संभाजीराजे शहाजीराजे भोसले : इतिहास, वंशज । Thorale Sambhaji Raje
इतिहासातून अनेक व्यक्तींचा उल्लेख नामशेष होत चाललेला आहे. त्यामुळे अनेक थोर पुरुषांचे आपल्याला इतिहास देखील माहीत होत नाही आणि त्यांच्या वंशजांनी विषय देखिल जास्त माहित नसते. अशीच एक व्यक्ती म्हणजे शहाजीराजे पुत्र थोरले संभाजी राजे यांच्या विषयी चा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या अज्ञात वंशजाविषयी देखील माहिती घेणार आहोत.
मराठ्यांच्या इतिहासामध्ये कमी उल्लेख आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू संभाजी राजे यांचा उल्लेख हा युवराज संभाजी राजे असा होतो. छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती धर्मवीर संभाजी राजे यांच्या वाट्याला तर फक्त तिरस्कार येत होता, सध्या कुठे लोकांना खरे शंभूराजे कळले आहेत. अनेक चांगल्या इतिहासकारांनी धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास हा जगासमोर आणला आहे. अशी बाब मात्र थोरले संभाजी राजे यांच्या विषयी घडलेली नाही. पुरेसा इतिहास आपल्याला त्यांच्याविषयी कुठेच उपलब्ध नाहीये.
शिवकाळातील एक कथा आहे, विजापूरहून फत्तेखान सारखे मातब्बर सरदार हे महाराजांचा पराभव करण्यासाठी निघाले होते. त्या काळात विजापूर दरबारी शहाजीराजे यांना अटक झालेली होती. त्यावेळी महाराजांनी आदिलशाही फौजेला कसे सळो की पळो करून सोडले होते याचा इतिहास सर्वांना माहीत आहेच. त्याच वेळी संभाजी राजांनी विजापूर दरबारातून कर्नाटकावर चालून आलेल्या सरदारांना कापून काढले होते. कर्नाटक मध्ये शहाजीराजे हे एखाद्या राज्याप्रमाणेच रहात होते. महाराष्ट्रातील स्वराज्य हे छत्रपती शिवरायांनी बघावे व कर्नाटकातील राज्य हे संभाजी राजे यांनी बघावे अशी शहाजी राजे यांची इच्छा होती. या काळात अल्पसा असा उल्लेख इतिहासात आपल्याला बघायला मिळतो.
राधा माधव, विलास चमपू आणि 91 कलमी बखरीमध्ये थोरले संभाजी राजे यांचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. संभाजी राजे यांचा जन्म 1623 साली झाला असावा असा अंदाज बांधला जातो. थोरले संभाजीराजे यांचा विवाह हा विजयराव विश्वासराव यांच्या कन्या जयंतीबाई (कदाचित जयवंतीबाई असावे) यांच्याशी झाला होता.
थोरले संभाजी राजे यांचा उल्लेखच इतका कमी आहे तर पुढील पिढीविषयी देखील माहिती जास्त उपलब्ध नाहीये. जेधे शकावली मध्ये आपल्याला संभाजी राजे यांचे पुत्र उमाजी यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1654 मध्ये झाल्याची माहिती सापडते. उमाजी व्यतिरिक्त राजेंना सुरजसिंग आणि मातोजी ही दोन मुले होती, असे उल्लेख इतर साधनांमध्ये भेटतात. मराठी साधनांमध्ये मात्र यांचे उल्लेख आढळत नाहीत. उमाजी यांना बहादूरजी नावाचा एक पुत्र होता, त्यांचा देखील हुकूम उपलब्ध आहे. 12 डिसेंबर 1689 चा हा हुकूम आहे. या हुकुमामध्ये असे लिहिलेले आहे की मालोजीराजे भोसले यांचे फर्जंद शहाजी संभाजी यांचे फर्जंद उमाजी यांचे बहादूरजी! उमाजी यांना विजापूर दरबारी जहागिरी होती. ऐन तिशीच्या सुमारास ते आपल्या तलवारीच्या जोरावर पराक्रम गाजवत असल्याचा पुरावा इसवी सन 1683 च्या एका मजहरा मध्ये मिळतो. 