Ticker

6/recent/ticker-posts

किल्ले शिवनेरी । Shivneri Fort

किल्ले शिवनेरी । Shivneri Fort

शिवजन्माने पावन झालेल्या आणि हिंदवी स्वराज्याच्या तळपत्या सूर्याचा प्रारंभ ज्या गडावरून झाला त्या शिवनेरी गडाविषयी आज संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात येणाऱ्या म्हणजेच सध्या शिवजन्मभूमी जुन्नर नावाने ओळखल्या जाणाऱ्या जुन्नर तालुक्यात हा शिवनेरी वसलेला आहे.

Shivneri fort / शिवनेरी

गडाचे नाव - शिवनेरी / Shivneri

समुद्रसपाटीपासून उंची - सुमारे 1200 मीटर

किल्ल्याचा प्रकार - गिरिदुर्ग

चढाईची श्रेणी - मध्यम

ठिकाण - जुन्नर जवळ, जिल्हा पुणे

डोंगररांग - नाणेघाट, सह्याद्री

सध्याची अवस्था- चांगली, डागडुजी चालू आहे.


शिवनेरी किल्ल्यावर कसे जाणार? - How to reach Shivneri Fort.

सुरुवातीला आपल्याला शिवजन्मभूमी जुन्नर येथे यावे लागेल. गडावर जाण्यासाठी 2 मुख्य वाटा आहेत.

साखळीची वाट- 

आपल्याला जुन्नर शहरातून या वाटेने जावे लागेल. स्थानिक लोक तुम्हाला ही साखळीची वाट सहज दाखवून देतील. आपण एक ते दीड तासांमध्ये गडावर सहज पाहोचतो. आपण या वाटेने जाणार असाल तर तुम्हाला वाटेत लेणी देखील बघायला मिळतील.

सात दरवाज्यांची वाट-

जुन्नर शहरातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या डाव्या बाजूने चालत गेल्यास तुम्हाला पुढे गडाच्या पायऱ्या लागतात. हा मार्ग देखील तुम्हाला दीड तासात गडावर घेऊन जातो. याच वाटेला राजमार्गाची वाट म्हणून देखील संबोधतात. पुरातत्व विभागाने शिवनेरी किल्ल्याचा जीर्णोद्धार केला आहे आणि वाटेत वनीकरण करून सुशोभीकरण केलेले आहे. 


आपण आपला प्रवास हा सात दरवाज्याच्या वाटेने करूयात. रस्त्याने पुढे गेल्यावर आपल्याला पहिला दरवाजा लागतो. याला जास्त काही नाव आणि महत्व प्राप्त नाही. थोडेसे पुढे गेल्यावर आपल्याला सर्वात प्रसिद्ध असा गडाचा दुसरा परवानगी दरवाजा लागतो. दरवाजाच्या कमानीवर शरभ शिल्प कोरलेले आहे. 

Shivneri ambarkhana, shivaji devi darwaja

पुढे गेल्यावर आपल्याला हत्ती दरवाजा, नंतर पिर दरवाजा आणि मग शिवाई दरवाजा लागतो. याला शिवाबाई दरवाजा म्हणून देखील संबोधले जाते. दरवाजाला मोठे लोखंडी खिळे असलेला लाकडी दरवाजा आहे. गडाचा हा दरवाजा आजही सुस्थितीत आहे आणि गडावरील सर्वात भव्य असा हाच दरवाजा आहे. इथून पुढे आता गडावर जाणारी एक वाट लागते आणि दुसरी वाट म्हणजेच उजव्या हाताची वाट ही शिवाई मंदिराकडे जाते. 

Shivneri shivai devi temple

शिवाई देवीच्या मंदिराकडून जाणारी वाट ही गडमाथ्याला पोहोचण्यासाठी तशी सोपी आहे. गडदेवता असणाऱ्या शिवाई मातेचे मंदिर हे सुंदर ठेंगण्या नक्षीकाम असलेल्या कमानीने सुरू होते. मंदिरात आपल्याला देवीची अष्टभुजा मूर्ती बघायला मिळते. शेजारीच शेंदूर लावलेला देवीचा सर्वात जुना आणि मुख्य उभट तांदळा आहे. शिवाई देवीचे मंदिर हे डोंगराच्या कपारीत कोरलेले आहे. मंदिराच्या बाहेर भव्य असा सभामंडप बांधलेला आहे. 

गडदेवतेचे दर्शन घेऊन अधिक ऊर्जेने पुढे जायचे. वाटेत आपल्याला आणखी दोन मुख्य दरवाजे लागतात. हे दरवाजे पार केल्यानंतर आपण गडाच्या मुख्य भागात प्रवेश करतो.

गडाचा शेवटचा दरवाजा पार केल्यानंतर आपल्याला डाव्या हातास अंबरखान्याची इमारत लागते. अंबरखान्याची पडझड सध्याच्या काळात झालेली असून थोडेफार अवशेष आता इथे शिल्लक आहेत. शिवरायांच्या काळामध्ये या अंबरखान्याचा वापर धान्य साठवून ठेवण्यासाठी करण्यात येत होता.

अंबरखान्यापासून पुढे पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावर ते गंगा यमुना नावाच्या टाक्या आहेत. या टाक्यांमध्ये बाराही महिने पाणी असते आधीच्या काळामध्ये टाक्यांमधील पाणी पिण्यायोग्य आहे असे म्हणले जायचे, परंतु मध्यंतरी येथे पाण्याचा उपसा होत नसल्याने पाण्याला उन्हाळ्यात हिरवट रंग प्राप्त झालेला होता. गंगा जमुना टाक यांचे वैशिष्ट्य म्हणजे दगडी खांबांवर या टाक्या तोललेल्या आहेत आणि या टाक्यांमध्ये उतरून पाणी पिण्यासाठी आपल्याला पायऱ्या देखील बघायला मिळतात. 

