Ticker

6/recent/ticker-posts

किल्ले कसे पाहावेत? | How to See the Forts in Marathi?

किल्ले कसे पाहावेत? | How to See the Forts in Marathi?

किल्ले बघायला अनेक लोक जातात परंतु खरंच आपण किल्ले जसे बघायला हवेत तसे बघतो का? प्रश्न मोठा आहे परंतु कठीण मात्र नाही त्यामुळे तुमच्याकडे गडकिल्ल्यांसाठी द्यायला जर वेळ असेल तर एखादा हा लेख पूर्ण वाचा. तुमच्याप्रमाणे मी देखील गडकिल्ले बघताना काय बघायचे असते याचा अनेक दिवस शोध घेतला आणि मग आज हे लिहितोय.

किल्ले कसे पाहावेत? | How to See the Forts in Marathi?

आपण गडांना भेट देतो त्यावेळी तिथे असलेल्या भिंती म्हणजेच तटबंदी, दरवाजे, बुरुज, वाड्यांचे अवशेष, मंदिरे बघितले म्हणजे किल्ले बघितले असे असते का? नाही. हे असे किल्ले बघणे म्हणजे पर्यटन स्थळांना भेटी देणे आणि काहीतरी मनोरंजन म्हणून किल्ल्यांना भेटी देणे होय.  जेव्हा आपण त्या किल्ल्याच्या इतिहासात डोकावतो, त्या इतिहासातील प्रसंग आपल्याला तिथे जाऊन डोळ्यासमोर उभे राहतात आणि आपल्या अंगावर शहारे येतात म्हणजे किल्ले पाहणे होय. गडाच्या भावनांशी आपल्या मनातील भावनांचे सूर जेव्हा जुळतात तेव्हा ती किल्ल्याला दिलेली भेट विस्मरणीय असेल हे मात्र नक्की!

प्राध्यापक प्र के घाणेकर त्यांच्या एका व्याख्यानात एक गोष्ट आवर्जून सांगतात. ती आज मला इथे पुन्हा एकदा सांगावी वाटते आहे. एके काळी इंग्लंड ची राजकुमारी आफ्रिकेच्या जंगलात फिरायला जाते. ती दिवसभर ते जंगल फिरून रात्री एका हॉटेल मध्ये जेवायला जाते. ते हॉटेल म्हणजे एका झाडावर बांधलेले ट्री टॉप हॉटेल होते. ज्यावेळी ती राजकुमारी तिथे जाते त्यावेळी इंग्लंडच्या राणी बनते. म्हणजे ज्यावेळी ती त्या ट्री टॉप हॉटेल मध्ये जात असते तेव्हा ती राजकुमारी असते आणि जेवहा ती त्या हॉटेल मधून बाहेर पडते तेव्हा ती इंग्लंडची राणी बनलेली असते.

ट्री टॉप हॉटेल मध्ये गेल्यानंतर असा काही चमत्कार होऊ शकतो म्हणून लोक आजही त्या हॉटेल मध्ये जातात. आजही त्या हॉटेल मध्ये भरपूर गर्दी आपल्याला बघायला मिळते. 

तुम्ही अलिबाग मध्ये गेलात तर तुम्हाला 3 गडकोट बघायला मिळतात. यातील एक म्हणजे हिराकोट! आता या भुईकोट किल्ल्याचे तुरुंगात रूपांतर झालेले आहे. इतिहासात जंजिऱ्यावर स्वारी करण्यासाठी बाजीराव पुत्र नानासाहेब यांनी याच कोटात मुक्काम केला होता. या ठिकाणी त्यांनी पुढील मोहिमेची रणनीती आखली. परंतु जेव्हा नानासाहेब या हिराकोट मध्ये होते त्यावेळी बाजीरावांचे निधन झाले. तद्नंतर पेशवे पदाची सूत्रे ही वस्त्र धारण केल्यानंतर नानासाहेबांकडे येणार होती हे नक्की होते. तरीही आज हा गडकोट आपल्या सर्वांकडून दुर्लक्षित आहे.

