Ticker

6/recent/ticker-posts

मधू मकरंदगड (Madhu Makarandgad)

मधू मकरंदगड (Madhu Makarandgad)

महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी दिवसभर सर्व पॉईंट फिरून झाल्यावर नेमक्या सूर्यास्ताच्यावेळी सर्व पर्यटक बॉम्बे पॉईंटकडे धाव घेतात . महाबळेश्वर डोंगराच्या पश्चिम कड्यावरील या पॉईंटवरुन सूर्यास्त विलक्षण विलोभनीय दिसतो . म्हणून त्यास सनसेट पॉईंट असेही म्हणतात . येथून प्रतिदिवशी शेकडो पर्यटकांच्या साक्षीने तेजोभास्कर ज्या डोंगराच्या मागे अंतर्धान पावतो तो किल्ले मकरंदगड . बॉम्बे पॉईंट वरून दिसणाऱ्या याच्या घोड्यावरील खोगीरासारख्या आकारामुळे महाबळेश्वरवासी यास सँडल बॅक म्हणूनही ओळखतात .

मधू मकरंदगड (Madhu Makarandgad)

समुद्रसपाटीपासून १२३६ मी . उंचीवर कोयनेच्या खोऱ्यात वसलेल्या मकरंदगडास जावळीच्या घनदाट अरण्याची नैसर्गिक कवचकुंडले लाभलेली आहेत .

किल्ल्याचे नाव : मकरंदगड किंवा मधू मकरंदगड (Madhu Makarandgad)

समुद्रसपाटीपासून उंची: 1236 मी.

किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग

चढाईची श्रेणी: मध्यम

ठिकाण: महाबळेश्वर जवळ दुधगाव, घोणसपूर हे पायथ्याचे गाव

जिल्हा: पुणे

सध्याची अवस्था: ठीक

किल्ल्याला भेट द्यायला कसे जाल?

मकरंदगडास भेट देण्यासाठी आपण महाबळेश्वर स्थानकावरून सकाळी ८.३० वाजता सुटणारी दुधगावची एस.टी. पकडायची . महाबळेश्वर - महाड या हमरस्त्यावर वाडा कुंभरोशी गावाच्या अलीकडे एक कि.मी. अंतरावर आपली गाडी पार गावाकडे जाणाऱ्या फाट्यावर आत वळते . या फाट्यावरच श्री रामवरदायिनी देवीच्या नावाचा उल्लेख असणारी मोठी कमान लावलेली आहे . हा २० कि.मी. चा पाऊण तासाचा प्रवास करून आपण पार गावात दाखल होतो . हीच बस पुढे मकरंदगडाजवळच्या दूधगांवकडे जाते . शिवकालीन पूल ओलांडून तासभर चालल्यानंतर मकरंदगडाच्या पायथ्याच्या हातलोट गावाचा फाटा लागतो . येथून दूधगांवचा रस्ता सोडून उजवीकडे हातलोट गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने आपण चालू लागायचे . साधारण तासाभरात आपण फाट्यावरून हातलोट गावात पोहोचतो .

किल्ल्याला भेट देण्याची वेळ-

वेळेची काही मर्यादा नाही!

शिवकालीन पूल

आपल्याला शिवकालीन रामवरदायिनीचे मंदिर व शिवकालीन कोयनेवरचा पूल पाहून मकरंदगडास प्रयाण करायचे असल्यामुळे आपण पार गावातच पायउतार व्हायचे . प्रतापगडाच्या दक्षिणेस अवघ्या ३ कि.मी. अंतरावर अगदी गडाच्या कुशीतच पार हे ऐतिहासिक गाव वसलेले आहे . या गावातच भवानीरूपी रामवरदायिनीचे शिवकालातील मंदिर आहे . अतिशय भव्य अशा या मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आलेला असून मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात दगडी सिंहासनावर श्रीवरदायिनी व श्री रामवरदायिनी अशा दोन मूर्ती एकमेकांशेजारी आहेत . जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांची रामवरदायिनी कुलदैवता . प्रत्यक्ष छ . शिवाजी महाराजांचा व समर्थ रामदास स्वामीचा या मंदिराशी शिवकालात संबंध आलेला आहे . देवीचे मनोभावे दर्शन घेऊन आपण डांबरी रस्त्याने चालू लागायचे . येथून पार गांव ओलांडल्यानंतर साधारण २० मिनीटे चालल्यानंतर आपणास दुधगांवकडे जाणारा गाडीरस्ता आडवा येतो . या रस्त्यावर उजवीकडे वळून पुढे काही वेळ चालल्यानंतर एक भक्कम दगडी पूल लागतो . हा पूल ३०० वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी बांधून घेतलेला असून येथे शेजारीच पूलाचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी पूजा केलेली गणरायाची मूर्तीही आहे . कोयना नदीवर बांधलेला हा पूल चार भक्कम कमानीनी तोललेला असून उगमाचे बाजूला पाण्याची धार कापणारे मत्स्य आहेत .


