Ticker

6/recent/ticker-posts

कलाडगड : ट्रेकर्सकडून दुर्लक्षित गड (Kaladgad)

कलाडगड : ट्रेकर्सकडून दुर्लक्षित गड (Kaladgad)


पंढरीची वारी वारकरी जशी नित्य नेमाने न चुकता पार पाडतात तशी ट्रेकर्स त्यांच्या पंढरीच्या वारीला येतच असतात. वारकऱ्यांचा पांडुरंग हा विठ्ठल रखुमाई असतात तर आम्हा दुर्ग वेड्यांचा तो हरिश्चंद्रगड! याच हरिश्चंद्रगडाचा पाठीवरचा भाऊ म्हणून ओळख असलेला आणि तशाच प्रकारची दुर्गम रचना असलेला हा कलाडगड होय.

किल्ल्याचे नाव- कलाडगड
समुद्रसपाटीपासुन ऊंची-  ११०० मी
किल्ल्याचा प्रकार-  गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी- मध्यम
ठिकाण- अकोले तालुक्यातील पाचनई गावातून पुढे आणि पेठेवाडीच्या अलीकडे
जिल्हा- अहमदनगर
सध्याची अवस्था- व्यवस्थित



किल्ल्याला भेट द्यायला कसे जाल?
पुण्यावरून येणार असाल तर पहिले संगमनेर ला यावं लागेल(१५६ कि. मी.), तेथून अकोले तालुक्यातील राजूर या बसस्थानकावरून पाचनई गावाची बस पकडून यायचं. पाचनई पासून ७ कि. मी. अंतरावर पेठेवाडी गाव परंतु तिथे न जाता अलिकडेच म्हणजे ५ की.मी. वर आपल्याला गडाचा पायथा लागतो.

गडावर येण्याचा दुसरा मार्ग म्हणजे पुणे जिल्ह्यातील माळशेज घाटातील खिरेश्वर नावाचे गाव आहे. हे गाव हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याचे गाव आहे. येथून टोलार खिंडीमार्गे साधारणतः ४ तासांच्या पायपीटीचा मार्ग आहे. किंवा हरिश्चंद्रगडाला भेट देऊन दुर्गप्रेमी पाचनई गावात उतरू शकतात.

भेटीची वेळ-  वेळेचे बंधन नाही

किल्ल्याला भेट देताना-

हा गड थोडासा सवयीच्या ट्रेकर्सने करावा असा मी सल्ला देईल. 

गडावर जाताना सोबतीला ४० फूट दोरी नक्की घेऊन जावी. तशी त्याची गरज पडत नाही परंतु न होऊ पण काही घडले तर मदतीला उपयोगी असेल. गडावर पावसाळ्यात तर मुळीच जाऊ नये, याचे कारण पुढे कळेलच आपल्याला.
कलाडगड : ट्रेकर्सकडून दुर्लक्षित गड (Kaladgad)

हरीशचंद्रगडाच्या पाठीमागे वसलेला एक एकटा डोंगर म्हणजे कलाडगड होय. आपल्या प्रवासात पाचनई गावात पोहोचल्यावर आपल्याला पश्चिम दिशेला दिसणारा डोंगर म्हणजे कलाडगड! पाचनई गावातून प्रवासाला सुरुवात करायची( तशी अकोले तालुक्यात आले की आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली असते. त्यामुळे अकोल्यात आले की राजूर पर्यंत जाईपर्यंत इतकं काही नवीन वाटत नाही पण एकदा राजूर पासून पाचनई प्रवास सुरु झाला की मग माणसाच्या तोंडातून आपसूकच आश्चर्य बाहेर पडत). पाचनई मधून एक कच्च्या रस्त्याने जवळपास दीड दोन तासाच्या पायी पायपीटीनंतर आपण पेठेवाडीच्या अलीकडील शासनाने बांधलेल्या एका सिमेंटच्या निवाऱ्याशेजारी येऊन पोहोचतो. इथूनच आपल्या गडावरील प्रवासाला सुरुवात होणार आहे.हाच गडाचा पायथा. पाचनई पासून इथपर्यंत पोहोचायला खाजगी वाहने किंवा स्वतःची वाहने आणता येतात. पाचनई मधून कलाडगडासाठी सोबतीला वाटाड्या घेतला की तो मधल्या मार्गे फक्त १ तासात तुम्हाला या ठिकाणी आणून पोहोच करतो.

