Ticker

6/recent/ticker-posts

किल्ले कुंजरगड / कोंबडा किल्ला (Kunjargad)

किल्ले कुंजरगड / कोंबडा किल्ला (Kunjargad)

किल्ले कुंजरगड / कोंबडा किल्ला (Kunjargad)

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात बुलंद आणि बेलाग उपमांना साजेसे असे खूप किल्ले आहेत. या सर्व गडांचे वैशिष्ट्य म्हणजे हे किल्ले १२०० ते १३०० मीटर सरासरी उंचीच्या गगनाला भिडलेल्या पहाडांवर उभे आहेत.यातील हरिश्चंद्रगड, रतनगड, अलंग-मदन-कुलंग या उत्तुंग गडांवर दुर्गप्रेमी पुन्हापुन्हा जातात पण या गडांच्या प्रभावळीत खऱ्या अर्थाने उठून दिसणाऱ्या कुंजरगड उर्फ कोंबडा किल्ल्याकडे फारसे दुर्गयात्री फिरकत नाही.शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कुंजरगडाचे स्वरूप आणि ट्रेकर्स साठी एक थरार नक्की अनुभवावा असेच आहे.

किल्ल्याचे नाव- कुंजरगड, कोंबडा किल्ला

समुद्रसपाटीपासून उंची- १३५० मी.

किल्ल्याचा प्रकार- गिरिदुर्ग

डोंगररांग- बालाघाट डोंगररांग 

चढाईची श्रेणी- मध्यम

ठिकाण- विहीर व फोफसुंडी गाव, अकोले तालुका

जिल्हा- अहमदनगर

सध्याची अवस्था- चांगली
किल्ले कुंजरगड / कोंबडा किल्ला (Kunjargad)

किल्ल्याला भेट द्यायला कसे जाल?


किल्ल्याला भेट देण्यासाठी तुम्हाला सुरुवातील संगमनेर बसस्थानकावरून अकोले स्थानकावर यायचे. इथून १०:३० ला सकाळी व संध्याकाळी ५:३० वाजता कोठले गावास जाणारी बस सुटते. त्या बसने आपण कोथळे गावाच्या अलीकडेच लागणारे विहीर गावात उतरून घ्यायचे.
गडावर जाण्याचा दुसरा मार्ग हा फोफसुंडी गावातून आहे. पुण्यावरून आळेफाटा आणि त्यानंतर ओतूर मार्गे आपण या गावात पोहोचू शकता.

भेटीची वेळ- वेळेचे बंधन नाही

किल्ल्यावर प्रवेश करताना-

गडावर पोहोचल्याशिवाय मध्ये कोठेही पाण्याची व्यवस्था नाहीये आणि कदाचित उन्हाळ्यात गडावर देखील पिण्यायोग्य पाणी मिळणार नाही. गडाची  चढाई थोडी थकवणारी असल्यामुळे शक्यतो पाठीवर जास्त वजन घेऊन न जाता आपल्या पिशव्या गडपायथ्याला असलेल्या झापांमध्ये ठेऊन मग चढण्यास सुरुवात करावी.

विहीर गावाच्या मार्गाने आपण गडावर पोहोचुयात. विहीर गावात उतरल्यावर गावाच्या मागेच आपल्याला आडवा पसरलेला कुंजरगडाचा डोंगर दृष्टीक्षेपात पडतो. विहीर गावातील शाळेसमोरून शेतीवाडीतून एक पायवाट गडाकडे जाते. त्या वाटेने आपण चालू लागायचं. एका तासाच्या पायपिटीनंतर आपण गडाच्या पायथ्याला असलेल्या झापांजवळ येऊन पोहोचतो. आता आपला प्रवास या गच्च भरलेल्या कारवितील वाटेने सुरु होतो. हि खडी चढाई पार करायला पाऊन ते एक तास लागतो आणि आपण खिंडीत येऊन पोहोचतो.आपल्या डाव्या हाताला आता कुंजरगड आहे. आत्तापर्यंत आपण जी खडी चढाई केली ती या खिंडीतून खाली आलेल्या दगडांवर सफर करत आलोय. आता खिंडीतून खाली जाण्यासाठी एक वाट आहे. हि वाट फोफसुंडी गावात जाते, आपण जर फोफसुंडी गावातून प्रवासाला सुरुवात केली तर आपली भेट इथेच होईल.

