किल्ले वासोटा ऊर्फ व्याघ्रगड (Vasota Fort / Vyaghragad)
"डोंगर झाडी मनस्वी, अडचण बहुत ! किल्ला बहुत बांका ! सात कोश, अडीच मास झाडी तोडली तेंव्हा मार्ग जाला."
पेशव्यांचे सेनापती असणाऱ्या बापू गोखले यांच्या ओळी आजही गडावर जाताना आपल्याला आठवतात. जावळीचे जंगल ही संकल्पना आपण प्रतापगड युद्धात ऐकलेली आहेच त्याच जावळीच्या जंगलात वसलेला हा वनदुर्ग, गिरिदुर्ग आणि अभेद्य दुर्ग!
प्रचंड नजर जाईल तिथपर्यन्त पसरलेला अथांग शिवसागर जलाशयाचा फुगवटा पायथ्याला लागून, जावळीचे घनदाट जंगल, दिवसाही सहसा जमिनीवर सूर्यकिरण न पडणारे अरण्य आणि त्यावर राज्य करणारे त्या वनाचे खरे मालक वाघ, बिबटे आणि त्यांचे मित्र परिवार! हा एकाच बाजूचा भाग दुसरी बाजू तर सरळसोट कोकणात उतरणार तीव्र ताशीव कडा, समोरच असलेला जुना वासोटा आणि उत्तरेला असलेली नागेश्वर गुहा.. हे सर्व म्हणजे निसर्गप्रेमी, दुर्गवेडे आणि ट्रेकर्स साठी पर्वणीच!
किल्ल्याचे नाव- वासोटा ऊर्फ व्याघ्रगड (VASOTA / Vyaghragad)
समुद्रसपाटीपासून उंची- 4267 फूट
किल्ल्याचा प्रकार- वनदुर्ग आणि गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी- मध्यम
ठिकाण- बामणोलीच्या पुढे शिवसागर जलाशय ओलांडून
जिल्हा- सातारा
सध्याची अवस्था- ठीक
किल्ल्याला भेट द्यायला कसे जाल?
वासोटा किल्ल्याला भेट देण्यासाठी 2 वाटा आहेत. यातील एक वाट खूपच बिकट आहे.
1) चोरवणे मार्गे-
कोकणातून चिपळूण मार्गे चोरवणे या गावापर्यंत गाडीवाट आहे. महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या गाड्या इथे येतात. इथून पुढे खडतर प्रवास करत नागेश्वर सुळका गाठून तिथून पुन्हा नागेश्वर फाटा आणि मग वासोटा हा मोठा ट्रेक होतो. सध्या मुक्कामाला बंदी असल्याने ही वाट अशक्य आहे.
2) शिवसागर जलाशय ओलांडून-
साताऱ्याहून शिवसागर जलाशय ओलांडणाऱ्या बामणोली गावात यायचे. इथे असलेल्या धक्क्यावरुन आपल्याला बोटी मिळतात त्या भाड्याने करून आपल्याला वासोट्याचा पायथा गाठायचा असतो. शिवसागरात फुगवटा किती आहे यानुसार 50 मिनिट ते कधी दीड तासाचाही प्रवास होऊ शकतो. मग आपली ट्रेक जंगलातुन वासोट्याच्या दिशेने सुरू होते.
किल्ल्यावर जाताना घ्यावयाची काळजी-
वासोटा किल्ल्यावर जाताना आपल्याला घनदाट जंगलातून जावे लागते, त्यामुळे खाण्याच्या गोष्टी सोबत घेऊन जाव्या लागतील. पाण्याची टाकी गडावर असली तरी देखील पाण्याच्या बाटल्या सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे. गडावर जाताना सोबत एखादे ओळखपत्र असू द्यावे कारण ते वनविभागाच्या चौकीवर विचारले जाऊ शकते.
गडावर ड्रोन कॅमेरा आणि प्लॅस्टिकला परवानगी नाहीये त्यामुळे शक्य तेव्हडे कमी प्लास्टिक वर न्यावे आणि येताना ते पुन्हा जबाबदारी ने घेऊन यावे.
किल्ल्याला भेट द्यायची वेळ-
वासोटा म्हणजेच व्याघ्रगड हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत वन क्षेत्रात आहे त्यामुळे दिवसभरच तुम्ही इथे जाऊ शकता.
अनेक अख्यायिका असणाऱ्या या गडाचा काही संदर्भ ज्ञानेश्वरी मध्ये देखील आढळतो. ज्ञानेश्वरी मध्ये वसवटा हा उल्लेख आलेला आहे. याचाच पुढे वासोटा झाला असावा! असो.