किल्ला तसा ट्रेकर्स कडून दुर्लक्षितच आहे परंतु गडावरील भैरवनाथाच मंदिर हे लोकांचे श्रध्दास्थान असल्याने पायवाट तशी रुळलेली आहे.आपल्याला जर वाटाड्याने आणले असेल तर वाटेत निसर्गाचा मनमुराद आनंद घेत आपल्याला ओढ्यांची, झाडांची आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाची सोबत नक्की लाभेल. आता तुमच्या डाव्या हाताला जो डोंगर दिसतोय तो म्हणजे कलाडगड होय. आता दाट झाडीमधून आपण प्रवासाला सुरुवात करायची, अर्ध्या तासाच्या आल्हाददायक पण खड्या चढाई नंतर आपण येऊन पोहोचतो कातळकोरीव अशा दुसऱ्या टप्प्याकडे.

दगडाला जागोजागी शेंदूर फासलेला आपल्याला दिसतो. इथून कातळात कोरलेल्या काहीशा कठीण आणि काहीशा सोप्प्या अशा पायऱ्यांनी आपण पुढे चालत राहायचं. पुढे कातळात कोरलेला एक अवघड टप्पा लागतो. इथे काळजी घेणे गरजेचे आहे. या कातळात जेमतेम पाय कसाबसा बसेल इतक्याच जागेच्या खोबण्या केलेल्या आहे. या खोबान्यांमध्ये हाताची मजबूत पकड बनवत हळूहळू पाय रुतवत तिरके तिरके जात हा अवघड टप्पा पूर्ण करायचा.सोबत एकाच प्रशिक्षित ट्रेकर असेल तर त्याने अगोदर वर जाऊन नंतर दोरीच्या सहाय्याने इतरांना सौरक्षण देत हा टप्पा पार केला तर अति उत्तम.

हा टप्पा पार झाल्यावर आता गडाचा शेवटचा आणि काहीसा कठीण भाग लागतो. इथे देखील कातळकोरीव पायऱ्या आहेत परंतु या अरुंद आहेत. ज्यांनी यशस्वीपने मागचा टप्पा पूर्ण केला त्यांच्यासाठी हे जास्त अवघड नक्कीच नाही. या मार्गाने आपण १० मिनिट मध्ये गडमाथ्यावर येऊन पोहोचायचे.

कलाडगडाच्या माथ्यावर पोहोचताच चहूबाजूने गगनाशी स्पर्धा करणारे डोंगर, निरभ्र आकाश व हिरव्यागार वनराईने नटलेले व निळसर खळखळत वाहणारे मुळा नदीचे खोरे पाहिल्यानंतर आपला चढाईचा थकवा कुठल्याकुठे पळून जातो. गडाच्या माथ्याचा आकार लांबलचक असून आपण जेथे माथ्यावर पोहोचतो तिथेच सुरुवातीला भैरवाची गुहा लागते.जमिनीखाली कातळात खोदलेल्या या गुहेत भैरवाचा शेंदूर फासलेला एक तांदळा, गणपतीचे छोटेसे शिल्प, वाघाचे शिल्प बघायला मिळते. दगडात कोरलेले २ नाग शिल्प आपल्याला मंदिरात जागा नसल्याने बाहेर गुहेसमोरच ठेवलेले दिसतात. हे भैरव मंदिर आजूबाजूच्या आदिवासी लोकांचे श्रद्धास्थान असल्याने प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यात इथे यात्रा असते आणि त्यावेळेस शेजारी एक पिण्यायोग्य पाण्याचा झरा देखील असतो असे गावकरी किंवा वाटाड्या आपल्याला सांगतो.


भैरवनाथाचे दर्शन करून किल्ल्याचा बालेकिल्ला उजव्या हाताला ठेवत आणि दरी डाव्या हाताला ठेवत आपण गडाच्या दक्षिण भागाकडे जात राहायचे. वाट तशी अवघड नाहीये परंतु अरुंद आहे आणि शेजारीच दरी असल्याने धोक्याची देखील आहे.पुढे गेल्यावर या वाटेने तुम्हाला दोन पाण्याचे टाके लागतील. या पाण्याच्या टाक्यांत दगड पडलेले आहेत व उपसा नाही त्यामुळे पाणी पिण्यायोग्य नाहीये.टाके पाहून पुढे आपण एक सपाट माथ्यावर येऊन पोहोचतो. येथे आपल्याला शेंदूर फसलेले दगड दिसतात. समोरच दोन गोलाकार अशी दगडे दिसतात कदाचित ही तोफेची गोळे असावे असा माझा अंदाज. एक गोष्ट बरी केलीये त्यांना शेंदूर लावून देवाचं रूप दिलंय त्यात हे वेताळाचे देऊळ त्यामुळे कोणी हे दगड हलवण्याचा प्रयत्न नाही करत. ऐतिहासीक स्थळांवर सध्या जे चाललंय त्यामुळे मनाला सतत दुःख होत, गडावर ठेवलेल्या तोफा किंवा तोफगोळे पर्यटक मनोरंजन म्हणून दरीत ढकलून देतात. या गडावर देवाचे रूप देऊन का होईना पण आजपर्यंत हे गोळे तसेच बघायला मिळताय ही एक आनंदाची बाब आहे. या जागेला वेताळाचा चाळा असे म्हणतात.
कलाडगड : ट्रेकर्सकडून दुर्लक्षित गड (Kaladgad)