गोष्ट इथे संपते मात्र फार मोठा आशय देऊन जाते. घाणेकर आपल्याला असे एक उदाहरण देतात परंतु स्वराज्याच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत आणि आपण जर ती समजून घेतली तर आपल्या गडकोटांना भेट देत असताना आपण देखील काहीतरी ऊर्जा घेऊन परतीचा प्रवास करू, असे मला वाटते. 


किल्ले बघताना त्यात जर तुम्ही जास्तीत जास्त समरस झाला तर मग त्या गडाचा प्रत्येक दगड तुमच्याशी बोलायला लागेल. किल्ले बघायला जाताना आपल्याकडे त्या किल्ल्याची माहिती असावी. 

किल्ला म्हणजे काय आणि प्रकार

याविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक्स वर क्लिक करा,

किल्ले- महत्व, इतिहास आणि प्रकार भाग 1

तुम्हाला ज्या किल्ल्याला भेट द्यायची आहे त्याविषयी सर्व माहिती तुम्ही आधी गोळा केली पाहिजे. तुम्ही यासाठी गुगल मॅप्स, पुस्तके, गुगल, लेख, बखरी यांची मदत घेऊ शकता. तुम्ही जे म्हणता ना किल्ल्याचे दगड बोलतात हे तुम्हाला आधी माहिती मिळवलेली असेल आणि किल्ल्याला पहिल्यांदा भेट देत असाल तरी अनुभवायला मिळेल. 

महाराष्ट्रात किल्ले भटकंती करत असताना कोणी किल्ला बांधला? आपल्या पूर्वजांनी बांधला का? किंवा पाश्चिमात्य लोकांनी बांधला हे प्रश्नच येत नाहीत. परंतु जेव्हा आपण गोव्याकडे जातो तेव्हा आपल्याला या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागते. साधारण जेव्हा आपण किल्ल्यांकडे बघतो तेव्हा आपल्याला त्याच्या बुरुजांच्या बांधणीतून लगेच लक्षात येते की कोणता किल्ला पोर्तुगीजांनी/इंग्रजांनी बांधलेला आहे आणि कोणता आपण बांधलेला आहे. आपण म्हणजे पूर्वेकडील लोक असा इथे अर्थ घेऊयात. 

पाश्चिमात्य लोकांनी जे किल्ले बांधले आहेत त्याचे बुरुज हे चौकोनी असतात आणि आपल्या इकडे बांधणी शैलीत असलेले बुरुज हे गोलाकार असतात. त्यामुळे गोव्यामध्ये जर तुम्हाला गोल बुरुज दिसला तर समजून घ्यायचे की किल्ला महाराजांनी बांधलेला असावा किंवा एखाद्या मुघली घरण्याने बांधलेला असावा. जेव्हा आपल्याला कळते की हा किल्ला आपल्या महाराजांनी बांधलेला आहे किंवा महाराजांनी त्याची डागडुजी केलेली आहे तेव्हा आपण त्या किल्ल्यासोबत एक वेगळं नात आपोआप प्रस्थापित करत असतो आणि किल्ल्याची भटकंती करत असताना आपल्याला ती गोष्ट पुन्हा पुन्हा प्रकर्षाने जाणवते. 

इंग्रजांनी बांधलेल्या किल्ल्याचे बुरुज हे जमिनीशी काटकोन करतात आणि पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ल्याचा बुरुज हा थोडासा ढाळ आपल्याला दिसतो. 

