Ticker

6/recent/ticker-posts

वीर संताजी घोरपडे यांनी औरंगजेबाची केलेली फजिती || Veer Santaji Ghorpade

वीर संताजी घोरपडे यांनी औरंगजेबाची केलेली फजिती || Veer Santaji Ghorpade

छत्रपती संभाजी महाराजांच्या कैदेनंतर देखील मराठ्यांच्या इतिहासात अनेक सुवर्णपाने आहेत ज्यात मावळ्यांनी आपल्या जीवाची बाजी आपल्या राज्याला वाचविण्यासाठी साठी आणि नंतर बदला घेण्यासाठी लावलेली आहे.

वीर संताजी घोरपडे यांनी औरंगजेबाची केलेली फजिती || Veer Santaji Ghorpade

असेच एक सुवर्णपर्ण म्हणजे वीर संताजी घोरपडे! या मावळयाविषयी संपूर्ण माहिती आपण नंतर एखाद्या लेखात  जाणून घेऊयात परंतु त्यांनी केलेला एक पराक्रम आज आपण जाणून घेणार आहोत.

छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर इ स 1689 साली रायगडावर असलेले राजाराम महाराज हे आधी प्रतापगडावर आले. राजाराम महाराज रायगडावर निसटले आणि ते प्रतापगडाला गेले ही बातमी मुघलांना कळाली. मुघलांनी तातडीने प्रतापगडाला वेढा दिला. इतिहास आपल्याला सांगतो की राजाराम महाराज प्रतापगडाला देखील थांबले नाहीत. त्यांनी वासोटा, सातारा, परळी मुक्काम करत पन्हाळा किल्ल्याकडे कूच केली. मुघली फौजा राजाराम महाराजांच्या पाठलागावर होत्या. राजाराम महाराज पन्हाळगडावर गेले आणि पन्हाळगडाला देखील वेढा पडला. स्वराज्यातील अनेक गडकिल्ल्याना आता मुघलांनी वेढे दिले होते.

अनेक गडकिल्ले मोघलांच्या ताब्यात गेले देखील होते परंतु तरी देखील किल्लेदार शूरपणे किल्ले लढवत होते. मुघलांचे सैन्य तसे मोठे होते आणि त्यांच्यापुढे छत्रपती गमावलेले आपले मराठा सैन्य निष्फळ ठरत होते. राजाराम महाराज तरी देखील सर्वांना प्रोत्साहन देत होते. या बिकट काळात काही मावळ्यांची नावे आवर्जून घ्यावी लागतात आणि त्यातील शत्रुच्या तंबूंचे कळस छाटून आणणारे संताजी आणि धनाजी हे वीर देखील आहेत. 

संभाजी महाराजांची हत्या केली आणि त्यानंतर औरंगजेब बादशहा भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगाव या ठिकाणी छावणी करून राहिला होता. मुघली सत्तांची सर्व सूत्रे तिथून हालत होती. अनेक गडकिल्ल्याना ताब्यात घेण्यासाठी मोहिमा इथूनच सुरू होत होत्या. जर औरंगजेबाच्या मनात पुन्हा दरारा निर्माण करायचा असेल तर बादशहाच्या छावणीवरच हल्ला करून नेस्तनाबूत करावे ही कल्पना संताजी आणि धनाजी या जोडीला सुचली. 

संताजी आणि धनाजी या जोडीने त्यांच्या फौजा गोळा करून शंभू महादेवाचे देऊळ गाठले. बादशहा छावणीवर संताजी हल्ला करेल आणि फलटण येथे असलेल्या शहाबुद्दीन खान आणि रनमस्त खानवर धनाजी जातील. संताजी यांच्या जोडीला विठोजी चव्हाण हे शूर सेनानी होते.  इतक्या वेळ संताजी यांचे आडनाव तुम्हाला सांगितलेच नाही! संताजी घोरपडे, बहिरजी घोरपडे, मालोजी घोरपडे (दोघेही संताजींचे बंधुचं होते) आणि विठोजी चव्हान यांच्या सोबतीला या मोहिमेत 2000 स्वार होते. 

बखरकार मल्हार रामराव चिटणीस यांनी या मोहिमेचे वर्णन सुंदर केलेले आहे. वर दिलेली सर्व माहिती ही याच बखरीतून संदर्भ घेऊन दिलेली आहे. या बखरीत असलेला एक उल्लेख वाचायला मस्त वाटतो.

"...आपण मराठे आहोत हे खाश्यास कळवून येतो..."