ही जागा बघून आपण गडाच्या आणखी पिछाडीवर जायचे. रतनगडाचा खुट्टा आपण बघितला त्याप्रमाणेच कलाडगडाला देखील असा एक सुळका आहे ज्याला कलाडचा अंगठा असे म्हणतात. इथून निसर्गाचा आनंद घेऊन आपण गडाच्या बालेकिल्ल्याकडे मार्गस्थ होण्यासाठी पाण्याच्या टाक्यांजवळ यायचं. गवतातून जाणाऱ्या पायवाटेने आपण गडाचा बालेकिल्ला गाठायचा. बालेकिल्ल्यावर तसे बघण्यासारख्या गोष्टी म्हणजे घरांचे जोते इतकंच. परंतु बालेकिल्ल्यावरून सह्याद्रीचा जो आनंद घेता येतो तो बहुमूल्यच! मराठी मध्ये म्हणतात ना की तोडच नाही तसला प्रकार हा.

उत्तरेपासून बघायला सुरुवात केली तर एक तुटलेल्या डोंगरासारखा भाग दिसतो तो म्हणजे शिरपुंज्याचा भैरवगड, ज्या डोंगररांगेतून तो वेगळा झालाय ते म्हणजे घनचक्करचे पठार किंवा डोंगररांग, मागच्या बाजूला दिसतोय तो रतनगड आणि मुळा नदीचा आनंद आपण घेतला तिचे उगमस्थान असणारा आजोबा पर्वत आणि सोबतीला कात्राबाई चा डोंगर आपल्याला पाहायला मिळतो.
आता जसे जसे दक्षिण पूर्वेकडे सरकतोय तसे आपल्याला  कोथळयाचा भैरवगड आणि कुंजरगड काहीसा दिसतो.पुढे आपल्याला कुमशेतचा कोंबडा हा डोंगर आणि कलाडगडाचा नाफ्ता नजरेस पडतो. दूरवरपसरलेला माळशेज घाट आणि कोकणात उतरणाऱ्या त्याच्या पर्वत शृंखला धुके नसेल तर बघायला मिळतात. पूर्वेला आपल्याला दिसतो तो आपल्यासारख्यांसाठी असलेले पंढरपूर, म्हणजे हरिश्चंद्रगड!

कलाडगड : ट्रेकर्सकडून दुर्लक्षित गड (Kaladgad)


गडाचा प्रवास आपला इथेच संपतो त्यामुळे खाली उतरताना आपण काळजी घ्यावी आणि दोरीच्या साहाय्याने उतरले तर आपली काळजी कमी होईल.

आपण रतनगडाच्या भागात जस सांगितलं त्याप्रमाणे रतनगड करून तुम्ही कलाडगड आणि परत पाचनई मध्ये येऊन हरीशचंद्रगड असा मार्ग अवलंबु शकता. किंवा हरिश्चंद्रगड करून मग कलाडगड आणि मग पुढे भैरवगड करून कुंजरगड असा ४ दिवसांचा ट्रेक देखील करु शकता.
कलाडगड : ट्रेकर्सकडून दुर्लक्षित गड (Kaladgad)

कलाडगडाचा इतिहास-

कलाडगडाची तशी इतिहासात नोंद नाहीये परंतु जसा हरिश्चंद्रगड बांधला त्याप्रमाणे आणि तेव्हाच कलाडगड देखील बांधला असावा असा अंदाज आहे. असे बोलण्याचे कारण म्हणजे आज्ञापत्रात म्हणाल्या प्रमाणे गडाशेजारी जर दुसरा डोंगर असेल तर तो समूळ फोडून नष्ट करावा आणि ते शक्य नसेल तर तो देखील बांधून काढावा. कातळात तयार झालेला हा डोंगर फोडून काढणे शक्य नव्हते त्यामळे कदाचित याला बांधून काढले असावे.तसे युद्ध इथे झाले नसावे आणि या गडाचा उपयोग हा टेहाळणी साठी केला असावा असे वाटते.


राहण्याची व खाण्याची व्यवस्था-

गडाच्या पायथ्यापासून ५ कि. मी. अंतरावर पाचनई गावात हनुमानाच्या मंदिरात राहण्याची सोय होऊ शकते आणि जेवणाची व्यवस्था तेथील काही हॉटेल्स मध्ये होऊ शकेल.

Post a Comment

0 Comments