1677 मध्ये त्यांना पुण्याच्या परिसरात एका मोठ्या युद्धात वीरमरण आले होते. नंतर इतिहासकारांनी मकाऊ आणि जयंतीबाई एकच होत्या हा गैरसमज करून घेतलेला दिसतो. परंतु या दोघी सासू सुना होत्या. मकाऊ या उमाजींच्या पत्नी होत्या. थोरल्या संभाजी राजेनंतर कोलार तालुक्यात त्यांच्या पत्नी जयंतीबाई यांनी दान केल्याचा अखेरचा शिलालेख हा 1693 सालचा आहे. म्हणजेच जयंतीबाई 1693 पर्यंत हयात होत्या आणि त्यांनी कर्नाटक मध्ये वास्तव्य केले हे ठामपणे सांगता येते. दुसरी गोष्ट म्हणजे मकाऊ भोसले या इ स 1740 पर्यंत जिंती चा कारभार करताना दिसून येतात. म्हणून या दोघी एक नव्हत्या हे सिद्ध होते. उमाजी पुत्र बहादूरजी यांना पुढे पुत्र नसल्याने मकाऊ यांनी शहाजी राजे यांचे चुलत भाऊ असलेले भंबोरेकर भोसले यांच्या घराण्यातील परसोजी भोसले यांचे पणतू परसोजी भोसले यांनी दत्तक घेतले. यांच्यापासूनच पुढे जिंतीकर भोसले घराण्याचा वंश पुढे वाढला. भोसले घराण्यातील जी पाटीलकीची गावे वंश परंपरागत पुढे चालत आलेली होती त्यापैकीच एक होते जिंती!
थोरल्या संभाजीराजे यांच्या वंशातील जिंतीकर भोसले यांच्या घराण्यात मकाऊ या मोठ्या नावाजलेल्या स्त्री होत्या. बादशाही कागदपत्रात त्यांचा उल्लेख हा मकुबाई पाटलीन जिंतीकर असा येतो.
छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत त्यांनी मकाऊ यांना धनाजी जाधवांच्याकडून एक गाव दिल्याची नोंद त्यांच्या कागदपत्रात आढळते. इतकेच नाही तर पुढे शाहू महाराजांच्या काळात त्यांना आदर होता. मकाऊ या शाहू महाराजांच्या चुलत चुलती लागत होत्या आणि त्याना त्यांच्याबद्दल आदर, स्नेह तर होताच पण शाहू छत्रपतींनी देखील त्यांच्या चुलतीकडून अनेकदा परामर्ष घेतल्याचे शाहू दप्तरातील कागदपत्रांमधून दिसून येते. इ स 1740 पर्यंत शाहू दप्तरात मकाऊचे उल्लेख सापडतात. आजही त्यांच्या आदर्श कारभारामुळे जिंती गावात त्यांना देवीचा मान असून त्यांचा उल्लेख हा मकाई देवी असा केला जातो. ग्रामस्थ त्यांना देवी मानतात आणि दरवर्षी त्यांची यात्रा भरते. पुणे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या जिंती गावामध्ये मकाऊ यांचा 4 बुरुजी चिरेबंदी वाडा हा मोठ्या दिमाखात उभा असून त्यामध्ये थोरल्या संभाजी राजांच्या शाखेचे विद्यमान वंशज राहतात. गावाशेजारीच मकाऊ यांची समाधी आहे. थोरले संभाजी राजे हे अजून काही काळ हयात असते तर मराठ्यांच्या इतिहासाला अजून एक सुवर्णपर्ण नक्कीच लाभले असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्तर दिग्विजय केला असता परंतु दुर्दैव हेच की इतिहासाला जर तरची मर्यादा नसते!
आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची सातारा आणि करवीर गादी माहित आहे, त्याचबरोबर भोसले घराण्याच्या नागपूर, तंजावर आणि अक्कलकोट येथील घराण्यांच्या विषयी माहिती आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू युवराज संभाजी राजे यांचे वंशज हे अज्ञातच होते.
0 Comments