Ticker

6/recent/ticker-posts

भटक्यांची पंढरी: किल्ले हरिश्चंद्रगड (Harishchandragad)

भटक्यांची पंढरी: किल्ले हरिश्चंद्रगड (Harishchandragad) 

किल्ले हरिश्चंद्रगड (Harishchandragad)

पंढरीचा पांडुरंग जसा वारकऱ्यांच्या मनाला दर आषाढीला साद घालतो तसाच सह्याद्रीच्या कुशीतील हरिश्चंद्रगड म्हणजे तुम्हा आम्हा भटक्यांची जणू पंढरीच. आपल्या देखील या पांडुरंगाच्या वाऱ्या झाल्या असतील. 

पुणे, ठाणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला किल्ला. तारामती, रोहिदास आणि हरिश्चंद्र या पुराण कथातील पात्रांची नावे असलेले उंचच उंच शिखरे, केदारेश्वराच्या गुहेतील भव्य दिव्य शिवलिंगाची थंड पाण्यातून केलेली प्रदक्षिणा, भव्य वक्राकार कोकणकडा आणि नशिबात असेल तर दिसणारा इंद्रवज्र.... काय हवं असत याशिवाय भटक्यांना? 


किल्ल्याचे नाव- हरिश्चंद्रगड


समुद्रसपाटीपासुन ऊंची-  ४८८० फुट 

किल्ल्याचा प्रकार-  गिरीदुर्ग

चढाईची श्रेणी- मध्यम

ठिकाण- पाचनई आणि खिरेश्वरच्या जवळ 

जिल्हा- अहमदनगर

सध्याची अवस्था- व्यवस्थित

किल्ले हरिश्चंद्रगड (Harishchandragad) map

किल्ल्याला भेट द्यायला कसे जाल?

खिरेश्वर गावातून :
सर्वात प्रचलित असणारी वाट ही खिरेश्वर गावातून गडावर येते . या वाटेने येण्यासाठी पुण्याहून आळेफाटा मार्गे अथवा कल्याणहून मुरबाड - माळशेज घाट मार्गे खुबी फाट्यास उतरावे . खुबी फाट्यावरून धरणावरून चालत गेल्यावर , ५ कि.मी अंतरावर खिरेश्वर गाव लागते . या वाटा गावातून दोन गडावर जातात . अ ) एक वाट ही टोलार खिंडीतून गडावर सुमारे ३ तासात हरीश्चंद्रेश्वर मंदिरापर्यंत पोहचते . टोलार खिंडीत वाघाचे शिल्प पाहायला मिळते . ब ) दुसरी वाट ही राजदरवाजाची वाट आहे . ही वाट पूर्वी प्रचलित होती . आता मात्र वाटाड्याशिवाय या वाटेने गडावर जाऊ नये . या वाटेने आपण गडाच्या जुन्नर दरवाज्यापाशी पोहचतो . या मार्गाने जाताना गावातील विहिरीतून पाणी भरून घेणे आवश्यक आहे , कारण वाटेत कुठेच पाणी मिळत नाही . 

खिरेश्वर मधील नागेश्वर महादेवाचे मंदिर-
खिरेश्वर गावातील आश्रमशाळेजवळ नागेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे.  यादवकालीन या मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वरील पट्टीवर शेषशाही भगवान विष्णू चे अत्यंत मोहक शिल्प बघायला मिळते. बाहेर मंडपाच्या छताला सोळा कोरीव कामांतून प्रसंग म्हणजेच शिल्पपट आहे.

vyaghra shilp

नगर जिल्ह्यातून ( पाचनई मार्गे ) : 
हरिश्चंद्रगडावर जाण्याची एक वाट ही नगर जिल्ह्यातून आहे . यासाठी मुंबई - नाशिक हमरस्त्यावरील घोटी या गावी उतरावे . तिथून संगमनेर मार्गावरील राजूर या गावी यावे . पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव असून येथून गड गाठण्यास सुमारे ३ तास लागतात . वाट फारच सोपी आहे . पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे अंतर सुमारे ६ किमी आहे .

