Ticker

6/recent/ticker-posts

पळशीचा भुईकोट किल्ला/ पळशीची गढी/ पळशीकर वाडा (Palashi Fort)

पळशीचा भुईकोट किल्ला/ पळशीची गढी/ पळशीकर वाडा (Palashi Fort) 

पळशीचा भुईकोट किल्ला/ पळशीची गढी/ पळशीकर वाडा (Palashi Fort)

पळशी हे गाव गुगल मॅप वर आता कुठे सापडायला लागलंय परंतु आज देखील हा भुईकोट किल्ला दुर्लक्षितच राहिलाय. 

किल्ल्याचे नाव- पळशीचा भुईकोट किल्ला, पळशीची गढी, पळशीकरांचा वाडा, PALASHI FORT


समुद्रसपाटीपासूनची उंची- 

किल्ल्याचा प्रकार- भुईकोट 

चढाईची श्रेणी- सोप्पी 

ठिकाण- पळशी-वनकुटे, पारनेर

जिल्हा- अहमदनगर

सध्याची अवस्था- व्यवस्थित

किल्ल्याला भेट द्यायला कसे जाल?


पळशी हे गाव गुगल मॅपवर पलाशी या नावाने दिसेल. पळशी किल्ल्याला भेट द्यायला जायचे असेल तर टाकळी ढोकेश्वर मधून वासुंदे गावाकडे येऊन खडकवाडी मधून उजव्या हाताला गेल्यावर आपल्याला पळशी किल्ल्याची तटबंदी दिसेल. आपण संगमनेर कडून आलात तर मांडवे गावातील मुळा नदीचे निसर्गरम्य पात्र बघून खडकवाडी मधून डाव्या हाताला पळशी किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे. 

किल्ल्याला भेट देताना घ्यावयाची काळजी 


किल्ला हा भुईकोट असल्याने तशी काही काळजी घ्यायची गरज नाहीये परंतु जर पळशीकर वाडा निरखून बघायचा असेल तर विजेरी(बॅटरी) सोबत ठेवावी. 

खडकवाडी मधून पुढे पळशी किल्ल्याकडे गेल्यावर आपल्याला किल्ल्याची तटबंदी दिसू लागते. आपण किल्ल्याच्या उत्तर दरवाजा समोर येऊन पोहोचतो. गावकऱ्यांनी किल्ल्याच्या या मुख्य प्रवेशद्वाराला रंग रंगोटी करून सुशोभिकरण केलेले आहे.  गडाला संपूर्ण बाजूने तटबंदी आहे. एकूण १६ बुरुज किल्ल्याला असून संपूर्ण पळशी गाव हे किल्ल्याच्या मध्येच वसलेले होते परंतु आता गावकरी सोयीनुसार तटबंदीबाहेर जात आहेत. किल्ल्याला एकूण ४ दरवाजे असून यातील २ दिंडी दरवाजे अथवा चोर दरवाजे आहेत आणि २ मुख्य दरवाजे आहेत, एक पूर्व दरवाजा आणि उत्तर दरवाजा आहे. दोनही मुख्य दरवाजे इतके भव्य आहेत कि त्यातून चार चाकी वाहने सहज जाऊ शकतील. 

गडाच्या उत्तर दरवाजाने आपण आत जातो तेव्हा आपल्याला दरवाज्याच्या दोनही बाजूला शिलालेख बघायला मिळतात. या शिलालेखांवरून या किल्ल्याची माहिती मिळते. किल्ल्याचा दरवाजा आजही लाकडी असून नक्षीकाम बघण्यासारखे आहे. खंत एकच वाटते कि या प्रवेशद्वारावर स्थानिक नेत्यांचे बॅनर सर्व शान धुळीत मिळवताय. कमीत कमी तरुण राजकारण्यांना तरी याची लाज वाटू द्यावी, असो! ( या वाक्याने आणि मी टाकलेल्या फोटोने कदाचित मला धमकी देखील येईल पण जे सत्य आहे ते आहे)

या प्रवेशद्वाराने आत गेल्यावर डाव्या हाताला वळून पुढे गावाच्या मुख्य चौकात आपल्याला महादेवाचं भव्य मंदिर बघायला मिळत आणि त्याच्या शेजारीच नागेश्वर मंदिर देखील आहे. या मंदिराविषयी आपण पळशीच्या विठ्ठल मंदिराच्या लेखनात नक्की अभ्यास करूयात. 

हे बघून आपण डाव्या हाताच्या पूर्व दरवाजाकडे जाणाऱ्या मार्गाकडे जाताना पहिल्या गल्लीतून आत गेल्यावर दोन दीपमाळा दिसतात. मी देखील वाचलंय कि इथे तोफगोळा आहे परंतु मी भेट दिली तेव्हा मला हा तोफगोळा काही सापडला नाही. 


