Ticker

6/recent/ticker-posts

किल्ले रोहिडा / विचित्रगड - Rohida Fort / Vichitragad Marathi

किल्ले रोहिडा / विचित्रगड - Rohida Fort / Vichitragad Marathi

किल्ले रोहिडा किंवा विचित्रगड हा ऐन मावळात वसलेला किल्ला भोरच्या दक्षिणेस फक्त १० कि.मी.च्या अंतरावर आहे. भोर ते महाबळेश्वर डोंगर मार्गावरील अतिशय महत्वाचा हा किल्ला आपल्या अजस्त्र लांबीच्या नैसर्गिक तटबंदीमुळे व चिरेबंदी बांधणीच्या दगडी प्रवेशद्वारांमुळे दुर्गयात्रीच्या मनावर वेगळीच छाप टाकतो. याच रोहिडा किल्ल्याविषयी माहिती आज आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतो आहे. 

किल्ले रोहिडा / विचित्रगड - Rohida Fort / Vichitragad Marathi

गडाचे नाव- रोहिडा किल्ला / विचित्रगड (Rohida Fort / Vichitragad)

गडाची उंची- 1116 मीटर

ठिकाण- बाजारवाडी, भोरच्या पुढे

चढाई श्रेणी- मध्यम

तालुका- भोर

जिल्हा- सातारा

रोहिडा किल्ल्याला भेट द्यायला कसे पोहोचाल? - How to reach Rohida Fort?

रोहिडा किल्ल्यास भेट देण्यासाठी आपण प्रथम संस्थानकालीन भोरला पोहोचायचे. येथून बसने आपण रोहिडा किल्ल्याच्या पायथ्याचे बाजारवाडी हे गाव गाठायचे. गावात पोहोचल्याबरोबर पश्चिमेकडे पाहिले की तटबंदी व बुरूजांनी नटलेला रोहिडा दिसतो, बाजारवाडी गावाच्या मागेच गडाची बऱ्यापैकी सोपी असलेली चढण सुरू होते. 

किल्ले रोहिडा / विचित्रगड - Rohida Fort / Vichitragad Marathi

बाजारवाडी येथून मळलेल्या ठळक पायवाटेने आपण तासाभरात गडाच्या पहिल्या गोमुखी बांधणीच्या दरवाज्याजवळ येऊन पोहोचतो. या किल्ल्यावरील बहुतांशी वास्तूंचा भोरच्या रायरेश्वर प्रतिष्ठानने जीर्णोध्दार केलेला असून गडावरील त्यांच्या विविध कामांमुळे हा गड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या दरवाज्याच्या माथ्यावर गणेशपट्टी आहे. 

हा दरवाजा पार केल्यानंतर दोन्ही अंगास सिंह व शरभ यांची शिल्पे असलेला दुसरा दरवाजा लागतो. या दरवाज्यातून आत गेल्यावर उजव्या हातालाच जमीन सपाटीतील कातळात खोदलेले बारमाही सुमधुर पाण्याचे टाके आहे. येथून थोडे पुढे गेल्यानंतर भक्कम बांधणीचा गडाचा तिसरा दरवाजा लागतो. 

दरवाज्याच्या कमानीच्या दोन्ही बाजूस कमळे व माशाची आकृती असून वरच्या बाजूला डावीकडे चंद्र व उजवीकडे सूर्य आहे. प्रवेशद्वाराच्या भिंतीवर दोन्ही बाजूस गजमुखांची शिल्पे असून डाव्या हातास मराठी शिलालेख व उजव्या हातास फारसी शिलालेख कोरलेले आपणास दिसतो.

दोन्ही एकापेक्षा एक सरस दरवाज्यातून आत गेल्यावर डावीकडेच सदरचे अवशेष आपल्याला दिसतात. येथून उजव्या हातालाच फत्तेबुरूज असून त्या वर ढालकाठी म्हणजे निशाण लावण्याचा गोल ओटा आहे. हा बुरूज पाहून सदरेच्या मागच्या बाजूला गेल्यानंतर दगडी बांधणीचे रोहिडमल्लाचे मंदिर लागते. देवळात गणपती व भैरवाच्या मूर्ती असून समोरच एक लहानसे टाके, दीपमाळ व किल्ल्याच्या ऐतिहासिकतेची साक्ष देणाऱ्या स्मारकशिला आपल्याला पाहावयास मिळतात. 


