Ticker

6/recent/ticker-posts

किल्ले कमळगड | Kamalgad Fort Marathi

किल्ले कमळगड | Kamalgad Fort Marathi 

धोम धरणाच्या जलाशयाच्या मागील बाजूने एक डोंगररांग पुढे आलेली आहे . दोन्ही बाजूंनी पाण्याचा वेढा असलेल्या या डोंगररांगेतून काळ्या पाषाणाचा एक डोंगर मान वर काढून आल्यासारखा उंचावला आहे , तोच किल्ले ' कमळगड ' . रुढार्थाने सर्व किल्ल्यांवर असणारी तट - बुरूज असे कोणतेच अवशेष या किल्ल्यावर नाहीत . पण या सर्वांहून न्यारा असा टवटवीत निसर्गाचा अमाप खजिना कमळगडास लाभला आहे . घनदाट झाडी हे बलस्थान असलेल्या कमळगडाची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.

गडाचे नाव- कमळगड / कत्तलगड / भेळंजा (Kamalgad Fort / Kattalgad Fort / Bhelanja)

गडाचे स्वरूप- गिरिदुर्ग

समुद्रसपाटीपासून उंची- 1375 मीटर

ठिकाण- वासोळे, तुपेवाडी

जिल्हा- सातारा

सध्याची अवस्था- ऐतिहासिक अस कांही शिल्लक नाही

किल्ले कमळगड | Kamalgad Fort Marathi

कमळगडाला कसे पोहोचाल? How to reach to Kamalgad?

कमळगडास भेट देण्यासाठी प्रथम आपणास वाई हे गाव गाठावे लागते . वाईहून आपण गडाशेजारच्या वासोळे गावची एस.टी. पकडायची . हा सर्व एस.टी. प्रवास धोम जलाशयाच्या सभोवारच असल्यामुळे आपण निसर्गाचे अवलोकन करीत कधी वासोळे गावात पोहोचतो याचे आपल्याला भान राहात नाही . ऐन धरणाच्या जलाशयाला खेटून वसलेल्या वासोळे गावातून आपण पायी अर्ध्या तासात तुपेवाडीत पोहोचतो . पुढे तुपेवाडी पार करुन गडाच्या उजव्या खिंडीच्या वाटेने आपण चालू लागायचे . 

Kamalgad fort

गडाच्या खिंडीच्या वाटेने जाताना पुढची पायवाट मात्र झाडीतूनच जात असल्यामुळे आपण तासाभरात खिंडीच्या वरच्या भागात येऊन पोहोचतो . पुढे डावीकडच्या डोंगरधारेने एक डोंगर चढून अर्ध्या तासात आपण पोहोचतो गोरखनाथाच्या देवळाजवळ . मंदिराशेजारीच औंदुबराचा वृक्ष असून आपण येथेच थोडी विश्रांती घ्यायची . गर्द झाडीतल्या देवळाजवळच एक बारमाही वाहाणारा झरा असून गडावर पाण्याची सोय नसल्यामुळे आपण पाण्याच्या बाटल्या न विसरता येथूनच भरून घ्यायच्या . 

मंदिराला खेटून जाणाऱ्या जंगलातील पायवाटेने आपण अर्ध्या तासात कमळमाचीवर येऊन पोहोचतो . येथून समोरच एका पाठोपाठ एक असे नवरा नवरीचे वैशिष्ट्यपूर्ण सुळके आपले लक्ष वेधून घेतात व उजव्या हातासच घनदाट झाडीतून डोकावणारा कमळगड आपल्याला दिसू लागतो . पुढे शेतातील दोन घरांजवळून उजव्या बाजूच्या गर्द रानात शिरलेल्या पायवाटेने आपण थोडक्या चढाईनंतर किल्ल्यासमीप येऊन पोहोचतो . वाटेत आपणास थोडी फार भग्न तटबंदी व उध्वस्त घरांचे अवशेष दिसतात . 

Kamalgad fort

येथून दोन भल्या मोठ्या कातळांना बिलगून वर जाताच आपण गडाच्या सपाटीवर पोहोचतो . कमळगडावर नेहमी इतर किल्ल्यावर आढळणारे प्रवेशद्वार , बुरूज असे कोणतेच अवशेष नाहीत . पण गडाचे एकमेव वैशिष्ठ्य असलेली गेरुची किंवा कावेची विहीर मात्र ह्या साऱ्यांची उणीव भरून काढते . ही विहीर म्हणजे जणू जमीन खोल चिरत गेलेले एक रूंद भुयारच . 

विहीरीच्या पायऱ्यांच्या वाटेने जसजसे आपण खाली जावू तसतसे हवेतील गारवा वाढत जातो . खाली पोहोचल्यावर आत आपणास चहूबाजूला खोल कपारी व गेरू किंवा काव यांची ओलसर माती पसरलेली दिसते . येथून वर पाहिल्याबरोबर माथ्याकडे तीन - चार आयताकृती झरोके उजेडासाठी खोदलेले आपणास दिसतात . 

गडावर फिरताना दक्षिणेकडे कातळाची नैसर्गिक भिंत दिसते . तर किल्ल्याच्या मध्यभागात गवतात लपलेले चौथऱ्याचे अवशेष दिसतात . गडावर कोठेही पाण्याचे टाके मात्र नाही . किल्ल्याच्या पठारावरून महाबळेश्वरचा वनाच्छादित परिसर , रायरेश्वरचे पठार , केंजळगड , धोम धरणाचा निळाशार विस्तृत जलाशय असा बराच लांबचा रमणीय प्रदेश दिसतो . 

परतीसाठी आल्या वाटेने तुपेवाडी गावापर्यंत यायचे . गर्द झाडीच्या वाटेमुळे तसेच गडापर्यंत येण्यासाठी कराव्या लागणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण ट्रेकमुळे कमळगड दुर्गप्रेमींबरोबर निसर्गप्रेमींनाही भेट देण्यास अगदी योग्य किल्ला आहे .

कमळगड किल्ल्याचा इतिहास- History of Kamalgad Fort

Kamalgad fort

गडाचा इतिहास पाहायला गेल्यास शिवराज्याभिषेकाच्या आधी कमळगड स्वराज्यात सामील झाला . या गडाचे दुसरे नाव आहे भेळंजा . पण हे नांव मात्र फारसे रूढ झालेले नाही . एप्रिल १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला . 

राहण्याची व जेवणाची सोय-

परतण्यास वेळ झाल्यास मुक्कामासाठी तुपेवाडीतील विठ्ठल मंदिर योग्य आहे . इथेच तुमची जेवणाची देखील सोय होईल.


Post a Comment

0 Comments