Ticker

6/recent/ticker-posts

धर्मवीरगड / बहादूरगड/ पांडे पेडगावचा भुईकोट किल्ला (dharmvirgad)

धर्मवीरगड / बहादूरगड/ पांडे पेडगावचा भुईकोट किल्ला

बहादूरगड, धर्मवीरगड

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूच्या काही दिवस अगोदरचा अमानुष अत्याचार औरंगजेबाने पेडगावच्या याच बहादूर गडावर केला. महाराजांच्या अमानुष छळाला बघून आजही ती भीमा नदी आपले अश्रू थांबवू शकत नाही. "मोडेल पण वाकणार नाही आणि मरेल पण विकला जाणार नाही", असे आपण लागलीच म्हणून जातो परंतु हे वाक्य खरा करून दाखवणाऱ्या शंभू राजांच रूप बघितलेला पेडगावचा भुईकोट किल्ला आणि आत्ता सध्याचा हा धर्मवीर गड!

पेडगावचा शहाणा ही म्हण नक्की माहीत असेल? तिचाच संबंध या किल्ल्याशी येतो. खान जहाँन बहादूरखान कोकलताश याला छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमिकाव्याने वेडं बनवलं होतं आणि बहादूरखान कसा अतिशहाना ठरला होता हे या किल्ल्याने बघितलंय.

किल्ल्याचे नाव- पेडगावचा किल्ला, पांडे-पेडगावचा भुईकोट किल्ला, बहादूरगड, धर्मवीरगड
समुद्रसपाटीपासुन ऊंची- 
किल्ल्याचा प्रकार- भुईकोट
चढाईची श्रेणी- सोपी
ठिकाण- श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे
जिल्हा- अहमदनगर
सध्याची अवस्था- व्यवस्थित (दुर्गविकासात)
बहादूरगड, धर्मवीरगड


किल्ल्याला भेट द्यायला कसे जाल?

सर्वप्रथम आपण पेडगाव शोधाल तर २ पेडगाव आहेत. एक थोरले पेडगाव आणि दुसरं धाकटे पेडगाव. किल्ला हा थोरल्या पेडगाव या गावात आहे तर धाकटे पेडगाव हे दौंड तालुक्यात पुणे जिल्ह्यात आहे.

पुण्यापासून दौंड मार्गे पेडगाव हे अंतर १०५ कि. मी. इतके आहे.(वाटेत नव्हे पण थोडंस मध्ये गेल्यावर सिद्धटेक च्या गणपतीचे दर्शन देखील या प्रवासात होऊ शकते)

नाशिक वरून हा किल्ला शिर्डी मार्गे २३६ कि. मी. आहे तर संगमनेर मार्गे २१३ कि.मी. इतके अंतर आहे.
आपण अहमदनगर शहरात बस ने येऊन तिथून श्रीगोंदा बस पकडून श्रीगोंदयाला येऊ शकतात आणि तिथून पेडगावला जाणारी बस जर नाही मिळाली तर खाजगी वाहने सतत चालू असतात.
बहादूरगड, धर्मवीरगड

भेटीची वेळ- काही ठराविक वेळ नाहीये

किल्ल्यावर प्रवेश करताना-
किल्ला तसा खूप दुर्लक्षित आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी काटेरी झुडुपे वाढलेली आहेत. त्यामुळे शक्यतो त्यांची काळजी घ्यावी. धर्मवीर गड हा शंभू राज्यांचे आपल्यासाठी एक प्रेरणास्थान आहे त्यामुळे कृपया इथे कुठलाही कचरा अथवा घाण करू नये, शक्य झाल्यास पडलेला कचरा उचलून स्वराज्याप्रति कर्तव्य पार पाडावे.