आपल्या किनारपट्टीला असलेल्या किल्ल्यांमध्ये रेवदंडा आणि वसई यासारखे किल्ले जर तुम्ही बघितले तर या किल्ल्याच्या तटबंदीच्या आतून म्हणजे तटबंदी मध्ये जाण्यास एक कमाणीसारखी जागा जर असेल तर हा किल्ला पोर्तुगीज बांधणीचा आहे असा सबळ पुरावा आपल्याला तिथेच भेटून जातो. म्हणजे आपण किल्ल्याचा इतिहास वाचला असेल तर आपल्याला त्याला दुजोरा देणारे पुरावे इथे किल्ल्याच्या बाह्यरुपावरून सहज सापडतात. किल्ल्याचा इतिहास वाचला नसेल तरी देखील कुठल्याही इतिहासाच्या पुस्तकांचा अभ्यास न करता तुम्ही किल्ल्याच्या बांधणीनुसार हे सर्व काही सांगू शकता.

जंजिरासारख्या किल्ल्यावर तुम्हाला पोकळ बुरुज बघायला मिळतात. म्हणजे इथे 3 मजली बुरुज आहे. ही रचना थोडीशी सिद्दींची आहे परंतु या प्रमाणे आपल्याला महाराष्ट्रात थोड्याफार प्रमाणात जे नंतर किल्ले मुघलांनी बांधले त्यात हे बघायला मिळते.

प्रत्येक किल्ल्याकडे जाणारी पायवाट आणि मार्ग देखील आपण नेहमी बघितले पाहिजे. शक्य असेल तर अभ्यास करून समुहाने आजही किल्ल्याला दरवाजा आहे परंतु तिथून कोणी गेलं नाही तो मार्ग आपण शोधला पाहिजे. 

आपण गडाच्या दरवाजात गेल्यानंतर आपल्याला दरवाजाच्या वर किंवा बाजूला अनेक द्वारशिल्प बघायला मिळत असतात. हे सर्व शिल्प आपण अभ्यासून बघितले पाहिजे. तुम्हाला बांधणीनुसार वेगवेगळे शिल्प त्या दरवाजावर दिसतील आणि त्यांचा अर्थ समजून घेतला तर ते तुम्हाला फायद्याचे ठरेल. प्रत्येक दरवाजावर जे शिल्प आहे त्यातून आपल्याला अनेक माहिती तर मिळतेच परंतु यातून ज्याने किल्ला बांधला त्याचे सामर्थ्य देखील समजते. आपल्याला असे अनेक शिल्प सापडतील त्याचा संदर्भ पुराणात देखील सापडेल. 

परांड्याचा किल्ला जर बघितला तर त्याच्या तळघरात 6 हाताचा नृत्यगणेश दिलेला आहे. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली तर त्यात या गणेशाचा उल्लेख आहे. मग ज्ञानेश्वरांनी तो गणपती पाहून उल्लेख केला आहे का? की ज्ञानेश्वरी त्या वेळी वाचून तो गणपती घडविला गेला आहे? अनेक प्रश्न जेवहा तुम्हाला किल्ला बघत असताना समोर येतील तेव्हाच तुम्ही किल्ला बघितला असे म्हणता येईल. किल्ल्यावर तुम्हाला पडलेले प्रश्न लगेच सापडतील अशी गोष्ट नाही परंतु जे सापडेल ते तिथल्या तिथे क्लीअर करून जे सापडत नाही त्याचे फोटोग्राफ तुमच्या मोबाईल मध्ये घेऊन तुम्ही तज्ञांची मदत घेऊन त्याविषयी अधिक माहिती मिळवू शकतात. 

किल्ल्यांवर कोरलेले शिलालेख हा अभ्यासाचा विषय आहे. अनेक गडकिल्ल्यांवर संस्कृत, फारशी, मोडी, पाली किंवा इतरही भाषा मध्ये शिलालेख कोरलेले आहेत. ते तुम्ही वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्ही ते वाचताय तर मग वाचून झाल्यानंतर त्याचा अर्थ काय आहे? वाचता येत नसेल तर त्याचे देवनागरीत वाचन कुठे सापडते आहे का? हे तुम्ही बघितले पाहिजे. यात जर गोडी निर्माण झाली तर मोडी सारख्या भाषा तुम्हाला शिकता येतील. 