दीपमाळा बघून आपण पुढे पळशीकरांच्या वाड्याकडे जातो. इथे आपल्याला वाड्यांचे अवशेष बघायला मिळतात. इथे ४ वाडे होते असे सांगितले जाते व अवशेष देखील तेच सांगतात. आपण एका पडक्या भिंतीसमोर येऊन पोहोचतो. इथे आल्यावर बिलकुल वाटत नाही कि इथे तो पळशीकरांचा वाडा असेल म्हणून परंतु याच कचऱ्याच्या ठिकाणी आपल्याला पळशीकरांचा वाडा दिसतो. (खरंच इतिहास खितपत पडलाय, याचा अर्थ आज कळतो) वाड्याच्या प्रवेशद्वाराच्या आतून आपण पुढे जातो तिथे आपल्याला पहारेकऱ्यांची बसायची जागा आपल्याला दिसते. 
तिथून आपण वाड्याच्या मुख्य चौकात येऊन थांबतो. इथे आल्यावर आपल्या डोळ्यांचे पारणे फिटल्याशिवाय राहणार नाही. सुंदर कोरीव लाकडी नक्षीकाम आणि एक संघ लाकडातील कला सोबतीला खांबांचे नक्षीकाम आणि स्थापत्य बघून मन तृप्त होते. येथे आपल्याला चौकात स्नानासाठी त्याकाळी वापरला जाणारा भव्य पाट बघायला मिळतो. याशिवाय एक भुयार देखील इथे आहे असे राखणदार भास्कर शिंदे सांगतात. चौकात उभे राहिल्यावर समोरच दक्षिणेकडे आपल्याला कारभाराची जागा बघायला मिळते. इथेच या वाड्याचे सध्याचे मालक रामराव कृष्णराव पळशीकर व त्यांचे वडील कृष्णराव पळशीकर यांचे फोटो बघायला मिळतात. हे बघून आपण वाड्याच्या प्रत्येक खांबाचं नक्षीकाम अगदी बारकाईने बघायचं. उजव्या हाताला आपल्याला देवघर बघायला मिळते, याच देवघरात त्या काळी सोन्याचे देव होते असं सांगितलं जाते परंतु आता ते बंद आहे. 
आता आपण जिन्याच्या शेजारी असलेल्या भव्य राहण्याच्या खोलीत जायचे. या खोलीत जात्याच्या भव्य तळी आपल्याला पाहायला मिळतात. इथे एक भव्य तळमजल्याला जाण्याचे द्वार आहे. इथून आजही कोणी खाली जाऊन बघितलं नाहीये. अजून एक इथेच भुयारी मार्ग बघायला मिळतो. वाड्यातील एक भुयारी मार्ग देवीच्या मंदिराकडे, दुसरा महादेव मंदिराकडे आणि आणखी एक विठ्ठल मंदिराकडे म्हणजेच किल्ल्याच्या बाहेर पडतो असे सांगितले जाते. 


वाड्याच्या दुसऱ्या  मजल्यावर आपल्याला काही खोल्या व देवड्या सारखी रचना दिसते परंतु आजच्या आमच्याच पिढीने प्रेमप्रकरण इथे कोरून ठेवायचे काम केलंय, इथेच असलेल्या फोटो लावायच्या जागांवर आता विचित्र चित्रकला केलेली आहे. गर्व वाटतो आम्हाला असं काहीतरी करायला आणि आमच्याच इतिहासाला विद्रुप करायला, हो ना?

किल्ल्याच्या वरचे २ मजले आता नाहीयेत परंतु आपण तिसऱ्या मजल्याच्या भिंतीवरून परिसर न्याहाळू शकतात. वाड्याच्या भिंतीला जंग्यांची रचना बघायला मिळते ती तुम्ही बाहेर आल्यावर  बघू शकता. आज वाडा दोनच मजल्यात बघायला मिळतो परंतु कधीकाळी इथे ४ मजली चौसोपी वाडा होता आणि आता कालानुरूप तो फक्त २ मजली राहिलाय व अवस्था बिकटच असल्याने कदाचित पुढच्या पिढीला हा बघायला मिळेल कि नाही याची शंकाच वाटते. 


वाडा बघून आपण बाहेर पडायचं आणि किल्ल्याच्या पूर्व दरवाजाकडे जायचं. पूर्व दरवाजाच्या बुरुजांवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि त्यावर जाऊन आपण पळशी नदी आणि ऐतिहासिक विठ्ठल मंदिर देखील बघू शकता. दरवाज्याच्या आत पहारेकऱ्यांच्या देवड्या बघायला मिळतात. पूर्व दरवाजा बघून आपण किल्ल्याची भटकंती संपवतो. पुढे ऐतिहासिक पुरातन विठ्ठल मंदिर बघायला आपण जाऊ शकता. 

इतिहास-

पळशीच्या किल्ल्याला तसा युद्धाचा काही इतिहास नाहीये. होळकरांचे दिवाण असलेले रामाजी यादव कांबळे- पळशीकर यांनी या किल्ल्याची म्हणजेच गढीची निर्मिती करून घेतली होती. पळशी हि त्या काळात बारा गावांची बाजारपेठ असावी परंतु आज एक छोटंसं खेडेगाव बनलंय. पळशी गावाचा कारभार तेव्हा पळशीकर वाड्यातूनच चालत असावा असा अंदाज आहे. आजही हे वाडे वादाच्या भोवऱ्यात असून सर्व वाड्यांची मालकी हि खाजगी आहे. आपण पाहिलेल्या पळशीकर वाड्याची मालकी हि सध्या वंशज रामराव कृष्णराव पळशीकर यांच्याकडे असून ते सध्या इंदूर, मध्यप्रदेश येथे वास्तव्याला असतात. नवरात्र उत्सवात ते भेट द्यायला इकडे येतात देखील. 
आजच्या वाड्याच्या अवस्थेवरून खाजगी मालकी असल्याने ऐतिहासिक ठेवा जपला जात नाहीये असेच वाटते व गावकरी देखील याची काळजी घेत नाहीयेत हीच खंत वाटते. 

राहण्याची व जेवणाची व्यवस्था-

पळशी हे छोटं गाव असल्याने इथे फक्त नाष्ट्याची सोय होऊ शकते. राहण्याची व जेवणाची सोया जवळच असलेल्या पारनेर अथवा टाकळी ढोकेश्वर येथे होऊ शकते. 

Post a Comment

1 Comments