आपली सफर ही बामणोली येथे येऊन सुरू होते. रात्री बामणोली येथे तुम्ही कोयनेच्या किनारी टेंट टाकून कॅम्पिंग करू शकता. इथे बोट वाल्यांची काही घरे आहे ते जेवणाची वैगेरे व्यवस्था करतात. इथून सकाळी आपण लॉनचेस पकड्याच्या आणि आपला शिवसागर ओलांडण्याचा प्रवास सुरू करायचा. जवळपास हा 50 मिनिट पासून ते कधी कधी दीड तासाचा प्रवास... त्यामुळे सकाळी शक्य तितके लवकर आवरून निघायचे.
बोटीवाले आपल्याला पायथ्याला सोडतात आणि एखादा बोटीवाला आपल्यासोबत गड दाखवायला देखील येतो. सुरुवातीला आपल्याला एक मळलेली पायवाट वनविभागाच्या चौकी पर्यंत घेऊन जाते. इथे आपल्याला काही त्यांचे चार्जेस देऊन आणि आपले नाव, आपल्याकडील प्लास्टिकची नोंदणी करून पुढचा प्रवास सुरू करायचा आहे.
काही अंतर चालून गेले की आपल्याला मारुती आणि गणपती मंदिर दिसते. इथे दर्शन घेऊन आपण सुरुवात करायची आपल्या पुढच्या ट्रेकला... इथे एक निखळ वाहणारा शांत ओढा आहे. या ओढ्यातील पाणी हे पिण्यायोग्य आहे. आपल्या बाटल्या इथून भरून घ्यायच्या. हे पाणी म्हणजे थकवा घालवणारे ग्लुकोजच आहे. आपण मळलेल्या पायवाटेने पुढे जात असताना आपल्याला पायवाट सोडता बाजूला किर्रर्र घनदाट जंगल आणि प्राण्यांचे आवाज येत असतात. अनेक हिंस्र प्राणी या जंगलात असल्याने शक्यतो आवाज न करता जाणे योग्य असते. आणि गडावर समूहाने जावे ही अट वनविभाग देखील घालते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प असल्याने इथे वाघ, बिबट, तरस, अस्वल, रानगवे यांचे अस्तित्व आहे. याशिवाय इतर पक्षी आणि सरपटणारे वन्य जीव देखिल बघायला मिळतील.
आपण जिथून जातोय ते गाव म्हणजे मेटइंदवली होय. आपल्याला ऐतिहासिक काही वास्तू झाडांच्या गर्दीत बघायला मिळतात.
पुढे आपण एका फाट्यावर येऊन पोहोचतो तिथे नागेश्वर फाटा असे नाव दिलेले आहे. इथून उजव्या हाताला जाणारा मार्ग हा नागेश्वर गुहा आणि सुळक्याच्या दिशेला घेऊन जातो. हा ट्रेक देखील जवळपास 2 तासाचा आहे. त्यामुळे एका दिवसात दोन्ही ट्रेक होऊ शकणार नाहीत. नागेश्वर ट्रेक विषयी तुम्हाला इथे माहिती मिळेल.
आपण सरळ चढण असलेली वाट आता सुरू करायची. काही वेळात आपण निसर्गाचा आनंद घेत कारव्यांच्या गर्दीतून गडाच्या पायऱ्यांच्या जवळ येऊन पोहोचतो. पुढे आपल्याला गडाचे भग्न असे प्रवेशद्वार लागते. यातून आपण डावीकडच्या बाजूने पुढे जातो. तिथे आपल्याला पाण्याची टाके लागते, हे टाके एका भिंतीच्या सहाय्याने विभागले गेले आहे. या टाक्यांमधील पाणी आपल्या मनुष्याचा संपर्क कमी असल्याने खुप शुद्ध आणि पिण्यायोग्य आहे. पुढे जाऊन आपण दक्षिण टोकाकडे पोहोचतो. दक्षिण टोकापासून आपल्याला जुना वासोटा रौद्र भासतो. येथील बांबू कडा अथवा बाबू कडा नावाने प्रसिद्ध कडा बघितला की आपल्याला हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याची आणि साल्हेर च्या शैलकड्याची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.
इथे आपण कड्यामुळे जोरदार वाऱ्यांचा आनंद घेऊन पुन्हा टाक्यांकडे माघारी यायचे. पाणी संपले असेल तर ते पुन्हा भरून घ्यायचे.
