Ticker

6/recent/ticker-posts

नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे (Tanhaji Malusare)

नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे (Tanhaji Malusare)

नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे (Tanhaji Malusare)


नरवीर तानाजी मालुसरे म्हणजे सिंहगडावर वीर मरण आलेला नरवीर योद्धा! मराठा स्वराज्याचा ज्वलंत आणि जिवंत इतिहास आजही आपल्याला प्रेरणा देत असतो. मराठ्यांच्या या इतिहासातील एक महत्वाचे पान म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे! स्वराज्याचा इतिहास हा रक्तरंजित आणि अंगावर शाहारे आणणारा आहे आणि तो घडलाय या बलिदान देणाऱ्या मावळ्यांच्या रक्ताच्या जोरावरच...


तान्हाजी मालुसरे यांचा जन्म कुठे झाला याबाबत साशंकता आहे परंतु सध्या मिळालेल्या सबळ पुराव्यांच्या आधारे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात वसलेल्या गोडोली येथे झाल्याचे समजते. तसे अगोदर देखील हेच गाव त्यांचे मूळ गाव असे सांगितले जायचे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर जवळ असलेले उमरठ या गावी देखील तान्हाजींच्या जन्म झाला असे सांगितले जाते. 

तुम्ही म्हणत असाल की तानाजी म्हणायचे सोडून तान्हाजी असा उल्लेख इथे का केला जातोय? तर मालुसरे कुटुंबाचे दैवत म्हणजे तान्हाई देवी, याच देवीच्या नवसाला झालेला पुत्र म्हणून नाव तान्हाजी! 

तानाजी हे महाराजांच्या लहानपणीच्या सवंगडयांपैकी एक होते. अफजलखान वधाच्या वेळी महाराजांनी प्रत्येक मावळ्याला काही हजारांची फौज घेऊन अफजलखानाच्या फौजेवर हल्ला करण्यासाठी दिले होते. या मोहिमेत देखील तान्हाजीनी खूप महत्वाची भूमिका बजावली होती. 

महाराजांच्या दक्षिण कोकण मोहिमेत श्रुंगारपूर जिंकल्यानंतर तिथे तान्हाजी व पिराजी यांना ठेवले. रात्री अचानक स्वराज्याच्या फौजेवर सुर्व्यांनी हल्ला केला. महाराजांना याची कल्पना होतीच म्हणून त्यांनी तान्हाजी आणि पिराजी या दोन विश्वासू मावळ्यांना तिथे ठेवले होते. तान्हाजी आणि पिराजी दोघांनी पराक्रम गाजवत सुर्व्यांचा पराभव केला.


आधी लगीन कोंढण्याचं

छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या नजर कैदेतून सुटून आल्यानंतर त्यांनी पुरंदरच्या तहात गमावलेल्या किल्ल्यांना पुन्हा मिळवण्याची तयारी सुरू केली. यातील सर्वात महत्वाच्या मुघलांच्या घशात गेलेल्या किल्ल्यांपैकी दोन किल्ले म्हणजे पुरंदर आणि कोंढाणा! दख्खनची शान म्हणजे कोंढाणा! मुघलांनी देखील या किल्ल्याला तितकेच महत्व दिलेले होते. महाराज कोंढाणा घ्यायचा हा विचार करत असताना तान्हाजी आपला मुलगा रायबाच्या लग्नाची पत्रिका घेऊन आले. तान्हाजींच्या सोबत त्यांचे बंधू सूर्याजी देखील होते.

महाराजांना त्यांनी रायबाच्या लग्नाला यायचे आमंत्रण दिले. परंतु महाराजांनी मोहिमेत अडकलो असल्याचे सांगितले व शक्य झाल्यास येऊ असेही वचन दिले. महाराजांचे मावळे म्हणजे निष्ठावंत... तान्हाजी कसे मागे असणार. महाराज स्वतः मोहिमेवर जाणार किंवा इतर कोणाला तरी ही मोहीम देणार यापेक्षा तान्हाजींनी मोहिमेची जबाबदारी स्वतःकडे घेतली. 

