Ticker

6/recent/ticker-posts

सह्याद्रीतील अनमोल रत्न- रतनगड (Ratangad)

सह्याद्रीतील अनमोल रत्न- रतनगड (Ratangad)

सह्याद्रीतील अनमोल रत्न- रतनगड (Ratangad)

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याचा उत्तर भाग म्हणजे जणू महाराष्ट्राचा हिमालायच! उंचच उंच गगनाला भिडणारी पर्वत शिखरे, सोबतीला हिरवळ आणि पाण्याचे जलाशय आणि धबधबे म्हणजे  स्वर्गच की हो.

सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील एक अनमोल रत्न म्हणजेच रतनगड, भंडारदरा धरणाच्या मुलुखात बुलंद आणि बेलाग असा परंतु उपेक्षित दुर्गरत्न. महाराष्ट्रातील फक्त या एकाच किल्ल्याला रत्न म्हणून संबोधले जाते याचे कारण स्वतःच्या दुर्गसफरी नंतरच कळेल.
सह्याद्रीतील अनमोल रत्न- रतनगड (Ratangad)

किल्ल्याचे नाव- रतनगड

समुद्रसपाटीपासुन ऊंची-  १२९७ मी

किल्ल्याचा प्रकार-  गिरीदुर्ग

चढाईची श्रेणी- मध्यम

ठिकाण- अकोले तालुक्यातील रतनवाडी आणि साम्रद गावांच्या मध्ये

जिल्हा- अहमदनगर

सध्याची अवस्था- व्यवस्थितकिल्ल्याला भेट द्यायला कसे जाल?

रतनगडाला भेट द्यायला सर्वात अगोदर संगमनेर या गावी यावे लागेल. तेथून अकोले आणि मग पुढे शेंडी(भंडारदरा धरण) असा प्रवास होईल.इगतपुरी बाजूने आल्यास देखील आपल्याला शेंडी गावात यावे लागेल.इथे जवळच रंधा प्रपात आणि कळसुबाई शिखर यांचा आनंद देखील घेऊ शकता.

शेंडी मधून रतनवाडीला जाण्यासाठी बस सुविधा उपलब्ध आहेत परंतु या जलाशयाला वळसा घालून जाणारा मार्ग आपला प्रवासाचा वेळ ३ तास आणखी वाढवतो, त्यापेक्षा शेंडी मधून आपण एक अर्ध्या तासाच्या पायी पायपीटीनंतर मुरशेत गाठायचे.मुरशेत वरून पहिल्या रतनवाडीला पोहोचायला होडीचा थरार अनुभवाचा. 

जलाशयातून हा मार्ग जातो त्यामुळे आपला बराच प्रवास वाचतो.रतनवाडी गावातून आपण अर्धा तासाच्या प्रवासानंतर दुसऱ्या रतनवाडीमध्ये पोहोचायचे.हेच ते गड पायथ्याचे रतनवाडी गाव. (रतनवाडी मार्गे साम्रद गावात पोहोचून देखील आपण गडप्रवासाला सुरुवात करू शकता)
पुण्याहून संगमनेर  जवळपास १५६ कि. मी. आहे आणि तेथून अकोले ४० कि. मी. अंतरावर आहे 

रतनगडाचा प्रवास हा शेंडी मधून सुरू करायचा आणि तिथून पायी मुरशेत गाठायचे. इथून लॉंच उपलब्ध आहेत त्याच्या माध्यमातून भंडारदरा धरणाचा बॅकवॉटर पार करून पहिल्या रतनवाडी गावात पोहोचायचं. स्वतःची गाडी असेल आणि महत्वाचं म्हणजे वेळ असेल तर या जलाशयाला वळसा घालून मुरशेत ला न जाता अकोले आणि शेंडी च्या मधून एक रस्ता सरळ पहिल्या रतनवाडीत जातो तिथे पोहोचायचे. पहिल्या रतनवाडी मधून पुढे अर्ध्या तासात दुसरी म्हणजेच पायथ्याची रतनवाडी लागते. यालाच श्री क्षेत्र अमृतेश्वर म्हणून ओळखले जाते. प्रवरा नदीच्या उगमस्थानी बांधलेले हे अतिप्राचीन मंदिर बघून त्याच्या जवळच असलेली पुष्करणी म्हणजेच गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार श्री विष्णूतीर्थ बघायचे. (आमच्या मंदिर या भटकंती भागात याविषयी आणखी माहिती मिळेल) मंदिर बघून झाले की प्रवरा नदी पात्राला डाव्या हाताला ठेवत छोट्या  बंधाऱ्या पासून प्रवास सुरु करायचा. पायवाट तशी मळलेली आहे त्यामुळे रस्ता सापडतो परंतु तरी सोबत वाटाड्या असेल तर मार्ग चुकण्याची भीती कमी होते.