सावर्णे - बेलपाडा - साधले असा घाटमार्ग : 
मुंबई - माळशेज मार्गावर माळशेजघाट चालू होण्यापूर्वी सावर्णे गाव आहे . सावर्णे गावातून बेलपाडा गावात जाण्यासाठी फाटा फुटतो . या फाट्यावरून २ - ३ किमी गेल्यावर उजव्या हाताला जाणाऱ्या रस्त्याने बेलपाडा गावात पोहोचता येते . मुंबई - माळशेज रस्त्यावरून बेलपाड्या पर्यंत पायी चालत जाण्यास दिड ते दोन तास लागतात . बेलपाडा गावातून साधले घाट मार्गे हरिश्चंद्रगडावर जाता येते .
परंतु हा मार्ग फारच अवघड असल्याने प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असलेल्यांनीच हा मार्ग अवलंबावा . येथून बेलपाडा या कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावात यावे . येथून कड्यातून काढलेल्या साधले घाटाच्या सहाय्याने कोकणकड्याच्या पठारावर जाता येते . या वाटेने मंदिर गाठण्यास सुमारे १० ते १२ तास लागतात .

प्रचलित डाव्या नळीची वाट :
नळीच्या वाटेने जाण्यासाठी बेलपाडा या कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावात यावे . बेलपाडा गावातून कोकणकड्याच्या दिशेने चालत जाऊन ओढा पार करावा लागतो . ओढा पार केल्यावर वाट कोकणकडा व बाजूचा डोंगर यांच्या मधल्या अरूंद घळीतून वर चढत जाते.ही वाट फारच अवघड असल्याने प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असलेल्यांनीच हा मार्ग अवलंबावा . या मार्गाने कोकणकड्याच्या पठारावर जाण्यास सुमारे ८ ते १२ तास लागतात .

रोहिदास नळीची वाट :
या नळीच्या वाटेने जाण्यासाठी बेलपाडा या कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावात यावे . बेलपाडा गावातून कोकणकड्याच्या दिशेने चालत जाऊन कड्याजवळील उजव्या नळीत शिरावे . नळी पार traverse केल्यावर सुमारे ८०० ते १००० फूट खाली उतरून पठारावर यावे . इकडून पुढे बालेकिल्ल्यापर्यंत लागतो . पुढे बालेकिल्ल्याच्या अलीकडील नळीतून आपण गडावर पोहोचतो . ही वाट फारच अवघड असल्याने प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असलेल्यांनीच हा मार्ग अवलंबावा . या मार्गाने कोकणकड्याच्या पठारावर जाण्यास सुमारे १० ते १५ तास लागतात . 

गडावर जाताना घ्यायची काळजी-

किल्ले हरिश्चंद्रगड (Harishchandragad)

गडावर जाण्याचे बरेच मार्ग हे खूप खडतर आहेत परंतु यातील पाचनई मार्गे सर्वात सोप्पी आहे त्यामुळे सुरुवात करणाऱ्यांनी याच मार्गाने गडावर जावे.
गडावर जाताना मध्ये पाणी मिळणे कठीण आहे आणि कमीत कमी ३ तासांचा हा प्रवास असल्याने शक्यतो सोबत जास्तीचे पाणी घेऊनच जावे.

गडावर आपण पाचनई मार्गेच प्रवास करूयात. पाचनई पासून जवळपास ६ किलोमीटर अंतरावर आहे हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. गडावर जाताना या वाटेवर आपल्याला जास्त अडचणी नाहीयेत. गडावर जाताना वाटेत लागणारे पाण्याचे वाहते छोटे प्रवाह , हिरवीगार झाडी आणि आपली इंद्रवज्र बघण्याची इच्छा आपला सगळा थकवा दूर करते. गडावर पोहोचण्याअगोदर आपल्याला एक पहाऱ्याची गुहा बघायला मिळते आणि या गुहेत आपण काही काळ विश्रांती देखील घेऊ शकता.
किल्ले हरिश्चंद्रगड (Harishchandragad)

