Ticker

6/recent/ticker-posts

स्वराज्यद्रोही खंडोजी खोपडे यांना दिलेली शिक्षा || Khandoji Khopade Marathi

स्वराज्यद्रोही खंडोजी खोपडे यांना दिलेली शिक्षा || Khandoji Khopade Marathi

Khandoji khopade marathi

खंडोजी खोपडे हे रोहिडा खोऱ्यातील देशमुख होते. त्यांनी अफजलखान वधाच्या वेळी महाराजांच्या विरोधात तलवार चालवली होती. वधानंतर महाराज हे वेढ्यात अडकले व पुढे जाऊन जेव्हा ते राजगडावर परत आले तेव्हा मात्र त्यांच्या डोक्यात ती गोष्ट होतीच. खंडोजीना चूक कळली होती आणि त्यामुळे त्यांनी त्यांचे जावई हैबतराव शिळीमकर, जे शिवरायांच्या सैन्यात होते त्यांच्याकडे धाव घेतली. हैबतराव तेव्हढे जास्त वजनदार नसल्याने म्हणजे त्यांचा शब्द महाराज ऐकतीलच ही खात्री नसल्याने त्यांनी कान्होजी जेध्यांकडे धाव घेतली. कान्होजींनी महाराजांकडून खंडोजी खोपडे यांच्यासाठी अभयदान मागावून घेतले.

स्वराज्यामध्ये जर एखाद्याने फितुरी केली तर त्याला एकच शिक्षा दिली जात असे आणि ती शिक्षा म्हणजे मृत्युदंड! खंडोजी खोपडे यांनी स्वराज्याशी गद्दारी आणि फितुरी केली होती. त्याच्या चुकीला मृत्युदंड हीच शिक्षा होती. महाराजानी ती शिक्षा फर्मावली देखील असती परंतु कान्होजी जेधे यांच्या शब्दाला पाळत  महाराजांनी त्याला अभयदान दिले होते. परंतु शेवटी खंडोजी खोपडे हा फितुरच... अशा गद्दारांमुळे स्वराज्यावर संकट येते आणि अनेक निष्ठावान मावळे मारले जातात. गद्दारी आणि फितुरी ही मुळापासून नष्ट व्हायला हवी हीच माँसाहेब जिजाऊंची आणि महाराजांची शिकवण होती. 

त्यामुळेच खुद्द महाराजांनी खंडोजी खोपडे यांचा एक पाय आणि एक हात कलम करण्याची आज्ञा दिली. राजा शिवछत्रपती पुस्तकात उजवा हात आणि डावा पाय छाटल्याची नोंद आढळते. महाराजांची आज्ञा पाळत मावळ्यांनी खंडोजी खोपडे यांचा एक हात आणि दुसरा पाय कलम केला.  ज्या हातानी स्वराज्याशी फितुरी केली आणि जे पाय स्वराज्याच्या विरोधात गद्दारी करण्यासाठी पुढे सरसावले ते हात पाय कायमचे छाटले गेले. 

गडाच्या पायथ्याशी असलेल्या कान्होजी जेधे यांना ही बातमी समजली. कान्होजींचा संताप अनावर झाला. राजांनी कान्होजींना शब्द दिला होता की ते खंडोजी खोपडे यांना अभयदान देतील. कान्होजींनी खंडोजींची भेट घेतली व ते थेट राजांकडे गेले. राजांना अगोदर मुजरा करत कान्होजी म्हणाले की राजं, आम्हाला दिलेला शब्द मोडला तुम्ही! यावर राजे शांततेत आणि संयमाने म्हणाले की "कान्होजी काका, तुम्हाला शब्द दिला होता म्हणूनच तर त्या स्वराज्यद्रोही खंडोजीला आम्ही जिवंत सोडले. ज्या हातानी स्वराज्याविरोधी तलवार उचलली आणि जे पाय स्वराज्याशी गद्दारी करण्यास पुढे आले ते फक्त एक पाय आणि एक हात छाटलेत आम्ही! तुम्हाला शब्द दिला नसता तर त्या खंडोजी खोपड्याची गर्दन उडवण्यातच स्वराज्याचे भले होते.  ज्याने स्वराज्याशी गद्दारी केली त्याला फक्त एकच शिक्षा ... ती म्हणजे मृत्युदंड!" 

महाराजांनी केवळ कान्होजी काकांच्या शब्दाचा मान राखून त्या खंडोजी खोपडेला जिवंत सोडले होते. कदाचित अशाच प्रकारे मन मोठे दाखवत जर महाराज फितूर आणि गद्दारांना माफ करत गेले असते तर  स्वराज्य हे फितुरी आणि गद्दारीपोटी राखेला मिळाले असते. तेच पुढे संभाजी महाराजांना अनुभवावे लागले. 

खंडोजी खोपडे सारख्या गद्दाराला शासन केल्यामुळे स्वराज्यात फितुरी करण्याचा विचार देखील आता कोणाच्या मनात येत नसे. कान्होजी हे स्वराज्याचे निष्ठावंत सेवक होते. कान्होजींना महाराजांचा निर्णय पटला. महाराजांच्या मृत्यूनंतर अनेक फितूर झाले ती गोष्ट वेगळी परंतु महाराज हयात होते तोपर्यंत कोणी फितुरी केली नाही आणि ज्यांनी केली त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली. 

Post a Comment

0 Comments