आता आपण डाव्या हाताच्या पायवाटेने चालायला लागायचे. या वाटेने जाताना आपल्याला एका बाजूला कुंजरगड आणि दुसऱ्या बाजूला दरी ठेवत तिरकी चाल करत आपण पुढे जात राहायचे. या वाटेने आपण गडाच्या अगदी जवळ येऊन पोहोचतो. गडाचे चार कातळटप्प्यात आहे. शेवटच्या टप्प्यावर गडमाथा आहे. आपण दोन कातळटप्पे चढून तिसऱ्या टप्प्यावर येऊन पोहोचतो.येथे एका झाडाखाली तुरबत, दगडी घुमट आणि अनेक भगवे झेंडे आपल्याला पाहायला मिळतात.

याच्याच मागे असलेल्या टेकडीच्या माथ्यावर एकसलग अशी तटबंदी आपल्याला पाहायला मिळेल. गडाचा हा तिसरा टप्पा पाहून गडाचा मुख्य माथा डाव्या हातालाब ठेवत वर जाणाऱ्या पायवाटेने चढत राहायचे. याच वाटेवर एक यु-टर्न मारल्यावर गडाच्या अंतिम टप्प्यासाठी कातळात खोदलेल्या अरुंद पायऱ्या जवळ आपण येऊन पोहोचतो. या पायऱ्यांनी पुढे गेल्यावर आपल्याला गडावर एका भग्न दरवाजातून प्रवेश करावा लागतो.

गडावर पोहोचल्यावर आपल्याला गडाच्या भव्यतेचा अंदाज येतो. गड लांबलचक पण अरुंद असा आहे. आपण डाव्या हाताला जाऊन गडाच्या पूर्वेकडील बाजूला असलेल्या कातळकोरीव टाक्यावर पोहोचायचे. या टाक्यात खाली उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत व एका बाजूने जादा झालेले पाणी बाहेर टाकण्यासाठी एक खाच देखील मारलेली आहे. या टाक्यातील पाणी कधी कधी पिण्यायोग्य असू शकते पण याची खात्री देता येत नाही.

हे टाके पाहून आपण गडाच्या निमुळत्या सोंडेसारख्या दिसणाऱ्या टोकाकडे जायचे. वाटेत आपल्याला अनेक पाण्याची टाकी लागतात परंतु त्यांचे पाणी पिण्यायोग्य मुळीच नाहीये. वाटेत एक भुयारासारखी रचना आपल्याला दिसते. रतनगडावरील गुप्त टाक्याची आठवण येते. परंतु यात आतमध्ये थोडेफार पाणी असले तरी हे टाके नसून गुहा आहे यात गणेशाची मूर्ती आहे असे भटके सांगतात. गडाच्या या टोकावर एकसलग अशी तटबंदी बघायला मिळते.