२ तासांच्या जंगलातील पायपीटीनंतर आपण एका फाट्यावर येऊन थांबतो.इथेच आपल्याला पाण्याचे टाके दिसतात आणि पाणी हवं असेल तर ते इथूनच भरून घ्यायचे. डावीकडे जाणारी वाट ही कात्राबाई खिंडीकडे जाते तर उजवीकडील वाट रतनगडाच्या शिडीच्या मार्गाकडे जाते. या वाटेने जंगलातून अर्धा तास चालत आपण पहिल्या शिडीजवळ येऊन पोहोचतो.जंगलातून मार्ग असल्याने थोडी सतर्कता आणि काळजी नक्की घ्यायला पाहिजे. शक्यतो ग्रुप असेल तर उत्तमच! पहिल्या दोन शिड्या चढताना आपल्याला घाम फुटतो, मनात विचार येतो जर शिड्या नव्हत्या तर त्या काळात सैनिक गडावर कसे जात असतील? कदाचित इंग्रजांनी इथला कातळकोरीव अथवा असाच शिड्यांचा मार्ग तर उध्वस्त केला नसेल?

गडाच्या पहिल्या दरवाजाजवळ आपण येऊन पोहोचतो, त्याचं नाव गणेश दरवाजा! दरवाज्याच्या माथ्यावर भैरवनाथाची मूर्ती आणि डावीकडे कातळात कोरलेली श्री गणेशाची मूर्ती. दरवाजातून पुढे गेल्यावर आपल्याला हत्ती दरवाजा लागतो पण पहिले तिकडे न जाता आपण उजव्या हाताला जाणाऱ्या रस्त्या ने गुहेकडे यायचे. यातील पहिली गुहा आपल्याला लागते ती म्हणजे रत्नादेवी च मंदिर होय. कात्राबाई, रत्नादेवी आणि कळसुबाई या तीन बहिणी होत्या आणि पुढे त्यांचीच नावे या पर्वत शिखरांना देण्यात आली, अशी आख्यायिका इथे सांगितली जाते. या गुहेत देखील ६-७ लोकांची राहण्याची व्यवस्था होऊ शकते. आता या पायपीटीनंतर तहान लागणे साहजिकच आहे आणि आपल्या मावळ्यांना, लेकरांना सह्याद्री तहानलेलं कसं ठेवेल? पुढे आपल्याला एक प्रशस्त गुहा लागते हीच ती राहण्याची गुहा अथवा वस्तीची गुहा होय. समोरच कातळकोरीव थंड पाण्याचं टाकं आपल्याला लागत. टाक्यातील पाणी पिऊन जणू काही असं वाटत की सह्याद्री माझी पोटच्या लेकरसारखीच काळजी घेतंय.

आता पुन्हा मागे येऊन हत्ती दरवाजातून आत जायचे. दरवाजाचा वरील नक्षीकाम आणि मूर्तिकाम इतिहास अभ्यासकांसाठी उपयुक्त असे आहे.थोडंस पुढे आल्यावर आपल्याला समोर दिसतो भंडारदरा धरण, प्रवारामाई चा परिसर आणि महाराष्ट्रातील दुसऱ्या नंबरच्या उंचीवरील घनचक्करचे पठार. हा निसर्ग अनुभव घेऊन पुढे गेल्यावर एक गोलाकार बुरुज रचना दिसते. यालाच राणीचा हुडा म्हणून ओळखले जाते.जवळच पाण्याचे टाके आपल्याला लागते परंतु यातील पाणी पिण्यायोग्य नक्कीच नाहीये. इतिहास अभ्यासक असाल अथवा जिज्ञासू भटके असाल तर या बुरुजविषयी नक्की प्रश्न मनात येतो कारण हा बुरुज एका बाजूला नसून मध्यवर्ती ठिकाणी आहे, कदाचित या बुरुजाचा उपयोग गडाखाली नव्हे तर गडावरच टेहाळणी साठी करत असतील असे माझे मत आहे.

