Ticker

6/recent/ticker-posts

बितनगड / बितंगा/ बिताका (Bitangad)

बितनगड / बितंगा/ बिताका (Bitangad)


किल्ल्याचे नाव- बितनगड / बितंगा/ बिताका (Bitangad)

समुद्रसपाटीपासून उंची- ३५६० फुट

किल्ल्याचा प्रकार- गिरिदुर्ग 

चढाईची श्रेणी- सध्या सोप्पी 

ठिकाण- बितनवाडी , अकोले 

जिल्हा- अहमदनगर 

सध्याची अवस्था- व्यवस्थित 

किल्ल्याला भेट द्यायला कसे जाल?

तुम्हाला घोटी गावात यावे लागेल, इथून भंडारदरा रस्त्यावर टाकेद गावाला जाण्यासाठी एक फाटा आहे. या फाट्यावरून पुढे आल्यावर १२ किमी अंतरावर एकदरा फाटा आपल्याला लागतो. तेथून ६ किमी अंतरावर बितनवाडी हे गाव लागेल. हे बितनवाडी गाव म्हणजेच बितनगडाचा पायथा आहे.

गडावर जाताना घ्यावयाची काळजी- 

गडावर रेलिंग लावण्याआधी पायऱ्यांची वाट हि धोक्याची होती परंतु आता ती सुखकर झाल्याने तशी काही भीती नाही.


बितनगड हा किल्ला कळसुबाई डोंगररांगेची उपरांग असलेल्या पट्टा डोंगररांगेतील शेवटचे टोक आहे असे म्हणले तरी काही वावगे ठरणार नाही. बितनवाडी गावामधून गडाकडे जाणारी पाऊल वाट सुरु होते, खुरट्या झाडीमधून वाट काढत आपल्याला गडाकडे जावे लागते. आपल्याला ज्या वाटेने जायचे आहे त्याच्या अगदी पाठीमागे आपल्याला पट्टा किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेचे दर्शन होते. 

पुढे थोडीशी चढाई केल्यानंतर आपल्याला गडाच्या बालेकिल्ल्याच्या पायऱ्या दिसायला लागतात. वाटेत आपल्याला पाण्याच्या टाक्यांचेही दर्शन घडते. पहिले पावसाळ्यात या पायऱ्यांवरून जाने तसे खूप धोक्याचे होते, तेव्हा ट्रेकर्स ग्रुप आपल्य्सोबत दोरी बाळगत परंतु आता या किल्ल्यावर वनविभागाने धोक्याची घंटा लक्षात घेता रेलिंग बसवल्या आहेत.


आपण या पायऱ्यांनी चढून वर गेल्यावर आपल्याला एक लेणी सदृश्य गुहा आहे. हि गुहा तशी भरपूर मोठी आहे, गडावर मुक्कामाच्या हेतूने येणार असाल तर इथे तुम्ही थांबू शकता. गुहेतून बाहेर आल्यावर आता आपल्याला गडमाथ्यावर जाण्यासाठी मार्ग आहे. या वाटेने आपण गडाच्या छोटेखानी माथ्यावर जाऊन पोहोचतो. एका बाजूला आपल्याला बुरुजाची ढासळलेली वास्तू ओळखू देखील येणार नाही.गडावर तुम्हाला एक आरी सारखे निशाण दिसेल, ते म्हणजे त्या काळात गडावरील तोफांना दिशा देण्यासाठी असणारी आरी असावी असे काही लोक सांगतात. आता वनविभागाने माथ्यावर एक ओटा बांधलेला आहे. या ओट्याशेजारी एक निशानकाठी उभी केलेली आहे.

गडावरील हे सर्व बघितल्यावर आता गडावरून दिसणाऱ्या बाकी निसर्गाचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. पट्टा किल्ल्याच्या बाजूला आपल्याला धुके नसेल तर औंध आणि आड हे किल्ले देखील दिसतात. ट्रेकिंग विश्वातील एक त्रिकुट म्हणजेच अलंग-मदन-कुलंग यांचे दर्शन देखील घडते. हे सर्व विहंगम दृश्य बघून आपण आपल्या परतीच्या प्रवासाला लागू शकतो.


इतिहास- 

गडाचा तसा जास्त स्वराज्याच्या इतिहासात नामोल्लेख आढळत नाही परंतु एका पत्रात या गडाच्या पायथ्याच्या बितनवाडी गावाचा उल्लेख आढळतो. रहुल्ला खान २३ डिसेंबर १६८२ रोजी औरंगजेब बादशाहाला पत्र लिहितो त्यात तो म्हणतो कि शत्रूच्या किल्ल्याच्या पायथ्याचे बितनवाडी हे गाव आम्ही पेटवून दिले आहे आणि कदाचित याचा धाक शत्रूला बसेल. आता १६८२ च्या आसपास निजामशाही संपुष्टात आलेली होती त्यामुळे त्यांच्या ताब्यात तर हा किल्ला नक्की नव्हता, आदिलशाहीचा इकडे नगर भागात संबंध फार कमी आणि त्याकाळी औरंगजेबाचे खरे लढवय्ये शत्रू होते मराठे! त्यामुळे हा किल्ला स्वराज्याचा एक भाग होता हे नक्की समोर येते. 

किल्ल्याचा माथा बघता असे लक्षात येते कि या गडावर फक्त एखादी दुसरी तोफ असावी आणि याचा वापर जास्तीत जास्त टेहाळणी साठीच केला गेलेला असावा. 


राहण्याची व जेवणाची सोय-

राहण्याची सोय त्या गुहेत होऊ शकते किंवा तुम्ही बितनवाडी गावात आलात तर विनंती करून तुम्ही थांबू शकता. जेवणाची सोय देखील इथे गावात घरघुती करावी लागेल.


Post a Comment

0 Comments