गडाची हि बाजू पाहून झाल्यावर गडाच्या वरील एका उंच भूभागावर आपण पोहोचायचं. आपल्याला येथे एक पाण्याचे टाके दिसते त्यात मध्ये बांध घातलेला आहे. या टाक्यांच्या समोरच उघड्यावर असलेले शिवलिंग आणि नंदी आपल्याला पाहायला मिळेल. आता आपण बालेकिल्ल्यावर आहोत, येथे आपल्याला भव्य अशा राजवाड्याच्या इमारतीच्या चौथऱ्याचे अवशेष बघायला मिळतात. वाड्याच्या पायऱ्या आणि काही इमारतींच्या आतील देवळ्या  असे अवशेष आजही मोडकळीला आलेल्या स्थितीत आपल्याला बघायला मिळतात. पुढे आपल्याला हनुमंताचे एक भग्न शिल्प बघायला मिळते व इथेच एक भव्य असा पाण्याचा तलाव आहे. त्यातील पाणी कायम गढूळ वाटते म्हणून कदाचित याला गढूळ पाण्याचा तलाव बरेच भटके म्हणतात.पुढे आपण गडाच्या तटबंदी जवळील टोकाकडे जायचे. इथे आपल्याला या तटबंदीवर चढून निसर्गाचा आनंद घेता येतो. यासाठी तटबंदीवर जायला आपल्याला पायऱ्या बघायला मिळतात. तटावरून चौफेर नजर टाकताना  आजूबाजूच्या कातळकड्यांचा रौद्र परिसर आपल्या नजरेस पडतो.कुंजरगड हा हरिश्चंद्रगडाच्या पाठीमागे असल्याने इथून आपल्याला हरिश्चंद्रगडाची टोलारखिंडीकडील बाजू व्यवस्थितपणे बघता येते.आता गडावरील सर्वात आकर्षक अशा गुहे कडे जायचे. हि गुहा म्हणजे कुंजरगडाच्या दोन्ही बाजूच्या गावांवर लक्ष ठेवण्यासाठी असलेली गुहा. या गुहेच्या तोंडाला खूप मोठी जागा आहे पण जर आपल्याला दुसऱ्या बाजूपर्यंत पोहोचायचे झाल्यास काही वेळा गुडघ्यावर तर काहीवेळा सरपटत पुढे जावे लागते. पण दुसऱ्या टोकाला पोहोचून तिथे उभे राहुन काहीतरी वेगळ केल्याचा आनंद हा मनाला समाधान देऊन जातो. (हे सर्व करत असताना विजेरीची सोबत असणे गरजेचे आहे)


  गडावर हे सर्व वैभव बघितल्यानंतर आपण आपल्या मार्गाला लागायचे. गड उतरायला सुरुवात करायची. गडावर शक्यतो पाणी नसते त्यामुळे इथे कॅम्पिंग चा विचार स्वताच्या जबाबदारीवर घ्यावा.

इतिहास-

कुंजरगडाचा उल्लेख इतिहासात मुख्यत्वे केला जातो. शिवचरित्रात याचा उल्लेख आढळतो. इतिहास सांगण्या अगोदर मला पडलेला प्रश्न असा की इतर रतनगडासारखा दुर्गरत्न असताना, हरिश्चंद्रगडासारखा पाठीराखा असताना महाराजांचा मुक्काम हा कुंजरगडावरच का? याचा अर्थ एकच की या भागातील बाकी किल्ल्यांच्या संरक्षणात वसलेला कुंजरगड हा मजबूत आणि पाठीराखा किल्ला आहे. महाराजांच्या पहिल्या सुरत लुटीवेळी महाराजांनी कांचनबारीच्या लढाईत पराक्रम गाजवून विश्रांतीसाठी हा गड निवडला होता. १६७० मध्ये महाराज सुरतेची दुसऱ्यांदा लुट करून महाराष्ट्रात नाशिक अहमदनगर आणि मग पुणे रायगड असा प्रवास करणार होते. कांचनबारी येथे मुघलांशी महाराजांचे युद्ध झाले आणि याचे नेतृत्व महाराजांनी करत मोकळ्या मैदानात महाराजांनी मोगलांचा पराभव केला. आता युद्धामुळे फौजेला विश्रांतीची आणि जखमींना सुश्रुषेची गरज होती. त्यामुळे महाराजांनी कुंजरगडावर हि सर्व व्यवस्था केली. येथेच प्रतापराव, आनंदराव व व्यंकोजीपंत यांच्यासह महाराज पुढचे बेत ठरवत होते. याच गडावर महाराज विश्रांती घेत असताना मोरोपंतानी शिवनेरी घेण्याचा प्रयत्न अपयशी ठरला असला तरी त्यांनी त्र्यंबकगडावर भगवे निशाण रोवले हा आनंद वेगळाच होता. कुंजरगडावरच मुक्काम करून राजे काही दिवसाने येथूनच ताज्या दमाने कारंज्याच्या मोहिमेवर निघाले.

राहण्याची व खाण्याची व्यवस्था-

गडावर स्वताचा टेंट घेऊन जाऊन राहण्याची व्यवस्था होईल पण ती योग्य नाहीये त्यापेक्षा विहीर गावातील शाळेच्या पडवीत राहण्याची व्यवस्था होऊ शकेल व गावकरयांना सांगून जेवणाची देखील व्यवस्था होईल.

Post a Comment

1 Comments