पुढे गेल्यावर आपल्याला भव्य अशी कातळकोरीव ४ टाकी दिसतात. यात पाणी देखील आहे परंतु कचऱ्यामुळे हे पाणी पिण्यासाठी योग्य नाहीये. पुढे दक्षिण मार्गाने मळलेल्या पाऊल वाटेने उंच वाढलेल्या गवतामधून गेल्यावर अर्धा बुजलेल्या अवस्थेतील कोकण दरवाजा लागतो. हा गडावरील येण्याचा आणखी एक मार्ग आहे परंतु इंग्रजांनी इथे येण्याचा हा प्रवेशमार्ग पूर्णपणे उध्वस्त केल्याने इथून गडावर येणे कठीण आहे.अतिशय सुबक असे हे प्रवेशद्वार कदाचित त्या काळात मुख्य प्रवेशद्वार असावे.

कोकण दरवाजा पाहून मागे येऊन पुन्हा पुढे दिसणाऱ्या पाण्याच्या टाक्यांकडे जायचे. इथे सात पाण्याची टाकी पाहायला मिळतात आणि जलस्थिरीकरण ही संकल्पना इथे वापरलेली आपल्याला बघायला मिळते.इथे देखील पाणी पिण्यायोग्य नाहीये. पुढे गेल्यावर आपल्याला एक कोरडं पडलेले टाके दिसते. जेव्हा तुम्ही टाक्यात उतराल तेव्हा आतमध्ये जाण्यासाठी एक गुहा मार्ग तुम्हाला दिसेल आणि अगदी त्याच्या समोरच चर खोदलेला आहे त्यात पाणी जाण्यासाठी दरवाजा सारखा मार्ग इथे आढळतो. जेव्हा आपण या गुप्त मार्गाने आत जाणार तेव्हा सोबत विजेरी(बॅटरी) असणे खूप गरजेचे आहे. आत गेल्यावर पुन्हा दोन गुहा लागतात यातील उजवीकडील गुहा ही अर्धीच खोदलेली आहे असे वाटते आणि जी डावीकडील गुहा आहे त्या गुहेत पिण्यासाठी उत्तम असे पाण्याचे टाके आहे. गडावरील पिण्यायोग्य पाण्याचे हे दुसरे टाके होय.गडावरील काही जुन्या घरांचे जोते बघून पुढे पाण्याचं एक शेवटचं टाकं बघून गडावरील सर्वोच्च ठिकाण म्हणजेच या गडाला रत्न बनवणाऱ्या नेढ्याकडे जायचे. जवळपास ४०-५० लोक बसतील इतके मोठे डोंगराला पडलेलं हे छिद्र होय. रतनगड, राजगडावरील सुवेळा माची ,इर्शाळगड अशा काही निसर्गसौंदर्याने नटलेल्या किल्ल्यालाच हे सुख लाभलेलं आहे. इथून हरिश्चंद्रगड, खुट्टा यासोबत नयनरम्य हिरवळ आणि गारव्याचा आंनद घ्यायचा आणि प्रवास त्र्यंबक दरवाजाकडे करायचा.


त्र्यंबक दरवाजा हा कातळकोरीव भव्य दिव्य असा दरवाजा याच्या पायऱ्या देखील कातळकोरीव. गडावर येण्याचा हा मार्ग देखील आहे, साम्रद गावातून खुट्ट्याला विळखा घालून तुम्हाला ३ तासांच्या चढाई नंतर इथे येता येईल. जर तुम्ही मुक्कामाच्या हेतूने आले असाल तर पुन्हा त्या गुहेकडे जायचे आणि जर तुमच्याकडे अंधार होण्यासाठी आणखी ३ तासांचा कालावधी असेल तर त्र्यंबक दरवाजाने खाली उतरून खुट्ट्या शेजारून जाणाऱ्या पायवाटेने रतानागडात पोहोचू शकता आणि तिथूनच आणखी एका मार्गाने साम्रद गावात देखील पोहोचू शकता.