बहादूरगड, धर्मवीरगड

धर्मवीर गडावर पोहोचण्यासाठी श्रीगोंदयाहुन पेडगाव गावात पोहोचायचे.गावाच्या गडाच्या मुख्य वेशीतून गेल्यावर डाव्या हाताला मारुतीचे मंदिर लागते. पुढे जिर्णोद्धार केलेले भैरवनाथ मंदिर आहे. गाडीच्या माध्यमातून १० मिनिट च्या अंतरातून आपण गडाच्या प्रवेशद्वाराच्या वेशीत आपण पोहोचतो हा उत्तर दरवाजा होय. याच दरवाजातून शंभू राजांना आणि कवी कलशांना तक्ताकुलाह करून आणले होते.पुढे समोर जो स्तंभ आहे तो शौर्यस्तंभ! शंभूराजांना इथेच औरंगजेबाच्या समोर उभे केले होते. त्याच्या शेजारी एक आणखी विरदगड आढळतो तो म्हणजे कवी कलशांना इथे उभे केलेले होते. कवी कलशांनी केलेली शिघ्र कविता इथे लावलेली आहे. शौर्यस्तंभासमोर नतमस्तक होऊन पुढे औरंगजेबाच सिंहासन जिथे होतं तो चौथरा आहे. चौथरा १८६×१५५ फूट इतक्या आकाराचा असून सध्या अवशेष खूप काही शिल्लक नाहीत. सिंहासनाच्या पायऱ्यांच्या मधून आपल्याला खापरी पाईपलाईन दिसते.कदाचित हा धबधबा असू शकेल त्या काळातील किंवा पाय धुण्यासाठी बनवलेली जागा असेल.
बहादूरगड, धर्मवीरगड

धर्मवीरगड तसा ३६० एकर परिसरात असून जुन्या काळात ५२ पेठा या गडात होत्या. दक्षिणेतील सर्वात मोठा व्यापार इथून चालायचा अस म्हणले जाते. सोन्या चांदीचा सर्वात जास्त व्यापार इथेच चालायचा त्यामुळेच महाराजांनी आपला राज्याभिषेक खर्च इथून वसूल केला होता. गडाला बारा वेशी होत्या त्यातील १ हा दिंडी दरवाजा असा उल्लेख आढळतो.पण आता यातील ३ ते ४ दरवाजे आपल्याला पाहायला मिळतात.
बहादूरगड, धर्मवीरगड

बहादूरगड, धर्मवीरगड

चौथरा पाहून झाला की समोर दिसतो तो हमामखाना आणि दिवाण-ए-खास. हमामखाना म्हणजे खाजगीची जागा तिथे आजही आपल्याला बाथरूम, बाथटब यासारखे अवशेष दिसतात. दिवाण-ए-खास ही दुमजली इमारत असून समोरच आपल्याला कारंजा असल्याचे दिसते. त्या काळातील उत्तमोत्तम पाईपलाईन चा नमुना म्हणजे हा किल्ला. दिवाण-ए-खास म्हणजे गुप्त खाजगी चर्चा करण्याचे खास ठिकाण. भीमा नदीच्या काठचा गारवा यावा म्हणून तीन द्वार आणि वरच्या बाजूला ३ खिडक्यांची रचना आपल्याला दिसते.
बहादूरगड, धर्मवीरगड

इथून जी पडलेली जागा दिसते ती म्हणजे राणीमहाल होय. पडलेल्या अवस्थेत असलं तरी आजही त्या काळाची आठवण नक्की करून देतो. राणीमहाल दगडी बांधकामाचा होता परंतु हमामखाना हा विटांच्या बांधकामात आढळतो त्यामुळे त्याच्या बनावटीच्या काळाचा थोडा संशय अजूनही आहे.
बहादूरगड, धर्मवीरगड

बहादूरगड, धर्मवीरगड

गडावरील हे सगळं बघून आपण जायचं ते समोर दिसणाऱ्या लक्ष्मी नारायण मंदिराकडे. किल्ल्यावर ४ महत्वाची आणि इतर छोटीमोठी मंदिरे व वीरगळ आपल्याला बघायला मिळतात. लक्ष्मी नारायण मंदिर हे सर्वात उत्कृष्ट स्थापत्यशास्त्राचा व मूर्तिकलेचा नमुना आहे. २१,२२,२३ जून या तारखांना कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरासारखेच किरणोत्सव बघायला मिळतो. या मंदिराविषयी अभ्यासपूर्ण माहिती तुम्हाला वेबसाईट वर मिळेलच. लक्ष्मी नारायण मंदिरासमोरच बाळेश्वर मंदिर आहे.त्यावरील नक्षीकाम देखील सुंदरतेने नटलेले आहे. याशिवाय रामेश्वर मंदिर आणि मालिकार्जुन मंदिर देखील बघण्यासारखं आहे.
बहादूरगड, धर्मवीरगड