गडावर आपण सर्वात अगोदर येऊन पोहोचतो ते मंगळगंगेच्या पात्राजवळ. गडावरील हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आपल्याला बघायला मिळते. हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर म्हणजे हेमाडपंथी स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना म्हणजे हे मंदिर होय. आपण रतनगडाच्या पायथ्याला असलेले अमृतेश्वराचे मंदिर बघितले. ११ व्या शतकाच्या आसपास झांज या राजाने १२ नद्यांच्या उगमस्थानी १२ शिवलिंगांचे मंदिरे बांधली त्यापैकी एक म्हणजे मंगळगंगेच्या उगमस्थानी असलेले हे हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर! तळापासून साधारणतः अंदाजे १६ मीटर उंचीचे कातळात बांधलेले हे मंदिर. मंदिराचे बांधकाम हे बघण्यासारखे, मंदिराच्या अंतर्भागात आपल्याला एक शिवलिंग बघायला मिळेल. शिवलिंगावर सतत अभिषेक होईल अशी व्यवस्था ग्रामस्थांनी केलेली आहे.

मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो. हा ओढा मंगळगंगेेेच पात्र. मंदिराच्या पाठीमागे आपल्याला एक शेंदूर फासलेली गणेशमूर्ती बघायला मिळते. गणेश मूर्तीपासून पुढे आपल्याला जमिनीखाली कातळात कोरलेले टाके बघायला मिळेल, हे टाके नसून हा पाण्याचा जिवंत झरा आहे आणि यालाच मंगळगंगेचे उगमस्थान म्हणले जाते. मंदिराच्या आसपास आपल्याला काही मोकळ्या गुहा बघायला मिळतात. या गुहांमध्ये आपली राहण्याची व्यवस्था होऊ शकते.

मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या गुहेत एक चौथरा आहे आणि याच चौथऱ्यात खाली एक प्रशस्थ खोली आहे. परंतु याच्या दरवाजाला एक प्रचंड शिळा लावून ही बंद केलेली आहे. याच खोलीत बसून चांगदेव ऋषींनी तब्बल १४ वर्ष तपस्या केली आहे असे गावकरी सांगतात.

"शके चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा । मार्गशिर तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ॥ हरिश्चंद्रनाम पर्वतु । तेथ महादेव भक्तु । सुरसिद्ध गणी विरुयातु । सेविजे जो ॥ हरिश्चंद्र देवता ॥ मंगळगंगा सरिता । सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान । ब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु । लिंगी जगन्नाथु । महादेओ ॥ जोतीर्थासि तीर्थ । केदारांसि तुकिनाति । आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा ॥" हे चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबावर, भिंतीवर आढळतात, असे अभ्यासक सांगतात. श्री चांगदेवांनी येथे तपश्चर्या करून ‘तत्वसार’ नावाचा ग्रंथ लिहिला होता. एका शिलालेखावर "चक्रपाणी वटेश्वरनंदतु । तस्य सुतु वीकट देऊ ॥" लिहिलेले आढळते आणि ते वाचता देखील येते.
किल्ले हरिश्चंद्रगड (Harishchandragad)

मंदिराच्या समोरच आपल्याला पुष्करणी बघायला मिळते. या पुष्करनीला एकूण १४ कोनाडे आहेत आणि असे म्हणले जाते कि यात विष्णूच्या वेगवेगळ्या रूपातील मुर्त्या होत्या. आता या मुर्त्या आपल्याला मंदिर परिसरातील एका गुहेत बघायला मिळतात कदाचित त्याच या मुर्त्या असतील. अमृतेश्वराच्या शेजारी असलेली पुष्करणी देखील १४ कोनाड्यांची परंतु त्यांची रचना हि चौकोनाकृती होती मात्र गडावरील या पुष्करणी मध्ये आपल्याला एकाच बाजूला सर्व कोनाडे बघायला मिळतात. या पुष्करणीची सफाई कोणी करत नसल्याने यातील पाणी खूप उग्र दर्पाचे बनले आहे. रानवाटा टीम आणि गावकर्यांनी मिळून एकदा हि पुष्करणी साफ केली होती अशी विडीओ मला नुकतीच बघायला मिळाली. (त्यांच्या या कार्याला गर्वाने मराठी टीम चा सलाम) video बघण्यासाठी इथे क्लिक करा.

