Ticker

6/recent/ticker-posts

किल्ले पुरंदर - वज्रगड | Purandar - Vajragad Fort

किल्ले पुरंदर - वज्रगड | Purandar - Vajragad Fort

पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या मुख्य रांगेतून सह्याद्रीचे दोन फाटे निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत. यातील दूसरा फाटा दूरवर पसरत गेलेला असून त्याला भुलेश्वर रांग म्हणतात. भुलेश्वर  रांगेतील सर्वात उंच शिखर म्हणजे किल्ले पुरंदर. याच पुरंदर किल्ल्याचा उपयोग करून आदिलशाही सरदार फत्तेखानाविरुध्द स्वराज्याची पहिली लढाई खेळली गेली व ती मराठ्यांनी नियोजनबद्ध रितीने जिंकली. 
साताऱ्याकडे लढाईचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी संपूर्ण राजकारण व युद्धाचे नियोजन शिवरायांनी वयाच्या फक्त 18 व्या वर्षी स्वतः केले, पण या लढाईत 65 वर्षाचे बाजी पासलकर धारातीर्थी पडले. पुढे मिझाराजे जयसिंहाच्या मुघली वावटळीत दिलेरखानाविरुध्द लढताना याच पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे अतुलनीय पराक्रम करुन धारातीर्थी पडले. अशा अनेक नररत्नांच्या रक्ताने पुरंदरची भूमी पावन बनलीय. 

किल्ले पुरंदर - वज्रगड | Purandar - Vajragad Fort

गडाचे नाव-
किल्ले पुरंदर व किल्ले वज्रगड (Purandar Fort & Vajragad Fort)
गडाचा प्रकार- गिरिदुर्ग
समुद्रसपाटीपासून उंची- 1390 मीटर
ठिकाण- नारायणपूर
जिल्हा- पुणे
सध्याची अवस्था- लष्कराच्या ताब्यात असल्याने उत्तम पण वास्तू मोडकळीस आलेल्या

पुरंदर वज्रगडाला कसे पोहोचाल? - How to Reach Purandar & Vajragad Fort?

पुरंदर किल्ल्यास भेट देण्यासाठी कोल्हापूर - पुणे महामार्गावरील कापूरओहोळ गावात आपणास प्रथम पोहोचावे लागते. येथून खाजगी वाहानाने किंवा बसने गड पायथ्याचे नारायणपूर गाव गाठायचे. 