बहादूरगड, धर्मवीरगड

आता गडावरील हत्ती मोट बघायची, समोर एक फलक दिसतो जुनी हत्ती मोट आणि नवी हत्ती मोट. यातील जुन्या हत्ती मोटे कडे जायचं. ही यादवकालीन हत्ती मोट आहे आणि याच मोटेच्या माध्यमातून संपूर्ण किल्ल्यावर खापरी नळाचा वापर करून  पाणी पोहोचवलं जायचे. आपण ज्याला एअरव्हॉल्व (हुसहूसा) म्हणतो त्याची रचना देखील इथे आढळते. भीमा नदी पत्रातून शेजारी खोदलेल्या विहिरीत पाणी आणले जायचे आणि हत्तीच्या मोटीने त्याला उंची देऊन ते संपूर्ण गडभर फिरवले होते. दुसऱ्या म्हणजेच नव्या मोटिकडे गेल्यावर आपल्याला मागच्या सारखीच रचना आढळते. या मोटीच्या निर्मितीची गरज ही जवळपास सव्वा किलोमीटर वर असलेल्या मशिदी मध्ये पाणी पुरवठा  करण्यासाठी केला होता. कोणी बांधली आणि कधी बांधली याची चर्चा इतिहास विभागात केलेली आहेच.
बहादूरगड, धर्मवीरगड

डोंगरासारखा जो भाग आपल्याला किल्ल्यात दिसतो त्याला देखील शौर्यस्तंभा इतकेच महत्व आहे.इथे ७ मजली इमारत होती असे बखरकार लिहितात. कदाचित शंभू राजांना काही काळ इथे कोठडी असेल त्यात ठेवलं गेलं असेल कारण इतरत्र अशी जागा सापडत नाही.किल्ला बघून महाराजांना वंदन करून आपल्या घराकडे मार्गस्थ व्हायचं....


धर्मवीरगडाचा इतिहास-

गडावर जी मंदिरे आढळतात त्यावरून तरी असे वाटते की ही मंदिरे चालुक्य शैलीतील आहेत. गडाचे बांधकाम हे देवगिरीचे यादव यांनी केले. यादवांच्या काळात हा किल्ला भीमा आणि सरस्वती नदीच्या संगमावरील पेडगाव या गावात बांधला गेला. भीमेच्या पलीकडे पांडे हे गाव तर किल्ला जिथे आहे ते पेडगाव! त्यामुळे किल्ल्याचे त्या काळातील नाव म्हणजे पांडे पेडगाव चा किल्ला अथवा काही ठिकाणी पांडे- पेडगाव चा भुईकोट किल्ला असा देखील उल्लेख आढळतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे पणजोबा वेरुळचे बाबाजी राजे भोसले हे यादवांकडे होते, त्यामुळे त्यांच्याकडे हा किल्ला मोकास (देखभालीसाठी) होता.

बहामनी सत्तेच्या वाटण्यानंतर किल्ला निजामाच्या ताब्यात आला. निजामशाही ही भुईकोट किल्ल्यांवर जास्त अवलंबून होती असे इथे पण दिसते. मालोजीराजे म्हणजे शिवाजी महाराजांचे आजोबा देखील या किल्ल्याची निजामाकडे असताना देखभाल करत होते असे काही इतिहासकार लिहितात,परंतु याची सत्यता कितपत योग्य आहे हे सांगता येत नाही. निजामशाही च्या अस्तानंतर हा किल्ला मोगलांकडे गेला.
बहादूरगड, धर्मवीरगड

औरंगजेबाचा दुधभाऊ म्हणून इतिहासात ओळख असलेला खान जहाँन बहादूरखान कोकलताश याला औरंगजेबाने स्वतः दक्षिणेतील सरदार म्हणून नेमले. बहादूरखान दक्षिणेत आल्यानंतर त्याचा मुक्काम म्हणा किंवा त्याची राजधानीच हा किल्ला बनली. भीमा नदीच्या बाजूची भिंत त्याने पुन्हा निर्माण केली आणि किल्ल्याची इतर डागडुजी केली. दक्षिणेत मोगलांचा दबदबा होताच म्हणून त्याला असे वाटायला लागले की तोच दक्षिणेचा सुलतान! त्याच्या किल्ल्यावरील बांधकामांपैकी एक महत्वाचे बांधकाम म्हणजे दुसरी हत्ती मोट. दुसरी का तर पहिली हत्ती मोट ही यादवांनी स्वतः बांधली होती.  २६ मार्च १६८५ रोजी किल्लेदार अब्दुल रहमान ने ही मोट बांधली.

