सरसेनापती हंबीरराव मोहिते !! Sarsenapati Hambirarao Mohite
स्वराज्याचे एकनिष्ठ स्वामिनिष्ठ सेवक, स्वराज्याचे तिसरे सरसेनापती प्रतापराव गुजरांच्या मृत्यूचा बदला घेणारे , कसोटीच्या काळात संभाजी महाराजांच्या मागे खंबीरपणाने उभे राहणारे हंबीरमामा!
शहाजीराजे ज्यावेळी आदिलशाहीमध्ये होते तेव्हा निजामशाही फौजेने शहाजीराजांवर हल्ला केला होता. अशा कठीण प्रसंगी संभाजीराव मोहिते व धारोजी मोहिते या दोन मोहिते बंधूनी शहाजी राजांना साथ दिली. वडिलोपार्जीत कराड मधील तळबीडची पाटीलकी असलेल्या मोहिते घराण्याकडे शहाजीराज्यांच्या शिफारशीने संभाजीरावाना तळबीडची देशमुखी देण्यात आली.
भोसले व मोहिते घराण्यांचे संबंध हे फक्त युद्धात राहिले नाही, संभाजीरावांच्या बहिण तुकाबाई यांचा विवाह शहाजीराजांच्या सोबत झाला. पुढे सलग ३ पिढ्यांमध्ये मोहिते घरण्याच्या कन्या भोसले घराण्याच्या सदस्य झाल्या.
संभाजीरावांच्या मुलाचे नाव हंसाजी मोहिते होय. हेच हंसाजी पुढे जाऊन हंबीरराव झाले. हंसाजीचा जन्म हा कदाचित तळबीड येथीलच असावा असे इतिहासकार सांगतात.
स्वराज्याचे तिसरे सरसेनापती प्रतापराव उर्फ कुड्तोजी गुजर यांच्या बहलोलखानावरील केलेल्या स्वारीत झालेल्या मृत्युनंतर त्यांच्याच सैन्यात असलेल्या हंसाजी मोहिते या सेनापतीने सर्व मावळ्यांना धीर देऊन अगदी संयमाने निर्णय घेत त्या बहलोलखानाला विजापूर पर्यंत पिटाळून लावले. महाराजांना प्रतापरावांच्या मृत्युनंतर स्वराज्यासाठी एक असाच शूर, संयमी आणि स्वराज्यनिष्ठ सरसेनापती हवा होता. चिपळूण येथे श्री क्षेत्र परशुराम येथे छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे सरसेनापती बनवले. हंसाजीना हंबीरराव हा किताब दिला. हंसाजीचे झालेले हंबीरराव मोहिते हे स्वराज्याचे चौथे आणि राज्याभिषेकानंतरचे अष्ठप्रधानमंडळातील पहिले सरसेनापती बनले.
राज्याभिषेकानंतर हंबीररावांच्या नेतृत्वाखाली मराठा फौजांनी आदिलशाही व मुघल प्रांतात जणू धुमाकूळ घातला होता. खानदेश , बागलाण, औरंगाबाद, अहमदाबाद, बुऱ्हानपूर, वर्हाळ, माहूर ते नर्मदेपर्यंत हंबीररावांची घोडदौड होती. यानंतर देखील दक्षिण दिग्विजय मोहिमे मध्ये शिवरायांच्या सोबतीने हंबीररावांनी पोपळचा किल्ला आणि ठाणे जिंकले. जिंजीच्या उत्तरेला असलेला वेल्लोरचा किल्ला म्हणजे बुलंद आणि बेलाग! किल्ला हा भूईकोटच परंतु उंचच उंच भक्कम अशी तटबंदी आणि भोवतालच्या खंदकात सुसरीचे वास्तव्य होते. अशा या बेलाग वेल्लोर किल्ल्याला हंबीररावांनी वेढा दिला. वेढा इतका कडक होता कि अब्दुल खान या किल्लेदाराला बाहेरून किल्ल्यामध्ये रसद देखील मिळत नव्हती, अखेरीस गडावरील साठा संपला आणि २२ जुलै १६७८ रोजी वेल्लोरचा किल्ला स्वराज्यात शामिल झाला.
