Ticker

6/recent/ticker-posts

जंगली जयगड - Jangali Jaigad

जंगली जयगड - Jangali Jaigad 

सह्याद्री म्हणलं की आपल्याला राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा ही महाराष्ट्र गीतातील ओळ नक्कीच आठवते! आणि या काव्यपंक्ती खऱ्या अर्थाने साध्य करणार किल्ला आज घेऊन आलो आहे. कोयना नदीवर बांधलेल्या कोयना धरणामुळे तयार झालेल्या अथांग अशा शिवसागर जलाशयाच्या निसर्गरम्य प्रदेशात असलेला परंतु भटक्यांपासून वंचित असलेला जंगली जयगड आज तुमच्या समोर आणतो आहे. 

जंगली जयगड - Jangali Jaigad


गडाचे नाव - जंगली जयगड (Jangali Jaygad/ Forest Jaigad)

गडाची उंची - 1029 मी

ठिकाण- नवजा, कोयनानगर

चढाई श्रेणी- मध्यम

तालुका - पाटण

जिल्हा- सातारा

गडावर भेट देण्यासाठी कसे येणार?

गडाला भेट द्यायला येणार असाल तर तुम्हाला सर्वात आधी कराड चिपळूण या मार्गावर असलेल्या कोयनानगर येथे यावे लागेल. जंगली जयगड ला जाण्यासाठी पायथ्याचे गाव म्हणजे नवजा. कोयनानगर येथून सकाळी एक 8 वाजता बस या गावी जाते. नवजा गाव हे शिवसागर जलाशयाच्या काठावर वसलेले विस्तृत असे सुंदर आणि रमणीय असे गाव आहे. नदीचा प्रवाह मागे वळवून त्याला उतारावर नेऊन वीजनिर्मिती करण्याचा शेवटचा प्रयत्न याच गावात झाला. नवजा गावातून साधारणतः दीड ते दोन तासात आपण पायी चालत पंचधारा बोगद्याच्या अलीकडे असणाऱ्या डाव्या हाताला वर जाणाऱ्या पायवाटेजवळ येऊन पोहोचतो.


आपण या पायवाटेने वर चालत गेल्यास एका सपाटीवर येऊन पोहोचतो आणि हे नयनरम्य ठिकाण म्हणजे घोडतळ किंवा घोडेतळ होय. या ठिकाणी इंग्रजांच्या काळात जंगली जयगड ला आल्यानंतर घोडे बांधले जायचे म्हणून याला घोडेतळ असे संबोधले जाते. या ठिकाणी आपल्याला पाण्याचा एक जिवंत झरा देखील बघायला मिळतो. प्राण्यांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून एक रुंदीकरण करून छोटा पाणीसाठा करण्यात आलेला आहे. जंगली जयगडाला येताना हा मधला स्टॉप म्हणून तुम्ही इथे विश्रांती घेऊ शकता. 


महाबळेश्वर येथून उगम पावणाऱ्या पाच नद्या म्हणजे कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री! सह्याद्रीच्या तशा या पाचही नद्या लाडक्याच, परंतु त्यात देखील कोयना ही सह्याद्रीच्या सोबत जास्त बागडत पुढे जाते. कोयना नदी पुढे जाऊन कराड येथे कृष्णा नदीला मिळते. हेच ठिकाण म्हणजे प्रीतिसंगम! कोयना नदीच्या परिसरात असलेला हा जंगली जयगड किल्ला आपल्याला पुढे जात असताना कोयनेचे दर्शन देत राहतो.


जंगली जयगड पक्षी, प्राणी आणि भौगोलिक परिस्थती

जंगली जयगड वसलेला आहे निमसदाहरित वनामध्ये! या वनामध्ये मोठ्या औषधी वनस्पती आणि खुरट्या वनस्पती देखील आहेत. ऐन, अंजनी, वेत, कुंभा, जांभूळ व आंबा ही काही झाडे या भागात आपल्याला आढळतात. हरीण प्रकारात भेकर म्हणजेच बार्किंग डियर, सांबर, बिबट्या, जंगली कुत्रे, गवा आणि भरपूर विविधता असलेले प्राणी देखील आहेत. पक्षी देखील इकडे स्थलांतरित होत असतात आणि काहींचे वास्तव्य इथेच आहे. या जंगलामध्ये अस्वले देखील आहेत परंतु ते शक्यतो दिसत नाहीत.


आपला प्रवास हा गडाकडे जाताना गर्द झाडीमधून असल्याने कदाचित आपल्याला एखाद्या प्राण्यांचे दर्शन देखील होऊन जाईल. जंगलातून जाताना तुम्ही शांतता ठेवली तर कदाचित ते भाग्य तुमच्या नशिबात देखील असेल. आपल्याला पायवाट दाखविण्यासाठी जागोजागी दगड धोंडे रचून त्यातून दिशा दाखवायचे काम देखील वनविभागाने केलेले आहे. 

आपण काही अंतर पुढे चालून गेल्यावर आपल्याला एक गोल ओटा लागतो. या ओट्यावर जाण्यासाठी पायऱ्या देखील आहेत. या पाऱ्यांवर चढून आपण वर जाऊन बघितले तर इथे झेंडा आहे त्यामुळे याला झेंडा बुरुज म्हणून देखील ओळखले जाते. याच्या एका बाजूला कोकणाकडे उतरणारी दरी आहे. आपण गडाच्या जवळ आलो आहोत याची चिन्ह म्हणजे हा बुरुज होय. 