स्वराज्याच्या इतिहासातील सुवर्णक्षण म्हणजे महाराजांचा राज्याभिषेक नुकताच पार पडला होता. तारीख होती ६ जून १६७४, राज्याभिषेकावर नाही म्हणलं तरी थोडा जास्त खर्च झालाच होता. आता हा खर्च कसा वसूल करायचा याच नियोजन महाराजांच्या मस्तकात सुरू होतंच. पावसाळ्याचा काळ असल्याने शेतीची कामे करायला आपले मावळे घरी गेलेले होते आणि गडावर जेमतेम ९ हजारांची फौज होती. महाराजांना गुप्तचर खात्याकडून खबर मिळाली होती की बहादूरगडावर १ कोटीचा खजिना आणि २०० अरबी घोडे आहेत. महाराजानी सैन्याची दोन तुकडे केले, ७००० च एक आणि २००० ची दुसरी. या २ हजार सैनिकांनी बहादूर गडावर हल्ला करून पळत सुटले. त्यांचा हेतू इतकाच होता की गोंधळ उडवून द्यायचा आणि बहादूरखानाच्या सगळया सैन्याला पाठीवर घेऊन पळत सुटायचे आणि किल्ल्यापासून दूर करायचे. हे यशस्वी झालं, बहादूरखान आपलं सगळं सैन्य घेऊन त्या २००० मराठयांच्या मागे गेला आणि गडावर असलेले बाजारबुणगे, थोडंफार सैन्य आणि काही रखवालदार यांना बाकी ७ हजार सैन्याने पुरतं लुटलं. जे लुटता आलं नाही ते पेटवून दिलं. म्हणूनच आज आपण पेडगावचा शहाणा अस बोलतो आणि हा शहाणा म्हणजे खुद्द बहादूरखान...!

किल्ल्याचा जास्त इतिहास सापडत नाही परंतु स्वराज्याशी निगडित २ प्रसंग असे घडलेत की एकामुळे सर्वत्र आनंद पसरतो तर दुसरीकडे मनावर घाव पडतो. कोकणातील संगमेश्वरी छत्रपती संभाजी राजांना पकडले जाते तेव्हा औरंगजेबाची छावणी ही अकलूज ला असते ती तात्काळ बहादूरगडावर हलवली जाते, यावरून हेच कळत की दक्षिणे मधील हे खरंच सुरक्षित ठिकाण आहे. महाराजांना याच किल्ल्याच्या दिवाण-ए-आम मध्ये हजर केलं जाते आणि त्यांच्यासोबत असतात ते स्वराज्याचे छंदोगामात्य कवी कलश! महाराजांवरील तब्बल २६ दिवसांचा अमानुष अत्याचार इथेच झालेला आहे. कवी कलशांना सुचलेल काव्य देखील इथेच लिहिलं गेलंय. या घटनेविषयी तुम्हाला आमच्या वेबसाईट वर नक्की वाचायला मिळेल. (वाचण्यासाठी इथे क्लिक करा)

या घटनेनंतर गडाचा इतिहास सापडत नाही अथवा इतिहासकार त्याकडे लक्ष देत नसावे. माझ्या वाचनानुसार हा किल्ला पेशव्यानकडे गेला असावा कारण ते काही काळ विजयरथावर जणू पेशवाई स्वार होती..त्यानंतर इंग्रजांकडे असेल परंतु त्यांनी या किल्ल्याचा फारसा उपयोग केलेला आढळत नाही.

राहण्याची व खाण्यापिण्याची सोय-

बहादूरगड, धर्मवीरगड

पेडगाव तस इतकं प्रगत नसल्याने तिथे हॉटेल्स मिळणं थोडं कठीण आहे परंतु एखाद्या घरघुती ठिकाणी व्यवस्था होऊ शकते आणि भैरवनाथ मंदिरात राहण्याची देखील व्यवस्था होईल

Post a Comment

0 Comments