गड बघायला ३ तास पुरेसे होतात परंतु जर गडावर जाण्यासाठी रतनवाडीमध्ये तुम्ही सकाळी ७ वाजेच्या आत आलात तर आरामात संध्याकाळी ४ वाजेपर्यंत गड बघून या पूर्ण ट्रेक चा मनसोक्त आनंद घेऊ शकता. लॉंच साधारणतः ७ वाजता सुरू होतात त्यामुळे जेवढे लवकर शक्य होईल तितका प्रयत्न करा. गडावर मुक्काम करू शकता परंतु जर सुट्टीच्या काळात गेलात तर गर्दीमुळे जागेचा अभाव पडू शकतो.

ज्या दुर्ग प्रेमींना रतनगडासोबत पाचनई मार्गे हरीशचंद्रगड करायचा असेल त्यांनी साम्रद मार्गे त्र्यंबक दरवाजाने चढून शिडीच्या मार्गे रतनगड उतरून कात्राबाई खिंडी कडे जाणाऱ्या मार्गे पाचनई गाठायची. रतनगड करून सांधण व्हॅली देखील पाहू शकता.
त्र्यंबक दरवाजाने रतनगड चढून शिडीच्या मार्गे उतरून कात्राबाई खिंडीमार्गे पाचनई मध्ये कलाडगड अनुभवून पुढे हरिश्चंद्रगड देखील करू शकता.रतनगडाचा इतिहास-


रतनगड हे गडाचे नाव गडावर अधिष्ठापित असलेल्या रत्नाई देवीमुळे आहे. रतनगड म्हणजे प्रवरामाईचे उगमस्थान होय. झांज राजाने १०व्या किंवा ११व्या शतकात १२ नद्यांच्या उगमस्थानी बारा मंदिरांची स्थापना केली. त्यातील प्रवरेच्या उगमावरील रतनवाडीमधील हे अमृतेश्वर मंदिर देखील एक. शिवकाळात किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता आणि बांधकाम शैली देखील मराठ्यांची आहे असे मला वाटते. मोघल सेनानी मातब्बर खानाने किल्ला १६८८ मध्ये ताब्यात घेतला.पुन्हा हा गड मराठ्यांकडे आला. 

इंग्रजांचे राज्य येण्यापूर्वी मराठ्यांच्या काळात खूप जास्त महत्व रतनगडास होते. अलंग-मदन-कुलंग हे किल्ले, राजूर, सोकुलीचा प्रदेश हा रतनगडाच्या अधिपत्याखाली येत होता.

नानासाहेबांच्या काळात बालाजी कराळे हे पेशवाई मधील रतनगडाचे किल्लेदार होते. १७६३ मध्ये महादेव कोळी जयाजी यांच्या ताब्यात किल्ला होता. १८२० मध्ये कॅप्टन गॉर्डन ने किल्ला शिताफीने लढत ताब्यात घेतला. त्याने किल्ल्यावर गोविंदराव खाडे यांना किल्लेदार म्हणून नेमले. 

१८२४ मध्ये म्हणजे फक्त ४ वर्षातच रामोजी भांगरे/भांगरी या आदिवासीच्या नेतृत्वाखाली उठाव करून किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. पण इंग्रजांनी किल्ला काहीच काळात ताब्यात घेत गडावरील कोकण दरवाजाकडील मार्ग उध्वस्त केला जेणेकरून पुन्हा गडावर अशा गोष्टी होऊ नयेत. नंतर बराच काळ किल्ला इंगजांच्याच ताब्यात राहिला.


राहण्याची व जेवणाची व्यवस्था-

गडावरील रत्नाई देवीच्या गुहेत व शेजारील गुहेत राहण्याची व्यवस्था होऊ शकते. जेवणाची व्यवस्था स्वतःला करावी लागेल. जर सुट्टयांमध्ये येणार असाल तर ट्रेकिंग ग्रुप्स इथे मुक्कामाला असतात त्यामुळे जागेचा प्रश्न येऊ शकतो त्यामुळे सोबत टेंट असेल तर राणीच्या हुडा वर टेंट टाकून आपली व्यवस्था होईल.

Post a Comment

0 Comments