. स्वराज्यात आता थेट समुद्रकिनाऱ्यापर्यंतचा प्रदेश आला होता. 

जावळीच्या युद्धात स्वराज्याच्या सैन्याशी अगदी त्वेषाने लढणारे मुरारबाजी हे महाराजांच्या नजरेत पडले. ती नजर एक रत्नपारख्याची होती. मोरे यांचा पराभव झाला. महाराजांनी त्यानंतर मुरारबाजी यांना आपल्या सैन्यात समाविष्ट करून घेतले. 

त्यानंतर स्वराज्यात अनेक घटना घडल्या. महाराजांनी मोघलांच्या आर्थिक राजधानिवर म्हणजे सुरतेवर छापा टाकला. सुरत पुरती लुटून उध्वस्त केली. महाराजांनी मुघलांना खडे आव्हान दिले होते.

औरंगजेबाने महाराजांच्या विरोधात मिर्झाराजे जयसिंग याला पाठवले. सप्टेंबर 1664 मध्ये मिर्झाराजे जयसिंग मुघली तख्तापासून स्वराज्यवार चालून यायला निघाला. त्यांच्यासोबत प्रचंड फौजफाटा होती. त्याच्यासोबत दिलेरखान पठाण आणि त्याची 5000 सैन्याची कडवी पठाण फौज देखील दिली. मार्च 1665 मध्ये मिर्झाराजे जयसिंग हा पुण्यात पोहोचला. त्याच्यासोबत किती फौज होती हे वेगवेगळे इतिहासकार वेगवेगळ्या प्रकारे सांगतात. मुख्यतः कमीत कमी 40 हजारांची फौज त्यांच्यासोबत होती हे मात्र निश्चित आहे. 

पुण्यामध्ये मिर्झाराजाच्या सैन्याने लूट सुरू केली. त्यांनी महाराजांच्या विरोधात सर्व शत्रूंना एकाच वेळी आक्रमण करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी महाराजांच्या विरोधात अनेक लोकांना फितूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांची फौज ही पुरंदरच्या दिशेने रवाना झाली.

पुरंदर किल्ल्यावर किल्लेदार म्हणून मुरारबाजी देशपांडे यांनी नेमणूक केलेली होती. त्यांच्यासोबत 2000 मावळे देखील होते. पुरंदरला लागूनच असलेल्या वज्रगड किल्ल्यावर आणखी दोन प्रभू सरदार होते. बाबाजी बोवाजी प्रभू आणि यशवंतराव बोवाजी प्रभू अशी त्या दोघांची नावे होती. 

पुरंदर किल्ल्यावरील युद्ध समजून घ्यायचे असेल तर तुम्ही किल्ल्याचा नकाशा नक्कीच अभ्यासायला हवा. आपण किल्ल्याविषयी इत्यंभूत माहिती ही आपल्या दुसऱ्या एका लेखात घेतलेली आहे.

31 मार्च 1665 रोजी दिलेरखान आणि मिर्झाराजे जयसिंग यांची फौज पुरंदर किल्ल्याच्या जवळ आली. जवळपास 20 हजार सैन्य हे वेढ्यासाठी होते तर 5000 पठाण सैनिक हे दिलेरखानाच्या सोबत होते. वेढा आणि पुरंदर युद्धाची जबाबदारी दिलेरखानाकडे होती. म्हणजे एकूण 15 हजारांच्या फौजेला तोंड द्यायला 2300 मावळे सज्ज होते. 

मुघल फौजेने वेढा घातला मात्र ते जसे पुढे जाण्यास पाऊल उचलत तसे मराठे हल्ला करत. रात्रीचे छुपे छापे मराठ्यांनी सुरूच ठेवले होते. दिलेरखान हुशार होता त्यामुळे त्याने आधी पुरंदरवर स्वारी न करता वज्रगड घ्यायचे ठरविले. एकदा वज्रगडावर तोफा चढविल्या की पुरंदर ताब्यात येणार हे त्याला माहित होते. 3 दिवस तोफा मारा करण्याच्या टप्प्यावर न्यायला लागले. 

14 एप्रिल रोजी दिलेरखानाने वज्रगडावर एकवटून हल्ला केला. प्रचंड मुघली फौजेच्या समोर बाबाजी आणि यशवंतराव यांच्या तोकड्या सैन्याचा निभाव लागला नाही. दोघेही वीर या लढाईत मृत्युमुखी पडले.