पुष्करणी बघून आपण पुढे गेल्यावर एक छोटंसं पाण्याचं टाक लागत आणि त्याच्या अगदी समोर एक छोटंसं शिवलिंग असलेले मंदिर लागत. पौराणिक कथांमध्ये सांगितलेला सत्यवचनी राजा हरिश्चंद्र याच टाकीला भरण्यासाठी कावडीने पाणी आणत होता अशी दंतकथा आहे. मंदिराच्या बाहेर एक कावड घेतलेल्या व्यक्तीचे शिल्प आहे हाच तो डोंबऱ्याचा घरी कावडीने पाणी वाहणारा राजा हरिश्चंद्र! विश्वमित्रांची देखील शिळा आपल्याला इथे बघायला मिळते.
kokankada

आता सूर्यास्त व्हायला लागतो त्यामुळे आपला प्रवास पहिले सूर्यास्त बघायला कोकणकड्याकडे हलवायचा आणि जर जास्त वेळ असेल तर मग केदारेश्वराची गुहा बघून मग तिकडे जायचे. मंदिरापासून कोकणकड्याकडे जाण्यासाठी अर्धा तास लागतो. कोकणकडा हे हरिश्चंद्रगडाचे आकर्षण होय. गिर्यारोहकांसाठी आकर्षणाचे स्थान! जवळपास अर्धा किलोमीटर परिघाचा वाटीसारख्या आकाराचा अर्धगोल असा अंतर्वक्र कोकणकडा. असा कोकणकडा एकमेवाद्वितीय आहे, म्हणूनच काय जणू हा गड भटक्यांना कायम साद घालत असतो. सूर्यास्ताचे नयनरम्य दृश्य या कोकणकड्या वरून अनुभवता येते आणि तुमच्याकडे तंबूची व्यवस्था असेल तर इथेच कॅम्पिंग केली जाते.
किल्ले हरिश्चंद्रगड (Harishchandragad)

आता पुन्हा मंदिराजवळ येऊन मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने जायचं. पावसाळ्यात गेलात तर खळाळत वाहणारी ही मंगळगंगा तुमचा थकवा नक्की घालवते. पुढे गेल्यावर आपल्या डाव्या हाताला एका घळीत असलेल्या गुहेमध्ये एक भव्य शिवलिंग बघायला मिळते. हे शिवलिंग म्हणजेच केदारेश्वर आणि हीच ती केदारेश्वराची गुहा. भव्य असे १ मीटर उंच आणि २ मीटर लांब असलेले हे शिवलिंग कमरेइतक्या चौथऱ्यावर आहे. मंगळगंगेच्या पाण्याने ही गुहा सतत भरलेली असते आणि जर आपल्याला या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालायची असेल तर बर्फासारख्या थंड पाण्यातून जाण्याची आपली तयारी हवी. गुहेच्या डाव्या हाताच्या भिंतीवर शिवलिंगपूजनाचा प्रसंग कोरलेला बघायला मिळतो. केदारेश्वराची गुहा ही ४ खांबांवर उभी आहे आणि हे ४ युगांचे प्रतीक आहे असे स्थानिक सांगतात. आता यातील ३ खांब पडले आहेत आणि गुहेचे छत हे एका खांबावर उभे आहे. कथा सांगताना लोक बोलून जातात की जेव्हा हे कलियुग संपेल तेव्हा हा खांब देखील नष्ट होईल आणि गुहा नाहीशी होईल. वैज्ञानिक दृष्ट्या विचार केला तर मंगळगंगेचे पाणी सतत गुहेत असते आणि पाण्याच्या हलत्या प्रवाहामुळे खांबांची झीज होऊन ते निकामी झाले असतील.