"आधी लगीन कोंढण्याचं आणि मग रायबाचं", हे उद्गार तान्हाजींच्या मुखातून बाहेर निघाले. मोहिमेची तयारी सुरू झाली. कोंढाणा म्हणजे अभेद्य किल्ला, त्याची सुरक्षा भेदून जाणे म्हणजे अशक्य! गडागर किल्लेदार होता रजपूत सरदार उदयभान... गडावर कडेकोट जागते पहारे, जवळपास 1500 हुन जास्त हशम... बरेच रजपूत सरदार आणि नैसर्गिक सुरक्षा तर वेगळीच! गडावर जाण्यासाठी मात्र 2 दरवाजे, कल्याण दरवाजा आणि दुसरा पुणे दरवाजा. यातील आणखी एक मार्ग म्हणजे द्रोणागिरी कडा... कडा अगदी सरळ ताशीव, कोणीही तिथून येऊ शकणार नाही म्हणून तिथे पहारेकरी कमी. तान्हाजींनी हाच कडा निवडला. 

इतिहासात यशवंती घोरपडीचा उल्लेख आढळतो तर काही ठिकाणी घोरपडे बंधू चढून गेले असे सांगितले जाते. सभासद बखर सांगते की मराठे वानरासारखे कडा चढून गेले. इतिहासात ताळमेळ नसला तरी मराठे हा कडा कसा चढून गेले असतील हा आश्चर्याचा विषय आहे. तान्हाजी आपल्या सोबत 300 मावळे घेऊन कडा चढून वर आले. सूर्याजी आणि शेलार मामा बाकी मावळ्यांनीशी कल्याण दरवाजाच्या बाहेर वाट बघत होते. मुघलांना कळायच्या आत मराठ्यांनी हल्ला केला, काही मावळ्यांनी कल्याण दरवाजा आतून जाऊन उघडला. 

तान्हाजींनी सरळ उदयभान शी लढायला सुरुवात केली. तो देखील रजपूत सरदार होता. तुंबळ युद्ध सुरू झाले. दोघांचेही शरीर घावानी आणि रक्ताने भरले होते. इतक्यात घात झाला, तान्हाजींची ढाल तुटली. तान्हाजींनी डोक्यावरील शिरस्थानाला हाताला गुंढाळून त्याची ढाल केली. अखेर दोघेही खूप जास्त जखमी झाले होते. उदयभानाने दगा करत तान्हाजींवर वार केला. तान्हाजी कोसळले. 

मावळे लढत होते. अखेर सूर्याजी आणि शेलार मामा यांनी मावळ्यांच्या मदतीने गडावरील सर्व सैन्य कापून काढले. इतिहासात उदयभानला शेलार मामांनी मारले की सूर्याजी यांनी यात संभ्रम आहे. परंतु अखेरीस गड आला....

गडावर गवताच्या गंजी पेटवल्या गेल्या... रायगडावर वार्ता पोहोचली. महाराजांना कळताच महाराजांच्या तोंडून उदगार निघाले, " गड आला पण सिंह गेला"

संपूर्ण स्वराज्यावर कोंढाणा जिंकला असला तरी नरवीर तान्हाजी मालुसरे पडल्याने शोककळा पसरली. तान्हाजींचे पार्थिव हे ज्या मार्गाने उमरठ ला नेण्यात आले त्या मार्गाला मढेघाट नाव पडले. 

स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या या नरवीराची आठवण म्हणून कोंढाणा किल्ल्याला सिंहगड नाव देण्यात आले. महाराजांनी स्वतः जाऊन रायबाचा विवाह पार पाडला. पुढे जाऊन चंदगड तालुक्यातील पारगड किल्ल्याची किल्लेदारी रायबाला देण्यात आली.

सिंहगड किल्ल्यावर तान्हाजी मालुसरे यांची वीरगळ आणि मूर्ती समाधी आपल्याला बघायला मिळते. सध्या गडावर तिथे मेघडंबरी बांधलेली आहे. 

याशिवाय तान्हाजींची आठवण म्हणून उमरठ आणि गोडोली येथेही स्फूर्तिस्थळ बांधण्यात आलेले आहेत. 

स्वराज्याचे शिलेदार, निष्ठावंत मावळे, नरवीर योद्धे तान्हाजी मालुसरे यांच्या कार्याला आमचा मानाचा मुजरा!


Post a Comment

0 Comments