Ticker

6/recent/ticker-posts

गडावरील पाणी व्यवस्थापन || Water Management on Forts

गडावरील पाणी व्यवस्थापन || Water Management on Forts

Water management on first in marathi

अन्नाशिवाय आपण काही दिवस जगू शकतो परंतु पाण्याशिवाय जगणं अशक्यच! महाराष्ट्रात असलेली मोठी धरणे आणि जलाशय यांच्यामुळे सध्या महाराष्ट्रात पाण्याची उपलब्धता मुबलक आहे. सध्या पाणी तर आपल्याला बाटलीबंद मिळते आहे परंतु काळाच्या थोडं मागे गेलो तर मग आपल्याला हे पाण्याचे महत्व लक्षात येते. 

असंख्य दिवस शत्रूंशी भांडणाऱ्या किल्ल्यांवर पाण्याचे व्यवस्थापन कसे केले जायचे याविषयी आपण माहिती आज जाणून घेणार आहोत. 

पाण्याची व्यवस्था ही युद्धनीतीतील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला हे पाण्याची व्यवस्था करण्याचे महत्व एका युद्धातून समजून येते. आदिलशाही सरदार बहलोलखान 12 हजार फौजेनिशी स्वराज्यावर चालून आला असताना त्याचा तळ हा एखाद्या नदीच्या किंवा जलाशयाच्या शेजारीच टाकला जात असे. कारण इतक्या फौजेला आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर माणसांसोबत घोडे, हत्ती आणि बैल अशा प्राण्यांना देखील पाण्याची सोय व्हावी म्हणून बहलोलखानाचा तळ उमराणी गावाजवळील डोम नदीच्या एका जलाशयाचा बाजूला पडला. मराठ्यांचे सरनौबत प्रतापराव गुजर हे पन्हाळ्याच्या पायथ्याशी तळ ठोकून उभे होते. प्रतापराव वेगाने हालचाली करत फौजेनिशी डोम नदीच्या जलाशयाजवळ आले. याच जलाशयाला मराठ्यांचे चौकी पहारे पडले. बहलोलखानाचे हत्ती जेव्हा पाणी पिण्यासाठी जलाशयाला आले तेव्हा ते मराठ्यांना बघून हबकले. मराठे व बहलोल यांच्या पठाण सैन्यात घनघोर युद्ध झाले. काही काळानंतर बहलोल खानाचे सैन्य तहानेने व्याकुळ झाले. दिवस कडक उन्हाळ्याचे होते आणि त्यांच्याकडे पिण्यासाठी देखील पाणी नव्हते. शेवटी बहलोलखानाकडे पर्याय उरला नाही, त्याने पराभव स्विकारुन प्रतापराव गुजर यांना शरण येणे योग्य समजले. पाण्यामुळे बहलोलखानास मानहानीकारक शरणागती पत्करावी लागली. बहलोल प्रतापरावांना शरण आला. 

युद्धात पाणी विजय आणि पराभव ठरवते याची प्रचिती आपल्याला या प्रसंगातून नक्कीच येते. यावरून हे लक्षात येते की गडावरील पाणी साठा  किल्ल्याच्या अभेद्यतेसाठी खूप महत्वाचा असतो. 

आपण आज्ञापत्र जर बघितले तर त्या आज्ञापत्रात रामचंद्रपंत अमात्य लिहितात की-

गडावरी आधी उदक पाहुनी किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थळ बांधणे अवश्यप्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी टाकी पर्जन्यकाळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरेल ऐसे मजबूत बांधावे. गडावरी झराही आहे, जैसे तैसे पाणी पुरते म्हणून टिटक्यावर निश्चिनती न मानीनता उद्योग करावा.  की निमित्त की जुझामध्ये भांडीयाचे आवाजाखाले झरे स्वल्प होतात आणि पाणीयाचा खर्च विशेष लागतो. तेव्हा संकट पडते. याकरिता तैसे जागा जकेरीयाचे पाणी म्हणून दोन चार तळीटाकी बांधून ठेवून त्यातील पाणी खर्च होय न द्यावे. गडाचे पाणी बहुत जतन करावे. 

यावरून गडाची बांधणी करत असताना पाण्यासाठी काय खबरदारी घेतली जाते सोय कशी केली जाते याचे ज्ञान होते. किल्ल्यावर जरी पाण्याचे झरे असले तरी देखील पूर्णपणे त्याच्या भरोशावर अवलंबून राहिले जात नसे. कारण किल्ल्यावर मोठमोठ्या तोफा असत आणि बऱ्याच वेळा त्यांच्या हादऱ्याने किल्ल्यावर असणारे पाण्याचे झरे बंद होत असत. त्यामुळे फक्त या झऱ्यांवर विसंबून न राहता किल्ला बांधताना दगड फोडून पाण्याच्या टाक्या बांधल्या जात असत. फोडलेला दगड हा किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरला जात असे. म्हणजे येथे एकाच कामात दोन फायदे होत असत. 

आपल्याला भटकंतीची आवड असेल तर आपल्याला किल्ल्यांवर अनेक अशी टाकी बघायला मिळतात. टाक्यांसोबत विहिरी देखील बांधल्या जात. त्यांच्याभोवती बांधकाम करून त्यावर पहारा ठेवला जात असे. पन्हाळा किल्ल्याला कधी जाल तर तिथे असलेली अंधारबाव तुम्ही नक्की बघा. अंधारबाव हा एक उत्कृष्ठ उदाहरण आहे. यात एका दरवाजाच्या बाजूला छोटीशी विहीर देखील आहे. या विहिरीला अजूनही फक्त 3 फुटांवर आपल्याला दिसते. पन्हाळा किल्ल्यावर सोमेश्वर तलाव आहे.  किल्ल्यावर नागझरा म्हणून एक पाण्याचा बारमाही स्रोत देखील आहे. त्यामुळेच पन्हाळा किल्ला जिंकणे इतके सोपे नव्हते. हा किल्ला आत्मनिर्भर आणि अभेद्य असा किल्ला होता.  

याच प्रमाणे शिवनेरी सारख्या किल्ल्यावर आपल्याला बदामी तलाव, कमानी टाके आपल्याला बघायला मिळतात. समुद्राचे पाणी हे खारे पाणी आहे. त्यात अभेद्य आणि अजिंक्य अशा जंजिरा किल्ल्यावर आपल्याला दोन गोलाकार मोठे गोड पाण्याचे तलाव बघायला मिळतात. जंजिरा हा बेटावरील किल्ला आहे. त्याला अजिंक्य राहण्यासाठी अनेक कारणे असतील परंतु त्यातील एक महत्वाचे कारण म्हणजे गडावर असलेले हे पिण्यायोग्य गोड्या पाण्याचे साठे! 

प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला झरे, तलाव, टाकी किंवा विहिरी यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केलेली दिसते. पाण्याशिवाय गड हा अशक्यच! अनेक वीर योद्ध्यांची तहान याच पाणी साठ्यांनी इतिहासात भागविली आहे. आणि याच पाण्याने या वीरांना शत्रूला पाणी पाजण्याची ताकद देखील दिली आहे. 

Post a Comment

0 Comments