Ticker

6/recent/ticker-posts

संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार कसे झाले?- गोविंद/गणपत महार चे कार्य

संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार कसे झाले?- गोविंद/गणपत महार चे कार्य


११
मार्च १६८९, दिवस हा मराठ्यांच्या साठी काळाने झडप घालणारा होता! अखेरीस या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा वनवास संपला होता. असंख्य दिवस असंख्य यातना सहन करणाऱ्या शंभूराजांना औरंगजेब बादशहा ने वढू- तुळापुर येथे ठार मारले.

महाराजांवर अतोनात अत्याचार घडले होते, आधी महाराजांचे डोळे काढले होते, जीभ छाटली होती, संपूर्ण शरीराचा एक-एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरून इंद्रायणी भीमेच्या काठावर फेकून देण्यात आले. ज्या भीमा इंद्रायणी ने शंभू राजांचे शौर्य आणि पराक्रम पाहिला होता, तीच इंद्रायणी भीमा शंभू राजांचा विखुरलेला देह पहात होती. शंभूराजांच्या रक्ताने लाल झालेले त्या इंद्रायणी भीमेच्या काठावरचे पाणी सुद्धा हे शंभूराजांच्या रक्ताने माखलेले ते हाडामासाचे तुकडे बघून थरकापत होते. 

संध्याकाळ होत आली होती, परंतु शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्याजवळ जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती. कोणी जर शंभू राजांच्या शरीराला हात जरी लावला तरी त्याचे देखील तेच हाल होतील, असा आदेश औरंगजेबाने दिला होता. औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूच्या वाड्या-पाड्यांवरील माणसे त्या इंद्रायणी भीमेच्या काठावर जायला देखील घाबरत होती. अखेर पहाट झाली, रात्रीचा काळाकुटट अंधार आता नाहीसा होत होता, तांबड फुटू लागलं होत, झाडांची सळसळ एकू येत होती, पक्षी आभाळात भिरभिरू लागले होते. भल्या पहाटे जनाबाई परटीन धुनी धुण्यासाठी नदीकाठावर आली. कपडे धूत असताना तिला ते रक्तमासाचे तुकडे काठावर दिसले, कोणीतरी सांगितले आपल्या शिवाजी महाराजांचा मुलगा शंभू राजांना ठार मारून औरंगजेबाने त्यांच्या शरीराचे तुकडे इथे फेकलेत. ते रक्तमासाचे तुकडे पाहून धावत जनाबाई गावात आल्या, शंभू राजांना ठार मारल्याची बातमी आता आजूबाजूला वाऱ्यासारखी पसरत होती. गावाचे पाटील असणारे दामाजी पाटील कोरेगावाहून गावात परतले. बघता बघता त्यांच्या भोवती माणसे गोळा झाली. शंभूराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण गाव गोळा झाला. सगळ्यांचे चेहरे उदासवाणे होते, अनेकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या.

याच गर्दीतून पुढे येत गोरखनाथ बोलला, ''बाकी काही नाही आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे रक्तमास आपल्या गाव शिवाराच्या बाजूला पडावं आन आपण मात्र गप्प बसलोय याच दुःख वाटतंय.'' " खर हाय तुमचं", मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद लांबूनच म्हणाला. "शिवाजी राजांनी आपल्या लेकरा बाळांवर या मुलखावर काय कमी उपकार केलेत होय? आज त्यांच्या लेकराचा आतडी कोथळा आपल्या गावशिवाराच्या जवळ पडावा आन आम्ही मात्र मुग गिळून गप्प बसावे हे नाही बरे वाटत बघा."

