साळोबा धरण: छत्रपती शिवरायांनी बांधलेले पहिले धरण !! First Dam Constructed by Chatrapati Shivaji Maharaj
शिवपूर्व काळ म्हणजे आसमानीआणि सुलतानी संकटांशी झुंजणारा महाराष्ट्रातील शेतकरी! अगोदरच आस्मानी संकटाने बेहाल झालेले शेतकरी निजामशाही आणि आदिलशाही फौजांच्या जाचाने त्रासून गेल्या होत्या. अगोदरच निसर्गाची साथ नव्हती, दुष्काळाच्या झळा शेतकरी सहन करत होता, पावसाळ्यात तुरळक पडणारया पावसावर शेतकरी कसाबसा थोडेफार पिक उभे करत होता परंतु या परकीय सत्ता ते सगळे एकतर उध्वस्त करायच्या किंवा लुटून घेऊन जायच्या!
अशातच शिवनेरीवर एक रामराज्य चालवणाऱ्या शिवबांचा जन्म झाला. फक्त रामराज्यच नव्हे तर पुराणातील बळीराजाचे राज्य म्हणजेच स्वराज्य महाराजांनी स्थापन केले. महाराजांचा जन्म झाला तेव्हा पुण्याची अवस्था खूप बिकट होती. आदिलशाही सरदार मुरारजगदेवाने पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला होता. यामुळे येथील लोक परागंदा झाले व असलेली शेती पडीक बनली. या अशा परिस्थितीत शिवराय व जिजामातायांनी पुण्याची जहागिरी सांभाळली. पुणे त्यावेळी उजाड बनले होते, परंतु मासाहेब जिजाऊ खचणाऱ्या नव्हत्या, त्यांनी पुण्यामध्ये शिवबांच्या हाताने सोन्याचा नांगर फिरवला व रयतेला विश्वास दिला.
लोकांच्या मनात महाराजांनी व जिजाऊयांनी जागा निर्माण केली. याचा परिणाम असा झाला कि लोक पुण्याकडे पुन्हा येऊ लागले, पुण्यात शेतीवाडी सुरु झाली आणि पुण्याला पुन्हा पहिले वैभव प्राप्त झाले. महाराजांचे सुरुवातीचे वास्तव्य हे खेड शिवापूर येथील एका वाड्यात होते. तद्नंतर मासाहेब जिजाऊ व शिवबा पुण्यातील लालमहालात वास्तव्यास होते.
शिवबांनी रायरेश्वरी शपथ घेतल्यानंतर एका पाठोपाठ एक किल्ले जिंकायला सुरुवात केली. महाराजांनी फक्त किल्लेच जिंकले अस नाही, त्यांनी किल्ल्याच्या भोवतालच्या गावांमध्ये जाऊन तेथील सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला. " प्रजा सुखी तरच राजा सुखी" या प्रमाणे महाराजांनी जनतेचे, विशेषतः शेतकऱ्यांच्या कल्याणाचे धोरण राबवले. महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या खऱ्या पायाला ओळखले होते.
शिवरायांनी आपल्या आज्ञापत्रांमध्ये शेती आणि पाणी यांच्या नियोजनाविषयी अनेक आदेश दिले होते. अस म्हणले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात एकूण ३२ धरणे बांधलीत. हे खरे असले तरी त्यापैकी पहिले धरण कोणते होते याविषयी अनेक शिवप्रेमींच्या मनात प्रश्न उभा असतो!
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले पहिले धरण म्हणजे खेडशिवापुरचे साळोबा धरण! १६५६ मध्ये खेड शिवापूर येथून वाहणाऱ्या आंबिल ओढ्यावर बांध घालून शिवरायांनी रयतेच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला होता. या कामात महाराजांना शिवापूरच्या बाबाजी कोंडे देशमुख यांची मोठी मदत झाली होती. या धरणाचे वैशिष्ठ्य म्हणजे धरणाच्या दोन्ही बाजूने गावांत पाणी खेळते राहण्यासाठी पाट काढले होते. उजव्या बाजूच्या पाटाचे पाणी हे खोलेश्वर मंदिराच्या जवळून महाराजांच्या वाड्याच्या जवळून जात, तर डाव्या बाजूच्या पाटाचे पाणी हे शेतीसाठी पटी या विभागातून पुढे जाऊन ते खेड-शिवापूर चे श्रद्धास्थान असलेल्या आई भवानी मातेच्या मंदिराजवळ जात असे. हेच पाणी पुढे जाऊन पुन्हा आंबील ओढ्यास मिळेल अशी रचना देखील केलेली होती.
धरणाचे नाव हे त्याठिकाणी असलेल्या साळोबादेवाच्या मंदिरावरून देण्यात आले. अनेक वर्ष दुष्काळ पडला तरी खेड शिवापूरच्या नागरिकांना या पाण्याची साथ होती आणि ती आज देखील आहे. मागील १० वर्षांपूर्वीच्या दुष्काळात साळोबा धरणाने शेवट पर्यंत साथ दिली. मागील काही काळात या धरणाचा उजवा कालवा बंद करण्यात आला परंतु आजही डाव्या कालव्याने शेतीसाठी पाणी पुरवठा हा केला जातो.
छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी काय होती याची जाणीव पुन्हा एकदा या कार्यातून आपल्याला मिळते. शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि तो जपलाच पाहिजे हे महाराजांनी त्यवेळी ओळखले होते परंतु आज भारताची अर्थव्यवस्था डगमगतीये तेव्हा पुन्हा बळीराजा हा साथ देतोय. परंतु शेतकरी प्रश्न आज किती आतुरतेने व महत्व देऊन मांडले जाताय आणि सोडवले जाताय याचा विचार केला पाहिजे?


0 Comments