किल्ला बांधणीचे नियम बरेच असतात आणि त्यात असे सांगितलेले असते की किल्ला हा ज्या डोंगरावर असेल त्याला जोडून कोणताही दुसरा डोंगर नसावा किंवा दुसरा शेजारी डोंगर नसावा ज्यावरून किल्ल्यावर मारा केला जाऊ शकतो. आता मुख्य जंगली जयगड हा एका अगदी निमुळत्या शृंखलेने या बुरुजाशी जोडलेला आहे. वाट निमुळती असल्याने आणि दोन्ही बाजूंना तरी असल्याने आपण थोडीशी काळजी घेत इथून पुढे जावे. आपण जिथून गडाकडे बघतो त्या ठिकाणावरून गडावर तोफांचा मारा करणे अगदी सोपे आहे परंतु आपण ज्या ठिकाणावर सध्या आहोत तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जंगलातून येणारा मार्ग हा खूपच खडतर आहे त्यामुळे तोफा तिथपर्यंत आणणे देखील कठीण होते.

आपण त्या निमुळत्या रांगेवरून पुढे आलो की आपल्याला दोन सुळके दिसतात. यातील एक मोठा सुळका हा 25 फूट उंच असावा आणि दुसरा थोडा छोटा असावा. याला लोक दीपमाळ असे म्हणतात. पुढे आपण एका डोंगराला वळसा घालून पुढे आलो की मुख्य गड आपल्या समोर आहे. जंगली जयगड त्या 1967 साली आलेल्या भयंकर भूकंपात मोडकळीस आला. गडाचे मुख्य दरवाजाचे दगड देखील कोसळले. कोयना भूकंप प्रवण क्षेत्राच्या अगदी आत असल्याने किल्ला सतत थोडेफार भूकंपाचे धक्के सहन करतच असतो. गडावर आल्यानंतर आपल्याला जंगली जयगडाचे महत्व समजते. सपाटीवर आपल्याला दगडांपासून बनवलेले दोन चौथरे बघायला मिळतात. 

गडाच्या दुसऱ्या टोकाकडे जायला आपल्याला खूप खडतर मार्ग अवलंबत जावे लागते. पुढे आपल्याला या मार्गावर एक छोटेसे मंदिर लागते आणि आजही हे मंदिर इतके सगळे भूकंपाचे धक्के सहन करत उभे आहे. हे मंदिर आहे गड देवता ठाणाई देवीचे मंदिर! मंदिराच्या समोर एक छोटीशी दीपमाळ आहे आणि तिथे काही दगडी भांडी आहेत. आपल्याला गडावर असे दुर्गावशेष बघून मन नक्कीच समाधानी होते.

पुढे आपल्याला सपाटीवर राजवाड्याच्या चौथऱ्याचे काही अवशेष बघायला मिळतात. राजवाड्याच्या बाजूला एक बांधीव विहीर असावी असे वाटते परंतु आता ती पूर्णपणे बुजलेली आहे. त्या विहिरीत उतरायला पायऱ्या असाव्यात असे वाटते. सर्व काही गडावरील अवशेष बघून आपण गडाच्या पश्चिम टोकाला येऊन थांबतो! इथून वासोटा, मधू मकरंदगड यांचे देखील दर्शन होते. पोफळी घाट देखील आपल्याला इथून बघायला मिळतो. 


जंगली जयगडाचा इतिहास - History of Jangali Jaigad

जंगली जयगडाचा 15 व्या शतकाच्या आधी काही संदर्भ सापडत नाही. चिपळूण मध्ये जेवहा बारागाव कोळ्यांचे राज्य होते तेव्हा त्यांची मुख्य जागा ही पेंडांबे येथील बारवाई चा किल्ला होती. जंगली जयगड हा देखील त्याच्याच परिसरात येणारा एक किल्ला आहे. इथून आपल्याला कुंभार्ली घाटावर लक्ष ठेवता येत असल्याने हा किल्ला एक घाटावरचा किल्ला आहे. हेळवाक ही एक मोठी बाजारपेठ होती त्यामुळे त्याच्या रक्षणासाठी देखील हा चौकी पाहऱ्यासाठी किल्ला असावा. 

जयगड हा समुद्र किनारी असणारा किल्ला प्रसिद्ध आहे. तो सागराचे संरक्षण प्राप्त झालेला किल्ला तर जंगली जयगड हा जंगलाने संरक्षित असा दुर्ग आहे. शिवाजी महाराजांच्या काळात हा किल्ला महाराजांच्याच ताब्यात होता यात काही एक शंका नसावी. परंतु महाराजांच्या मृत्यूनंतर मराठेशाहीला खिंडार पाडण्यासाठी औरंगजेब आल्यानंतर पुढील काळात 1757-58 मध्ये पेशवे काळात खंडोजी मानकर यांनी हा किल्ला पंत प्रतिनिधींकडून जिंकला होता परंतु पंत प्रतिनिधींना हा किल्ला पुन्हा द्यावा लागला. ताई तेलीन ही पंत प्रतिनिधींची आश्रित होती. ताई तेलीन हा संबंध आपण वासोटा किल्ल्यात बघितला होता. 1810 मध्ये बापू गोखले यांनी हा किल्ला जिंकून पेशव्यांकडे दिला.

1818 साली इंग्रज कर्नल हिवेट याने हा किल्ला जिंकून घेतला. या काळात अनेक किल्ले हे इंग्रजांच्या ताब्यात गेले. 

गडावर राहण्याची आणि जेवणाची सोय

गडावर राहण्याची आणि जेवणाची काहीही सोय नाहीये त्यामुळे तुम्हाला नवजा गावात किंवा सरळ कोयनानगर गाठावे लागेल. गडावर जाताना किंवा परतताना आपण घोडेतळ इथे विश्रांती घेऊ शकतो परंतु रात्रीचा मुक्काम इथे होऊ शकत नाही. नवजा गावात तुम्ही लेक साईड कॅम्पिंग चा आनंद देखील घेऊ शकता.

Post a Comment

0 Comments