गडावर अनेक दैवते आहेत. त्या मूर्त्यांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतील. एका गडावर तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या देवतांच्या विषयी मिळेल. गडावर दैवत आजही सुस्थितीत आहे परंतु गडकिल्ले नाहीत. गडावर वीरगळ देखील बघायला मिळतात. वीरगळ ही गोष्ट आपल्याला अनेक गडकिल्ल्यावर कुठेतरी पडलेली दिसते. त्यांना एखाद्या ठिकाणी एकत्र आपण ठेऊ शकतो का? हा विचार आपल्या मनात आला पाहिजे. आपण गडकिल्ले बघत असताना गडावर जातो परंतु खाली असलेल्या पायथ्याच्या गावांमध्ये जात नाही. तुम्हाला या गावांमध्ये अनेक वीरगळ, सतीशीळा, गडावरून खाली ढकलल्या गेलेल्या तोफा किंवा शिलालेख भेटू शकतात. शक्यतो गडावर एक मंदिर असायचे आणि खाली एक मंदिर लोकांसाठी बांधलेले असायचे मग त्या मंदिरात तुम्हाला काही शिलालेख सापडू शकतात ज्यांचा संदर्भ अजून कोणालाच सापडला नसेल. त्यामुळे काहीतरी नवीन शोध तुम्ही घेऊ शकता. 

गणेशाची मूर्ती ही गोष्ट जरी तुम्ही अभ्यासायला घेतली तरी तुम्हाला कळून येईल की यात बदल आहेत. मला जे माहीत आहे किंवा मी ज्यांची भाषणे ऐकली आहेत त्यातून मला असे समजले की शिवकाळात जे गणपती कोरले गेलेत त्यांचे कान हे चौकोनी आहेत. मग हे खरच आहेत का? याचा संदर्भ तुम्ही शोधला पाहिजे.  

काही गोष्टी अनेक सत्तानी पुढे जाऊन आपल्या समोर आणलेल्या आहेत. त्यामुळे अभ्यासकांनी केलेले अभ्यास तुम्ही नक्की वाचले पाहिजे. किल्ल्यांवर अनेक शिलालेख आहेत मग त्यांची संपूर्ण माहिती अजूनही कुठे मिळेल असे एक ठिकाण सापडत नाहीये त्यामुळे मग आपण याविषयी काही करू शकतो का? याविषयी काही तरी करायचं का? बघुयात आम्ही हा प्रयत्न करू शकतो असा आम्हाला विश्वास आहे.

आपल्याला अनेक दंतकथा त्या किल्ल्याविषयी मिळू शकतात. त्यामुळे त्या भागातील लोकांशी तुम्ही संपर्क करा जेणेकरून तुम्हाला या कथा ऐकायला मिळतील. यासाठी गडावर गाईड असेल तर चांगलेच पण जर गाईड नसेल तर त्या पायथ्याच्या गावातील एखादा तरुण शोधा आणि त्याला सोबत ठेवा. त्याने सांगितलेल्या रंजक गोष्टी तुम्हाला नक्कीच गडाचे वेगळे रूप दाखवतील. गावात जे म्हातारे असतात त्यांना देखील भेटून तुम्ही या दंतकथा जाणून घेऊ शकता.

दुर्गपुंज आणि दुर्गशृंखला हे दोन दुर्ग बांधणीतील काही प्रकार आहेत यावर आपण अभ्यास करू शकतो. पुंज म्हणजे एका किल्ल्याच्या संरक्षणाला इतर छोटे किल्ले आणि शृंखला म्हणजे एका रेषेत असलेले किल्ले! किल्ल्याला दिलेले नाव देखील अभ्यासाचा विषय असतो त्यामुळे तुम्ही त्यावर अभ्यास करून भेट दिली तर फायद्याचे ठरेल.

