छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक । 2nd Coronation of Chatrapati Shivaji Maharaj
6 जून इ स 1674, महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा तो दिवस! हा दिवस म्हणजे स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडी छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. शिवराय अवघ्या महाराष्ट्राचे आणि हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले. रायगडी तर जल्लोष झालाच परंतु संपूर्ण महाराष्ट्रात, स्वराज्यात जल्लोष साजरा करण्यात आला. या राज्याभिषेक सोहळ्याचे अनेकांनी वर्णन केलेलं आहे त्यात उल्लेख आढळतात की या राज्याभिषेक सोहळ्याला फक्त महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण जगातून देश विदेशातून मान्यवर मंडळी आलेली होती. एकाच वेळी पाचही सुलतानी सत्ता जुलूम करत असताना त्या सर्वांना तोंड देत महाराजांनी रयतेचे स्वराज्य उभे केले.
हा राज्याभिषेक सर्वांना माहिती आहे परंतु तुम्हाला माहीत आहे का या राज्याभिषेक सोहळ्यानंतर केवळ 3 महिन्यानंतर छत्रपती शिवरायांनी दुसरा राज्याभिषेक केला!
छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक का केला?
6 जून 1674 रोजी गागाभट्ट यांनी केलेल्या अभिषेकानंतर छत्रपती शिवरायांनी दुसरा राज्याभिषेक हा तांत्रिक पद्धतीने अश्विन शुद्ध पंचमी म्हणजेच 24 सप्टेंबर 1674 रोजी केला अशी माहिती समकालीन संस्कृत ग्रंथ शिवराज्याभिषेक कल्पतरू मध्ये मिळते. अनिरुद्ध सरस्वती कवीने हा ग्रंथ लिहिलेला असून त्यामध्ये निश्चलपुरी गोसावी आणि गोविंद या दोन व्यक्तींचा संवाद काव्यरूपात दिलेला आहे. यात उल्लेख आढळतो की गागाभट्टाने केलेल्या अभिषेकामध्ये अनेक चूका झाल्या आणि त्याचे विपरीत परिणाम महाराजांना भोगावे लागले. त्यामध्ये सेनापती प्रतापराव गुजर यांचा मृत्यू झाला. प्रतापगडावर वीज कोसळली. महाराजांची पत्नी काशीबाई यांचा अचानक मृत्यू झाला. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्याभिषेक सोहळ्यानंतर केवळ 12 दिवसांनी माँसाहेब जिजाऊ यांचे देखील निधन झाला. या घटनांचा त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. यावरून असा निष्कर्ष काढता येतो की वैदिक पद्धतीने केलेल्या राज्याभिषेकाविषयी काही समज आणि गैरसमज त्याकाळातील पुरोहितांमध्ये असावेत. विशेषतः तंत्र मार्गाचा पुरस्कार करणारे पुरोहित हे वैदिक विधींपेक्षा तांत्रिक विधींना श्रेष्ठ मानत असावेत. त्यामुळेच त्या पुरोहितांनी महाराजांना तांत्रिक पध्दतिने राज्याभिषेक करण्यासाठी आग्रह केला असावा.
24 सप्टेंबर 1674 रोजी शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक हा तांत्रिक पद्धतीने पार पडला. निश्चलपुरी गोसावी यांनी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक केला. राज्याभिषेकाचा हा समारंभ अतिशय साध्या पद्धतीने पार पडला.
0 Comments