इथून आपण उत्तर दिशेला निघायचे. जाताना वाटेत आपल्याला मारुतीचे मंदिर लागते. मंदिराच्या पायऱ्या आणि कमान सुरक्षित असली तरी देखील मंदिराला छत नाहीये. आपल्याला काही अंतरावर भव्य वाड्याचे काही अवशेष बघायला मिळतात. भवानी देवीचं मंदिर इथे आहे असे म्हणतात परंतु आता त्या मंदिरात महादेवाची पिंड असल्याने त्याला महादेव मंदिरच म्हणले जाते. पुढे आपल्याला उत्तर माची दिसते. तिथे जाऊ शकता परंतु तिथे जास्त काही अवशेष नाहीत. आपल्याला भवानी मंदिरापासून नागेश्वर सुळका दिसतो. पहिला दिसतो तो नाही त्याच्या पलीकडे असणारा आहे नागेश्वर सुळका. तुम्हाला जो मध्ये पहिला दिसतोय त्याला तुळशीवृंदावन किंवा ठेंगा म्हणून संबोधले जाते.
आपण हे सर्व आटपून आपली परतीचा प्रवास सुरू करायचा. आपण हाडाचे ट्रेकर असाल आणि पूर्ण ग्रुप तसा असेल तर नागेश्वर ट्रेक देखील शक्य आहे परंतु त्यात दिवस मावळणार नाही ना याची काळजी घ्यावी. पुन्हा वनविभागाला आपल्या प्लास्टिकची संख्या देऊन तुम्ही बोटीने परत बामणोलीला पोहोचायचे.
वासोटा किल्ल्याचा इतिहास-
वासोटा किल्ला बांधण्याचे श्रेय शिलाहार वंशीय राजा दुसऱ्या भोजला जाते. त्याने गडावर तट चढवून गडाची निर्मिती केली असे सांगतात. काही दिवसाने शिर्के आणि मोरे यांच्याकडे या गडाचा ताबा गेला होता. महाराजांनी प्रयत्न करून किल्ला ताब्यात आला नव्हता. महाराज सिद्धीच्या वेढ्यात असताना बांदलांनी अविश्वसनीय कामगिरी करत किल्ला ताब्यात घेतला. तो दिवस होता 6 जून 1660, किल्ले वासोटा स्वराज्यात दाखल झाला. महाराजांनी गड हा वाघासारखा रक्षक असल्याने गडाचे नामकरण हे व्याघ्रगड असे केले.
राजापुर प्रकरणात पकडल्या गेलेल्या रोव्हिंगटन आणि त्याच्या साथीदारांना याच वासोट्याच्या किल्ल्यात बंदी बनवून ठेवले होते. स्वराज्याच्या काळात या किल्ल्याचा उपयोग हा कारागृह म्हणून केला जात असे. कोकणात मोहिमेवर असताना महाराजांना अरबस्थानामधील चाचे महिलांना देत असलेल्या त्रासाविषयी कळले, त्यांनी त्या सर्व चाच्यांना बंदी करून व्याघ्रगड वर कैदेत ठेवले आणि त्यांचा चांगलाच मराठमोळा पाहुणचार केला असे सांगितले जाते. महाराजाना गडावर 27 सप्टेंबर 1679 रोजी 4 धनाची हंडे सापडले असा इतिहासात उल्लेख आहे.
१७०० मध्ये औरंगजेबाने सज्जनगडाला वेढा दिल्यानंतर प्रतिनिधींनी सर्व मौल्यवान मुर्त्या आणि वस्तू वासोट्यावर आणून ठेवल्या असे सांगितले जाते.
1730 मध्ये औंधचे प्रतिनिधी आणि पेशवे यांच्यात वाद झाला. पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनि पंत प्रतिनिधींचा पराभव केला. आपल्या धन्याचा पराभव सहन न झाल्याने ताई तेलीनीने वासोटा किल्ल्यावर जाऊन पेशव्याच्या विरोधात बंड केले. बापू गोखल्यांच्या ओळी आपण सुरुवातीला पाहिल्यात, त्या ओळी याच प्रसंगाच्या विषयी आहेत. जवळपास 8 ते 10 महिने झुंज देऊन गोखल्यानी हा किल्ला ताब्यात मिळवला.
इंग्रज मराठे युद्धात 6 मार्च 1818 रोजी एल्फिस्टन या इंग्रज अधिकाऱ्याने वासोटा किल्ला जिंकला.
राहण्याची व जेवणाची सोय-
किल्ले वासोटा हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग असल्याने आणि मागे काही काळात पर्यटकांच्या धुडगूस , दंग्यामुळे वासोटा किल्ल्यावर मूक्कामाला परवानगी नाही. बामणोली गावात तुम्ही टेंट घेऊन राहू शकता. तिथेच जेवणाची व्यवस्था होते.
0 Comments