नारायणपूर हे गाव हल्ली एकमुखी दत्ताच्या मंदिरामुळे फारच प्रसिद्ध आहे. मंदिराशेजारीच नारायणेश्वर महादेवाचे राष्ट्रकूटकालीन मंदिर आहे. हे हेमाडपंती भव्य शिवमंदिर नक्षीकामाने व विविध कलाकुसरीने पाहाणाऱ्याचे भान हरपून टाकते. या मंदिरातील महादेवाचे दर्शन घेऊन आपण थोडक्या वेळात गड पायथ्याचे नारायणपेठ गाव गाठायचे. येथून मळलेल्या पायवाटेने उंच सखल अडथळे पार करून आपण पुरंदर माचीच्या बिनी दरवाज्यात येऊन पोहोचतो. 
पुरंदर किल्ला आता लष्कराच्या ताब्यात असल्यामुळे गडाच्या माचीवर दोन सुरक्षा रक्षक असतात. त्यांना आपला गडदर्शनाचा उदात्त हेतू सांगितल्यावर आपल्याला गडावर फिरण्याची मुभा मिळते. 
दरवाज्यातून आपण उजव्या हातास म्हणजे पश्चिमेस चालू लागल्यावर आपणास समोर दिसतो, रणझुंझार मुरारबाजी देशपांडे यांचा आवेशपूर्ण पुतळा. हातात दोन समशेरी घेऊन उभा असलेला हा स्फुर्तीदायी पुतळा 1970 साली बसविण्यात आला. येथे पुढेच आहे पद्मावती तलाव, हा सर्व परिसर डोळ्याखाली घालून आपण परत बिनी दरवाज्यापर्यंत यायचे. येथून सरळ जाणाऱ्या पक्क्या रस्त्याने पुढे गेल्यावर उजव्या हातासच पुरंदरचा अधिपती असलेल्या पुरंदरेश्वर महादेवाचे छोटेखानी पण सुंदर मंदिर लागते. येथील परिसरही नीटनेटका व स्वच्छ असून गर्भगृहात शिवलिंग आहे. 
आपण या देवळाच्या मागच्याच बाजूने जाणाऱ्या पायवाटेने बालेकिल्ल्याला भिडल्यानंतर वीस मिनिटात तटबंदीने सुसज्ज अशा सरदरवाज्यात येऊन पोहोचतो. सर दरवाज्यातून आत जाताच समोरच कंदकडा ही टेकडी लागते. लांबवर पसरलेल्या या टेकडीच्या टोकास कंदकडा बुरूज असून येथून समोरच आपणास पुरंदरचा सोबती वज्रगड अगदी जवळ दिसतो, हा बुरूज पाहून आपण आल्या वाटेने परत येऊन एका पाठोपाठ एक असणाऱ्या दोन दरवाज्यातून बालेकिल्ल्यात प्रवेश करायचा, येथे समोरच मारूतीचे मंदिर व पुरंदरे वाडा लागतो. पुढे मळलेल्या वाटेने थोडे अंतर गेल्यावर डाव्या हातास आपणास छोटी दगडी वास्तू दिसते. या वास्तूला वळसा घालून हिच्यात डोकावल्यास दोन टाकी दिसतात. ही आहेत तेल तूप साठवण्याची ठिकाणे. यातील मोठ्या टाक्यात शिवकालात तेल व छोट्यात तूप साठवत असल, या वास्तू पाहून उजव्या हाताच्या पायवाटेने आपण राजगादीच्या टेकडीवर जायचे. 
पूर्वी येथे शिवरायांचा वाडा होता. पण सध्या टेकडीवर कोणतेच अवशेष आपल्याला पाहायला मिळत नाहीत, पुरंदर किल्ल्याचा हा सर्वोच्च माथा असल्यामुळे इथून सभोवर विहंगम दृश्य दिसते. राजगादीच्या उतारावर गच्च झाडीत एक भक्कम दगडी इमारत आहे, ही आहे दारुगोळयाची कोठी. येथून आल्या वाटेने परत खाली उतरायचे व म्हसोबा टाक्यापासून राजगादीची टेकडी उजव्या हातास ठेवून केदार टेकडीकडे आपण चालू लागायचे. केदारेश्वराच्या टेकडीवर चढण्यासाठी मजबूत दगडी कठड्यासह रूंद जिनाच बांधलेला आहे. जिन्याच्या पायऱ्या चढून वर गेल्यावर समोरच प्रशस्त केदारेश्वराचे मंदिर आपणास दिसते. 
मंदिरासमोर नंदी व दीपमाळ असून येथे शेजारीच एका चौथऱ्यावर जुनी समाधी आहे. मंदिराच्या चारी बाजूने दगडी फरश्या बसवलेल्या असून गर्भगृहात शिवलिंग व इंद्राची मूर्ती आहे. येथून आल्यावाटेने केदार टेकडीच्या पायथ्यास यायचे. पुरंदरच्या बालेकिल्ल्यास शेंदऱ्या बुरूज, हत्ती बुरूज, कोकण्या बुरूज, फत्तेबुरूज असे भरभक्कम बुरूज आहेत. 
बालेकिल्ला पाहून परत आपण खालच्या माचीवर पोहोचायचे, आता आपल्याला जायचे आहे वज्रगडाकडे. पुरंदरच्या मानाने वज्रगड तसा आकार - विस्ताराने खूपच लहान, पण युद्धशास्त्राच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा. आज्ञापत्रात म्हटले आहे. ' किल्ल्यासमीप दुसरा पर्वत किल्ल्यासमुदायी असो नये. कदाचित असला तरी सुरंग लावून पाडून गडाचे आहारी आणावा. 
सुरंगास असाध्य असला तरी तोही जागा मोकळी न सोडितो बांधोन मजबूत करावा ! ' बरोबर हीच नेमकी परिस्थिती वज्रगडासंदर्भात लागू पडते. माचीवरुन सरळ पुर्वेकडे जाणाऱ्या रस्त्याने आपण एनसीसी ने बसविलेल्या शिवरायांच्या अर्धपुतळ्यापर्यंत यायचे. वाटेतच आपणास शिवरायांनी बांधलेले राजाळे तळे लागते. पुरंदर व वज्रगडामध्ये भैरवखिंड नावाची खिंड आहे. शिवरायांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूने वज्रगडाचा डोंगर उजवीकडे ठेवत आपण चालू लागायचे. 
वज्रगडाकडे फारसे कुणी फिरकत नसल्यामुळे पायवाट इकडे तिकडे चुकण्याची शक्यता असते. पुतळयापासून वज्रगडाच्या पहिल्या दरवाज्यापर्यंत येण्यासाठी आपणास वीस मिनिटे लागतात. हा पहिला दरवाजा दोन भक्कम बुरूजांनी संरक्षित केलेला आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दुसरा उत्तराभिमुख दरवाजा पार करून आपण ऐन गडावर येऊन पोहोचतो. वज्रगडाच्या बालेकिल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला प्रचंड प्रस्तरखंड दिसतात. 
वज्रगडाच्या या सर्वोच्च माथ्यावरून किल्ले पुरंदर फारच सुंदर दिसतो. येथून वज्रगडाची एकसलग तटबंदी व या तटात असणारे पाच बुरूजही आपल्याला दिसतात. बालेकिल्ला व्यवस्थित पाहिल्यानंतर दिंडी दरवाज्यातून आपण खाली उतरायचे. इथल्या खालच्या भागात तीन पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्यांशेजारीच हनुमंताचे व रुद्रेश्वर महादेवाचे मंदिर असून शिवलिंग मात्र नाहीसे झाले आहे. 
गडाच्या नैऋत्येकडील बुरूजाला पडकोट बांधला असून या बुरूजामुळे पुरंदरच्या माचीवरील सर्व हालचाली टिपता येतात. पुरंदर म्हणजे इंद्र. इंद्राच्या हातातील वज्र हे प्रभावी अस्त्र, तर या दुर्गाच्या हातातील बलवान स्थान ते वज्रगड. 