आपण जेव्हा किल्ले बघायला जातो तेव्हा फक्त इतिहास ही बाजू न ठेवता अनेक दृष्टीकोन ठेवले तर तुम्हाला खूप फायद्याची गोष्ट ठरेल. गडावर शौचकूप, शौचालय या गोष्टी तुम्ही बघू शकता. आजही ते सुस्थितीत आहेत त्यामुळे तुम्ही आज म्हणता ना या सरकारने स्वच्छ भारत केला त्या सरकारने स्वच्छता राखली, अरे माझ्या राजांनी किंवा आमच्या देशी स्थापत्यशास्त्राने हे आधीच केलेलं आहे.


किल्ले केव्हा पाहावेत?

किल्ले केव्हा पाहावेत ही गोष्ट तुम्हाला आणि मला देखील कळाली नाही असे व्हायला नको. किल्ला बघण्यासाठी काही कालावधी असतो आणि त्या काळात आपल्याला त्या किल्ल्याचे खरे रूप हे कळत असते. तुम्हाला नळदुर्ग माहिती असेलच! या नळदुर्गातून दोन मोठे धबधबे आहेत हे देखील तुम्ही फोटोमध्ये पाहिले असेल. परंतु जर तुम्ही नळदुर्गाला भेट द्यायला उन्हाळ्यात गेलात तर त्या नळदुर्गाचे महात्म्य आणि सुंदरता तुम्हाला कशी कळणार? ऑगस्ट महिना या नळदुर्गाला बघण्यासाठी योग्य कालावधी आहे. 

लोहगड किल्ल्यावर तुम्ही पावसाळ्यात जेवहा पाऊस सुरू असतो तेव्हा भेट द्या. किल्ल्यात प्रेम करायला नाही तर किल्ल्यावर प्रेम करायला जा. जेव्हा तुम्ही लोहगड प्रवेशद्वार आणि महादेवाचे मंदिर यांच्या मध्ये येता तेव्हा त्या कड्यावरून खाली जाणारे पाणी पुन्हा वेगाने तुमच्या अंगावर येते हा अनुभव उन्हाळ्यात काय घेणार तुम्ही?  असे अनेक किल्ले आहेत. यामध्ये हरिश्चंद्रगड या सह्याद्रीतील हिऱ्याचा उल्लेख होणार नाही असे होईल का? 

हरिश्चंद्रगडाला भेट देण्याचा उत्तम कालावधी म्हणजे पावसाळा! या पावसाळ्यात पण भयंकर पाऊस असेल असा पावसाळा नकोय. जेव्हा पाऊस ओसरायला लागतो आणि हिवाळ्याची चाहूल लागते तो काळ हरिश्चंद्रगडाला भेट देण्यासाठी योग्य काळ असतो. कोकण कड्यावर उभे राहिल्यानंतर पहाटेच्या वेळी जेव्हा सूर्य मागून येतो आणि तुमचे नशीब असेल तर तुम्हाला दिसणारा तो इंद्रवज्र... ज्याला बघायला मिळतो ना त्याचे नशीब उजळले असे म्हणायला काही हरकत नाही. 


आपला किल्ला ही आपली जबाबदारी आहे. जेव्हा बघायला जातोय तेव्हा तुम्ही गडाची काळजी घ्याल ही गोष्ट सांगायला नको परंतु जर तुम्ही गड बघायला जात आहात तर अभ्यासमोहिम आखली तर जास्त उपयुक्त ठरू शकेल. अभ्यासमोहिम तुम्ही आयोजित करताय तर मग त्यातून अनेक लोक एकत्र असतील त्यातील एकाला स्थापत्यशात्राचे ज्ञान असेल, एकाला इतिहास माहीत असेल, एखाद्याने शिल्प अभ्यासलेले असतील ,एकाने मंदिरे आणि पुराणांचा अभ्यास केलेला असेल तर त्या गडाचे सर्व पैलू समजून यायला मदत होईल हे नक्कीच!


(यात अधिक माहिती ऍड होईल त्यामुळे हा लेख सेव्ह करून ठेऊ शकता किंवा पुन्हा भेट देऊन बघू शकता)


Post a Comment

0 Comments