इतक्यात दामाजी पाटील बोलले " मंडळी तुमच्या पेक्षा शंभूराजांसाठी माझे काळीज जास्त तुटतय, पण गावाच्या भवताली चार-पाच लाख फौजेचा तळ पडलाय. बादशहाची लई दांडगी हाय! त्यान त्या रक्तमासाला कोणी शिवू नका असं फर्मान काढलंय." "खरंय पाटील, आज दिवसभर दहा गावातल फारस माणूस बाहेर पडलेलं दिसत नाही. उगाच बादशाहची कळ नको काढायला. पंचक्रोशितली बाकीची सारी गावं गप गार पडल्यात, आपणच कशाला घोड्यावर बसायचं?"

आता रात्र होत आली होती, गावपाटलान निकाला दिलेला होता. गावकरी आपापल्या घराकडे परतले होते. भाकर तुकडा खून अंथरुणावर पडायची तयारी करू लागले. पण जना परटीन मोठी जिद्दी बाई होती, ती थेट राधाई पाटलीनीच्या वाड्यावर गेली. तिने आजूबाजूच्या आया-बायांना गोळा केले. शिवाजी राजे आणि संभाजी राजांविषयी आधी गोष्टी निघाल्या, त्या आठवणीने साऱ्यांची काळीज हेलावली होती. रात्र बरीच वाढली होती तरीही कोणीही तिथून हलायला तयार नव्हत.मंदिरातल्या गोरखनाथ बुआला पाटलीनीने बोलावून घेतले. तेव्हड्यात या साऱ्या प्रकाराने बेचैन झालेला गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला, आपल्या हातातील काठी खाली ठेवत दूरवर बसला. आता जनाबाई बोलू लागली, "आम्ही असच उठून गेलो आणि शंभूराजांचे मास गोळाकरून आणले जर त्याला अग्नी दिला तर बादशहा करून करून काय करेल? गाव जाळील इतकंच ना?"

जनाबाई च्या बोलण्याने राधाबाई पेटून उठली. त्यातच गोरखनाथ बोलले, " आपल्या रितीरिवाजाप्रमाणे गावात चावडी नाहीतर नदीजवळ कधीही कोणा बेवारस मानसाच प्रेत आढळलं तर ते प्रेत उचलावं, त्याच्यावर अग्निसंस्कार करून मनुष्य देहाला मुक्ती द्यावी असं शास्त्र पुराण सांगत." गोविंद म्हणतो, " इथे शिवाजी राजाच्या लेकराच तूकड तूकड बेवारश्या सारखं नदीकाठी पडलंय आणि आम्ही सारे नामर्द बांगड्या भरून गप."

आता मात्र साऱ्या स्त्रिया पेटून उठल्या, चला नदीकाठी चला असा एकच आरोळा उठला! बाहेर गच्च काळोख पण साऱ्या लेकीबाळी पदर खोचत एकच निर्धाराने तयार झाल्या. वाड्यातील हा गलका दामाजी पाटलाच्या कानावर गेला, आत झोपलेला पाटील गडबडीने बाहेर आला. "कारभारनी काय हा पोरकट पणा लावलाय? बादशहा ने गावावरून गाढवाचा नांगर फिरवला म्हणजे कळल तुम्हाला"

"कारभारी, शिवाजी महाराजांच्या लेकराच मास घारी गिधाडांना देण्यापरीस आपण आणलेले काय वाईट, असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला? सांभाळा तुमचा गाव आणि घर! निघालो आम्ही" राधाई पाटलीन तरातरा वाड्यातून बाहेर पडली. तिच्या बरोबर जना परटीन आणि वढू गावातील समग्र स्त्रीशक्ती झपाट्याने बाहेर पडली. नदीच्या दिशेने त्यांची पावले पडू लागली. हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे होता.एकदाचा नदी काठ आला, आसमंतात काळा अंधार होता, त्यात बादशहाच्या फौजेची बीती होतीच. सगळ्या आया-बायांनी सहज वळून एकदा पाठीमागे बघितले, तर गावातील सगळी मंडळी त्यांच्या पाठोपाठ धावतच नदी किनारी येत होती. त्यांच्या सोबत दामाजी पाटीलहि होते. मध्यरात्र असल्याने औरंगजेबाचे सर्व सैन्य त्याच्या छावणीत ढाराढूर झोपलेले होते. गावकरी दबकत दबकत पुढे आले. त्यांनी कुडाचा चुला पेटवला, त्याच्या फुटफुटत्या प्रकाशात नदीकाठी शोधाशोध चालू झाली. शंभूराजांचे कान, पाय, हाताचा तुकडा असे एक-एक अवयव सापडू लागले. गावकऱ्यांनी डोक्याचे पागोटे, नेसूची धोतर सोडली, त्यामध्ये मांसाचे मिळतील ते तुकडे गोळा केले.

