पराठे, थालीपीठ (Parathe / Thalipith)
मोड आलेल्या मुगाचे धिरडे
साहित्यः
एक वाटी मोड आलेले मूग ,तीन - चार हिरव्या मिरच्या ,एक छोटा चमचा जिरे, चवीप्रमाणे वाटलेले लसूण ,चवीनुसार मीठ.
कृती :
मोड आलेले मूग , हिरव्या मिरच्या आणि मिरे बारीक वाटा . त्यात वाटलेले लसूण व चवीनुसार मीठ घाला . मिश्रण थोडे पातळ बनवा . गरम तव्यावर थोडे तेल टाकल्यानंतर मिश्रण टाकून पातळ धिरडे बनवावे व मंद गॅसवर खरपूस भाजा . हे धिरडे आवळ्याच्या किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर खायला द्या .
थालिपीठ
साहित्यः
एक वाटी गव्हाचे पीठ ,एक वाटी ज्वारीचे किंवा हुरड्याचे पीठ ,एक वाटी बाजरीचे पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, एक वाटी पालक , मेथी , कांद्याची पात यापैकी कोणतीही एक, बारीक चिरलेली पालेभाजी, एक बारीक चिरलेला कांदा ,पाऊण छोटा चमचा वाटलेलं आलं व लसूण, चवीनुसार वाटलेली हिरवी किंवा लाल मिरची ,चवीनुसार मीठ ,अर्धा छोटा चमचा ओवा ,आवश्यकतेनुसार तेल.कृती :
प्रथम सर्व साहित्य एकत्र करा . त्यात थोडे तेल व आवश्यकतेनुसार पाणी टाकून पीठ मळून घ्या . पीठ एक तास भिजत ठेवा . भिजलेल्या पिठाचे छोटे - छोटे गोळे करा . पोळपाटावर प्लॅस्टिकचा कागद किंवा ओले फडके घेऊन त्यावर गोळा हाताने थापा.तव्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल टाका.थापलेले थालिपीठ तव्यावर टाकून मंद आचेवर लाल होईपर्यंत भाजा . तयार झालेले थालिपीठ आपण लोणचे किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर खाऊ शकतो .
पालक पराठा
साहित्यः
दोन वाट्या चिरलेला पालक, एक वाटी गव्हाचे पीठ ,पाव वाटी हरभरा डाळीचे पीठ, तीन - चार हिरव्या मिरच्या, आवडीप्रमाणे मीठ व वाटलेला लसूण ,अर्धा छोटा चमचा जिरेपूड ,पराठा भाजण्यासाठी तेल .
कृती :
पालक मऊ वाफवून घ्या . ( आवडीप्रमाणे कच्चाही चालेल ) त्यामध्ये गव्हाचे आणि डाळीचे पीठ मिसळा . वाटलेली हिरवी मिरची व मीठ , वाटलेला लसूण मिरेपूड घाला . पीठ घट्ट मळा व पोळीप्रमाणे पीठ भिजवतांना एक चमचा तेल घाला.पीठ एक तास भिजत ठेवा . पीठाचे छोटे गोळे करून चपातीप्रमाणे लाटून तव्यावर भाजा व कडेने तेल सोडा . चटणीबरोबर गरम खायला द्या .
मेथी खाकरा
साहित्यः
दीड वाटी गव्हाचे पीठ, पाऊण वाटी बारीक चिरलेली मेथीची पाने ,एक छोटा चमचा ओवा, एक छोटा चमचा तीळ ,पाव छोटा चमचा मिरची पावडर ,पाव छोटा चमचा हळदी पावडर ,दोन चमचे तेल, चवीपुरते मीठ .
कृती :
मेथीच्या पानामध्ये ओवा , तीळ , तिखट , हळद , तेल आणि मीठ हे साहित्य मेथीची पाने मऊ होईपर्यंत एकत्र कालवा . या मिश्रणामध्ये गव्हाचे पीठ मिसळा आणि अंदामाने अलीपुरते पाणी घालून पीठ मळा . यानंतर हे पीठ एक तास भिजवून ठेवा . पिठाचे छोटे गोळे करून पातळ लाटा . ते तव्यावर टाकल्यानंतर त्यावर तेल किंवा तूप घाला . मंद जाळावर खाकरा कापडाने दाब देऊन कुरकुरीत होईपर्यंत भाजा .
कोबी - गाजर पराठा
साहित्यः
एक वाटी किसलेला कच्चा कोबी, एक वाटी किसलेले कच्चे गाजर ,एक वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर ,तीन - चार वाटलेल्या हिरव्या मिरच्या ,एक चमचा जिरे, एक चमचा वाटलेला लसूण ,अर्धी वाटी तेल, चवीनुसार मीठ व साखर.
कृती :
किसलेल्या कोबी व गाजरामध्ये गव्हाचे पीठ व एक मोठा चमचा तेल मिसळा.त्यामध्ये चवीनुसार मीठ व साखर , कोथिंबीर , हिरव्या मिरच्या वाटलेला लसूण व जिरे घाला.हे सर्व एकत्र मळून घेऊन गरम वाटल्यास त्यामध्ये थोडे पाणी घालून पुन्हा चांगले मळून घ्या . पीठ अर्धा तास भिजल्यानंतर पोळीसारखे लाटून तव्यावर थोडे तेल टाकून भाजून घ्या
मेथीचा पराठा
साहित्यः
दोन वाट्या गव्हाचे पीठ ,अर्धी वाटी बेसन पीठ ,दीड वाटी बारीक चिरलेली मेथी, पाऊण छोटा चमचा वाटलेलं आलं - लसूण ,चवीनुसार वाटलेल्या हिरव्या किंवा लाल मिरच्या ,चवीनुसार मीठ ,अर्धा छोटा चमचा ओवा ,आवश्यकतेनुसार तेल .
कृती :
गव्हाचे पीठ , बेसन पीठ , चिरलेली मेथी , वाटलेलं आलं व लसूण , वाटलेली मिरची , मीठ , ओवा हे सर्व साहित्य एकत्र करा . आवश्यकतेनुसार पाणी घालून ते चांगले मळून घ्या . पीठाचे छोटे छोटे गोळे करून पीठ लावून पातळ लाटा . तव्यांवर भाजा व कडेने तेल सोडा . पुदिना किंवा आवळ्याच्या चटणीबरोबर गरम खायला द्या
0 Comments