वज्रगड दिलेखानाकडे आल्यानंतर दिलेरखानाला वाटले की पुरंदर पण ताब्यात आलाच. त्याने वज्रगडावर तोफा लावल्या आणि त्यांचा मारा पुरंदरच्या सफेद बुरुजावर करायला सुरुवात केली. माऱ्यात सफेद बुरुज ढासळला. मराठ्यांनी साठवलेला दारुगोळा एका चुकीने पेटला आणि मोठा धमाका होऊन दोन्ही बाजूंचे नुकसान झाले. मुघली सैन्य आता सफेद बुरुजानजीक आले होते मात्र मराठ्यांनी तरी देखील काळ्या बुरुजावरून आपला प्रतिकार हा सुरूच ठेवला. दुसऱ्या बाजूने बिनी दरवाजा जवळ मुघली सैन्य आलेले होते.

मुरारबाजी या लढ्याचे नेतृत्व करत होते. इतका कडक बंदोबस्त असताना देखील शिवराय हे मुरारबाजी यांना केदार दरवाजाच्या मार्गाने रसद आणि दारुगोळा पुरवत होते. मराठे रात्री हल्ले जास्त करत होते. रात्री अपरात्री जाऊन तोफांच्या कानात लोखंडी खिळे ठोकण्याचे धाडसी काम मराठे वीर करत होते. यामुळे त्या तोफाच निकामी होत होत्या. 

सर दरवाजा पासून आतील भाग म्हणजे खांदकडा, ढाल बुरुज आणि टेकड्या मराठ्यांच्या ताब्यात होत्या. मुघल सैन्य आता जवळपास माचीवर आले होते. ही लढाई सुरू असतानाच शिवरायांनी मे च्या अखेरीस रघुनाथपंत हनुमंते यांना मिर्झाराजांकडे पाठविले होते. हे संकट निवारण्यासाठी ही बोलणी सुरू होती. बोलनीला सुरुवात देखील झाली होती मात्र दिलेरखान पुरंदर घेतल्याशिवाय काही बोलणी करण्याच्या मनःस्थिती मध्ये नव्हता.

संकट आता गळ्याशी आले होते. पुरंदर किल्ल्याची माची मुघलांच्या ताब्यात होती. आता मात्र शिवरायांनी हालचाली वाढविल्या आणि अखेर मिर्झाराजाना भेटण्यासाठी 11 जून ही तारीख देखील निश्चित झाली. दिलेरखानाने तह होण्याच्या आधी पुरंदर जिंकण्याचे ठरविले.

दिलेरखानाने 11 जून 1665 रोजी किल्ल्यावर सुलतान डवा करण्याचे ठरविले. मिर्झाराजे आणि शिवरायांची भेट होणार होती त्याच दिवशी त्याने हा हल्ला करण्याची तयारी केली. 11 जून रोजी दिलेरखानाच्या या सुलतान डव्याची माहिती मुराराबाजीना कळली. मुरारबाजी यांनी 700 मावळ्यांना घेऊन माचीवर आलेल्या मुघली छावणीवर हल्ला केला. सुलतान डवा झाला असता तरी मराठ्यांचा पराभव निश्चित होता हे त्यांनी हेरले होते आणि त्यामुळेच त्यांनी दिलेरखानाच्या पाऊलाआधी पाऊल उचलले.

मुरारबाजी यांनी आपल्या सैन्याच्या मदतीने एका तडाख्यात 500 हुन अधिक पठाण गारद केले. दिलेरखानाने 700 जणांच्या तुकडीवर घेरण्याची योजना आखली. त्यांच्यावर बरकंदाज, गोलंदाज आणि छोट्या तोफांच्या मदतीने मारा करायला सुरुवात केली. 

हे युद्ध तसे विषम होते मात्र तरी देखील मराठे मावळे शत्रूला कापत पुढे जात होते. मराठा फौजेने जवळपास अर्ध्या पठाण फौजेला यमसदनी धाडले होते. दिलेरखान स्वतः युद्धात आला. मुरारबाजी यांनी त्यांच्या तुकडीतील काही वीर हे फक्त दिलेरखानावर हल्ला करण्यासाठी निवडले. दिलेरखान जर उडवला असता तर मुघली आक्रमण सहज परतले असते. 

दिलेरखानचे सैन्य आणि संरक्षण मराठ्यांनी कापून काढले होते. मुरारबाजी त्या दिलेरखानावर चालून आले तेव्हाच त्याला देखील आश्चर्य वाटले असे आपल्या इतिहासात नमूद केलेले आहे. मुघली सैन्यासमोर मराठा सैन्याचा निभाव लागला नाही. सर्व सैन्य पडले मात्र अजून देखील एकटे मुरारबाजी लढत होते. त्यांना आवरणे मुघलांना कठीण जात होते.  