रोहिडा किल्ल्यास एकूण सात बुरूज असून त्यातील शिरवले व वाघजाई हे बुरूज भक्कम लढाऊ बांधणीचे आहेत. गडप्रदक्षिणेत उत्तर भागात कोरीव टाक्यांची माळ आपणास दिसते. येथेच एका टाक्याजवळ शिवलिंग व मानवी मूर्ती जमिनीलगत बसवलेली आहे. टाक्यांपासून पुढे गेल्यावर वाघजाईचा बुरूज लागतो. पायऱ्यांच्या वाटेने या बुरूजावर चढल्यानंतर चहुबाजूचा मुलूख पटकन आपल्या दृष्टीक्षेपात येतो. 

पूर्वेस पुरंदर - वज्रगडाची जोडी, उत्तरेस सिंहगड, वायव्येस राजगड, तोरणा, पश्चिमेस भेळंजा उर्फ कमळगड आपल्या नजरेस पडतात. बुरूजाच्या खालच्या बाजूस चुन्याची घाणी व दगडी चाक आपल्याला पाहावयास मिळते. संपूर्ण गडफेरी व्यवस्थित करण्यासाठी दोन तास पुरतात. 

रोहिडा किल्ल्याचा इतिहास - History of Rohida Fort

Rohida fort shilalekh

तिसऱ्याद्वारावरील शिलालेखावरुन २३ मे, १६५६ रोजी मुहमद आदिलशाहाने या गडाची दुरुस्ती करुन घेतली असे अनुमान प्रा. डॉ. ग. ह. खरे यांनी काढलेले आहे. यावरून हा किल्ला १६५६ पर्यंत आदिलशाहाकडे होता हे सिध्द होते. या किल्ल्याशी जेधे, खोपडे इ. शिवकालीन घराण्यांचा घनिष्ठ संबंध होता. 

बांदल देशमुखांच्या ताब्यात असलेला हा किल्ला घेतेवेळी प्रत्यक्ष लढाईत रत्नपारखी शिवरायांच्या नजरेत बांदलाचे कारभारी असलेले रणझुंजार बाजीप्रभू देशपांडे आले. या लढाईत कृष्णाजी बांदल मारले गेले. या लढाईनंतर राजांनी बाजीप्रभू व इतर बांदल सैनिकांना स्वराज्याच्या महान कार्यात सामावून घेतले. हिरडस मावळ व रोहिड खोरे या प्रदेशांवर रोहिड्याचा अधिकार होता. 

पुढे १६६५ मधील पुरंदरच्या तहानुसार याचा ताबा मोगलांकडे गेला. पण १३ जुलै, १६७१ रोजी शिवाजीराजांनी हा किल्ला परत घेतला. छ. संभाजीराजांच्या मृत्युनंतर राजाराम महाराजांच्या अनुपस्थितीमध्ये ज्यांनी स्वराज्याचा डोलारा सांभाळला त्यामध्ये भोर संस्थानचे संस्थापक सचिव शंकराजी नारायण हेही होते. 

सन १७०७ मध्ये मोगलांच्या ताब्यातून शाहूंची सुटका झाली त्यावेळी शंकराजी रोहिड्यावर होते. त्यांना भेटायला येण्याचा शाहूंचा हुकूम झाला. त्यावेळी शाहू की ताराराणीचा पक्ष या द्विधा मन : स्थितीत त्यांनी हिरकणी खाऊन मरण पत्करले. 

इतक्या थोर व्यक्तीचा दुर्दैवी अंत : रोहिड्यावर घडून आला. त्यानंतर ऑक्टोबर १७०७ मध्ये शाहूंनी स्वत : जातीने गडावर येऊन शंकराजींचा मुलगा नारो शंकर याची त्यांच्या जागी नेमणूक केली. 

पुढे इंग्रजांनी हा दुर्ग भोर संस्थानच्या ताब्यात राहू दिला. स्वातंत्र्यपूर्व काळातील भोर संस्थानातील हा देखणा किल्ला आपल्या वैशिष्टयपूर्ण बांधणीमुळे, अजूनही अस्तित्त्वात असलेल्या बऱ्याच वास्तूंमुळे व सोप्या चढाईमुळे सर्वांनी भेट देण्यायोग्य आहे.

राहण्याची आणि जेवणाची सोय

गडफेरी कमी वेळात पूर्ण होते त्यामुळे तुम्ही गडावरून खाली येऊन बाजारवाडी या गावात थांबू शकता. इथे तुमची खाण्याची व राहण्याची सोय देखील होऊ शकते.

Post a Comment

0 Comments