गडाकडे जाण्यापूर्वी आपल्याकडील पाण्याच्या बाटल्या गावातच भरून घ्यायच्या , कारण गडावरील पाण्याचे टाके अवघड जागी आहे . हातलोट गावातून पिण्याच्या पाण्याच्या विहीरीमागून मकरंदगडाची चढण सुरू होते . या पायवाटेने जाताना दोन्ही बाजूस घनदाट जंगल असल्यामुळे तीव्र चढ असूनही वृक्षांच्या गारव्यामुळे आपणांस थकवा जाणवत नाही . साधारण दीड तास खडी चढाई केल्यानंतर आपण मकरंदगडाच्या डाव्या कड्या खाली येऊन पोहोचतो .. येथून उजवीकडे वळल्यानंतर अर्ध्या तासाच्या वाटचालीनंतर घोणसपूरच्या टोकावर बसलेले शिवालय लागते . निसर्गरम्य ठिकाणी वसलेल्या या शिवालयाच्या गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग आहे . या मंदिरातच आपण थोडा वेळ विश्रांती घ्यायची . या शिवालयासमोरून सरळ जाणारी वाट घोणसपुराकडे जाते तर उजवीकडे वर चढत जाणारी वाट गडावर जाते . आपण या उजव्या वाटेने गड चढू लागायचे .

थोड्या वेळातच गडाचा पूर्णपणे ढासळलेला दरवाजा लागतो . हा दरवाजा पार करून आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचायचे . या माथ्यावर पोहोचताच या गडाचे दोन भाग आहेत हे आपल्या लक्षात येते . आपण जेथे पोहोचलेले असतो ते गडाचे नैऋत्य टोक आहे, वायव्य टोकाला दुसरे शिखर आहे म्हणून त्याला मधूगड म्हणतात आणि संपूर्ण गडाला मधूमकरंद गड असे नाव आहे, पण त्याच्या शिखरावर जाण्यासाठी मार्गच नाही , त्यामुळे आपण हेच शिखर व्यवस्थित पाहायचे . येथे समोरच श्री मल्लिकार्जुन शंकराचे पुरातन मंदिर आहे . या मंदिरातील शिवलिंगाची स्थापना स्वतः शिवरायांनी केली असे सांगितले जाते . या छोटेखानी मंदिराच्या समोरच उघडयावर नंदी असून आत शिवलिंग व त्यावर तांब्याचा नाग बसविलेला असून मागेच काळ्या पाषाणातील मल्लिकार्जुनाची मूर्ती आहे . मंदिरातील महादेवाचे दर्शन घेऊन आपण मंदिराच्या मागेच असलेल्या उजव्या बाजूच्या पायवाटेने शे - दीडशे फूट खाली उतरायचे . येथे समोरच खडकात फोडून तयार केलेले पाण्याचे टाके असून त्याच्यावरील कातळावर हनुमानाचे शिल्प कोरलेले आहे . पण या टाक्याकडे उतरताना आपणास काळजीपूर्वक उतरावे लागते . कारण ही सर्व वाट मुरमाड असून त्यामुळे पाय घसरण्याची शक्यता आहे . येथून आल्या वाटेने मंदिरापर्यंत यायचे . मल्लिकार्जुन मंदिराच्या सर्वोच्च भागावरुन पूर्वेला कोयना खोरे व महाबळेश्वराचे अतिशय सुरेख दर्शन होते . परतीसाठी आल्यावाटेने आपण खालच्या शिवालयापर्यंत यायचे . येथून आपण जंगम लोकांची वस्ती असलेल्या घोणसपूर मार्गे खालच्या चतुर्वेट गावात उतरू शकतो किंवा आल्या वाटेने परत हातलोट गावात पोहोचू शकतो . असा हा मकरंदगड प्रतापगडच्या भेटीतच दुर्गप्रेमी पाहू शकतात . पण त्यासाठी एका मुक्कामाची तयारी मात्र हवी .

किल्ले मधू मकरंदगड चा इतिहास-

मकरंदगडाच्या इतिहासावर नजर टाकल्यास हा किल्ला १६५६ मध्ये प्रतापगडाबरोबर शिवरायांनी बांधला . या किल्ल्यावरुन शिवकालात वासोटा व प्रतापगडावर संपर्क ठेवता येत असे . हा किल्ला १८१८ पर्यंत शत्रूच्या कधीच जाव्यात गेला नाही . यातच मकरंदगडाची थोरवी दडलेली आहे . पुढे दिनांक १४ मे १८१८ रोजी मकरंदगड इंग्रजांनी प्रतापगडाबरोबरच जिंकला .

राहण्याची व जेवणाची सोय-

जेवणाची गाव देखील याच घोणसपूर गावात होते.

हातलोट गावात पोहोचायला वेळ झाल्यास घोणसपूर गावातील कुंबालजयदेवीचे किंवा मारूतीचे मंदिर मुक्कामयोग्य आहे . गावात रात्री मुक्कामाची बस येते . ती बस सकाळी ७ वाजता महाबळेश्वरास परतते .

Post a Comment

0 Comments