Ticker

6/recent/ticker-posts

सरसेनापती प्रतापराव गुजर !! Sarsenapati Prataprao Gujar Marathi Mahiti

सरसेनापती प्रतापराव उर्फ कुडतोजी गुजर || Prataprao Gujar Marathi Mahitiम्यानातुनि उसळे तरवारीची पात !! वेडात मराठे वीर दौडले सात ....
कुसुमाग्रजांच्या लेखणीतून आलेल्या आणि लता दिदींनी गायलेल्या या ओळी ऐकून अंगात जणू स्फुरण चढते. या ओळी ज्या सात विरांविषयी आहेत त्यातील आघाडीचे म्हणजे सरसेनापती प्रतापराव गुजर होय. कुडतोजी गुजर यांचा जन्म १६१५ साली भोसरे (ता. सातारा) या गावी झाला. मोघलांच्या जाचाला कंटाळून भोसरे गावाच्या सुरक्षेसाठी आणि महिलांच्या अब्रूला जपण्यासाठी कुडतोजी एकटे मुघलांच्या विरोधात लढत होते.

एकदा अशीच मुघलांची लुट दोन मोघलांच्या विरोधकांनी केली, विजय झाला परंतु आता हे धन कोणाचे यावरून वाद झाला. हे दोघे होते छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे कुडतोजी गुजर. महाराजांनी कुडतोजीना स्वराज्याच्या कल्पनेविषयी सांगितले, कुडतोजी काहीही मागेपुढे विचार न करता स्वराज्याच्या कामात रुजू झाले. हि अशी कथारूपी प्रतापरावांची आणि महाराजांची भेट सांगितली जाते, याचा ऐतिहासिक पाठपुरावा काही सापडत नाही.

कुडतोजी गुजर स्वराज्यात असताना त्यांनी अनेक पराक्रम केले. 

कुडतोजीचे प्रतापराव कसे झाले?


मिर्झाराजे स्वराज्यावर चाल करून आले. पुरंदरचा घेराव करण्याचा प्रयत्न मिर्झाराजांनी केला होता. दिलेरखान एखाद्या चिवट किड्यासारखा पुरंदरला घेराव करत चिटकून बसला होता. पुरंदरचा पाठीराखा वज्रगड पडला, महाराजांची चिंता वाढली. दोन वेळेस महाराजांनी पंताना मिर्झाराजे जयसिंग यांच्याकडे पाठवले. तह करण्याचा विचार त्यांना सांगण्यात आला परंतु मिर्झाराजांनी दोनही वेळेस नकार दिला. पंतांसोबत दोन्ही वेळेस सोबतीला कुडतोजी गुजर होते. स्वराज्यावर खूप मोठे संकट होते, रयतेवर मिर्झाराजांचे सैनिक जुलूम करत होते. कुडतोजीरावाना हे बघवले गेले नाही, त्यांनी महाराजांना न सांगता त्यांनी एक धोक्याचे पाऊल उचलले.
मिर्झाराजे आणि मनुची बुद्धिबळाचा खेळ संपवून मिर्झाराजे आपल्या तंबूत जात होते. तंबू मध्ये एक मराठा सैनिक मिर्झाराजांवर वार करण्यासाठी पुढे आला परंतु मिर्झाराजांच्या अंगरक्षकाने त्याला पकडले. चेहरा मिर्झाराजांच्या ओळखीचा होता. मिर्झाराजांनी ओळखले, मावळा होता कुडतोजी गुजर! स्वराज्यावर आलेले संकट एका घावात ठार करून परतून लावण्याचा हा कुडतोजींचा असफल परंतु धाडसी पहिला प्रयत्न होय.मिर्झाराजांनी कुडतोजीना सोडण्यास सांगितले.मिर्झाराजांनी त्यांच्या या कृत्याची विचारणा केली, त्यांच्या लक्षात आले कि हि अशी अयशस्वी चाल शिवरायांची मुळीच नसणार, त्यांनी कुडतोजीना शिक्षा न करता त्यांची सन्मानाने पाठवणी केली. या पाठवणी मागे मिर्झाराजांचा उद्देश हा मावळ्यांना स्वतःकडे आकर्षित करून सामील करून घेण्याचा होता. परंतु महाराजांचा आपल्या स्वराज्याचा प्रत्येक मावळा महाराजांशी आणि स्वराज्याशी एकनिष्ठ होता. कुडतोजी मिर्झाराजांनी भेट दिलेल्या घोड्यावर बसून परतले. महाराजांच्या समोर हजार झाले, तोपर्यंत कुडतोजींचा पराक्रम महाराजांच्या कानावर आला होता.