-वीर संताजी घोरपडे

शंभू महादेवाच्या डोंगरावरून ते निघाले. डोंगरांचा आश्रय घेत ते जेजुरी येथे पोहोचले. श्रींचे तिथे दर्शन देखील घेतले. पुढे दिवेघाटात उतरून गर्द झाडीत संताजींनी मुक्काम केला. मध्यरात्रीच्या वेळी ते तिथून निघून तुळापुरी पोहोचले. काही अंतरावर रात्रीच्या पहाऱ्याचे सैनिक देखील त्यांना दिसले.  त्यांना संताजीने सांगितले की बादशहाच्या सैन्यात असलेल्या शिर्के व मोहिते यांच्याकडे रात्रीच्या पाहऱ्यासाठी गेलो होतो आणि बदलीला आलो आहोत. असे अगदी पक्के सांगितल्याने त्या पहारेकऱ्यांनी त्यांना आत जाऊ देखील दिले. 

अखेर संताजींनी बादशहाच्या छावणीवर हल्ला चढविला. चिटणीस बखरीत उल्लेख आढळतो की,

"...तेथे लाखो फौज असता, दोन-तीन हजारांनीशी हल्ला करून, बहुत तसनस करून, बादशहाच्या डेऱ्याचे तणावे तिघे बंधू घोरपडे व चव्हाण यांनी तोडून डेऱ्याचे सोन्याचे कळस दोन्ही घेतले..."

यात मराठ्यांचे देखील काही लोक मारले गेले. इथून ते बादशहाच्या फौजेला दोन विभागात फोडून सिंहगडाच्या झाडीत ते पोहोचले. सिंहगडावर सिधोजी गुजर हे किल्लेदार होते. सिधोजी म्हणजे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे पुत्र होय. सिधोजीना हे कळाले तेव्हाच सिधोजी खाली आले आणि त्यांनी संताजींची विचारपूस केली. जे जखमी सैनिक होते त्यांना संताजींनी सिधोजींच्या हवाली केले. संताजी आणि सैन्याने तिथे 2 दिवस आराम केला. ते गडावर गेले नाही. त्यांनी झाडीत मुक्काम केला.

संताजी यांनी रायगडाच्या दिशेने कूच केली. गडाला वेढा देऊन बसलेल्या जुल्फिकार खानाच्या सैन्यावर संताजींनी हल्ला चढविला. संताजी यांनी तिथे जास्त वेळ जाऊ दिला नाही. मुघलांची जितकी जास्त हानी करता येईल तितकी त्यांनी केली. येताना मुघलांचे 5 हत्ती देखील सोबत घेतले आणि माघारी फिरले. संताजी यांनी माघारी येताना पारघाट चढला, वाई सातारा मार्गे ते पन्हाळ्यावर आले.

औरंगजेबाच्या नाकावर टिच्चून त्यांच्या तंबूंचे 2 सोन्याचे कळस आणि जुल्फिकारखानाच्या सैन्यातील 5 हत्ती ही लूट घेऊन संताजी आणि सैन्य राजाराम महाराजांना येऊन मिळाले. या कामगिरी बद्दल या तिघा घोरपडे बंधूंना आणि विठोजी यांना किताबती आणि वस्त्रे मिळाली असा उल्लेख चिटणीस बखरीत आढळतो. यामध्ये तुम्ही जर बघितले तर लढाई लढताना शिवरायांचे नाव घेऊन लढाई लढली असा उल्लेख देखील आहे.

या पराक्रमाचे किताब खालीलप्रमाणे देण्यात आले,

संताजी घोरपडे - ममलकतमदार (राज्याचा आधारस्तंभ)

बहिरजी घोरपडे - हिंदुराव 

मालोजी घोरपडे - अमीर उल उमराव

विठोजी चव्हाण - हिम्मतबहाद्दर

छत्रपती राजाराम महाराजांनी संताजी व त्यांच्या सहकाऱ्यांना पदव्या, वस्त्रे देऊन सन्मान केला. शंभूराजांच्या हत्येनंतर मराठ्यांमध्ये असलेली भीती ही संपून संताजी यांनी विजेप्रमाणे औरंगजेबाची केलेली फजिती बघून मात्र आता मावळ्यांमध्ये पुन्हा एकदा स्फुरण चढले. 

रामचंद्रपंत अमात्य लिहितात की,

"...पातशाहचे डेऱ्याचे कळसच आणून, जुल्फिकारखान याचे 5 हत्ती आणले त्यापेक्षा यांची मर्दुमकी कोठवर वर्णावी..."

Post a Comment

0 Comments