त्या काळ्याकुट्ट अंधारातच गावकरी गावाकडे परतले. काहींनी आपापल्या घराकडे धाव घेतली. कोणी शेणकुट आणले, कोणी लाकूडफाटा आणला. दहनाची सगळी तयारी झाली. समोर पेच निर्माण झाला चिता रचायची कोणाच्या जागेत? दामाजी पाटील आता आपल्या सर्व जमिनीवर पाणी सोडायला तयार होते. त्यांचा जमीन जुमला हा तिथून कोसभर अंतरावर, शिवाय तिथून बादशहाचा तळही अगदी जवळच! बाकीचे जमीनमालक घाबरले, उद्या बादशहाचे सैनिक आले आणि जमिनीचे मालक कोण म्हणून आपलाच गळा कापला तर? संपूर्ण गाव कुजबुजत होता. शेवटी गर्दीच्या कोपरयात उभा असलेला गोविंद पुढे धावला, गावशिवारा जवळील त्याची जमीन दाखवत म्हणाला, "या इकड, हि आम्हा महारांची वतनी जमीन. इथं आमच्या जमिनीत द्या अग्नी शंभूराजांना. समजा उद्या बादशहाचे संकट आलचं तर कुढ बी निघून जाऊ. आम्हा गरिबांच्या ताटलीत हात घालून घुगऱ्या खाणारा राजा हाय माझा शंभूराजा. कस विसरू आम्ही." तिथे गोविंदच्या जागेत सरण रचलं गेलं. बादशाहची फौज कधीही अचानक गावात येऊ शकत होती. दामाजी पाटलान गावातील तरण्याबांड पोरांना गावशिवारात उभे राहून लक्ष ठेवायला सांगितले. अचानक वैऱ्याची घोडी धावत आली तर त्यांना वेशीबाहेरच आडवा, गोफानितल्या दगडाने लोळवा एकेकाला. प्राण गेला तरी चालेल परंतु अग्निसंस्कारात अडथळा येऊ देऊ नका, असे दामाजी पाटलाने पोरांना बजावून सांगितले. गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिली. अखेर शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला.

आग धडधडा पेटू लागली, आगीच्या ज्वाळा काळ्या अंधारात वर आसमंतात गेल्या. गावकऱ्यांना हुंदका फुटला होता. आया-बाया तर जोरजोरात रडत होत्या. पोऱ्ह तर धाय मोकलून रडत होती. पुरुष मंडळी देखील गुरासारखे हंबरडा फोडत होते. अरे रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठ आलास पाखरा!

त्या शोकाला अंत नव्हता लोकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या.पहाट होण्याआधीच राजांची चिता विझवली गेली.राजांची गरम रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमेच्या काठाकडे धावला. तांबड फुटायच्या आत ती रक्षा नदीत अर्पण केली गेली.आता उजाडू लागलं होत. पाखरे जागी होऊ लागली होती. नदीकाठावर जमलेला तो वढू गाव एकमेकांकडे अभिमानाने बघत होता. एक महान कार्य आपल्या हातून घडल्याचे समाधान साऱ्यांच्या चेहऱ्यावर होते.

संदर्भ- संभाजी कादंबरी (लेखक- विश्वास पाटील)

याशिवाय आणखी एक संदर्भ आढळतो शिवले पाटील यांच्या विषयी, तो देखील तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता.

Post a Comment

0 Comments