आता ट्रेकर्स तिथे जातात, पाण्यात उतरतात, काही लोक तर डुबकी मारतात, पाणी तोंडात घेतात, या सर्व गोष्टींमुळे त्या पाण्यात प्रवेश करावा सुद्धा वाटत नाही तरी काही हौशे नवशे जातात पण त्यांनी स्वतःच्या त्वचेची आणि आरोग्याची काळजी घ्यायला हवी.
किल्ले हरिश्चंद्रगड (Harishchandragad)

महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंचीचे शिखर म्हणजे तारामती शिखर! उंची साधारणतः ४८५० फुट. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. यातील एका गुहेत गणेशाची वेगळ्याच रूपातील जवळपास साडे आठ फुट उंचीची मूर्ती आहे. या सुंदर आणि भव्य मूर्तीला बघून इतर सहा गुहा बघायच्या. यात काही लेण्यांचे काम पूर्णत्वाला गेलेले नाहीये. याच गुहांमध्ये आपली राहण्याची सोय होऊ शकते. आता डावीकडे जाणारी वाट हि आपल्याला अर्ध्या तासात तारामती शिखरावर घेऊन जाते, परंतु वाट तशी धोक्याची त्यामुळे सुरक्षेच्या शिवाय तिकडे जाने शक्यतो टाळावे. शिखरावर जाताना आपल्याला गोमुख बघायला मिळतात. शिखरावरून आपल्याला जवळपासचे सर्व किल्ले बघायला मिळतात आणि जणू आपण जगाच्या वरून बघतोय असा भास होतो. शिखरावर आपल्याला तीन शिवलिंग आढळतात. तारामती शिखरावर गेल्यावर कळसुबाई सर केल्याचा आनंदच जणू आपल्याला मिळतो.

गडावर फिरायला जास्त वेळ लागतो त्यामुळे दोन दिवस देऊनच गड बघायला यावे. फक्त मनोरंजनासाठी एक दिवस पुरेसा ठरेल.

इतिहास-

किल्ले हरिश्चंद्रगड (Harishchandragad)

हरिश्चंद्रगडाची निर्मिती ५व्या किंव्या ६ व्या शतकातील त्रेकुटक अगर कलचुरी या राजघरान्यांच्या काळात झाली असावी असे इतिहासकार सांगतात. गडाविषयी हे झाले पण हरिश्चंद्र पर्वत हा फार पुरातन काळापासून ज्ञात असावा. काशीपुरानात, अग्नीपुराणात व मत्स्यपुराणात याचा उल्लेख आढळतो.

१६७०-७१ च्या दरम्यान शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला असे म्हणतात, याचा कुठे उल्लेख मला तरी सापडला नाही परंतु  महाराज एकदा शेजारीच असलेल्या कुंजरगडावर विश्रामाला थांबताय (याचे साल देखील १६७० आहे) तर हा गड सुरक्षितच असणार असा अंदाज बांधून हे सांगितले जाते.

हा गड मोगलांच्या ताब्यात होता, जवळपास १६८८ ते १७४७ अशा भव्य मोगल राजवटी नंतर मराठ्यांनी पेशवाईत १७४७ मध्ये जिंकला.१७५१ मध्ये गडावरचा कारभार हा माहुली किल्ल्याचे किल्लेदार कर्नाजी शिंदे यांनी गडावर डागडुजीची कामे केली. यानंतर किल्याचा शेवटचा मराठी किल्लेदार हा हरिश्चंद्रगडकर जोशी १८१८ मध्ये कर्नल साईक्स सोबत लढताना वीरमरण आले. याच कर्नल ने १८३५ मध्ये सर्वात प्रथम कोकणकड्यावरून संपूर्ण वर्तुळाकार इंद्रधनुष्य म्हणजेच पहिले इंद्रवज्र पहिले होते अशी नोंद आहे.

चांगदेवांच्या तत्वसार ग्रंथाच्या १०३६ ओव्यांपैकी ४०४ ओव्या हाती लागल्या आहेत. त्यातील एका ओवीत या गडाचा उल्लेख आहे.

राहण्याची व जेवणाची व्यवस्था-

गडावर मंदिराच्या मागे, तारामती शिखराच्या पोटातील गुहांमध्ये किंवा कोकणकड्यावर कॅम्पिंग करू शकतात. गडावर भास्कर चे कोकणकडा इन हे हॉटेल आहे. किंवा तुम्ही स्वतः देखील जेवणाची व्यवस्था करू शकता. गडावर पाण्याचा साठा विपुल प्रमाणात आहे .

Post a Comment

1 Comments