ही लढाई बघून दिलेरखानाने लढाई थांबविली. त्याने रक्ताने माखलेल्या मुराराबाजींकडे बघून उद्गार काढले, तू कौल घे! तू मुघलांच्या बाजूने ये. तू मोठा मर्द शिपाई आहेस. तुला मोठा पुरस्कार देऊन सन्मान देखील करतो. 

दिलेरखानचे बोलणे ऐकून मुरारबाजी उसळले! ते म्हणाले, तुझा कौल हा शिवाजी राजांचा शिपाई घेतो काय? हे बोलून  मुरारबाजी थेट खानाच्या दिशेने निघाले. दिलेरखानाने आता ओळखले की मुरारबाजी आपल्याकडे येणार नाहीत. दिलेरखानाने बाण धनुष्याला लावला. दिलेरखानावर चालून येणाऱ्या मुरारबाजींवर त्याने बाण सोडला. बाण मुरारबाजी यांना वर्मी लागला आणि ते खाली कोसळले. 

पुरंदरच्या माचीवर अखेर स्वराज्याचे काळभैरव कोसळले. एक मराठा वीर योद्धा धारातीर्थी पडला! महाराजांनी युद्ध थांबविण्याची मागणी देखील केली मात्र दिलेरखानाने ऐकले नाही. जे थोडेफार मराठा वीर अजून माचीवर लढत होते त्यांनी मुरारबाजी यांचे शव घेतले आणि ते बालेकिल्ल्यात आले. एक मुरारबाजी पडले होते मात्र आता त्वेषाने अनेक मुरारबाजी उभे राहिले. आता बालेकिल्ला लढविण्यास सुरुवात झाली.

बालेकिल्ल्याचा सर दरवाजा देखील अजूनही मुघलांच्या ताब्यात नव्हता. दिलेरखानाला राग अनावर झाला. परंतु मिर्झाराजे यांनी निरोप पाठवून युद्ध थांबवायला लावले. मराठ्यांनी किल्ला मुघलांना तहात स्वाधीन केला. पुरंदर किल्ला दिलेरखानाला जिंकता आलाच नाही हे म्हणायला हरकत नाही.

आज पुरंदर किल्ल्यावर तुम्ही गेलात तर बिनी दरवाजातून आत आल्यावर उजव्या बाजूला असलेल्या पुरंदर माचीवर एक घुमटी इमारत आणि आताच्या काळात बसविलेला मुरारबाजी यांचा पुतळा बघायला मिळेल. ती घुमटी म्हणजे मुरारबाजी यांचे स्मारक शिल्प होय. त्या घुमटीत स्मृतिशिळा आहेत. मुरारबाजी यांच्या हातात दोन तलवारी दाखविलेल्या आहेत.

तहात किल्ला मुघलांच्या ताब्यात गेल्यानंतर मुरारबाजी यांचे शव त्यांच्या गावी पाठविण्यात आल्याचा उल्लेख आपल्याला इतिहासात सापडतो. त्यांच्या देहावर किंजळोली या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले असावेत. मुघलांना या युद्धातून कळले की मराठ्यांकडून गड घेणे किती कठीण आहे. 

मिर्झाराजे हे रजपूत सरदार होते. आपण चित्रपटांमध्ये बघतो की जौहर ही संकल्पना त्या रजपूत राजांची मात्र आज त्याचे खरे रूप मुरारबाजी यांच्यामध्ये त्यांना बघायला मिळाले असावे. 

मुरारबाजी यांचे समाधीस्थळ

किंजळोली गावाच्या पुढे गांधारी नदीच्या पलीकडे सोमेश्वर मंदिराच्या शेजारी मुरारबाजी यांची समाधी आहे. किंजळोली गावात आपल्याला मुरारबाजी यांचा वाडा कुठे होता ही जागा दाखवतात. गावात मुरारबाजी यांचा पुतळा बसविण्यात आलेला आहे. 

मंदिराकडे जात असताना देखील आपल्याला एक समाधी बघायला मिळेल. अशा अनेक शिवकालीन समाधी आणि वीरगळ बघायला मिळतील. कदाचित हे सर्व योद्ध्ये हे पुरंदर युद्धातील वीर असावेत. इथे अनेक सतीशीळा देखील आहेत. 

सहयाद्री प्रतिष्ठानने या कार्यात खूप मोठे योगदान दिले आहे. त्यांनी या सर्व समाधी दुरावस्थेतून सुव्यवस्थेत नेण्यासाठी काम करत आहेत. 

Post a Comment

0 Comments