Shivjanmsthan

पाण्याच्या टाक्यांच्या समोरच आपल्याला शिवकुंज नावाची देखणी इमारत बघायला मिळते या वास्तू मध्येच राजमाता जिजाऊ साहेब व बाल शिवराय यांच्या पंच धातूच्या सुंदर मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. हा पुतळा तत्कालीन बांधकाम मंत्री बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते स्थापित करण्यात आल्याचा उल्लेख आपल्याला तिथे एका कोनशिलेत सापडतो. शिवकुंज वास्तूच्या समोरच आपल्याला बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेली मशीद बघायला मिळते. मशिदीच्या छतावरील आकार हा धनुष्यसारखा असला नाही या मशिदीला कमानी मशीद असे नाव पडले आहे.

Kamanimashid

हे सर्व बघून आपण शिवजन्म स्थानाकडे जायचे. इथे आपल्याला खालच्या मजल्यावर शिवरायांचा जन्म झाला होता. इथे महाराजांचा पुतळा आणि जुन्या काळातील पाळणा आहे. महाराजांच्या बाललीला बघितलेल्या या मजल्याला बघून आपण वर जायचे. वरच्या मजल्यावर जाऊन आपल्याला संपूर्ण जुन्नर परिसर न्याहाळता येतो. 

हे सर्व बघून आपण खाली उतरायचे आणि उत्तरेकडील निमुळत्या अशा कडेलोट टोकाकडे जायचे. कडेलोट टोकावरून अपराध्याला शिक्षा देण्यासाठी ढकलून देण्यात येई. इथून एकदा शिक्षा दिल्याची नोंद आपल्याला आढळते ती इतिहास विभागात बघूया.

Badnami talav

गडावर कोरडा पडलेला बदामी तलाव देखील आपल्याला बघायला मिळतो.

शिवनेरी किल्ल्याचा इतिहास

सुरुवातीला जीर्णनगर जुन्नेर आणि मग जुन्नर असा हा जुन्नर गावाच्या नावाचा प्रवास! शकराजा नहपानाची जुन्नर ही राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर आपल्या ताब्यात घेतला. सातवाहन राजांनी जुन्नर येथे सत्ता स्थापन केली कारण नाणेघाट मार्गे जुन्नर कडे व्यापार तसा खूप मोठ्या प्रमाणात होत होता. सत्ता स्थिर झाली आणि सातवाहन राजांनी तिथे लेण्या देखील खोदल्या. 

त्यामुळे काही लोक असे म्हणतात की सातवाहनांनी शिवनेरी किल्ल्याची निर्मिती केली परंतु इसवी सन 1770 ते 1308 या कालावधीमध्ये दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रात यादवांची सत्ता होते. यादवांच्या काळातच शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले असावे. 1443 मध्ये मलिक-उल-तुजार याने यादवांचा पराभव करून शिवनेरी किल्ला स्वतःच्या ताब्यात घेतला. त्याच्या या प्रयत्नाने शिवनेरी किल्ला बहमनी राजवटीत गेला.

1446 मध्ये मलिक महंमद यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे 1470 मध्ये मलिक-उल-तुजार याचा प्रतिनिधी मलिक महंमद याने शिवनेरी किल्ला जिंकून ताब्यात घेतला.

1493 मध्ये निजामशहाने आपली राजधानी अहमदनगरला नेली. 1565 मध्ये सुलतान मूर्तीच्या निजामाने आपला भाऊ कासीम याला शिवनेरीवर नजरकैदेत ठेवले. यानंतर 1595 मध्ये जुन्नर चा परिसर आणि शिवनेरी किल्ला हा मालोजीराजे भोसले यांच्या ताब्यात आला.

इ.स. 1630 मध्ये विजयराव सिधोजी विश्वासराव हे शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार होते. आपल्याला शिव जन्माची कथा तर माहीतच असेल राजमाता जिजाऊ मासाहेबांनी गडावरील शिवाई देवीस "पुत्र झालास तुझेच नाव ठेवीन" असे साकडे घातले होते. शिवाई देवीच्या कृपेने दिनांक 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जन्म राजमाता जिजाऊसाहेबांच्या उदरी झाला. इ.स 1632 मध्ये हा गड जिजाऊ मासाहेबांनी आणि शिवरायांनी सोडला. पुढील काही काळामध्ये इसवी सन 1637 मध्ये हा किल्ला पुन्हा मोगलांच्या ताब्यात गेला. 

पुढील प्रचंड काळ म्हणजे जवळपास इसवी सन 1716 पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आलाच नाही. 1650 मध्ये कोळ्यांनी बंड केले परंतु मोगलांनी ते मोडून काढले. 1673 मध्ये शिवनेरीचा किल्लेदार अजित खान यांच्याकडून महाराजांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न देखील यशस्वी झाला. पुढे 1678 मध्ये शिवरायांनी जुन्नर प्रांत पर्यंत मजल मारली परंतु या मोहिमेत देखील शिवनेरी हाताशी आला नाही.

छत्रपती शाहू महाराजांनी 1716 मध्ये किल्ला ताब्यात आणला. पुढे जाऊन किल्ला हा पेशव्यांच्या काळामध्ये त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आला.

राहण्याची व जेवणाची सोय

गडावर राहण्याची व जेवणाची सोय व्यवस्थित होईल, तुम्ही जुन्नरला राहू शकतात. तिथे तुम्हाला अधिक सोयीचे आहे. जुन्नरला खाण्याची सोय व्यवस्थित होईल.

Post a Comment

0 Comments