पुरंदर व वज्रगडाचा इतिहास - History of Purandar and Vajragad Fort

पुरंदरची बांधणी राष्ट्रकूट - चालुक्य काळात झाली असावी. बहामनी राजवटीनंतर हा किल्ला निजामशाहीकडे गेला. त्यावेळी महादजी निळकंठ गडाचे सरनाईक होते. त्यांच्या मृत्यूनंतर चौघा मुलांमध्ये अधिकारासाठी भांडण सुरू झाले. समयसूचकतेने शिवरायांनी त्यात लक्ष घालून पुरंदर आपल्या ताब्यात घेतला व त्या चौघाभावांना जमिनीचे इनाम देऊन स्वराज्यकार्यात सामावून घेतले. राजांनी नेताजी पालकरांना गडाची सरनोबती बहाल केली. याच गडावर 14 मे, 1657 म्हणजे ज्येष्ठ शुद्ध द्वादशी शके 1579 रोजी शंभूराजांचा जन्म झाला. या आनंदाने पुरंदर न्हाऊन निघाला. पुढे पुरंदरला दिलेरखानाचा मोघली वेढा पडला. त्याने पहिल्यांदा पुरंदरचा सोबती वज्रगड ताब्यात घेतला व वज्रगडावरुन तोफांचा मारा केला. 
एका बुरूजाला भगदाड पाडून त्यातून मोघली सैन्य माचीवर प्रवेशले. आता फक्त बालेकिल्ल्याचा घास घ्यायचा उरला होता. पण किल्लेदार मुरारबाजी डगमगला नाही. त्याने आपल्या हिंमतबाज मावळ्यांसह पाच हजार पठाणावर चढाई केली. धूळ उडवीत, चौखूर उड्डाण घेत जीवावर उदार झालेल्या मावळ्यांच्या तलवारी घुमू लागल्या. मुरारबाजीच्या शरीरात तर प्रत्यक्ष रणचंडिका प्रवेशली होती. त्यांचा उन्मत्त रणावेश पाहून दिलेरखान चकित झाला. त्याने मुरारबाजीस युद्ध थांबवून मोघलांस सामील होण्याचे आवाहन केले. पण स्वराज्याच्या या निष्ठावंत मानकऱ्याने ते ठोकरून दिलेरखानावरच चाल केली. खानाने तीर चालवून मुरारबाजींचे शिर उडवले. 
मुरारबाजींच्या मृत्यूनंतरही मराठ्यांनी किल्ला लढवणे चालूच ठेवले. शेवटी शिवरायांनी जून 1665 मध्ये मिझाराजाशी तह केला व युध्द थांबवून मावळयांना पुरंदर सोडण्यास सांगितले. राजांनी 23 किल्ले मोघलांना दिले व फक्त 12 किल्ले स्वराज्यात राहिले. पुढे 8 मार्च, 1670 मध्ये निळोपंत मुझुमदार यांनी पुरंदर परत स्वराज्यात आणला. त्यावेळी त्रिंबक भास्कर यांना शिवरायांनी पुरंदरचे किल्लेदार म्हणून नेमले. पेशवेकाळात हा किल्ला अनेक घडामोडींचा साक्षीदार ठरला. शेवटी इ. स. 1818 मध्ये इंग्रज सेनापती एल्ड्रिजने पुरंदरवर इंग्रजांचा ताबा आणला. 
असा हा मराठयांच्या पराक्रमाने गाजलेला किल्ले पुरंदर पाहून परतताना शिवपुत्र संभाजीराजांचे जन्मस्थान असूनही या गडावर त्यांचे कोणतेही स्मारक नसल्याची खंत आपल्या इतिहासप्रेमी मनास बोच लावते. 

आज महाराष्ट्रात जागो - जागी करोडो रुपये खर्चुन ऐतिहासिक स्मारके उभी रहात असताना शासनाला शंभूराजांच्या जन्म स्थळाचा विसर पडला आहे की काय ? अशी शंका आपल्या मनास पुरंदर भेटीत स्पशून जाते. तसेच या गडास भेट देणारे बहुतांशी दुर्गप्रेमी फक्त पुरंदर पाहून माघारी वळतात मात्र शेजारच्या वज्रगडाकडे कोणी फिरकतच नाही. पण जरा वाकडी वाट करुन पुरंदरचा हा तोलामोलाचा उपेक्षित सोबतीही प्रत्येकाने आवर्जून पाहावा असाच आहे.वज्रगडाशिवाय पुरंदरची भेट अपुरी आहे.

राहण्याची व जेवणाची सोय

पुरंदर किल्ल्यावर तुम्हाला राहता येणार नाही परंतु पायथ्याच्या नारायणगाव मध्ये राहण्याची व जेवणाची सोय होऊ शकते.

Post a Comment

1 Comments

  1. पुरंदर व वज्रगडाचा इतिहास मराठी मध्ये उपलब्ध केल्याबद्दल आभरी आहे

    ReplyDelete