महाराजांनी कुडतोजींच्या या अतघाई पणा वर थोडेसे रागावले. स्वराज्याच्या कठीण काळात कुडतोजीरावांसारख्या वीराची स्वराज्याला गरज आहे हे त्यांनी कुडतोजीना समजावून सांगितलं. कुदातोजीराव जाण्यासाठी निघाले असता महाराज म्हणाले जर शत्रू तुमच्या पराक्रमाची प्रशंसा करतोय तर आम्ही का नाही करावी? कुडतोजींना त्या दिवशी या प्रतापाबद्दल प्रतापराव हे नाव देण्यात आले व कुडतोजीराव गुजर आता स्वराज्याचे प्रतापराव गुजर झाले.

मिर्झाराजांचे संकट राजांनीयुक्तीने परतून लावल्यानंतर पन्हाळा किल्ला घेण्याच्या प्रयत्नात एका गनिमीकाव्याने नेतोजीराव पालकर स्वराज्यातून बाहेर पडले असता सरसेनापती हे पद प्रतापरावांकडे आले. प्रतापराव स्वराज्याचे तिसरे सरसेनापती झाले.

प्रतापरावांचा पराक्रम हा महाराज आग्र्याला कैदेत असल्या पासून एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला. मोरोपंतानी बागलाण आणि नाशिक प्रांत लढवला तर प्रतापराव औरंगाबाद प्रांतात स्वराज्याचा विस्तार करत चालले होते. बागलाण प्रांतातील साल्हेर किल्ला मराठ्यांनी ताब्यात घेतला. साल्हेर म्हणजे कळसुबाई शिखरानंतर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर! साल्हेर म्हणजे जणू औरंग्याच्या साम्राज्यात घुसलेली तलवारच होती.

औरंगजेबाला काहीही करून आता स्वराज्यात हस्तक्षेप करायचा होता, त्यामुळे त्याने इकलासखान, दिलेरखान, बहलोलखान आणि सोबतीला बहादूरखान स्वराज्यावर चाल करून पाठवले. दिलेरखान आणि बहादूरखान बागलाण मध्ये येऊन दोन वेगवेगळ्या मार्गांनी स्वराज्यावर चाल करून गेले. इकलासखान आणि बेहलोलखान साल्हेरला वेढा देऊन बसले. साल्हेरचा वेढा फोडणे कठीण होते कारण बागलाण हा प्रांत स्वराज्याच्या गनिमिकाव्याला योग्य नाही. मैदानी मुलुख, डोंगरदऱ्या तशा नावालाच....

महाराजांनी आणि संपूर्ण स्वराज्याने मैदानी भागात लढलेली ही पहिली लढाई. सूर्यराव काकडे व मोरोपंत पिंगळे आणि औरंगाबाद हून प्रतापराव आणि आनंदराव मकाजी साल्हेरवर चाल करून आले. इथे मोठा पराक्रम झाला, इकलास खान चा दारूण पराभव झाला. प्रतापराव घोडदळाचे प्रमुख नेतृत्व करत होते, मुघलांच्या घोडदळाला पाठीवर घेत दूर घेऊन गेले. आनंदराव सोबतीला येताच त्यांनी मुघल घोडदळ कापून काढले. असंख्य मोघल सैन्य आणि मराठा सैन्य मारले गेले. मराठ्यांचा विजय झाला परंतु या लढाईत स्वराज्याचा कर्ण सूर्यराव काकडे मारले गेले.

बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले. महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश दिला.

मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरीस आणले. वेळ प्रसंग पाहून बहलोलखान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी मेहेरबान झाला. युद्धात शरण आलेल्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाईधर्म सांगत होता. प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली. तो जीव वाचवून गेला.

शिवाजी महाराजांना खबर पोहोचली, “प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला!” आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली. त्या पत्रात एक वाक्य असं होतं की बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. त्याकाळी मावळ्यांचा शिवाजीमहाराजांवर असलेला जीव पाहता ही किती भयंकर शिक्षा सुनावल्या गेली होती हे लक्षात येईल.

महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी? हा एकच प्रश्न कडतोजींना दिवसरात्र सातावीत होता. जीवाची तगमग होत होती. सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले. सर्वत्र जासूद पाठवले. माग काढा ! फक्त माग काढा आणि सांगा कुठे आहे तो गनीम . त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवता येणार नाही.

अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता. मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले. काही मैल गेल्या नंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे? तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे.

बस! प्रतापरावांना राग अनावर झाला. त्या हेराला त्यांनी तसाच छावणीत पाठवला सैन्याला स्वारीचे आदेश दिला. पण… पण… सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना थांबवल्या गेलं नाही. त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला.

त्या सात जणांनी मरणाला समोरा समोर ट्क्कर दीली. वास्तवीक पाहता एवढ्या मोठ्या सैन्यासमोर ते सात जण कीती टीकणार?? ते जास्त वेळ तग धरु शकले नाहीत. पण त्यांनी पाय मागेही फीरवले नाहीत व महाराष्ट्राच्या सात वीरांना वीर मरण आले.

केवळ सात जण पंधरा हजार सैन्यावर चढाई करतात यातच सर्व काही आले. दुर्दम्य विश्वास, पराकोटिचे स्वामी प्रेम, शौर्य सार… सार काही. प्रतापरावांप्रमाणेच ते सहा सरदार ही, स्वामीनीष्ठ! त्यातील एकाचेही पाय मरणाला भीऊन डगमगले नाहीत. की त्यांनी आपल्या सेनापतीला पराव्रुत्त करण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त स्वामींच्या एका कटाक्षाने हे वीर मरणाच्या स्वाधीन व्हायला तयार झाले.
प्रतापराव आणि सोबतचे सहा सरदार मरण पावले. महाराजांना अतीव दु:ख झाले. स्वराज्याची अपरिमित हानी झाली. मात्र शौर्याला एक नवं परिमाण लाभलं होतं. पराक्रमाला एक नवं कोंदण मिळालं होतं.

वेडात मराठे वीर दौडले सात ॥ धृ. ॥

“श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात”

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ १ ॥

ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील
“माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात!”

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥

वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ३ ॥

“जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत”

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ४ ॥

ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ५ ॥

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ६ ॥

खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ७ ॥
दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ८ ॥

प्रतापरावांचे स्मारक नेसरी या गावी आहे. खंत याची वाटते की, जन्मगावी त्यांचे काही स्मारक नाही.. एका स्मारकाची सुरुवात भुईकोट किल्ला रूपाने सुरु झाली होती. परंतु ते काम अपूर्ण राहिले आहे. सध्या ते पडीक एक खंडहर अवस्थेत आहे. सगळेच लोक शासनानेच काहीतरी केले पाहिजे. अशा पावित्र्यात आहेत. परंतु एक मोठी लोकचळवळ आणि प्रतिष्ठान उभे राहिले तर खूप मोठे स्मारक उभे राहिले असते. इथे उदाहरण द्यायचे झाले तर तळबीड तालुका कराड जिल्हा सातारा येथे हंबीरराब मोहिते यांचे अतिशय सुंदर भव्य स्मारक आहे. शिवाय नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांचे सुंदर स्मारक आहे. कटगुण येथेही जोतीराव फुले यांचे स्मारक आहे. असे स्मारक भोसरे येथे सर्व गुजर वंशज, गावकरी मंडळी, शिवप्रेमी, इतिहास संशोधक, मराठी प्रेमी, मराठा समर्थक असे अनेक लोक मदत करतील. एक उत्तम स्मारक व्हावे असे सर्वांनाच वाटते. एक लिहावेसे वाटते की गावात दरवर्षी ग्रामदेवतेची मोठी यात्रा भरते. गावातील ग्रामदेवतेच्या मंदिराला खूप खर्च आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे.
परंतु प्रतापराव यांचे स्मारक पूर्ण होण्यासाठी केवळ शासनावर विसंबून न राहता.. प्रयत्नशील राहण्यासाठी तरुण वर्गाची धडपड दिसून येत नाही.

एवढ्या महान व्यक्तिमत्वाचे स्मारक झाल्यास भोसरे गाव एक औंध सारखेच पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येईल. पर्यायाने गावाचा खूप मोठा विकास होईल..

Post a Comment

0 Comments