दक्षिण दिग्विजय मोहिमेवर असताना शिवरायांनी त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांच्याकडे कर्नाटकाच्या जहागिरीचा वाटा मागितला, परंतु व्यंकोजीराजानी तो न देता सरळ हंबीररावांच्या ६००० घोडदळ व ६००० पायदळ असलेल्या फौजेवर हल्ला केला. व्यंकोजीराजांकडे ४००० घोडदळ व १०००० पायदळ होते, या सैन्यापुढे हंबीररावांचा निभाव लागला नाही व हंबीररावांचा पराभव झाला. हंबीररावांनी विलंब न करता रात्रीच्या वेळी विजयामुळे सुस्तावलेल्या व्यंकोजीराजांच्या फौजेवर हल्ला केला. मराठ्यांनी हिरे-जवाहीर, सोने नाणे लुटले, मराठ्यांना हत्ती व घोडे देखील मिळाले. व्यंकोजीराजांचा पराभव झाला. स्वतः व्यंकोजीराजे देखील हंबीररावांच्या कैदेत सापडले परंतु शिवरायांचे बंधू म्हणून त्यांना सोडून दिले.
हंबीरराव मोहिते यांची बहिण सोयराबाई या शिवरायांच्या पत्नी होत्या.पुढे हंबीररावांची कन्या ताराबाई यांचा विवाह रामाराजांशी झाला. रामराजे उर्फ राजाराम महाराज हे सोयराबाई मातोश्रींचे पुत्र होते.
शिवरायांच्या मृत्यूनंतर अष्ठप्रधान मंडळातील काही सदस्यांनी संभाजी राजांच्या विरोधात कट सुरु केले. अण्णाजी दत्तो, प्रल्हाद निराजी आणि हिरोजी फर्झंद यांनी शिवरायांच्या मृत्युनंतर संभाजी महाराजांचा गादीवरील हक्क नाकारून २१ एप्रिल १६८० रोजी राजाराम महाराज म्हणजेच रामराजांचे मंचकारोहण केले. या वेळी संभाजी महाराज पन्हाळगडावर वास्तव्यास होते. कटातील सदस्यांनी कदाचित हंबीरराव राजारामांचे मामा असल्याने आपल्या कटात सामील होतील म्हणून हंबीररावांना शंभूराजांना पकडण्याचे आदेश दिले. हंबीरराव संयमी आणि स्वामिनिष्ठ होते परंतु ते स्वराज्यनिष्ठ होते, मुघलांच्या आक्रमणाला जर विरोध करायचा असेल तर वाघाचा छावाच हवा , हे त्यांना माहीत होते. हंबीररावांनी महाराजांना पकडन्याऐवजी कटात सामील सर्वाना अटक करून महाराजांच्या समोर पन्हाळ गडावर हजर केले. महाराजांनी त्यांना पन्हाळ्याचे किल्लेदार माळोजी बाबा यांच्या ताब्यात देऊन हंबीरमामांच्या सोबत ते रायगडावर आले.
१६ जानेवारी १६८१ रोजी हंबीरमामांच्या खंबीर साथीने अखेरीस संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकानंतर मराठा मुघल युद्ध सुरु झाले. मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर एका वेगळ्या वळणावर शंभूराजांच्या राज्याभिषेकानंतर आले. मराठ्यांचे दख्खन मधील वाढते वर्चस्व आणि मुघल सरदारांचे अयशस्वी हाल यामुळे १६८१ मध्ये औरंगजेब बुऱ्हानपुरात आला. रामशेज किल्ल्यावर औरंगजेबाने हल्ला केला, याच रामशेजच्या परिसरात जुलै १६८२ मध्ये हंबीरराव लढाईत जखमी झाले.
बुऱ्हानपुरावरील हंबीररावांची स्वारी ही त्यांच्या कारकिर्दीतील शेवटची मोठी लढाई होती. ३० जानेवारी १६८१ रोजी हंबीररावांनी आपल्या २०००० सैन्यासोबत बुऱ्हानपुरावर हल्ला केला.बुर्हनपुराचा सरदार काकरखान मराठ्यांच्या फौजांना पाहून कोटात लपून बसला.परंतु हंबीररावांच्या नेतृत्वाखाली मराठा फौजांनि कोटाबाहेरील १८ पुरे लुटले. बुऱ्हानपूर तेव्हडे वाचले परंतु मराठ्यांनी जितके शक्य तितके लुटले व बाकी राहिलेले पेटवून दिले. मराठ्यांनी संभाजी महाराजांच्या काळात केलेली हि सर्वात मोठी लुट होती आणि हि हंबीरमामांच्या आधारानेच पार झाली होती.
डिसेंबर १६८७ मध्ये वाई जवळ झालेल्या एका लढाईमध्ये फौजेचे नेतृत्व करताना गर्दीमध्ये तोफेचा गोळा लागून हंबीरराव पडले. संभाजी महाराजांच्या पाठीशी असलेला खंबीर आधार पडला. महाराजांच्या सोबत असलेला आशीर्वाद आणि वडीलधारा आधार नाहीसा झाला. स्वराज्याचा सरसेनापती पडला, पुढील कसोटीच्या काळात स्वराज्य आधाराविना पोरके झाले.
0 Comments